RSS

Friday, July 22, 2011

कोइ लौटा दे मेरे बिते हुए दिन .... !!!

  "अलबेले दिन प्यारे ....
  मेरे बिछडे साथ सहारे ....
  हाये कहां गये .......
  हाये कहां गये .......
  आंखोके उजियारे .....
  मेरी सुनी रात के तारे ...
  हाये कहा गये ......
      कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन ....
      बिते हुए दिन वो मेरे प्यारे पलछिन" .... !!

   किशोरदांच हे गाणं ऎकायच ..... शांतपणे .... आवाजातला दर्द आणि कविच्या मनातली व्यथा नकळत सैरभैर करुन सोडते. काहीतरी निसटलय हातातून याची खंत मनात चोरपावलांनी प्रवेश करते ..... ते काहीतरी म्हणजे आपलं ...  बालपण ...... आणि नकळत ते क्षण डोळ्यासमोर उलगडायला लागतात रेशमी लडीं सारखे. कौलारु घराच्या वरती बहिण भावंडाबरोबर बसुन टोपलीभर हिरव्या चिंचा मिठ लाऊन खाल्ल्याचे क्षण ! चक्क मुलांमध्ये खेळलेले विट्टी-दांडू, लगोरीचे खेळ, पावसाळ्यात खेळायचा खोपचा म्हणून खेळ. एका बाजूने टोकदार अशी अर्धा फूट लांबीची लोखंडी सळी ....उंच हात करुन चिखलात खोचायची, असं खोचत खोचत दुरवर जायच, खोचल्यावर चिखलात ती उभीच राहिली पाहिजे, खाली पडली की दुस-या भिडूला राज्य!!

   मधल्या सुट्टीत विकत घेतलेली मीठ लावलेली आंबट गोड लाल बोरं, वर्गामध्ये तास सुरु झाला की गुपचुप तोंडात टाकायची आणि आठोळ्या बेंच मागे. चुकुन वर्गावर शिकवणा-या बाईंनी एखादा प्रश्न विचारलाच तर, बोरं आणि आठोळी तोंडात एका बाजुला धरुन उत्तर देतांना जी फजीती व्हायची, त्यानंतर मिळालेली शिक्षा, शिवाय वर्ग झाडणारा शिपाई बेंच मागील आठोळ्या काढतांना बडबड करायचा ती निराळीच.

   हिंदी विषय शिकवणा-या भावसार सरांच्या कोटावर पाठीमागून शाई शिंपडायची, त्यांच्या मफलरचा धागा ओढायचा, त्यांनी मागे वळून बघितलं की काहीच केलं नाही असा साळसुद निरागस भाव चेहे-यावर आणायचा, पण ते आम्हा सगळ्यां गृपला चांगले ओळखून होते. मग हेडमिस्ट्रेस कडे तक्रार.... सुमित्रा मॅडमने हातावर दिलेला छड्यांचा मार अजुनही आठवतोय. एकदा तर आम्हाला मारल्यावर त्या स्वत:च कितीवेळ डोक्याला हात लाऊन बसल्या होत्या, खुप वेळ समजावत होत्या ..... तुम्ही सगळ्या फार हुषार आहात ग ... कशासाठी एवढी मस्ती करता ... खुप अभ्यास करा , मोठ्या व्हा !! या छडयांच्या ऐवजी तुम्हाला बक्षिसाचं मेडल द्यायला मला जास्त आवडेल. मॅडमला असं भावूक होऊन बोलतांना बघून आम्ही किती रडलो होतो त्यावेळेस !!! मग दृढ निश्चय, असं कधी करायच नाही म्हणून, परत एखादा क्षण असा यायचा की परत पहिले पाढे पंच्चावन !!

   श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवसच असायची. खिचडी कितीही खाल्ली तरी खुप भुक लागलेली असायची. शेवटचा तास भुमितीचा. उंचीने कमी असलेले रामनाथ सर हात पुरत नाही म्हणून खुर्चीवर चढून भुमितीच्या आकृत्या काढायचे, समजवायचे, पुसायचे, परत दुसरी आकृती .... बापरे ते हे सगळं इतक भरभर करायचे की नुसतं गरगरायला व्हायचे आणि पोटात उठलेला भुकेचा डॊंब ....  डॊळ्यासमोर भुमितीच्या आकृत्यांचा ऐवजी आईने केलेला सुग्रास स्वयंपाक नाचत असायचा.... अन मग एकदाची बेल वाजली की वही बंद करुन घराकडे धुम ठोकायची, तुम्हीच काढत बसा आणि तुम्हीच पुसत बसा त्या आकृत्या असं म्हणत" 
   
   मराठीचे पुरोहित सर आमचे वर्ग शिक्षक. खांदे नेहेमी ऊंच करुन चालायचे आणि एका संथ लयीत बोलायचे, मग त्यांच्या पाठीमागे त्यांची नक्कल करत चालायचं. त्यांच्यासारखच संथ लयीत बोलायच. बर हे सगळं आम्ही मैत्रिणी आळीपाळीने करायचो. घरात आज्जी गेली आणि त्या गडबडीत बाबा फी द्यायला विसरले, मी मराठीच्या तासाला बसायला टाळायला लागले. पुरोहित सरांच्या ते लक्षात आले, त्यांनी बोलावून सांगितले ..."फी सावकाश भर, पण तासाला बसत जा. तु हुषार आहेस, अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नकोस", त्या वेळेस किती रडले होते मी.

   सगळ्या विषयात चांगले मार्क्स मिळवणारी मी  गणिताच नांव काढलं की शुन्यावस्थेत च पोहोचायची.  पोटात भितीचा मोठ्ठा गोळा उठायचा. गणिताचा पेपर ज्या दिवशी मिळायचा, त्याचे मार्क बघून दिवसभर चेहेरा उतरलेला असायचा, वाटायचं छे, पहिल्यापासून या विषयाकडे निट लक्ष दिलं असतं तर ..... !!!  एक सुखद आठवण मात्र मनावर कायमची कोरली गेलीय....."त्यादिवशी शाळेत गेले नव्हते, तर संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी धावत घरी, अगं आज मराठीचे पेपर्स मिळालेत, तु हायेस्ट!!, पी. आर. कुलकर्णी सरांनी तुझा पेपरमधला आई निबंध वर्गात वाचायाला सांगितला, आणि कुणाला माहितेय, सीमाला !! सगळ्या चिमण्या चिवचिवत होत्या. हयाच पी.आर. सरांनी, तास चालु असतांना मी आणि सीमा गुपचुप "नाव, गांव, आडनांव, पदार्थ..." हा खेळ खेळत होतो, म्हणून दोघींनाही वर्गाबाहेर जायला सांगितले होते. बरं ही खेळायची टुम मीच काढली म्हणून सीमाने बोलणच बंद केलं होतं माझ्याशी, त्यादिवशी पेपर घेऊन सीमाच घरी आली होती आणि भांडणही मिटलं होतं दोघींच !!

