RSS

Friday, July 22, 2011

कोइ लौटा दे मेरे बिते हुए दिन .... !!!

  "अलबेले दिन प्यारे ....
  मेरे बिछडे साथ सहारे ....
  हाये कहां गये .......
  हाये कहां गये .......
  आंखोके उजियारे .....
  मेरी सुनी रात के तारे ...
  हाये कहा गये ......
      कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन ....
      बिते हुए दिन वो मेरे प्यारे पलछिन" .... !!

   किशोरदांच हे गाणं ऎकायच ..... शांतपणे .... आवाजातला दर्द आणि कविच्या मनातली व्यथा नकळत सैरभैर करुन सोडते. काहीतरी निसटलय हातातून याची खंत मनात चोरपावलांनी प्रवेश करते ..... ते काहीतरी म्हणजे आपलं ...  बालपण ...... आणि नकळत ते क्षण डोळ्यासमोर उलगडायला लागतात रेशमी लडीं सारखे. कौलारु घराच्या वरती बहिण भावंडाबरोबर बसुन टोपलीभर हिरव्या चिंचा मिठ लाऊन खाल्ल्याचे क्षण ! चक्क मुलांमध्ये खेळलेले विट्टी-दांडू, लगोरीचे खेळ, पावसाळ्यात खेळायचा खोपचा म्हणून खेळ. एका बाजूने टोकदार अशी अर्धा फूट लांबीची लोखंडी सळी ....उंच हात करुन चिखलात खोचायची, असं खोचत खोचत दुरवर जायच, खोचल्यावर चिखलात ती उभीच राहिली पाहिजे, खाली पडली की दुस-या भिडूला राज्य!!

   मधल्या सुट्टीत विकत घेतलेली मीठ लावलेली आंबट गोड लाल बोरं, वर्गामध्ये तास सुरु झाला की गुपचुप तोंडात टाकायची आणि आठोळ्या बेंच मागे. चुकुन वर्गावर शिकवणा-या बाईंनी एखादा प्रश्न विचारलाच तर, बोरं आणि आठोळी तोंडात एका बाजुला धरुन उत्तर देतांना जी फजीती व्हायची, त्यानंतर मिळालेली शिक्षा, शिवाय वर्ग झाडणारा शिपाई बेंच मागील आठोळ्या काढतांना बडबड करायचा ती निराळीच.

   हिंदी विषय शिकवणा-या भावसार सरांच्या कोटावर पाठीमागून शाई शिंपडायची, त्यांच्या मफलरचा धागा ओढायचा, त्यांनी मागे वळून बघितलं की काहीच केलं नाही असा साळसुद निरागस भाव चेहे-यावर आणायचा, पण ते आम्हा सगळ्यां गृपला चांगले ओळखून होते. मग हेडमिस्ट्रेस कडे तक्रार.... सुमित्रा मॅडमने हातावर दिलेला छड्यांचा मार अजुनही आठवतोय. एकदा तर आम्हाला मारल्यावर त्या स्वत:च कितीवेळ डोक्याला हात लाऊन बसल्या होत्या, खुप वेळ समजावत होत्या ..... तुम्ही सगळ्या फार हुषार आहात ग ... कशासाठी एवढी मस्ती करता ... खुप अभ्यास करा , मोठ्या व्हा !! या छडयांच्या ऐवजी तुम्हाला बक्षिसाचं मेडल द्यायला मला जास्त आवडेल. मॅडमला असं भावूक होऊन बोलतांना बघून आम्ही किती रडलो होतो त्यावेळेस !!! मग दृढ निश्चय, असं कधी करायच नाही म्हणून, परत एखादा क्षण असा यायचा की परत पहिले पाढे पंच्चावन !!

   श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवसच असायची. खिचडी कितीही खाल्ली तरी खुप भुक लागलेली असायची. शेवटचा तास भुमितीचा. उंचीने कमी असलेले रामनाथ सर हात पुरत नाही म्हणून खुर्चीवर चढून भुमितीच्या आकृत्या काढायचे, समजवायचे, पुसायचे, परत दुसरी आकृती .... बापरे ते हे सगळं इतक भरभर करायचे की नुसतं गरगरायला व्हायचे आणि पोटात उठलेला भुकेचा डॊंब ....  डॊळ्यासमोर भुमितीच्या आकृत्यांचा ऐवजी आईने केलेला सुग्रास स्वयंपाक नाचत असायचा.... अन मग एकदाची बेल वाजली की वही बंद करुन घराकडे धुम ठोकायची, तुम्हीच काढत बसा आणि तुम्हीच पुसत बसा त्या आकृत्या असं म्हणत" 
   
