RSS

Saturday, August 21, 2010

"उध्वस्त"

"उध्वस्त"
लगबगीने काम करणारे माझे हात घडयाळयाच्या काटयांकडे लक्षं जाताच आणखीनच वेगाने काम आटोपत होते. दहा मिनिटांनी निघायलाच हव. आठ पंचवीसला निघाले नाही तर आठ चाळीसची बस चुकते, मग कंपनीत पोहोचायचे म्हणजे वीस रुपये रिक्शाचे खर्च करा आणि वरतून उशीर होणार ते वेगळेच. त्यातच राहुलचा हट्ट चालला होता, "आई, मला फ्रिजमधला पेप्सीकोला खायला दे ना" म्हणून! मी त्याला कसबस समजावले. बास्केटमध्ये त्याचे दुध, खाऊचे डबे, दोन केळी आणि संध्याकाळी बदलायचा ड्रेस घातला. पर्स गळ्यात अडकवली. राहुलला सांभाळणा-या मावशींच घर आमचा फ्लॅट मध्ये दोन बिल्डींग सोडून होतं.
राहुलला अच्छा करुन मी खाली आले. अतिशय वेगाने माझी पावलं पडत होती. बिल्डींगमधले दोन फ़्लॅट मागे टाकून मी डावीकडे वळले, आणि एक क्षणभर माझ त्याच्याकडे लक्ष गेलं, कालच्या प्रमाणेच आजही तो तिथे उभा होता. अतिशय प्रसंन्न व्यक्तिमत्वाचा, निळसर रंगाचा रेमंडचा शर्ट त्याने घातला होता, मागे वळवलेले त्याचे केस हवेवर उडत होते. मनातल्या मनात मी अस्वस्थ झाले. गेले चार दिवस असच चालल होत. त्याला तिथे अस उभ राहिलेल बघीतल की मला काहीतरी व्हायच!, आत कुठेतरी हलल्या सारख व्हायच. तो..........................तो...........................लंगडा होता. लगडा! शब्द वापरला आणि मला वाईट वाटल.’ त्याला पाय नव्हते’ पण का कुणास ठाऊक हे शब्द पण मनाला टोचत होते. मांडयांपासून त्याला पाय नव्हते. दोन्ही मांडयांच्या खाली दोन लाकडी गोल बसवली होते.
आठ चाळीसची बस पकडायचीय हे विचार मनात असूनही तो उभा होता ती बिल्डींग ओलांडून जातांना माझी पावल संकोचली. आमच्या सारखी धावपळ करणारी माणसं बघून काय वाटत असेल त्याला? एक क्षणभर मागे वळून त्याच्या चेहे-यावरचे भाव निरखावेत अस वाटल,पण तरीही मी मागे वळून बघीतल नाही. माझ्या डोळ्यात दाटून आलेली अनुकंपा, सहानुभूती! कदाचीत तो आणखीन अपमानीत होईल या विचाराने मी वळून बघीतल नाही, पण मग बघीतल नाही याची खंतही वाटत राहीली, त्याला अस तर वाटणार नाही ना ’ही लगबगीने धावपळ करणारी माणस माझ्यासारख्या लंगडया माणसाकडे कशाला बघतील ’ या विचाराने.
प्रयत्नपुर्वक त्याच्याकडे न बघता ती बिल्डींग ओलांडून मी पुढे गेले आणि मनातली विचारांची आंदोलन झटकून टाकली. आठ चाळीसची बस मिळाली. ऑफिसमध्ये मी वेळेवर पोहोचले. मग सेल्स ऑफर, कोटेशन्स, बिलींग...... दिवसभराच्या कामात मी त्याला पार विसरले.
संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडले आणि समोरच एक लंगडा भिकारी दिसला आणि मला पुन्हा त्याची आठवण झाली! भिका-याला बघून त्याची आठवण झाली म्हणून स्वत:चाच रागही आला. त्याच्या लंगडेपणामुळे त्याच्यात आणि भिका-यात साम्य़ असावे काय? किती प्रसंन्न व्यक्तिमत्वाचा होता तो! मनातल्या विचारांना झटकून टाकण्याचा मी प्रयत्न केला.
ब-याच दिवसांपासून मी त्याला पहात होते, म्हणजे लाकडी गोल ठोकलेल्या त्याच्या पायांकडे मी लांबूनच पहायचे, पण मी त्याच्या चेहे-या कडे कधीच पाहिल नाही, म्हणजे माझ धैर्यच व्हायच नाही. एक दिवस बघीतलं तर पांढरी लान्सर आली, ड्रायव्हरने कारचा दरवाजा उघडला अणि ड्रायव्हरच्याच मदतीने तो आत बसला. म्हणजे तो कुठेतरी जात होता हे निश्चित, पण मग कुठे जात असेल? त्याच्याविषयी बरच काही जाणून घ्यावेसे वाटत होते. त्याच लंगडेपण आतल्या आत बोचत होत, त्याच्याविषयी मन दयेने भरुन येत होत. त्याच्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे बघून त्याला पाय नसण खूपच खटकत होतं.
ही खंत ह्याच्याजवळ बोलून दाखवावी अस वाटूनही मी गप्प बसली "तुम्ही काय लेखिका ना म्हणजे भारीच सेंटी! अशी हजारो लंगडी माणस जगात आहेत, सगळ्यांचाच विचार आपण करायला लागलो तर आपल्या डोक्याचा पार भुगा होणार, मग स्वत:विषयी केव्हा विचार करणार?" अस म्हणून ह्यांनी माझ बोलण हसण्यावारी उडवल असत.
मध्यंतरी आमच्या कंपनीत युनियनचा नवीन करार झाला पगारवाढ, वाढीव बोनस त्याचबरोबर आणखीन एक नवीन बदल झाला, लंचटाईम एक तासाच्याऎवजी अर्धा तास, आणि सकाळी नऊच्या ऎवजी साडेनऊची वेळ झाली. माझी जाण्याची वेळ बदलली. नंतर पुन्हा कधीच तो मला दिसला नाही. बिल्डींग ओलांडून जातांना क्षणभर त्याची आठवण यायची. गेल्या सहा महिन्यात मी त्याला पूर्ण विसरले. अगदी त्याचे ओझरते बघीतलेले ’ते’ पायही लक्षात राहिले नाही. एक समाधानाचा सुस्कारा सोडला. त्याच्या न दिसण्याने निदान मनातली ती अनामिक खंत तरी कमी झाली.
त्यादिवशी संध्याकाळी हे घरी आले तेच मोठया आनंदात, हातात पेढयांचा मोठा बॉक्स, अन त्यांच्या आवाजाने घर नूसत दणाणून गेल,"अनुराधा, हा पेढयांचा नैवेद्दय देवाला दाखव, अग आपल घराच लोन सॅक्शन झाल, आता आपण आपल्या प्लॉटवर छान बंगला बाधायचा" बंगल्याच स्वप्न आता पुर्ण होणार या विचाराने मन आनंदीत झाल होतं, राहुल तर नूसता नाचत सुटला.