   जिल्हा पातळीवरच्या चित्रकला स्पर्धेच बक्षिस मिळालं तेव्हा सातवीत होते, मग तो सर्व शिक्षकांबरोबर काढलेला फोटो, त्यासाठी उडालेली धांदल, कपडे तसे मोजकेच असायचे पण त्यातल्या त्यातही चांगला कुठला ? यावर किती वेळ घालवला होता. रशिदाने वाढदिवसाला भेट दिलेलं गळ्यातलं, कानातलं, अंगठी ही घातली होती ती अंगठी दिसावी म्हणून अगदी हात पुढे दिसेल असा ठेवला होता .... कांही तरी वेगळं म्हणून केसांचा सरळ ऐवजी तिरपा पाडलेला भांग !!

  आत्ता आयुष्याकडे मागे वळून बघतांना जाणवते .... त्यावेळीस गणितात जास्त मार्क मिळवले नाहीत म्हणून आयुष्याच्या गणितात कुठेही चुकले नाही किंवा चित्रकलेत खुप बक्षिसं मिळवलीत म्हणून मोठी चित्रकारही झाले नाही, पण आयुष्याची चौकट मात्र सुरेख रंगवली ... त्यातल्या रंगामध्ये कुठेही विसंगती नाही .... !!!

   हे असे सुंदर क्षण, ओंजळीतून निसटून गेलेत, किशोरदांच्या आवाजातली .....व्यथा ... खंत हळूहळू  आपल्याही मनात झिरपायला लागते. डोळ्यांच्या कडा उगाचच ओलावतात, आणि जगजीत सींगजीच्या आवाजातला दर्दभ-या ओळी परत मनात उमटायला लागतात ...

   "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो ...
   भले छिन लो मुझसे मेरी जवानी ...
   मगर मुझको लौटा दो बचपनका सावन ...
   वो कागजकी कश्ती, वो बारिश का पानी .... "

   परवा फवारे बघायला गेलो होतो. उंच उंच भुईनळ्यांसारखे उडणारे ते कारंजे, पांढरे शुभ्र, फेसाळ, मध्येच त्यात लाल, हिरवे, पिवळे रंग मिसळत होते, फ्लोरोसंट रंग....चमकणारे. ते तुषार अंगावर घेत होतो. पाठीमागे वळून बघितले तर रंगीबेरंगी फुगे, त्यांना हात लावला अन मनातली सगळी खंत गळूनच पडली, गुब्बा-यांसारखं मन हलकं झालं आणि इथून तिथे धावत सुटलं.  तिथेच भेटला चेहे-याला चित्रविचित्र रंगरंगोटी करून, स्वत:च दु:ख विसरून पोटासाठी जगाला हसवणारा जोकर. "बुढ्ढीके बाल" साखरेचा कापूस खाणारा तो "गोटुराम", आईला सोडून उंटावर बसवलय, म्हणून रडणारी ती "पिटूकली"

  ते उंच उंच उडणारे तुषार, ते फुगे, ते बुढ्ढीके बाल, सगळं तसचं होतं, तिथेच होतं !! आपल्या मनातच असतं हे बालपण, फक्त आठवणींची कुपी उघडायची आणि मस्त सुगंध घ्यायचा !!!

   किशोरदांच्या आणि जगजित सींगजीच्या व्यथित स्वराला आता मस्तपैकी रॉक म्युझिकचा ठेका आला होता. फवा-यांचे तुषार अंगावर घेऊन आम्ही परतत होतो, मनातल्या बालपणाचा सुंगध मनात दरवळत ठेऊन !!!

*********************************







Monday, July 18, 2011

अशी रंगली गुरुपौर्णिमा

                         
    मनातल्या समुद्रात आठवणींच्या लाटा उसळायला लागल्या होत्या. आता ह्या लाटा डोळ्यांच्या किना-यावर आदळून फेसाळत बाहेर पडताय की काय असे वाटायला लागले....मी डॊळे बंद केले, किना-याला कधी दरवाजे असतात का ? माझ्या मनातल्या समुद्राच्या किना-याला दरवाजे आहेत, बंद केलेत ते दरवाजे, म्हटलं उसळू देत या आठवणींच्या लाटांना मनातच ..... !!!

      आज गुरुपौर्णिमा ...इतका चांगला दिवस आणि आपण देशातच नाही तर पार देशाच्या बाहेर ...!!! माझ्या सदगुरुंची सौ. ताईंची, गुरुस्वरुप सासुबाईंची, माझ्या आईची आणि हो लेकीचीही खुप आठवण येत होती. सौं. ताईंच्या कार्याची व्याप्ती एवढी वाढली आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना आमच्याशी फोनवर बोलता येणे शक्यच नव्हते. मग सासुबाईंना पहिला फोन केला, वय वर्षे ८२, या वयातला त्यांचा प्रसंन्न आणि हसरा आवाज ऐकला आणि  मनावरची सगळी मरगळ झटकली गेली. त्यांना नमस्कार सांगितला आणि म्हटलं, "गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला ताईंच्या आश्रमात जाणार ना उद्या?, तर म्हणाल्या, "हो जाणार ना, पण पाऊस खुप पडतोय, पावसाला सांगितलय उद्या दिवसभर पडू नकोस, मला जायचय ना आश्रमात....आणि परत एक निर्मंळ हसू, आमच्या नमस्काराला, ’माझे आशिर्वाद  बेटा तुम्हाला असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्यांच्याशी बोलून खुप उर्जा मिळाल्या सारखे वाटले, मनात प्रसन्नता दाटून आली.

      आईलाही नमस्काराचा फोन केला .... तीच्या नेहेमीच्या मायेने भरलेल्या आवाजात आमच्या नमस्काराला तीने, ’माझे लाख लाख आशिर्वाद ग तुम्हाला’ असं म्हटलं. या दोघींचेही आवाज ऐकलेत आणि वाटलं, या कल्पवृक्षाच्या सावलीत आम्ही किती निर्भर आहोत. तिसरा फोन लेकीला केला जसजशी मोठी होत गेली तशी ती अनेक रुपांनी माझी मैत्रीण कम गुरुच होत गेली.

      सकाळपासून ताईंच्या, माझ्या सदगुरुंच्या आश्रमातल्या कार्यक्रमाची खुप आठवण येत होती. आम्ही सगळेच सकाळी लवकर उठून तिथे हजर असतो. तिथे होणा-या अनुपम सोहोळ्याचा एक भाग होऊन जातो. यावर्षी मात्र ह्यांच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने इतक्या दुर, साता समुद्रापलीकडे, वेगळ्या वातावरणात, म्हणुनच आठवणींच्या लाटा अशा गर्दी करत होत्या. मग ठरवलं आपणही साजरी करुया "गुरुपौर्णिमा" !!!!