   मराठीचे पुरोहित सर आमचे वर्ग शिक्षक. खांदे नेहेमी ऊंच करुन चालायचे आणि एका संथ लयीत बोलायचे, मग त्यांच्या पाठीमागे त्यांची नक्कल करत चालायचं. त्यांच्यासारखच संथ लयीत बोलायच. बर हे सगळं आम्ही मैत्रिणी आळीपाळीने करायचो. घरात आज्जी गेली आणि त्या गडबडीत बाबा फी द्यायला विसरले, मी मराठीच्या तासाला बसायला टाळायला लागले. पुरोहित सरांच्या ते लक्षात आले, त्यांनी बोलावून सांगितले ..."फी सावकाश भर, पण तासाला बसत जा. तु हुषार आहेस, अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नकोस", त्या वेळेस किती रडले होते मी.

   सगळ्या विषयात चांगले मार्क्स मिळवणारी मी  गणिताच नांव काढलं की शुन्यावस्थेत च पोहोचायची.  पोटात भितीचा मोठ्ठा गोळा उठायचा. गणिताचा पेपर ज्या दिवशी मिळायचा, त्याचे मार्क बघून दिवसभर चेहेरा उतरलेला असायचा, वाटायचं छे, पहिल्यापासून या विषयाकडे निट लक्ष दिलं असतं तर ..... !!!  एक सुखद आठवण मात्र मनावर कायमची कोरली गेलीय....."त्यादिवशी शाळेत गेले नव्हते, तर संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी धावत घरी, अगं आज मराठीचे पेपर्स मिळालेत, तु हायेस्ट!!, पी. आर. कुलकर्णी सरांनी तुझा पेपरमधला आई निबंध वर्गात वाचायाला सांगितला, आणि कुणाला माहितेय, सीमाला !! सगळ्या चिमण्या चिवचिवत होत्या. हयाच पी.आर. सरांनी, तास चालु असतांना मी आणि सीमा गुपचुप "नाव, गांव, आडनांव, पदार्थ..." हा खेळ खेळत होतो, म्हणून दोघींनाही वर्गाबाहेर जायला सांगितले होते. बरं ही खेळायची टुम मीच काढली म्हणून सीमाने बोलणच बंद केलं होतं माझ्याशी, त्यादिवशी पेपर घेऊन सीमाच घरी आली होती आणि भांडणही मिटलं होतं दोघींच !!

   जिल्हा पातळीवरच्या चित्रकला स्पर्धेच बक्षिस मिळालं तेव्हा सातवीत होते, मग तो सर्व शिक्षकांबरोबर काढलेला फोटो, त्यासाठी उडालेली धांदल, कपडे तसे मोजकेच असायचे पण त्यातल्या त्यातही चांगला कुठला ? यावर किती वेळ घालवला होता. रशिदाने वाढदिवसाला भेट दिलेलं गळ्यातलं, कानातलं, अंगठी ही घातली होती ती अंगठी दिसावी म्हणून अगदी हात पुढे दिसेल असा ठेवला होता .... कांही तरी वेगळं म्हणून केसांचा सरळ ऐवजी तिरपा पाडलेला भांग !!

  आत्ता आयुष्याकडे मागे वळून बघतांना जाणवते .... त्यावेळीस गणितात जास्त मार्क मिळवले नाहीत म्हणून आयुष्याच्या गणितात कुठेही चुकले नाही किंवा चित्रकलेत खुप बक्षिसं मिळवलीत म्हणून मोठी चित्रकारही झाले नाही, पण आयुष्याची चौकट मात्र सुरेख रंगवली ... त्यातल्या रंगामध्ये कुठेही विसंगती नाही .... !!!

   हे असे सुंदर क्षण, ओंजळीतून निसटून गेलेत, किशोरदांच्या आवाजातली .....व्यथा ... खंत हळूहळू  आपल्याही मनात झिरपायला लागते. डोळ्यांच्या कडा उगाचच ओलावतात, आणि जगजीत सींगजीच्या आवाजातला दर्दभ-या ओळी परत मनात उमटायला लागतात ...