बंगला बांधायचा म्हणजे चांगल्या आर्किटेक्चर कडून प्लान काढून घायला हवा. ह्यांनी एक दोन मित्रांना फोन करून विचारल, त्यांच्याकडून आर्किटेक्चर राजवाडे फार हुषार आणि नावाजलेले आहेत अस समजल. ह्यांनी मला फोन करुन संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर परस्पर राजवाडयांच्या ऑफिसमध्ये यायला सांगीतलं. संध्याकाळी आम्ही दोघं भेटलो, आणि त्यांच्या ऑफिसच्या दिशेने चालायला लागलो, तस जवळच होत. "अनिकेत राजवाडे (बी.ई., आर्किटेक्ट)" ऑफिसवरची पाटी वाचून किंचीत हसायला आलं, "अनिकेत" म्हणजे घर नसलेला! लाखो लोकांना घराचे प्लॅन काढून देणारा हा आर्किटेक्चर घराविना! गंमतच वाटली. तळमजल्यावरच ऑफिस बघून जरा हायस वाटल, जिने चढायचा त्रास नाही या विचाराने, कारण इथले बहुतेक सगळे ऑफिसेस पहिल्या किंवा दुस-या मजल्यावरच होते. कांचेच दार ढकलून आम्ही आत शिरलो. वातानुकुलित ऑफिसच बाह्यदर्शन मनाला सुखावणार होत. अगदी समोरच गणपतीची भव्य पाचफुटी मुर्ती, तिला घातलेला गुलाबाच्या फुलांचा हार, आणि त्यासमोर लावलेली मंद सुवासाची उदबत्ती! वातावरणात एक पावित्र्य भरुन राहिलं होतं. त्या मुर्तीच्या बाजुलाच असलेल्या निळ्या फोमच्या कस्टमर्स साठी असलेल्या आठ ते दहा खुर्च्या. समोर अर्धवर्तुळाकृती निळसर काचेच टेबल, त्यावरचा इन्टरकॉम! त्याच्या पलीकडे खुर्चीवर बसलेली सुरेख रिसेप्शनीस्ट! तीने गोड आवाजात आमच स्वागत केलं. "राजवाडेंना भेटायचय" हे म्हणाले "एक मिनिट", असं म्हणून तिने इन्टरकॉम उचलला. "आतमध्ये दुस-या कस्टमरबरोबर मीटींग चालु आहे, थोडा वेळ बसावे लागेल" ती उत्तरली. आम्ही दोघही शांतपणे ऑफिसच निरिक्षण करत बसलो होतो. एक विस मिनिटांत तिने आम्हाला आत जायला सांगीतले.
आतल ऑफिस आणखीनच छान होत. एक काळं,समोरून खालपर्यंत अ‍ॅक्रेलीकच्या काचा लावलेलं मोठं टेबल, बाजूच्याच काचेच्या शेल्फमध्ये ठेवलेल्या निटनेटक्या बॉक्स फ़ाईल्स! टेबलवरच आकर्षक पेन स्टॅन्ड! आणि त्या पलिकडे झुलत्या खुर्चीवर बसलेले रुबाबदार ’अनिकेत राजवाडे’ एक क्षण त्यांच्याकडे बघितलं आणि जाणवल, ह्यांना कुठेतरी बघीतलय, कुठे ते मात्र आठवत नव्हत. हे त्यांच्याशी बराच वेळ चर्चा करत होते, त्यांची साईट व्हिजिट, प्लान याविषयी सगळ बोलून झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. राजवाडयांकडून आमचा प्लान आला, महानगरपालिकेकडून तो मंजूर झाला.आणि चांगलासा मुहुर्त बघून कामाला सुरुवात झाली. मधून मधून मी साईटवर जात होते. हवेनको ते बदल सुचवत होते. बघता बघता बंगल्याचे काम पुर्ण होत आले होते. हे तर सगळ्या कामात इतके व्यस्त होते की माझ्याशी दोन शब्द बोलायलाही त्यांना सवड होत नव्हती. सगळ काम पुर्ण झाल्यावर ह्यांनी समाधानाचा श्वास टाकला.
"अनुराधा, आज आपण सकाळपासूनच बंगला बघायला निघूया, मग तिकडूनच बाहेर जेवायला जाऊ या". म्हणजे आज अजिबात काम नाही, मस्त एन्जॉय करायचा दिवस! मी आणि राहूल लवकरच तयार झालो. बंगल्यावर पोहोचलो. सुरुवातीच्या काळात काय काय सोयी हव्यात ते सांगितल्यानंतर माझ येण झालच नव्हत. त्यामुळे मला कधी एकदा पुर्ण झालेल काम बघेल असं झाल होत. मी बंगल्यात शिरले आणि चकित होऊन बघतच राहिले! इतक सुंदर माझ घर! संगमरवरी देवघर, एकावर एक पाय-या, त्यावरची छत्री, किचनमधल्या टाईल्स, ट्रॉलिज, ओव्हनची सुबक जागा, हॉलमध्ये तिन पाय-य़ा चढून गेल्यावर केलेली डायनिंग टेबलची व्यवस्था, भिंतीतल्या शोकेस, कॉर्नर पीस, बेडरुमच्या फ्रेंच विंडोज आणि वॉर्डरोब! मी अविश्वासाने सगळ बघत होते, हे माझच घर का? अशा संभ्रमात. स्वप्नातल घर साकार झालेल बघून मन समाधानाने भरुन आले होते. मनातल्या मनात मी आर्किटेक्ट राजवाडयांना धन्यवाद दिलेत.
ह्यांच्या चेहे-यावरपण समाधान दिसत होते. मी म्हटल ह्यांना "अनिकेत राजवाडयांना जाऊन भेटून येउया, त्यांचे आभार मानायला हवेत आणि त्यांना एक छानशी भेट देउया त्यांच्या घराला शोभेल अशी, मी तर म्हणते ताजमहालाची छोटीशी प्रतिकृती देउया, त्यांची बायको खुश होइल" माझी बडबड चालूच होती. ह्यांनी एक खोल निश्वास सोडला, अगदी मला जाणवेल असा, मी चमकलेच, "कां हो काय झाल उदास व्हायला? "अग, बिचारे, दोन्ही पाय नाहीत त्यांना" हे उद्गारले, "काय, पण इतके दिवसात बोलला नाहीत तुम्ही कधी" "अग, घराच्या कामात इतका गुंतलो होतो आणि विषयच निघाला नाही तसा. आत्ता आठवल, राजवाडयांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना कुठेतरी बघितल्या सार वाटत होत. मी आठ चाळीसची बस गाठायला धावायचे, तेव्हा तो उमद्या प्रसंन्न व्यक्तिमत्वाचा, पाय नसलेला तरुण ती बिल्डिंग ओलांडतांना दिसायचा! हाच तो अनिकेत!
"मी अनिकेत राजवाडयांना भेटले तर तुमची काही हरकत आहे का?" मी ह्यांना विचारल."माझी हरकत नाही, पण उगीच त्यांच मन दुखावलं जाईल अस काहीतरी त्यांना विचारु नकोस म्हणजे झाल." मी राजवाडयांच्या ऑफिसमध्ये पोहोचले, रिसेप्शनिस्टची परवानगी न घेताच आत गेले, झुलत्या खुर्चीवर राजवाडे बसले होते, समोर कस्टमर बसले होते,त्यांच्या बरोबर काही चर्चा करत होते,त्यांचाकडे बघून त्यांना पाय नाहीत यावर कुणाचाच विश्वास बसला नसता. मला बघून त्यांना खूप आश्चर्य वाटल्यासारखे दिसले आणि ते थोडेसे डिस्टर्बही झाल्यासारखे दिसले, मी अपॉइटमेंट न घेता आल्यामुळे. समोरच्या कस्टमरजवळ दिलगिरी व्यक्त करत त्यांनी त्यांना थोडयावेळासाठी बाहेर जायला सांगितले.