      सकाळी फार लवकर नाही पण साडेसहाला उठलो. सगळं आवरून हे पुजेला बसले .. बाप्पाला पंचामृती स्नान, श्रीसुक्त, गजानन महाराज आवाहन आणि गणपती अथर्वशिर्षाची २१ आवर्तने. आदल्याच दिवशी अपार्टमेंटच्या बगिच्यातुन दुर्वा, लाल, केशरी जास्वंद, पांढरी कण्हेरी, मुकी जास्वंद तरत-हेची फुलं आणली होती त्याने देवघर आणि ग्रंथ सजवलेत."जे जे काही मिळालं ते सर्व सदगुरुंच्या आशिर्वादाने, गुरुंविषयी वाटणारी कृतज्ञता एका छोट्याश्या पुस्तिकेत लिहिली आहे, तीचं नांव     "श्री गुरुगुणगीता" या पुस्तिकेचं पुजन केलं. मग आरती. "गणेश गीता" या ग्रंथाचे वाचन.  छानसा सात्विक स्वयंपाक करायचा असे ठरवले होते पण मागचे दोन दिवस हे सारखे विचारत होते, आपला गुरुपौर्णिमेचा उपवास आहे का? म्हणून काय वाटले कुणास ठाऊक पण उपवासाचा मेनु करुया कां असं ह्यांना विचारलं आणि हो म्हणताच, मऊसर भगर, बटाट्याची भाजी, उपवासाची कढी आणि फळं असा नैवेद्य दाखवला. त्यानंतर शांतपणे जप लिहिला. ताईंच्या प्रवचनाची आठवण येत होती म्हणून २००९ सालातल्या दत्तजयंतीच्या प्रवचनाची व्हिडिओ क्लिप लावली... त्यांचा आवाज ऐकला .... त्यांना बघितलं आणि शांत वाटलं. प्रवचन संपल की नैवेद्य होतो, मग बाप्पाचा गजर असतो ..... "बाप्पा बाप्पा मोरया .... अरे बाप्पा बाप्पा मोरया.... साक्षात बाप्पा मोरया ...., त्यानंतर "तरुण गणपा, भक्त गणपा, विर गणपा ......" ही इडगुंजी या कर्नाटकातल्या गणेशाचे वर्णन करणारी कानडी गाण्याची कॅसेट लागते. हजारोंच्या संख्येने भक्तसमुदाय जमलेला असतो, सगळी पावलं थिरकायला लागतात. हजारो मनं एका पातळीवर येऊन ईश्वर नामात दंग होतात. ताई सांगत असतात .... सगळ्यांनी जयघोष करायचा, सगळ्यांनी त्या गजरात नाचायचं .... तुम्ही कोण आहात?  डॉक्टर, इंजिनियर, वकिल, सगळी लेबलं, सगळ्या झुली उतरवायच्या आणि एक भक्त म्हणून मोकळं मोकळं व्हायचं ...!!!!

      आम्ही पण आज इडगुंजी बाप्पाची कॅसेट लावली, त्या आधी श्री गजानन जय गजानन .. जय जय गणेश मोरया ... या तालबद्ध तालावर डोळे बंद करुन नामघोषात दंग झालो होतो .... पावलं थिरकत होती .... आश्रमातली सगळी भक्तमंडळी आजुबाजुला आहेत याची जाणिव होत होती.

      फराळ करुन थोडीशी विश्रांती घेतली. स्वयंपाक केला .... संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला, श्रीसुक्त म्हटलं, गजानन महाराजांची मानसपुजा केली आणि दुरवर मेरिडियन समुद्राजवळ असलेल्या फवा-यांच्या जवळ फिरायला गेलो ...घरी आल्यावर नैवेद्य केला आणि उपवास सोडायला बसलो.

      रात्री हॉलची खिडकी उघडली ...पुर्वेकडून वा-याच्या थंडगार झुळकी येत होत्या आणि रिअल प्लेयरवर गाण्य़ांचे सूर उमटत होते ... ’तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम .... "नको देवराया अंत आता पाहु ....." "रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा," आणि सर्वात शेवटी ... बैजू बावराचं ..... "मन तरपत हरि दर्शनको आज .... गुरु बिन ग्यान कहासे लांऊ ...... दिजो दान हरि गुन गाऊ ... !!! आर्त स्वरात गुरुंच्या आठवणींना जागवत मनात निरामय आनंद, प्रसन्नता फुलत होती...!!!

      गुरु हे चराचराला व्यापुन उरलेले तत्व आहे.  सदगुरुंच्या स्वरुपात सगुण रुप घेऊन ते आपल्या समोर उभे आहे. सदगुरुंनी दिलेले संस्कार, सर्वांशी प्रेमाने, विश्वबंधुत्वाच्या नात्याने वागायचे, स्वच्छता, शिस्त, नियमितपणा, नामजप, वाचन साधना पाळून स्वत:चा उद्धार करायचा, आई-वडिलांची, गुरुजनांची, समाजरुपी ईश्वराची सेवा करून गुरुभावात जगायचे, हे साधता आले तरी ख-या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी झाली.

      सदगुरुंचा सत्संग, सहवास आपल्याला सदैव लाभेलच असे नाही, पण त्यांनी दिलेली अध्यात्माची शिदोरी आपल्याजवळ आहे. या स्वरुपातच त्या आपल्या जवळ असणार आहेत.      हीच निर्गुणाची उपासना !!!.   

   एक आगळी-वेगळी गुरुपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद मनात घेऊन झोपायला गेलो.











Friday, July 15, 2011

व्यास पौर्णिमा - गुरुपौर्णिमा


    आज गुरुपौर्णिमा !! आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यासांनी वेदांचे संकलन केले. १८ पुराणे आणि उप-पुराणे यांची रचना केली. पाचवा वेद म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अशा महाभारताची रचना आजच्या पौर्णिमेच्या दिवशी पुर्ण झाली. "ब्रह्मसूत्र" या विश्वातल्या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या लेखनालाही आजच्या दिवशी सुरुवात झाली. महर्षी वेदव्यासांच्या या थोर कार्याविषयीची कृतज्ञता म्हणून सगळ्या देवदेवतांनी त्यांचे पुजन केले तो दिवस म्हणजे आषाढ वद्य पौर्णिमा!! म्हणूनच आजच्या दिवसाला "व्यास पौर्णिमा किवा गुरु पौर्णिमा" असे म्हणतात.

   सद्गुरुंची थोरवी वर्णन करायची तर भाषा अपूरी पडते. सद्गुरुंचे दिव्य अस्तित्वच मुळी जगाच्या कल्याणासाठी असते. भूतमात्राविषयी दया हेच त्यांच्या जीवनाचे ब्रिदवाक्य. सूर्य, दिपक किंवा हिरा या प्रकाशमान वस्तुंमुळे दृष्य वस्तू दिसतात पण सद्गुरुंनी दिलेल्या ज्ञानप्रकाशात अदृष्य अशा ईश्वराचे दर्शन होते. चंदनाने तापलेल्या कायेला शितलता मिळते तर सद्गुरुंच्या कृपेमुळे त्रिगुणांनी तप्त झालेली काया शांत होते. सद्गुरुंचे महत्व समजणे फार अवघड आहे. एखाद्या गाईने खुप दुध दिले म्हणजे ती कामधेनू होत नाही त्याप्रमाणे शब्दज्ञानी कितीही पारंगत झाला तरी त्याला सद्गुरुंचे महत्व समजणार नाही.  परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते परंतू परिस कांही स्वत:हून लोखंडापर्यंत जाऊन पोहोचत नाही. सद्गुरु स्वत: शिष्यापर्यंत पोहोचतात. त्यांचा उद्धार करतात. त्यांचा मोठेपणा परिसाच्या मोठेपणापेक्षाही वरच्या दर्जाचा आहे.
   सद्गुरु हे सुखाचे सागर आहेत, त्यांच्या सहवासात मनाला विसावा प्राप्त होतो. त्यांच्या सहवासात दु:ख आणि तळमळ यांचा लवलेशही नसतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू यांच्याजवळ मागितले की मिळते. चिंतामणी देखिल चिन्तन केले असता सर्व कांही देतो पण सद्गुरु मात्र न मागता देतात लौकिकातले आणि अलौकिकातले देखील.