   "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो ...
   भले छिन लो मुझसे मेरी जवानी ...
   मगर मुझको लौटा दो बचपनका सावन ...
   वो कागजकी कश्ती, वो बारिश का पानी .... "

   परवा फवारे बघायला गेलो होतो. उंच उंच भुईनळ्यांसारखे उडणारे ते कारंजे, पांढरे शुभ्र, फेसाळ, मध्येच त्यात लाल, हिरवे, पिवळे रंग मिसळत होते, फ्लोरोसंट रंग....चमकणारे. ते तुषार अंगावर घेत होतो. पाठीमागे वळून बघितले तर रंगीबेरंगी फुगे, त्यांना हात लावला अन मनातली सगळी खंत गळूनच पडली, गुब्बा-यांसारखं मन हलकं झालं आणि इथून तिथे धावत सुटलं.  तिथेच भेटला चेहे-याला चित्रविचित्र रंगरंगोटी करून, स्वत:च दु:ख विसरून पोटासाठी जगाला हसवणारा जोकर. "बुढ्ढीके बाल" साखरेचा कापूस खाणारा तो "गोटुराम", आईला सोडून उंटावर बसवलय, म्हणून रडणारी ती "पिटूकली"

  ते उंच उंच उडणारे तुषार, ते फुगे, ते बुढ्ढीके बाल, सगळं तसचं होतं, तिथेच होतं !! आपल्या मनातच असतं हे बालपण, फक्त आठवणींची कुपी उघडायची आणि मस्त सुगंध घ्यायचा !!!

   किशोरदांच्या आणि जगजित सींगजीच्या व्यथित स्वराला आता मस्तपैकी रॉक म्युझिकचा ठेका आला होता. फवा-यांचे तुषार अंगावर घेऊन आम्ही परतत होतो, मनातल्या बालपणाचा सुंगध मनात दरवळत ठेऊन !!!

*********************************







7 comments:

Anonymous said...

बालपणीच्या आठवणी कितीदाही ऐकल्या तरी खूप खूप छान वाटतात आणि कुणाच्याही ऐकल्या तरी आपल्याच वाटतात !!! अतिशय छान लिहिलं !! किती चांगले शिक्षक आणि कित्ती चांगली शाळा !! बालपणच कितीसुंदर असत !!

दिप्ती जोशी said...

धन्यवाद राजेश्वरी,

बालपणाचा तो सुखद काळ म्हणजे मोरपीसांसारखाच असतो !!
मागे वळून बघतांना खुप आनंद देऊन जातो. - दिप्ती

rohinivinayak said...

khup chhan! shaletlya aathvani, panyache karanje, phuge, tuza dress, sarv kahi mast!

दिप्ती जोशी said...

धन्यवाद रोहिणी,

बालपणीच्या आठवणी आणि सगळच मस्त असतं.

Shyam said...

आठव !!!!!!!!!!!!!!!!!!
दीप्ती ताई तुम्ही आमच्या पण बालपणीचा आठवांचा खजिना च उघडून दिला
अन अश्या गोड अन रम्य बालपणीच्या ....आठवणी....अन ह्याची गोडी लावली
ना.सी.फडक्यांचे एका अप्रतिम ललित लेख मुळे...." हरवली म्हणून सापडली "
फडताळात किल्ली हरवली अन ती शोधता शोधता एका पेटीत सापडलेल्या
बालपणीच्या शुल्लक वस्तू-न-मधून गवसलेले बालपण ...........
जेंव्हा रफी एका अप्रतिम भजनाद्वारे सांगत असतो कि सुख के सब साथी दुख मे न कोई ....
त्याच वेळी रफी-आशा शमशाद अन मन्ना आश्वस्त करीत असतात दुख भरे दिन बीते रे भैय्या
अब सुख आयो रे.....डेविड मन्ना अन आशा अन सगळ्या बालकांची टोळी आपल्याला शिकवतेय
नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है......कुठे गेला हा सगळा सुवर्ण काळ ???????
असे उत्कट लिहिणारे गाणारे ऐकणारे ...सगळच धुसर झालय...........!!!!!!
पण माझे मन मला बजावतंय कि नाही अजून सगळच नाही संपलय.....
तो आहे तो बघतोय अन सगळ छान छान च होईल.....पण तुम्ही जागे व्हा झोपू नका !!!!
मी गेलो पुन्हा वाहवत.....!!!
दीप्ती ताई तुमच्या ब्लॉग चे शीर्षक हेच सुचवतय न ?आठवणी आयुष्याच्या......
लिहित जा सांगत जा ......अन सगळ्या रसिकांना अश्या रम्य आठवणी त घेवून जात जा !!!!!!!!!

SUSHMEY said...

khup sunder lihitay... khup welane pratikriya detoy pan tmhi samjun ghyal..... khup sunder

दिप्ती जोशी said...

Thanks Shyam aani sushmeya

Post a Comment