"बसा मिसेस लिमये, हसून ते उद्गारले, काही प्रॉब्लेम झाला आहे कां?, माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या, " राजवाडे, तुम्ही कधी बोलला नाहीत, मी ऑफिसला जातांना रोज तुम्हाला बघायचे, खूप वेळ अस्वस्थ व्हायचे, काही सुचायच नाही, का अस व्हायच समजत नव्हत.! तुमच्या समोरून चालतांना, माझीच पावल पण ती टाकतांना अपराध्यासारख व्हायचं...........आवेगाने मी बोलत होते, डोळ्यातून आसवं वहायला लागली होती. अरे, अरे, मिसेस लिमये, मला राजवाडे म्हणण्यापेक्षा अनिकेतच म्हणा, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्याविषयी जाणून घ्यायचयं ना, तस तुम्हाला माझ्याविषयी सांगण्याचे काही कारणच नाही, पण तुमच्या स्वच्छ, सरळ मनाला झालेला त्रास मला जाणवतोय, एखाद्याचे दु:ख मनाला जाउन भिडले की असं होत, माझ्याबद्दल मी कधीच कुणालाच काहीही सांगत नाही, पण आज तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या मोठया वयाचा विचार करून.........................अगदी साधी आहे कहाणी..............!
आर्किटेक्चरच शिक्षण घेउन मी नुकताच मी कॉलेजमधून बाहेर पडलो होतो. आईचा एकूलता एक मुलगा, बाबा मी सातवीत असतांनाच गेले होते, बाबांच्यापाठीमागे आईने शिक्षिकेची नौकरी करून मला शिकवल होतं, वडिलोपार्जित इस्टेट होती पण आईच्या एकाकीपणाचा फायदा घेउन आमच्या वाटेला काहीच आले नव्हते. अगदी रहायला चांगले घरही नव्हत. मीत्रांची चांगली घरं बघीतली की वाइट वाटायच, मनाशी निश्चित ठरवल होत की स्वत:चा व्यवसाय सुरु केल्यावर छान घर बांधायच, आणि आईला सुखात ठेवायच. त्याचवेळेस व्यवसायाच्यानिमित्ताने देवधरांशी ऒळख झाली, त्यांना माझा स्वभाव, माझं शिक्षण, वागणं सगळच आवडलं होतं, त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुली साठी माझी निवड केली, पण मी त्यांना माझ्या घरातल्या परिस्थितीची जाणिव करून दिली होती, तरीही त्यांनी त्यांच्या मुलीशी, सुरुचीशी माझी ओळख करुन दिली होती, परिचयाच आवडीत आणि आवडीच प्रेमात रुपांतर कधी झाल, कळलच नाही. व्यवसायात मी स्थिर नव्हतो, माझी थांबण्याची तयारी होती, पण देवधरांची थांबण्याची तयारी नव्हती. लवकरातला मुहुर्त काढून थाटात लग्न झालं, आई तर खूप खूश होती सुनेवर.
लग्न झाल्यावर व्यवसायाच्या व्यापामुळे बाहेरगावी फिरायला जाता येणार नाही याबद्दल मी सुरुचीला सांगितले होते. पण अगदीच कुठे नाही तर पप्पांची कार घेउन आपण माथेरानला तरी दोन दिवस जाउया !असा हट्ट धरला. मी पण तिच मन मोडू नये म्हणून तयार झालो. आई तर खूप काळजी करत होती, निट सांभाळून जा म्हणून वारंवार बजावत होती. आईचा आणि सुरुचीच्या पप्पांचा निरोप घेउन आम्ही निघालो.
सुरुचीला वेगाच फार वेड होत. कार चालवतांना ती खूप वेगात चालवावी असा तिचा हट्ट असायचा. वेगाने कार चालवतांना बघून तिला थ्रील वाटायच! त्यादिवशी माथेरानला जातांना म्हणत होती "अनिकेत वेग वाढव ना.................. अजून वेगात..............काय मस्त वाटतय बघ...................! ही थंड हवा...............काय मजा येतेय ना?.......................!!! मलाही काय झालं होत समजत नव्हत, मी वेग वाढवतच होतो................!ते भयंकर वळण, त्या वळणावरुन येणारा ट्रक दिसलाच नाही..........ट्रकची जोरात धडक बसली.......क्षणभर काही समजलच नाही. शुध्दीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो, आई माझ्याजवळ बसून आसव पुसत होती. प्रथम मी सुरुचीची चौकशी केली, आणि कळल तिला केवळ मुका मारच बसला होता, हात फ्रॅक्चर झाला होता आणि प्लॅस्टरमध्ये ठेवला होता. सुरुचीचा विचार करता करता एक असह्य कळ आली पायातून! पाय हलवून बघण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एक जिवघेणी कळ! पायावरच पांघरूण बाजूला केलं आणि........ आणि............ जे कांही बघीतलं ते भयंकर होतं! माझी करूण आरोळी सा-या हॉस्पिटलभर घुमली. माझे मांडयांपासून दोन्ही पाय कापले होते! ओंजळीत चेहेरा लपवून मी रडत होतो लहान मुलांसारखा!
हॉस्पिटलमधून घरी आलो, वाटल, सुरुची घरी असेन, पण ती माहेरी गेलेली होती. मन आंतल्या आंत घुसमटल! सुरुची श्रीमंताची एकूलती एक मुलगी होती, ती ही असली तडजोड स्विकारणार नव्हती याची जाणिव होती मला.पण तरीही मला तिच्या आधाराची आत्ता खूप गरज भासत होती, आत्ता लगेचच तिने अस जाऊ नये असं वाटत होत. तिने मित्र म्हणून तिला आवडणा-या माणसाचा स्वीकार करावा पण माझ घरकुल अस मोडून जाऊ नये आणि ब-याच अंशी ती ही जबाबदार होती या अपघाताला! तिच पत्नी म्हणून घरात असणंच मला खूप धिर देणारं होतं. पण नाही सुरुचीने घटस्फोटाची नोटिस पाठवली, मी ही कुठलाही वादविवाद न करता त्यावर सही केली, सहा महिन्यांनी आम्ही विभक्त झालो.
माझं घराच स्वप्नं अस तोडून मोडून गेलं! पार उध्वस्तं झालं!!!!!!!!!
तरीही मी उभारी धरली. माझे पाय कापले गेले म्हणजे सगळच संपल नव्हत! माझ्या हातातली कला अजुन शाबुत होती. ईश्वराने दिलेली डोळ्यांची, हातांची अनमोल देणगी माझ्याजवळ होती. निष्णांत डॉक्टरांनी ऑपरेशन करून हे लाकडी गोल माझ्या मांडयात बसवले, ज्याच्या आधाराने मी उभा रहायला लागलो. सुरुवातीचे काही दिवस रिक्शा, आणि व्यवसायात जम बसल्यावर कार घेतली, पुर्णवेळ नोकर ठेवला, आणि मग सगळी घडी निट बसली.
माझ्या व्यवसायात स्थिरावलो, नाव कमावलं, किर्ती कमावली, संपत्ती मिळवली. आता मी खरोखरच खूप तृप्त झालोय.
मी घराचे सुंदर प्लॅन्स बनवतो. त्या घरात रहायला जाणा-या त्या कुणीतरी दोघांचे समाधान, आनंद बघतो, आणि आतल्या आत मी सुखावतो, त्यांचा आनंद मी स्वत: अनुभवतो. त्या सुंदर घरात रहायला जातांना ती कुणीतरी दोघं! स्वप्न रंगवणार आहेत, घर सजवणार आहेत................. असा विचार करतो आणि माझं उध्वस्त झालेलं घर त्या सुंदर घरांमध्ये विसरून जातो."