   सद्गुरु म्हणजे सद्गुणांनी धारण केलेले मनुष्यरुपच. शिष्यासाठी ईश्वराशी भांडण्याची क्षमता सद्गुरुंमध्येच असते म्हणून सद्गुरु हे सदैव आनंदस्वरुप असतात.  मनाची शांतता, उन्नयन सद्गुरुंच्या कृपेने प्राप्त होऊ शकते. मी कोण आहे? कोठून आलो आहे? मला काय करायचे आहे ह्याचे ज्ञान सद्गुरुंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या नित्य साधनेतून प्राप्त होते. गुरुंच्या सत्संगाने अनेकांची मनं एका पातळीवर येतात. इतरांना सामावून घेऊन भक्तीमार्गाची वाटचाल सुरु होते. आत्मिक उन्नतीला सुरुवात होते.  आत्म्याला आत्म्याची ओळख होते.

   असा सद्गुरंचा महिमा!! आजच्या या पवित्र दिवशी महर्षी व्यासांना आणि सद्गुरुंना त्रिवार वंदन!!!               

Wednesday, July 13, 2011

"फुलांची पायवाट"

फुलांमधली प्रसंन्नता आणि मुलांमधली निरागसता जीवनात आली की आयुष्याची पायवाट म्हणजे फुलांनी अंथरलेला गालिचाच होऊन जातो. मनुष्य कलेच्या प्रांतात वावरत असतो त्या क्षणी एक विशेष शक्ती कार्य करीत असते. हा निर्मितीचा क्षण म्हणजे आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण!!! त्या क्षणी "त्या" विशेष शक्तीचा "ईश्वरी-स्पर्श" अनुभवायला मिळतो.

१५ डिसेंबर २००९ ते १३ जानेवारी २०१० एखादा ध्यास लागल्या सारखा "फुलांची पायवाट" ही चित्र काढत होते. खुप मोठी चित्रकार आहे असे नाही, पण छंद म्हणून बघून बघून चित्र काढायला आवडतात. "जहांगिर आर्ट गॅलरीला" देवदत्त पाडेकरांच "द फ्लॉवरींग पाथ" च प्रदर्शन बघायला गेलो होतो, त्यांचं त्या प्रदर्शनाचं पुस्तक विकत घेतलं आणि त्यातली चित्र खुणावू लागली.....मग मंतरल्या सारखी चित्र कागदावर उमटायला लागलीत...या चित्रांमधली फुलं, निसर्ग, गोजिरवाणी मुलं सगळी माझ्याशी गोष्टी करायची. प्रत्येक चित्र पुर्ण झालं की पहिली काढलेली सगळी चित्र मांडून कितीतरी वेळ त्यांच्याकडे बघत बसायचे.... खरं तर नुसता छंद म्हणून ही चित्र काढलीत...ह्यांच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने अल्जेरियात रहाण्याचा योग आला आणि थोडासा स्वत:साठी वेळ मिळाला मग लिखाण, चित्र काढणे....खुप कांही गोष्टी हातुन घडायला लागल्या. ते क्षण खुप आनंद देऊन गेलेत .... निर्मितीचा क्षण...त्या क्षणी मन को-या पाटीसारखं असावं लागत .... निर्विचार .... निर्मल.....हळूवार !!!!

बाळाला जन्म देणारी "आई" अशीच असते का? खुप वेदनांना सामोरं जातांनाही तिच्या चेहे-यावर असिम आनंद असतो. गोंडस चेहेरा, छोटे छोटे हातपाय.... नाजुक जिवणी....!!! हा रक्तामांसाचा जीव माझ्या शरिरातून जन्माला आलाय....ही जाणिव सगळ्या वेदना विसरायला लावणारी. जगातला सर्वोच्च आनंदाचा क्षण!!!

या कागदावर रेखाटलेला निसर्ग, ही फुलं, ही गोजिरवाणी मुलं सगळी आपण काढलीत याचा विस्मयमिश्रीत आनंद !! खरोखर हा क्षण वर्णन करता येण्यासारखा नव्हता...!!! मग मनात विचार आला या छोट्याश्या कागदांवर रेखाटलेली ही निर्जिव फुलं, ही मुलं, हा निसर्ग बघून आपल्याला इतका आनंद होतो जी केवळ चित्रातली आहेत, सजीव नाहीत....मग सा-या चराचर सृष्टीला, निसर्गाला, मुलांना, फुलांना निर्माण करणारा "तो" जगत-नियंता, त्याला काय वाटत असेल? एवढं सगळं निर्माण करून तो मात्र "निराकार", "अव्यक्त" कुठेही दिसत नाही ... कसा असेल तो? त्याला बघण्यासाठी मन व्याकुळ होते ... मन त्या प्रभु पुढे नतमस्तक होते ... .मनात गाण्याच्या ओळी उमटतात ....

"ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है .....
हरी भरी वसुंधरापे निला निला ये गगन .....
ये जिसपे बादलोंकी पालकी उडा रहा पवन .....
दिशांए देखो रंगभरी चमक रही उमंगभरी .....
ये किसने फुल फुल पे किया सिंगार है ...."

         








 

Monday, July 11, 2011

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल....!!!

आज आषाढी एकादशी....आज वारकरी आपल्या आवडत्या दैवताचं...विठ्ठलाचं दर्शन घेऊन कृतकृत्य होणार. निघतांना सावळ्या, सुंदर मुर्तीला डोळ्यात साठवून घेत....त्याच्या विरहाच्या अश्रुंना डोळ्यातुन तसच वाहू देत.... पुढच्या वर्षीही अशीच वारी घडू दे म्हणून विठू माऊलीच्या चरणी करूणा भाकणार!! "वारी आणि वारकरी" प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय.

     पुर्वीच्या काळी वैकुंठाला जायचे म्हणजे केवढी अवघड गोष्ट. तपाचे कष्ट करावे लागायचे. पण आता ही गोष्ट एवढी कठिण नाही. पुंडलिकरायाने मोठाच उपकार करून ठेवला आहे. त्याने वैकुंठच भुमिवर आणले. त्याच्यामुळे विठ्ठलच पंढरीला आला. जिथं विठ्ठल तेच भुवैकुंठ. आणि या भुवैकुंठ पंढरीला पायी जाता येते.

     पुंडलिकाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. जे तपाच्या राशी करूनही प्राप्त होत नाही ते निधान त्याने पंढरीला आणले. गया आणि काशीसारखी सर्व तीर्थक्षेत्रे पंढरीत विठ्ठलाच्या पायाशी आहेत. या विठ्ठलाच्या मंदिराचा नुसता कळस पाहिला तरी अंहकाराचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते.

     "कारे पुंडया मातलासी ।
          उभे केले विठ्ठलासी ॥
     ऎसा कैसा रे तू धीट ।
          मागे भिरकावली वीट ॥

     अशा शब्दात तुकोबा पुंडलिकाबद्दल कौतुकाचे उद्गार काढतात. शिवाय अठ्ठाविस युगांचा काळ लोटला तरी अजूनही त्याला बस म्हणायला तयार नाहीस! पुंडलिक हा खरा समर्थ भक्त आहे त्याचा भाव पाहूनच देवाने वैकुंठ सोडले.

     तात्काळ अभिमान नष्ट होतो असे स्थळ माहित आहे का? डोळ्यात पाणी येते, शरिरावर रोमांच उभे रहातात असा अनुभव कोठे येतो? देव भक्तांचा अभेद काला कोठे पाहिला आहे का? या सर्व गोष्टी पंढरीत घडतात, पहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. अगदी दुष्टाच्या अंत:करणाला सुद्धा पाझर फुटतो. पंढरपुरमध्ये विटेवर उभा असलेला विठ्ठल हा सर्वव्यापक असा विश्वंभर असून चराचराचा तो अधिष्ठान आहे.

     काशीच्या पाच यात्रा किंवा द्वारकेच्या तीन यात्रा केल्याने जे पुण्य मिळते तेवढे पुण्य पंढरीच्या एकाच वारीने प्राप्त होते. पंढरीत अठरा पगड जातीच्या वैष्णवात कोणताही भेद केला जात नाही.  भाविक असो वा अभाविक  विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर त्याला मोक्ष मिळतो. पंढरीत जमलेल्या वैष्णवांना अभिमान नसतो म्हणून तर ते निसंकोचपणे एकमेकांच्या पायी लागतात.

     "तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी ।
           तयाचिये घरी यम न ये" 

     जो एकदा पंढरीला जातो त्याच्या घरी यम येत नाही असे तुकोबा ठामपणे सांगतात.

     पंढरी क्षेत्राचा महिमा एवढा आहे की पंढरी नामाचा उच्चार केला तरी पाप देशोधडीला लागते. सतत नामाचा उत्सव चालू असलेले पंढरी हे जगातील धन्य असे ठिकाण आहे. पंढरीतील भक्तांपुढे रिद्धी-सिद्धी लोटांगण घालतात, पण भक्तांना ईश्वरी प्रेमसुखापुढे त्या तुच्छ वाटतात. पंढरी तर प्रेमसुखाची खाणच आहे. तुलनाच करायची झाल्यास विष्णुच्या भुवैकुंठाशी करता येईल.  पंढरी म्हणजे भुमीवरी वैकुंठ "भू वैकुंठ" वैकुंठापेक्षा एका अक्षराने अधिक !!!

Monday, July 4, 2011

"स्पंदन"

            मी साफल्यच्या प्रवेश द्वाराजवळ पोहोचले. पर्समध्ये पेन, डायरी, मुलाखतीची टाचणं व्यवस्थित आहे किंवा नाही ते चाचपून घेतल. प्रवेश द्वाराजवळ सत्तरीच्या आसपास झुकलेले पांढरा झब्बा पायजमा घातलेले एक गृहस्थ अरामखुर्चीत बसलेले होते. त्याच्या वयाकडे बघून त्यांना नमस्कार करावासा वाटला.
 मी अदिती मुजुमदार, नादब्रह्म मासिकाची पत्रकार. माई कारखानिसांची मुलाखत घ्यायला आले आहे. त्यांनी चष्यातून माझ निरिक्षण केलं. एक मिनिट, बसाअस सांगून ते आत गेले. मी क्षणभर खुर्चीवर टेकले. प्रवेशद्वाराच्या भिंतीची उंची ओलांडून आकाशाकडे उंच झेप घेणा-या, एका रांगेत लावलेल्या उंच सुरुच्या झाडांकडे
बघत माई कारखानिसांविषयी विचार करत होते, कशा असतील माई? काळ्या की गो-या? उंच भारदस्त व्यक्तिमत्वाच्या की खुज्या?  कुणास ठाऊक, पण मला मात्र त्यांना भेटण्याची उत्सुकता लागली होती. तिन दिवसांचा भरपूर वेळ घेऊन मी आले होते. तिन दिवस त्यांच्या सहवासात राहून, त्यांना जवळुन निरखुन घेणार होते.
आणि मग नादब्रह्मच्या पहिल्या पानावर सा-या रसिकांना भेटणार होत्या माई कारखानिस’, त्यांच्याशी झालेल्या  मुलाखतीसह!
चला, माई आत बोलावत आहेत, मघाशी दाराजवळ असलेल्या त्या गृहस्थांच्या आवाजाने मी भानावर आले.  तुम्ही मला नुसत अदिती म्हटलं तरी चालेल, अहो, जाहो नको, मी नम्रतेने त्यांना सुचवल. त्यांच्या वयाला आणि वेषाला साजेस गंभीर हसत ते उद्गारले "मी अप्पा साने, वयाच्या मानाने जास्त काम होत नाही म्हणून
दरवाज्यावर बसून येणा-या जाणा-याची चौकशी करण्याचे हलके फुलके काम करतो." आम्ही दोघही आत शिरलो. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर नजरेस पडल ते साफल्यच मोठ आवार. मी आळीपाळीने डाव्या आणि उजव्या बाजूला पहात होते. नजरेच्या टप्प्याच्याही पलीकडे पसरलेली फळं, फुलं, दुर्वा, भाजी-पाल्याची लागवड. चालता चालता जेवढ नजरेत साठवता येईल तेवढ साठवत मी अप्पांच्या पाठोपाठ चालत होते. थोडस अंतर चालुन गेल्यावर एका बैठया खोलीत आम्ही प्रवेश केला, तिथे अगदी मोठी, म्हणजे पाच फुटी उभी गणेशाची मुर्ती होती, संध्याकाळचे सहा वाजले होते, कुणीतरी नुकतीच पुजा केल्यासारख वाटत होत. मुर्तीच्या डोक्यावर वाहिलेला गुलाब, गळ्यातला २१ जुडयांचा दुर्वांचा हार, त्याच्या जोडीने घातलेला लाल जास्वंदीच्या फुलांचा हार, मंद जळणारी तुपाची निरांजन, चंदनाचा सुगंध हवेत सोडत जळणारी उदबत्ती!. इथे कुणीतरी गणेशाची पुजा अगदी मनोभावे करतय याची जाणिव झाली.  कोप-यात चपला काढुन मी गणपतीला नमस्कार केला. बैठया खोलीचा कमी उंचीचा दरवाजा ओलांडुन आम्ही आतल्या हॉलमध्ये गेलो, तिथे साधारणपणे हजार माणसं बसण्याची सोय होती. निटनेटक्या सतरंज्या अंथरून बैठकीची व्यवस्था केली होती.