माझे डोळे काठोकाठ भरुन आले होते. नवीन घरात रहायला जातांना त्याचं उध्वस्तं घर आठवून मी मनांतल्या मनांत अंत:र्मुख होणार होते.
सौ.दिप्ती जोशी, डोंबिवली.
*******************************************************

Sunday, August 15, 2010

"प्रतिबिंब"

"प्रतिबिंब"

माझ्या अभ्यासिकेच्या खोलीतून ते घर दिसतं. तीन खोल्यांच छोटेखानी! समोर अंगण असलेलं. त्या अंगणात रोपं लावलीत,अबोलीची, झेनियाची आणि धुंद करुन टाकणा-या मोग-याची. आमच्या मोठ्या बंगल्यापुढे ते घर फारच छोटस दिसत, तरीही मला ते खूप आवडतं.
चार ते सहा हा माझा वेळ लेखन, वाचन आणि मनन करण्याचा. एकदा या अभ्यासिकेत आले की मी लिखाणात आणि वाचनात दंग होते. रोजनिशी लिहायची हा नियम मी न चुकता पाळते. त्यानंतर चांगली पुस्तकं वाचून त्यावर मनन करायचं. चार ते साडेपांचपर्यंत हा कार्यक्रम व्यग्रतेने चाललेला असतो. साडेपांचच्या दरम्यान ती बाहेर येते, अंगण झाडायला आणि माझं वाचनातल लक्ष उडतं तिच्या मोहक हालचाली न्याहाळण्यात गुंतून जातं अंगणाचा कानाकोपरा स्वच्छ करणारे तिचे गोरे, काचेच्या बांगडयांनी भरलेले हात. साडी वर खोचून,कपाळावर आलेले केस मागे सारुन, झाडाच्या मुळांशी कोरुन नवीन माती घालतांनाची तिची व्यग्रता! हे सारं करत असतांना घरातून तिची छोटी धावत येते, मळक्या हातांनीच ती तिला उचलून घेते, गोल गोल गिरकी घेत तिच्या गोब-या गालांची पापी घेते. छोटीला घेऊन ती घरात गेली तरी हाताच कोपरे टेबलावर टेकवून, हाताच्या ओंजळीत हनुवटी टेकवून मी कितीतरी वेळ त्या घराकडे बघत रहायची. रस्त्याच्या एका बाजूला आमचा बंगला आणि दुस-या बाजूला ते घर. फार लांब नाही. या एवढया अंतरावरूनही मला त्या घरातली स्पंदन जाणवायची. त्या घराची दारं, खिडक्या, अंगण सारे माझ्याशी गुजगोष्टी करायचे, हवेबरोबर मंदमंद हेलकावे घेणारे पडदे त्या मालकिणीचं गुपीत मला सांगायचे.
मला माहित होतं, आता ती घरात जाणार छोटीच आणि तिचं आवरणार. तो येण्याच्या आत. काठपदराची साडी असली तर लांब बाह्यांचा ब्लाऊज,लांब वेणी, त्यावर माळलेला मोगरीचा गजरा. तलम साडी असेल तर त्यावर स्लिवलेस ब्लाऊज, लांब केसांचा, उंच मध्यभागी घातलेला अंबाडा. ती अशी आवरून तयार झाली की माझं घडयाळाकडे लक्ष जायचं, साडेसहा झालेले असायचे, व्हिजीटसाठी सातला बाहेर पडायचयं. सात ते आठ विवेकानंद केंद्रात मोफत उपचार, आठ वाजता खालचा दवाखाना उघडायचा, मग पेशंटची गर्दी व्हायची, त्यांची दुखणी, गा-हाणी, त्यांचे इलाज,औषाधोपचार यामध्ये ’ते घर आणि ती’ सारं काही मी विसरून जायचे.
एक कोडं माझं मलाच उमगत नव्हतं. ते घर, त्या घरातली ’ती’ आणि इतर माणसं मला आवडत होती, त्यांना बघणं, त्यांना न्याहाळणं,माझा अगदी आवडता छंद होता, तरीही ती माझ्या दवाखान्यात आली की तिच्याशी अत्यंत तुसडेपणाने वागायची, तिचा अपमान करण्याची एकही संधी मी सोडायची नाही, अंतर्मुख होऊन विचार करायला लागले की मला अपराधी वाटायचे, असं कां? खुप विचार करून शोधण्याचा प्रयत्न करायचे, पण कारण सापडत नव्ह्ते. मी एक प्रतिष्ठित डॉक्टर होते, मला असं वागण शोभत नव्ह्ते, हे मलाही कळत होते, तरीही हे असं घडायचच, मग मनाला चुट्पुट लागायची. पुन्हा असं होऊ द्यायच नाही असं ठरवूनही परत असच काहीतरी घडायचच.
त्यादिवशी तिच्या छोटीला, सायलीला ताप होता, लगबगीने आल्याने तिला श्वांस लागला होता,सायलीला तपासायला घेतलं आणि हीची बडबड सुरु झाली, "काल रात्रीपासुनच ताप आहे, रात्रभर जागी होते ती आणि मी, फारच काळजी वाटतेयं हो, कसला असेल ताप?, बरं वाटेल नां लवकर?, ती फारच नाजुक आहे" आज मी मनाशी नक्की ठरवलं होतं तिच्यावर रागवायचच नाही, त्याचवेळेस सायलीने तपासायच्या टेबलवर शु केली, तरीही मी तुसडेपणा करणार नव्हते, ती घाईगर्दीत दवाखान्यात आली आणि सायलीच्या आजारपणाच्या काळजीमुळे दुपटं आणायला विसरली असणार, मी कंपाउडरला कपडा आणायला सांगणारच होते, तेवढ्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं, सायलीने टेबल ओलं केलं आहे याकडे तिच लक्षच नव्ह्तं, मायेने तिचे डोळे भरुन आले होते, सायलीविषयी वाटणारे प्रेम तिच्या नजरेतुन ओसंडुन वहात होतं. ती नजर बघीतली आणि क्षणभर मी माझे अस्तित्वच विसरले, माझ्या मनावरचा ताबा सुटला, मी जोरात ओरडले," अग बघतेस काय अशी बावळटासारखी, मुलीने सगळं टेबल ओलं केलय ते पूस आधी, मग रड! एवढया शिकलेल्या मुली तुम्ही, साध्या साध्या गोष्टी कळत नाही" ती खूपच ओशाळवाणी झाली, उतरलेल्या आवाजात तिने विचारलं डॉक्टर कपडा मिळेल का एखादा? कपडा द्यायला काही हरकत होती कां पण नाही, माझा पारा आणखीनच चढला आणि वरच्या स्वरात मी ओरडले, साध दुपट सुध्दा आणता येत नाही कां घरुन? तिचा चेहेरा आणखीनच उतरला." एक मिनिट ", असं म्हणत ती घराकडे धावली, घरुन आणलेल्या दुपटयाने तिने टेबल पुसलं, दुस-या दुपटयात सायलीला गुंडाळल. माझ्या तोडून बोलण्याने तिला दु:ख झालं होत, पण ते बाजूला सारून ती काकुळतीने विचारत होती, "डॉक्टर सायलीला बरं वाटेल ना लवकर, काय पथ्य पाळु आंघोळ नको ना घालु दोन दिवस? तिचा झालेला अपमान तिच्यातली आई कधीच विसरली होती. मी कोरडेपणाने उत्तर दिलं, "साधाच ताप आहे, होइल बरी",खर म्हणजे त्यावेळेस तिला माझ्या धीराच्या, प्रेमाच्या शब्दांची आवशकता होती, पण नाही, माझ्यातली कटुता आणखीनच तीव्र झाली होती. सायलीला बरं वाटेपर्यंत ती नेमाने येत होती, प्रत्येक वेळेस या ना त्या कारणाने तिचा अपमान करण्याची संधी मी सोडत नव्हते.
त्यादिवशी ती आली वेगळ्याच चिंतेत, तिच्या नव-याला, निरंजनला ताप आणि उलटया सुरु झाल्या होत्या. मी मनाला सारखी बजावत होते कुठलीही कटुता निर्माण करायची नाही. ताप जरा जास्तच होता त्यामुळे औषध दिल्यावर सांगीतलं, ’उद्या जर ताप असेल तर दवाखान्यात आणू नकोस, मी घरी येईन’, नेहेमी प्रमाणे त्याची काळजी करत, बडबड करत ती दवाखान्यातून बाहेर पडली.
दुस-या आणि तिस-या दिवशीही ताप जास्त होता म्हणून त्याच्या प्रेमापोटी, काळजीने ती त्याला अगोदरच दवाखान्यात घेउन आली. ताप उतरतच नव्हता, तापाच निदान झालं ’टाईफाइड’! आता मात्र मी तीला बजावल, "हे बघ टाईफाइड मध्ये विश्रांतीची आवशकता असते, मी घरीच तपासायला येत जाईन, औषधांचा काय परिणाम होतो बघुया, नाहीतर मोठया हास्पिटलमध्ये अडमिट करुया, पण तु त्याला घेउन दवाखान्यात मात्र घेउन येऊ नकोस.
दुस-या दिवशी व्हिजीटला म्हणून घरी गेले. त्याच्या तापाच्या धावपळीतही ते छोटसं घर तिने स्वच्छ, सुंदर ठेवलं होतं, प्रत्येक कानाकोपरा कलात्मकतेने सजवला होता, तिच्या त्या छोटयाशा विश्वात ती आनंदात, सुखात होती याची जाणिव होत होती. ’डॉक्टर, काल ह्यांना खुप भुक लागली होती म्हणुन ब्रेडच्या कडा काढून दुधात भिजवून खायला दिला, चालेल ना? टाईफाइडमध्ये फार पथ्य असते, असा ब्रेड द्यायला नको होता. मी त्याला तपासत होते, आणि त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत ती काळजीने विचारत होती, ’भूक लागली कां?, पेज देऊ का?’ गेल्या पंधरा दिवसात जागरणाने, काळजीने, त्याचं पथ्य, ऒषधांची वेळ सांभाळून कृश झालेली तीची कांती, आणि मायेने ओथंबलेली तिची नजर.! एक क्षणभर मझ्या ह्रदयात काहीतरी टोचल, आणि मी आग पाखडायला सुरुवात केली "सांगीतलेली पथ्य पाळत नाही, आणि बरं वाटत नाही म्हणुन डॉक्टरांनाच जबाबदार ठरवतात. डॉक्टरांनी सांगीतलेले ऐकायचे नाही, स्वत:ची अक्कल वापरायला सांगीतले कुणी? जेवढे म्हणुन कटु शब्द वापरता येतील तेवढे मी वापरत होते, तीला जास्तीत जास्त दुखावत होते. "उद्या पेशंटच काही बरं वाईट झालं तर माझ्याकडे रडत्त यायच नाही, मी सांगीतलेली पथ्य पाळायची नसतील तर माझं औषध बंद करा". तिने ओंजळीत चेहेरा झाकून रडायला सुरुवात केली, पण माझा चढलेला पारा उतरायलाच तयार नव्हता. मनाच्या रागावलेल्या अवस्थेत त्याला इंजेक्शन दिलं आणि कारमध्ये येउन बसले, पुढे विवेकानंद केंद्रात जायचे होते. ती धावत बाहेर आली, रडवेल्या सुरात म्हणत होती,’ डॉक्टर, माझं चुकलच, असा ब्रेड द्यायला नको होता, काही नवीन औषध आणायची कां? बरं वाटेल ना डॉक्टर ह्यांना? मी कोरडेपणाने उत्तरले, ’आहे तीच औषध चालू ठेव, आणि बरं वाटण्याबद्दल विचारशील तर तुझा मूर्खपणा तू जोपर्यंत चालू ठेवणार आहेस तोपर्यंत त्याला त्रास होणारच. माझी गाडी चालू झाली तरी ती तिथेच उतरल्या चेहे-याने उभी होती, मी रागाने तिच्याकडे पाहीलं, गाडी चालू केली.
संध्याकाळी अभ्यासिकेत बसल्यावर मात्र मी अस्वस्थ झाले, आज अंगणात तिचा वावर नव्ह्ता, अंगण सुने भासत होते, तिचा रडवेला, केविलवाणा चेहेरा डोळ्यासमोर उभा राहिला. त्याच्या दुखण्याने किती हळवी झाली होती ती! कुणाच्यातरी धीराच्या, गोड शब्दांची आवश्यकता होती, कुणाच्यातरी मायेने पाठीवरुन हात फिरवण्याची गरज होती. अशावेळेस माझं हे असं कठोर, कटु वागणं. सगळ्यांशी प्रेमाने, वडिलकीच्या नात्याने वागणारी मी तिच्याशीच अशी कां वागते? डोळे भरुन आलेत, मनावरचा ताण असह्य होऊन मी डोळे बंद केलेत. टप......टप......गालावरुन आसव वहायला लागलीत......... त्या आसवांच्या धारांवरुन मी हलकेच भूतकाळात शिरले.
त्यावेळेस मी डॉक्टर नव्ह्ते, नुकतीच दहावी पास होऊन, पुढे काय करायच या संभ्रमात पडलेली शुभदा प्रधान होते! गणित,सायंन्स,भाषा सगळ्या विषयात ९५ च्या वरती मार्क्स मिळाले होते.त्यामुळे सायंन्स, कॉमर्स, कुठल्याही शाखेत प्रवेश मिळायला काहीच अडचण न्व्ह्ती. तिच्या बाबांनातर इतका आनंद झाला होता की सगळ्या गांवाला पेढे वाटत होते. बाबांना इतक दिलखुलास हसतांना त्यांनी सगळ्यानी प्रथमच पाहिले होते. तसे ते खुप कठोर होते, किंवा मुलांवर त्याचे प्रेम नव्ह्ते अशातला भाग नव्ह्ता, पण त्यांची कडक शिस्त, नियम यामुळे मुलं त्यांना घाबरायची एवढं मात्र निश्चित!
साहित्याची तीला खुप आवड होती तीने मनाशी निश्चित ठरवलं होतं, कलाशाखेत प्रवेश घ्यायचा, पदवीधर झाल्यावर एम.ए., मग डॉक्टरेट! खुप वाचन करायच, खुप लिखाण करायच. सोळाव्या वर्षात पदार्पण केलं अन तेव्हापासुन तीला ते स्वप्न बघायची सवय लागली होती. सुंदर संसार करायचा, अगदी निटनेटका, टाप-टीपीचा! डोळे बंद केले की तिच्या स्वप्नातलं घर मनासमोर साकारायच. तिच्या स्वप्नातला तो!...............देखणा............. उंच...........दोघांनी मिळून रंगवलेल्या स्वप्नात ’तीच’ आगमन, हो ’तीचच’! तिला मुलगी फार आवडायची.फार मोठ्या अपेक्षा न ठेवता, साधं पण सुंदर जीवन जगायचं, अनेक रात्री तिने या सुंदर स्वप्नात रंगवल्या होत्या. तीची ही हळूवार स्वप्न तीने कवितेच्या रुपात कागदावर उतरवली होती.