     बैठकीच्या एका बाजुला स्टॅंडवरती दासबोधठेउन माई तो वाचत होत्या. मी त्यांच्याकडे बघीतलं, साधारण ६५ च्या आसपास असलेलं वय! गोरापान वर्ण, थोडेसे पांढरे झालेले, तरीही दाट केस, त्यांचा मानेवर रुळणारा, निटनेटका घातलेला अंबाडा, धारदार वाटणार, तरीही टोकाला किंचीतसं पसरट झालेलं नाक, त्यावर शोभीवंत दिसणारा सोनेरी काडय़ांचा चष्मा! या सर्व वैशिष्ठयांवर कळस चढवणारी त्यांची निर्मळता! स्वच्छतेची झळाळी ल्यालेलं आकाशी फुलांच्या छपाईची पांढरी साडी, त्यावरच पांढर ब्लाऊज! माईंच मी भरभर निरिक्षण करत होते. प्रथमदर्शनी माई मला आवडल्या. नितांत सुंदर भासल्या. त्यांच्याकडे अस शांतपणे बघत असतांनाच त्यांनी मला बसायची खुण केली, त्यांच्या समोर थोड अंतर राखुन मी बसले.. त्यांचा अध्याय वाचुन झाला असावा, खुणे दाखल त्यांनी ग्रंथातलाच लाल रेशमी दोरा त्या पानावर ठेवला, शांतपणे नमस्कार करून दासबोध मिटला. माझ्याकडे हसून बघत म्हणाल्या " तु अदिती.......पुण्याहुन आलीस ना? तुझ्या येण्याची सुचना अगोदरच मिळाली आहे आम्हाला. बरं प्रवासात काही त्रास झाला का?, दमली असशील. आधी आंघोळ कर, चहा घे, मग बोलु आपण. त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्वापेक्षा त्यांचा आवाज अधिक गोड होता, उठुन त्यांना नमस्कार करावा म्हणुन मी वाकले, मला उठवत म्हणाल्या, नमस्कार नको, नमस्कार घेणा-याजवळ समोरच्याच दु:ख स्वत:त सामावुन घेण्याची ताकद असावी लागते, तेवढी मोठी नाही मी, त्यापेक्षा गणपती बाप्पाला नमस्कार कर असं म्हणुन त्यांनी माझे जोडलेले हात हातात घेतले, त्यांचा स्पर्श खुप मुलायम होता. अप्पा तुला बाथरुम दाखवतील, आंघोळ करुन स्वयंपाक घरात ये, मी तुझ्यासाठी गरम खायला करते, माईच्या विषयीच्या आदराने माझं मन भरुन आलं होतं.

     साफल्यवयस्कर लोकांसाठी, वयस्कर लोकांनी चालवलेले वयस्करांचे गृह! म्हणजे वृध्दाश्रम! पण नाही वृध्दाश्रम हा शब्द माईंच्या तत्वात बसत नव्हता. घरात मोडकळीस आलेल्या वस्तु विकायला काढणे काय किंवा घरात निकामी झालेल्याना  वृध्दाश्रमात नेउन सोडणे काय, त्यांच्यालेखी सारखेच  होते, म्हणुनच आपल्या या संस्थेबाबत वृध्दाश्रम हा शब्द त्या कटाक्षाने टाळत होत्या. आयुष्याची वाटचाल सफलतेने संपवुन त्याच्या कडु-गोड आठवणींसह साफल्यमध्ये प्रवेश करायचा. साफल्यचा हा मोठा पसारा सांभाळणा-या माई कारखानीस! त्यांची मुलाखत घ्यायला आले  होते मी नादब्रह्ममासिकासाठी!!
      माईच्या एकंदर व्यक्तिमत्वात समोरच्याला भारावुन टाकण्याची जादु होती. तिन दिवसातला क्षण नी क्षण मी माईंच्या सहवासात घालवणार होते. आम्ही दोघीही स्वयंपाक घरात आलो. तिथली व्यवस्था बघुन गंमतच वाटली. दहा उभ्याच्या ओटयांची सोय असलेल मोठं स्वयंपाकघर होत ते. दहा ओट्यांवर दहा गॅस सुसज्ज होते. प्रत्येक ओटयाच्या बाजुलाच साधारण १०० माणसांची जेवणाची भांडी ठेवता येतील एवढ मोठ टेबल होतं साफल्यत रहाणा-याची संख्या साधारण हजार होती पण कुठेही गडबड गोंधळ नव्हता. सगळ कस निटनेटक चालल होत. चहा आणि खायला करता करता माई तिला स्वयंपाकाची व्यवस्था समजावुन सांगत होत्या. सगळ्यात प्रथम चार वाजता माई उठायच्या, त्यांच्या बरोबर आणखी दहा मंडळी उठायची. सकाळची आंघोळ झाली की साफल्यच्या दिवसाला सुरुवात व्हायची माई प्रथम दहाजणांचा चहा ठेवायच्या. पाच पुरुष, पाच स्त्रिया अशा ग्रुपने आंघोळी व्हायच्या. पहिला चहा झाला की माई साधनेला बसायच्या. पहील्या दहाजणांच्या ग्रुपमधील एकजण पुढच्या दहाजणांचा चहा ठेवायची. चहाबरोबरच नाश्त्याच कामही झालेलं असायच. साधारण चार ते सात पर्यत सगळ्यांच चहापाणी झालेल असायच. बरोबर सात वाजता सगळी मंडळी मधल्या मुख्य सभागृहात जमायची. गणेशाच सामुदायिक नामस्मरण व्हायच. आज नामस्मरणात रममाण झालेल्या त्या सगळ्यांकडे बघुन माईंच्या अफाट नेतृत्व शक्तिची जाणिव होत होती "ॐ गं गणपतये नम:" माईंचा गोड, शांत आवाज सभागृहात निनादत होता, त्यानंतर लगेचच त्याच सुरात असंख्य आवाज माईंच्या सुरात मिसळत होते. तिथे एक सुंदर नादानुसंधान निर्माण झाले होते. आठ वाजता नामस्मरण झाले की नाश्ता घेऊन साफल्यमधील सगळी मंडळी आपापल्या उद्द्योगाला लागायची ती नंतर साडेबारा वाजता परत जेवण्यासाठी म्हणुन एकत्र यायची. वेळेच अचुक व्यवधान येथे सांभाळल जात होत. साफल्यमध्ये अनेक व्यवसाय उभारले होते. वयस्कर मंडळी तरुणांनाही लाजवेल इतक्या वेगाने उत्साहाने कामाला लागत होती. मी, दादा आणि माई, दादा म्हणजे माईंचे यजमान. या व्यापक कार्याचे सुत्रधार! कल्पवृक्षाच्या सावलीसारखे माईंच्या पाठीशी उभे राहीलेले! शांत वृत्तीचे, सदैव प्रेमाचा वर्षाव करणारे त्यांचे डोळे. माईंनी एखादा मानस बोलुन दाखवायचाच, त्यावर गंभीरपणे विचार करणारे, मितभाषी दादा! "साफल्य" वरील एका लेखात दादांबद्दलची ही माहिती माझ्या वाचनात आली होती. आम्ही तिघेही आवाराच्या एका टोकाला चालत होतो. माई आज तिथे चालणा-या प्रत्येक उपक्रमाची माहिती करुन देणार होत्या.  

     लोकलने कर्जतला उतरुन, जामखुर्द मार्गे जाणारी बस पकडुन साधारण एक तासाच्या प्रवासानंतर कोठिंबे नावाच एक छोटसं खेडेगाव लागतं. या कोठिंब्याच्या निसर्गरम्य परिसरात वयस्करांसाठी चालवलेली ही संस्था म्हणजे "साफल्य". हे संकुल निराधार वयस्करांना आधार देते. त्यांच विस्कटलेले जीवन सावरण्याचा प्रयत्न करते. आयुष्यात आपण कोणालाच नकोसे आहोत, जगायला पुरेसे पैसेही नाहीत अशा वेळेस मनात आयुष्य संपवुन टाकावं, या विचारात इथे येणारी ही माणसं पुन्हा नव्याने सारिपाट मांडतात. त्यांचा जगण्यातला उत्साह, आनंद बघुन मी चकित झाले होते. इथे कुणीही कुणाला पोसत नव्हते. प्रत्येकजण स्वावलंबी होता. कमाईचे दरवाजे इथे सगळ्यांना खुली करुन दिले होते. आपण स्वकष्टाची भाकरी खातोय ही अतीव समाधानाची जाणिव येथील प्रत्येक माणसाच्या चेहे-यावर मी बघितली होती.
  
     प्रवेशद्वारातुन आत शिरुन थोडस चालुन गेले की अगदी सुरुवातीलाच गणेशाची मुर्ती असलेली छोटेखानी खोली. ती खोली ओलांडली की पुढे मोठं सभागृह. त्याला लागुन असलेल स्वयंपाकघर, त्याच्या बाजुला जेवणाचे सभागृह, या सर्वाच्या बाजुला इंग्रजी सी आकाराच्या, प्रत्येक खोलीत सहा माणसं राहु शकतील अशा दोनशे खोल्या. या खोल्या आणि मधले सभागृह यामध्ये जे अंतर होत, तिथे निशिगंध, मोगरा, चमेलीची झाडं लावली होती. खालची जमीन सारवली जायची. उन्हाळ्यात सगळे रात्रीचं जेवण तिथेच घ्यायचे.