ही सगळी स्वप्न तिने मनातल्या मनात रंगवली होती. बांबाच्या कडक शिस्तीत वाढणारी ती आणि तिची भावंड, बाबांसमोर एक शब्दही काढण्याचे त्यांचे धैर्य नव्हते. तिच्या शिक्षणाविषयी ठरवतांना बाबांनी कडक शब्दात सांगितले "शुभदा तु डॉक्टर व्हाव अशी माझी इच्छा आहे. "पण बाबा मला तर आर्टसला जायची इच्छा आहे" सार धैर्य एकवटून ती बोलली त्यानंतर बाबा तिच्यावर जे बरसले होते, "अग आर्ट्सला जायचे काय भिकेचे डोहाळे लागले आहेत का?, तुझं गणित, सायंन्स दोन्ही विषय चांगले आहेत, तु सायंन्सलाच प्रवेश घ्यायचाय, नाही बाबा मला आर्ट्सला जायचय, "मला उलट उत्तर देतेस, थांब जरा" असं म्हणुन ते रागारागाने बाहेर निघून गेलेत. त्यानंतर जे रामायण घडंल ते भयंकरच होतं. बाबा दोन दिवस ऑफिस मधुन घरीच आले नाही, सगळेजण खुप तणावाखाली होते, दोन दिवस झालेत, ते घरी आले नाहीत बघून आईने रडायलाच सुरुवात केली. घरातल वातावरण, आईच रडण,मनाच्या विमनस्क अवस्थेत तिने बाबांचा निर्णय स्विकारला, स्वत:च्या आवडीला मुरड घालून तिने डॉक्टर व्हायच ठरवल. सायन्सला अ‍ॅड्मिशन घेतली, तिने खुप मनापासून अभ्यास केला होता, त्यामुळे मेडिकलला प्रवेश मिळायला अजिबात त्रास झाला नाही. घरात बाबा एकटे कमावणारे होते, परिस्थिती तशी मध्यमच होती. या सगळ्यांची जाणिव तिला होती. त्यामुळे ती मनापासुन अभ्यास करत होती. मेडिकलचा क्लिष्ट, कठीण अभ्यास, मोठी पुस्तकं, या व्यापात स्वत:च्या आवडीचं एखादं पुस्तक देखिल वाचायला सवड मिळायची नाही तिला. पण तक्रार न करता तीने हे जीवन स्विकारलं. मनाने ती कधीच कॉलेज मध्ये रमली नाही, कुणाशीच मैत्री पण करावीशी वाटली नाही. मनातल्या स्वप्नांना असं आत कोंडुन टाकतांना, कधीतरी आसवांनी उशी ओली व्हायची, पण जवळ कुणी नसायच, मनातल दु:ख मोकळ करायला. प्रत्येक वर्षी ती फर्स्टक्लास मिळवत होती.
बघता बघता पहीली चार वर्ष संपलीत, आता फक्त एक वर्ष आणि सहा महीन्यांची इंटर्नलशीप, त्यानंतर एम.बी.बी.एस. ची डिग्री, मग स्वत:चा दवाखाना! अचानक त्यांच्या कुटुंबावर दु:खाची कु-हाड कोसळली. बाबांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. घरात तीच मोठी, सगळ्या जबाबदा-यांच ओझं तीच्यावर टाकून बाबा निघून गेले. तिच्या पाठीवरचे संजू, सतीश, आणि धाकटी स्मिता, तीन भावंड, आणि आई. घरात मिळवते कुणी नव्ह्ते. बाबांच्या प्राव्हिडंड फडांत आणि ग्राच्युटीत पांचजणांच भागण शक्यच नव्हत. नेटाने तीने राहीलेलं शिक्षण पुर्ण केलं आणि तिथल्याच दवाखान्यात नोकरी धरली. तिचा पगार, शिलकीचे व्याज यावर त्यांचे जेमतेम भागत होत.
कोसळलेल्या आईला सावरण, सतिश, संजूच आणि स्मिताच शिक्षण, अचानक आलेल्या या जबाबदारीच्या ओझ्यांमुळे ती प्रौढ झाली, तीने रंगवलेल्या स्वप्नांचे रंग हळूहळू उतरत होते. स्मिता ग्रॅज्युएट झाली आणि तिने तिचा जोडीदार समोर आणून उभा केल्यावर तर तिचं स्वप्न पार तोडून मोडून गेलं. ती घराला सावरण्यासाठी अपार कष्ट करत होती, पण कुणालाच काहीच वाटत नव्हत. हिच्या मनाची कुणालाच कदर नव्हती. सतीश,संजूने स्वत:ची लग्न ठरवलीत त्यावेळेस आईने म्हटलं "इतकी वर्ष तुमच्यासाठी झिजते आहे, तुमची शिक्षणं पुर्ण केलीत, घरासाठी दिवसरात्र राबते आहे, कधी केला तिच्या मनाचा विचार? स्वत:चा स्वार्थ तेवढा बघीतला! किती करायचं एकटया पोरींन?" असं म्हणून आई एकटीच कितीतरी वेळ रडत होती. तीचं लग्नाचं सरत वय, तिच्यावरच्या या जबाबदा-या, या जाणिवेने आईचं मन आतून पोखरून निघत होतं. वयाची चाळीशी आली, लग्नाची उमेद संपली, तीचं भाव-विश्व असं कोसळून पडलं.
तिने डॉक्टरी व्यवसायात नांव कमावल, स्वत:चा मोठा दवाखाना, बंगला!, एक नामांकित डॉक्टर म्हणुन समाजात मिळवलेला मान, सरत्या काळाबरोबर मनातली बोच हळूहळू कमी होत गेली. मनात फुलवले ते स्वप्न, मग ह्रदयाच्या आतल्या कप्प्यात कधीच बंद केलं होतं. ते स्वप्न आज दुसरच कुणीतरी साकार करत होतं., जे तिला मिळालं नव्हत ते दुस-या कोणालातरी उपभोगतांना बघून तिच्या आतला ’मी’ दुखावला जात होता, प्रतिबिंब म्हणजे बिंबाची सावली, ते दोन्ही वेगळे असूच शकत नाही, पण इथे प्रतिबिंब ’तिच्या’ रुपात समोर उभं राहिलं होतं त्याला तिच्या स्वप्नातलं जीवन जगतांना बघून तिच्यातल्या बिंबाला त्रास होत होता म्हणून हा सगळा राग, हा तुसडेपणा ’मी’ चा अहंकार दुखावला जात होता म्हणून ही कटूता.
त्या तुसडया ’मी’ चा भयंकर राग आला होत मला. माझं स्वप्न साकार झालं नाही म्हणून तिच्यावर असं रागावण्याचा मला काय अधिकार होता. मनाच्या कोर्टात अशी स्वत:चीच उलटतपासणी घेतली आणि मनाला मग थोडस शांत वाटलं, मनावरच ओझं उतरल, आभाळ मोकळं मोकळं झालं.
आज मी वेळेच्या अगोदरच व्हिजीटला बाहेर पडले, रस्ता ओलांडून ’त्या’ घराच फाटक उघडून आट शीरले. फाटकाचा आवाज ऎकून ’ती’ बाहेर आली. "शुभदा, निरंजनला बरं वाटतय कां", मी अत्यंत प्रेमाने तिला विचारलं, माझ्या आवाजाच तिला खुपच आश्चर्य वाटत होतं, गडबडलेल्या अवस्थेत ती उत्तरली, " पण डॉक्टर, माझ नांव शुभदा नाही,माझं नांव...........!" "असू दे,आजपासून मी तुला शुभदाच हाक मारणार, चालेल ना? निरंजन, आजपासून नवीन औषध सुरु करते, लवकरच बरं वाटेल". असं म्हणत मी सायलीला मांडीवर घेतलं,आणि बघता बघता तिने माझी साडी ओली केली, तिचा चेहेरा चांगलाच गोरामोरा झाला. "डॉक्टर थांबा, दुपट देते, म्हणून ती किचन कडे धावली, "अगं असू दे, लहान मुलं नाही तर मोठी माणसं का करणार असं? मी जोरात हसले आणि माझ्या हसण्यात त्या दोघांच्याही हसण्याण्याचा आवाज मिसळला.
दिप्ती जोशी, मुंबई
*************************************

"पुर्नजन्म एका कलाकाराचा"


"पुर्नजन्म एका कलाकाराचा"


आज माझा वाढदिवस. सकाळी आंघोळ करुनच ह्यांना डबा करुन दिला. छान केशर, वेलची, जायफळ घालुन केलेला शिरा, प्रसाद सारखा. त्यावर पेरलेले काजू, बदामाचे काप. सगळ्या डब्याचाच देवाला नैवेद्द दाखवला. संध्याकाळी वाटलच तर बाहेर, नाहीतर घरातच एखादा छान पदार्थ. हल्ली बाहेर जाऊन जेवण्याच फारसं अप्रुप वाटत नव्हत. डब्याबरोबरच माझा स्वयंपाक करुन घेतला होता. पूजा झाली होती. काम वाल्या बाईपण काम करून गेल्या होत्या.
सकाळी सकाळीच सासूबाई आणि आईला नमस्काराचा फोन केला; आणि सगळ्यांचे वाढदिवासाचे फोन येऊन गेले. सकाळपासून वेळ छान गेला होता. मनाला त्रास त्रास होईल अशी एकही घटना घडली नव्हती. आता सगळा मोकळा वेळ माझा होत.हव ते वाचायचं, हव ते लिहायचे. आता साडेदहा झाले होते, पुढे साडेसातपर्यंतच्या सगळ्या वेळाची मी मालकीण होते. मनातून अनामिक आनंदाच्या लहरी येत होत्या.
मग मी माझा वार्डरोब ऊघडला.......क्षणभर बघतच राहीले..............विविध प्रकारच्या साडयांनी गच्च भरलेले कपाट........... प्युअर-सिल्क, कॉटन्स, गढवाल, इरकल, पैठणी.......मग हळूच दागीन्यांचा लॉकर उघडला......... पाटल्या, बांगडया, तोडे, नेकलेस, मोहनमाळ, ठुशी, मोत्याचा सेट, पोवळ्याचा सेट.......हळूवारपणे सगळ्या दागिन्यांवर हात फिरवला. चांदीच्या लॉकरमधून तर भांडी बाहेर पडायला बघत होती, इतकी भांडी जमा झाली होती. लक्ष्मीचा वरदहस्त जाणवत होता.
सगळ्या घरावर नजर फिरवली. किती मोठं घर! ते पण डोंबिवली सारख्या मुंबईच्या उपनगरात......मनात तृप्तता नुसती ओतप्रोत भरुन होती. डॉक्टर झालेली मूलगी. तिचा डॉक्टर जोडीदार......आता लवकरच तीचं "क्लिनिक" या विचारानेच मनावर सुखद मोरपीस फिरल्यासारखं होत होतं. नाशिकला छान बांधलेला बंगला! नाही म्हणायला मुलगा नाही ही उणिव होती, पण जावई ही उणिव नक्कीच भरून काढेल याची हळूहळू खात्री पटायला लागली होती. उच्चशिक्षित, संस्कारी, सात्विक वागण, आणि आमच्या दोघांची काळजी घेणं यामुळे हळूहळू ही उणिव पुसट होत होती. ईश्वरीकृपेचा वर्षाव अजून वेगळा काही असू शकतो का? या तृप्ततेला मी खूप खोल श्वास घेत माझ्या आतल्या मनात, ह्र्दयात भरुन घेतलं.
लॉकरच्या खाली एक कप्पा होता, त्यात माझ्या प्रशस्तीपत्रकांची फाईल आणि काही लिखाण केलं होतं त्या डाय-या होत्या. फाईल आणि डाय-या हातात घेतल्या, आवडती सीडी लावली आणी सोफ्यावर शांतपणे बसले..........
फाईल चाळत होते...........गाण्याचे सूर कानावर पडत होते.............सलीलचा ह्दयाला स्पर्शुन जाणारा आवाज...........!
"आताशा असे हे मला काय होते
कुण्याकाळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते"
अन मी खरच स्तब्ध झाले, माझे शब्दही मूक झालेत. डोळ्यातून आसवांच्या सरी वहायला लागल्यात................
प्रशस्तीपत्रकांनी फाईल गच्च भरली होती. चित्रकला, गायन, भावगीत, निबंध, कथालेखन, रसास्वाद.......... कसली म्हणून प्रशस्तीपत्रक नव्हती त्या फाईलमध्ये ! ७० साली सातवीत असतांना पहिल प्रशस्तीपत्रक मिळाल ते जिल्हापातळीवरच्या चित्रकला स्पर्धेच. त्यावेळेस अजून आठवत......... शाळेचा प्युन घरी बोलवायला आला होता, शाळेच्या स्मरणिकेत देण्यासाठी सगळ्या शिक्षकांबरोबर फोटो काढायचा होता, मग माझी उडालेली धावपळ, कांहीतरी वेगळ करायच म्हणून आहे तो सरळ भांग मोडून तिरपा भांग पाडून घातलेली वेणी, मोजकेच कपडे असायचे, त्यातलाच एक चांगलासा स्कर्ट ब्लाऊज त्यावर रशिदाने भेट दिलेले गळ्यातलं, कानातलं, हातात अंगठी पण आवर्जून घातली, आता ती फोटोत दिसणार नाही हे कुठं कळत होतं तेव्हा. शिक्षकांच्या दोन रांगा, त्याच्यासमोर छोटं स्टूल टाकून मला बसवल मग काढलेला फोटो, बाबांबरोबर जाऊन जळगांवच्या कलेक्टर ऑफीस मधून घेतलेला पूरस्कार! शाळेतल्या प्रत्येक निबंध स्पर्धेत बक्षिस हमखास ठरलेलेच असायच. मग कॉलेज जीवन, त्यातली असंख्य बक्षिसं, त्यातला चढता यशाचा आलेख.
लिखाणाची आवड फार लहानपणापासून होती. ८ वीत असतांना पहिली कथा लिहिली- "अनोखे दान" तिच नांव. पुढे हीच कथा कॉलेजमध्ये गेल्यावर रेल्वे कल्चरल अकाडमीच्या स्पर्धेसाठी पाठवली, आणि तिला "व्हेग" मासिकेचा प्रथम पुरस्कार मिळाला. "शिक्षा" कथेला चारचौघी मासिकाचा प्रथम पुरस्कार, "नजर" कथा गृहलक्ष्मीच्या कथा स्पर्धेत ६०० कथांमधून अंतिम फेरीत पोहोचली. अनेक चित्र काढलीत, एखादा विषय घेवून, त्यावर लिखाण करुन मग चित्र काढलीत---मोठ्या चित्रकाराने कौतुक करावीत अशी ---- इतकी सुंदर! गाण्याची आवड होती ---- गाण शिकण्याचा प्रयत्न केला.
आता या ५३ व्या वर्षात पदार्पण करत असतांना स्वत:च्या आयुष्याच्या यशस्वी वाटचालीचा पट उघडून बसले होते अन डोळ्यातुन आसवाच्या सरी वहात होत्या. हातातुन आयुष्य निसटून गेल्याची खंत, सृजनशिलतेची प्रचंड शक्ति असूनही तिला योग्य दिशा मिळाली नाही याची बोच जाणवत होती.
आयूष्याच्या प्रत्येक वळणावर नवी भुमिका निभावतांना ......... एक मुलगी.........बहिण.........पत्नी......सुन.......प्रत्येक वळणावर एकेका कलेच विसर्जन करत आयुष्य पुढे जात होतं.
"बाबा चित्रकला फार आवडते, मी जी.डी.आर्ट्सला जाऊ का?"
"बाई इतक महागडं शिक्षण तुला द्यायच. बाकीच्या मुलांच्या शिक्षणाच काय?"
मनातला चित्रकार निमुटपणे विसर्जित झाला होता.
लग्नानंतर खुप लिखाण करायच होतं, पण सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि जाणंवल चांगल सुस्थिर जिवन जगायचे असेल तर नोकरी करण क्रमप्राप्तच आहे. मग अठरा वर्षे नॊकरीच्या चक्रात वावरतांना....... नऊ ते पांच आफिस, लेकीची शाळा, घरचा अभ्यास, पाहुण्यांची सततची वर्दळ, मोलकरणीच्या सुट्ट्या, लिखाणाचे सुंदर विचार सुचत असतांना, डोळे थकून कधीच मिटलेले असायचे, आतल्या लेखीकेच कधीच समर्पण झाले होते.
अचानक ह्यांना परदेशी नोकरीची संधी चालून आली. आम्ही दोघांनी सल्लामसलत करुनच ह्यांनी ती संधी स्विकारली होती. पण त्याच वेळेस लेकीच ख-या अर्थाने शिक्षण, करियर सुरु झालं होत. पांच वर्ष तिच्याबरोबर रहातांना, तिच्यासाठी आई आणि वडिल या दोन्ही भुमिका निभावतांना, नोकरीच्या धावपळीत तीच्या सहवासात रहायलाच मिळाले नव्ह्ते, आता तिच्यावर चांगले संस्कार करतांना, तिची मैत्रिण होतांना, तिचं आयुष्य नादमय बनवतांना माझ्या मनातले गाण्याचे सूर कधीच हरवले होते..........कधीतरी ते सूर साद घालायचे.....अन माझं मन त्या ओळींभोवती रूंजी घालायच.................
"दूर.......आर्त........सांग......कुणी.......छेडीली बांसरी.........!!!!!
आज फाईल्स चाळता चाळता मनातली खंत आसवांच्या सरीतून बाहेर पडत होत्ती. किती गूण होते अंगात, किती कलासक्त मन होतं. लग्न होऊन आल्यापासून कोणी बघीतलीत ही प्रशस्तीपत्रक? दागदागीने, साड्या, मोठं घर हीच कां होती सुखाची परिमाणं? मला आठवतयं, गेल्या दोन वर्षात ते जड दागीने कधी घातलेच नाही. अगदी जवळच्या लग्नात देखिल हातात एक पाटली, घड्याळ, गळ्यात मोत्याचा सर! बस्स एवढेच. लग्नकार्याला जातांना कपाट उघडल की प्युअरसील्कच्या नाजूक जरी बार्डरच्या साडी कडे हात वळायचा,त्या जड जड पैठण्या कधीच वरच्या बॅगेत टाकल्य़ा होत्या. ......., माझ्यातला कलाकार तळमळत होता, अतृप्त होता.
माझ्यातल्या कलाकाराला असं प्रत्येक वळणांवर विसर्जित होतांना मन मात्र रडत होत. मला खुप कांही करायच होतं, पण आयुष्य मात्र हातातून निसटून गेल्याची खंत नेमकी आज वाढदिवसाच्याच दिवशी होत होती. ईश्वराजवळ प्रार्थना करतांना एक विनंती केली....."ईश्वरा या ज्न्मात नाही जमलं हे सगळं, पण पुढचे अनेक जन्म माणसाचेच दे, एकेक कलेसाठी सगळा जन्म वाहून घेतला जाऊ दे.........." डोळ्यातल्या आसवांना परतवून लावत असतांना एक क्षणभर गुंगी आली...........आणि कानाशी कुणीतरी गुणगुणत होतं................!!
"अग, बघ तुझा हा रेखिव संसार, प्रत्येक गोष्ट कशी नेटकी ठेवली आहेस, प्रत्येक डब्यावर लावलेलं लेबल,
त्यात बरोबर तीच वस्तु, कलात्मकतेने सजवलेला दिवाणखाना, सगळ कसं आखिव आणि नियोजनबध्द.
संसाराच हे असं सुंदर चित्र, एखाद्या चित्रकारालाच जमतं........मला भेटला की तुझ्यातला चित्रकार!"
"तुझ्या मनातल्या सात्विक विचारांचे संस्कार तु तुझ्या लेकीवर करत होतीस, म्हणून तर ती इतकी संस्कारशील घडत गेली.हा तर तुझ्यातल्या लेखिकेचा चालता बोलता आविष्कार!"
"आणि गाण्याचच म्हणशील तर..........तिन्हीसांजेच्या वेळी.......समईची ज्योत उजळ्यावर, आर्त स्वरात केलेली ईश्वराची आळवणी........ती भक्तीगीतं, भावगीतं.........तुझ्यातल्या सुरांना, गाण्याला ती जोपासत होती......!"
माझ्या कानात उमटणारे ते शब्द खुप गोड होते, कदाचित तो माझ्या मनातलाच आवाज असेल, पण तो आवाज ईश्वरी होता. ती वाणी अमृतवाणी होती. डोळ्यातल्या आसवांना मी कधीच पुसुन टाकले होते, माझ्या ओठावर हसू उमटलं होतं आणि ते हास्य आतल्या मनातुन आलं होतं. परवाच काढलेलं गजानन महाराजांच चित्र घेतल ते टेबलावर ठेवलं, एक छोटसं लिखाण केलं होतं "भाव ते दृढनिष्ठा - प्रवास भक्तिचा" ते ही त्या फोटोसमोर ठेवलं, आणि मी शांतपणे हात जोडून डोळे मिटून गाणं म्हणत होते.
"नच वाण कोणतीही, सौख्यास पार नाही कांता, सुपुत्र सारे दैवेच प्राप्त होता....... शेगांवच्या महंता.........."!
माझ्यातला कलाकार कदाचित जगापुढे उघड झाला नसेल पण या चराचराला, सा-या जगाला निर्माण करणा-या या नियंत्यापुढे मात्र मी कलाकारच होते. त्याच्यासमोर गातांना, त्याचे चित्र काढतांना, त्याच्याविषयी लिहीतांना माझ्यातला कलाकार मोकळा......मोकळा श्वास घेत होता......!
माझ्यातल्या कलाकाराचा हा पूर्नज्न्म होता.....!!!!!
मनात गाण्याच्या ओळी उमटत होत्या...............
"एकाच या जन्मी जणु फिरूनी नवी जन्मेन मी....."!
एक आगळा वेगळाच वाढदिवस साजरा झाला होता माझा.......
दिप्ती जोशी, मुंबई,
***************************************************