     साफल्यच्या एका टोकाला अर्धा किलोमिटर चालुन आल्यावर माईंनी बोलायला सुरुवात केली. येतांना त्या शांतपणे कुठलातरी जप करत होत्या त्यामुळे मुकपणे आलो. हे बघ अदिती या भागात दुर्वांची लागवड केली आहे. इथल्या जवळपासच्या मंदिरांना सेवा म्हणुन दुर्वा देतो. शंभरजणाचा गृप याची जोपासना करतोय. त्याच्या पुढच्या भागात झेंडू, गुलाब, लावले होते. बोलत बोलत आम्ही एक एक भाग बघत चाललो होतो. संकुलाच्या दुस-या भागात भाज्यांची लागवड केली होती वांगी, भेंडया, टमाटे, गवार, मिरच्या. मोठमोठया हॉटेल्सला आमच्या येथुन ताज्या भाज्या पुरविल्या जातात. एका भागात लावलेली जास्वंदीची फुलं मात्र साफल्यमधील गणेशाच्या पुजेसाठीच वापरली जात होती. माई आणि दादा गणेशभक्त होते. इथे येणा-या प्रत्येक व्यक्तीने गणेशाच्या भक्तीचा स्विकार करावा असा त्यांचा आग्रह होता. आपापल्या कामात व्यग्र असतांना, प्रत्येकाने मुखाने गणेशाचे नाम घ्यावे असं त्या सगळ्यांना सांगत. नाम घेता घेता काम केले म्हणजे कामाचा शिण जाणवतच नाही.  अशी तल्लिनता येते की ज्याच नाम घेतोय तो आणि आपण यात वेगळेपण उरतच नाही. नाम आणि नामी  यात द्वैत ऊरायलाच नको. ज्या  परमात्म्याचा अंश म्हणुन या जगात जन्माला आलो आहोत, नामस्मरण करत करत त्याच्यातच परत विलिन व्हायचे. पुनर्जन्माच्या फे-यातुन मुक्त व्हायचे. परमात्म्याच्या शरिरापासुन निघालेला एक एक किरण म्हणजे या पृथ्वीतलावरची अखंड सृष्टी. नामस्मरणाने मानवदेहाचे सार्थक करायचे. माईंचे रसाळ बोलणे ऐकतच रहावेसे वाटत होते.
    मुख्य इमारतीच्या बाजुला थोडयाशा अंतरावर एक दवाखाना होता. दहा डॉक्टर आणि विस नर्सेस तिथे हजर असायच्या. दोन डॉक्टर आणि चार नर्सेस अशी आळीपाळीने डयुटी असायची. दवाखान्याच्याच बाजुला एक छोट सभागृह होत. ती होती व्हीजिटर्स रुमया वृद्ध मंडळींना भेटायला त्यांची नातेवाइक मंडळी यायची, त्यांना भेटायची, सुख-दुखा:च्या गोष्टी करायची आणि परतून जायची. त्याच्या बाजुलाच एक खोली होती. त्या खोलीत २५ शिवणयंत्र ठेवली होती. तिथे हरकच्या कापडाचे तागे रचुन ठेवले होते. ज्या स्त्रीयांनी त्याच्या पुर्वायष्यात शिवणकाम केले होते अशा स्त्रीया तेथे लंगोट आणि दुपटी शिवण्याचे काम करत होत्या. ही दुपटी, लंगोट सुतिकागृहाला पाठवली जायची .ह्या स्त्रीयांना मदत करण्यासाठी.... कापड कापण्यासाठी, सुईत दोरा ओवण्यासाठी दहा तरुण मदतनिस होत्या. दिवाळीच्या दिवसात काही हौशी मंडळी साधेच पण सुंदर, आकर्षक आकाशकंदिल बनवायचे मग हे आकाशकंदिल जवळच्याच गावात विकायला पाठवले जायचे. अकाउंटस लिहिण्याचा अनुभव असलेली मंडळी खाजगी कंपन्यांचे अकाउंटस लिहुन द्यायचे काम करायची. या व्यवसायातुन झालेले उत्पन्न त्या त्या विभागात झालेल्या उत्पन्नाच्या सम प्रमाणात प्रत्येक व्यक्तीच्या नावाने बॅंकेत जमा केले जायचे. ही बॅंकही तेथेच "साफल्य-पतपेढी" या नावाने चालवली जात होती, याचा कारभारही साफल्यमधील मंडळीच बघत होती. या सगळ्या उत्पन्नातला एक चतुर्थांश भाग परत भांडवलासाठी वापरला जायचा. हातात मिळणा-या पैशाचा वापर स्वेच्छेने करायचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला होता. दरवर्षी चार- धाम यात्रेचे आयोजन व्हायचे. १०० जणांचा ग्रुप ही यात्रा करायचा. तीन डॉक्टर, सहा नर्सेस, आणि दहा सेविका त्या ग्रुप बरोबर असायच्या. जे खुप वयस्कर होते, काम करु शकत नव्हते, आणि आर्थिक दृष्टया निराधार होते अशांचा सांभाळ साफल्यची संस्था करत होती.
    येथील प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक कहाणी होती. त्या प्रत्येकाची कहाणी स्वतंत्रपणे ऐकली असती तर माझ्या आणि ऐकणा-याच्या डोळ्यात अश्रुंचं जलाशय तयार झाल असतं  इतकी करुण आणि हृदय हेलाउन टाकणारी व्यथा होती एकेकाची. ८० वर्षाचे तारे आजोबा आणि ७५ वर्षाच्या आजी....... वयोमानाने होणारा वारंवार बाथरुमला जायचा त्रास....त्यासाठी त्यांना लांब वाडयाच्या बाहेर जायला लावणारी सुन! वारंवार टाकुन बोलायच, जेवायला कमी द्यायच......आपल्याच घरात चोरटयासारखी रहाणारी ही माणसं.......सगळ्यात कळस म्हणजे एक दिवशी भर दुपारी बारा वाजता रेल्वे स्टेशनवर बेवारशासारख आणुन सोडलं त्याच्या सामानासकट......रेल्वे कॉलनीतले सगळे आले होते तारे वहिनींना समजावयला, पण पाझर नाही फुटला बाईला.....!!! आता इथे छान फुलं भाज्यांची लागवड जोपासताय आनंदात. एक ७८ वर्षांच्या ललिता आजी......मुलं त्यांची गरज होती तोपर्यंत एकत्र राहिलीत त्यांची गरज संपली......आजी-आजोबांमधुन वेगळे निघाले जवळच बंगल्यात रहातात,  मुल, सुना कुणालाच वेळ नाही आजी-आजोबांकडे बघायला, आजोबा गेलेत, आता आजी एकटयाच......एकटीने करवत नाही म्हणुन इथे आल्यात..... पुर्वाश्रमीच्या सुगरण!!! आता स्वयंपाकावर देखरेख करण्याच काम करतात, खुप आनंदात असतात, सगळे पोटभर जेवले की खुश होतात....पेन्शन मिळत नऊ हजार रुपये......!!    खुपसं मुलांवरच खर्च करतात.....!! ह्या आणि अशा खुप करुण कहाण्या होत्या पण माईंच्या कडक शिस्तीत आणि गणेशाच्या सेवेत डोळ्यांमधुन आनंदाची कारंजी उडत होती.....येणारा प्रत्येक क्षण उत्साहाचे वारे घेउन येत होता.
   माईंच्या सहवासातला एक दिवस संपला. रात्रीच सहभोजन सगळ्यांनी एकत्र, सारवलेल्या अंगणात घेतल. उन्हाळ्याचे दिवस होते. चमेलीला बहर आला होता. हवेच्या मंद झुळुकीबरोबर येणारा सुगंध मन धुंद करत होता. माझी झोपायची सोय माईंच्या खोलीत केली होती. रात्री १० वाजता झोपायच्या अगोदर माईंनी सगळ्यांची विचारपुस केली, आश्रमातील सगळ्यात वयोवृद्ध नानींच्या डोक्याला बाम लावला, मग त्या झोपायला आल्या.
    "अदिती, झोप आता, तू पण दमली असशील". माईंच्या बोलण्याला मी हलकेच हुंकार भरला. आता या क्षणाला मला एकांत हवा होता. मनातला कॉम्प्युटर चालु झाला होता. मनात एक शंका आली हा एवढा पसारा सांभाळणारे माई, दादा दु:खी असतील का? परिस्थितीच्या चटक्यांनी ही साफल्यची संकल्पना साकारली नसेल ना?, एकुलत्या एक मुलाने ....? हा विचार मनात आला आणि दचकल्यासारख झालं. मायेचा इतका वर्षाव करणा-या माईंना त्यांच्या मुलाने सांभाळायला नकार दिला असेल का? मनातल्या विचारांच्या गुंत्याने थकून केव्हांतरी झोप लागली. सकाळी जाग आली ती माईंच्या हाकेने, परत तेवढयाच उत्साहाने त्या कामाला लागल्या होत्या. "अदिती आज अपुर्वा आणि चैतन्य येणार आहेत, आमची मुलं, त्यांच्याबरोबर जावईबापु, सुनबाई आणि बालगोपाल मंडळी पण येणार आहेत. आज पुर्ण दिवस राहाणार आहेत ती. अहो उठता ना? मुलं येणार आज.
दादा लगबगीने ऊठले आणि कामाला लागले नित्यनेमाची कामं वेळेत चालली होती. माझे डोळे साफल्यच्या दरवाजाकडे लागले होते. माईंच्या मुलांना बघायची उत्सुकता होती. साडेनऊच्या सुमारास एक पांढरी मारुती व्हॅन आली त्यातुन तीन छोटी मुलं आणि एक मुलगी उतरली, ’माई आजी, माई आजीकरत ती सगळी माईंना बिलगली. माईपण कुणाच्या पाठीवरुन हात फिरवीत होत्या, कुणाची पापी घेत होत्या. मी तो कौतुक सोहळा दुरुनच बघत होते. माईंच रुप ल्यालेली  अपुर्वा आणि दादांशी साम्य असणारा चैतन्य. माईंची मुलं, जावई, सुन, नातवंडं, सगळीच छान होती, गोरीगोमटी, खानदानीपणाच तेज असलेली. त्यांच्या सुनेने आणि जावयाने वाकुन नमस्कार केला दोघांनाही. अपूर्वा, चैतन्य मात्र गळ्यातच पडले. माईंच्या स्पर्शाने अपुर्वाचे डोळे भरुन आलेत. भरल्या गळ्यानेच ती म्हणाली "आई, तुझी खुप आठवण येते, अमेरिकेत अगदी एकट वाटत", तिच्या पाठीवर हात फिरवत माई म्हणाल्या," अग, जगाच्या पाठीवर कुठेही असली ना तरी आमचे आशिर्वाद आहेत ना तुमच्या पाठीशी". परिवाराच्या भॆटीत मग्न झालेल्या माई भानावर आल्यात, माझ्याकडे बघत म्हणाल्या अदिती, तुझी ओळख करुन देते सगळ्यांशी’. मी म्हटल,’माई तुम्ही न सांगताच ओळख झालीय माझी सगळ्यांशी. माईंच्या संसारवेलीच्या फांद्यांना जवळुन बघण्याची संधी मिळाली.

    अपुर्वा एम.एस्सी. झाली होती, तीचे मिस्टर एम.एस. होऊन अमेरिकेत नॊकरी करत होते, तिथेच स्थिरावले होते. चैतन्य, सायली दोघही बी.ई. झाले होते, यु.डी.सी.टी. चे अत्यंत बुद्धीमान विद्दयार्थी म्हणून ओळखले जायचे त्यांचा प्रेमविवाह. चैतन्यला दोन्ही मुलच तर अपुर्वाला एक मुलगा, एक मुलगी.

   दृष्ट लागावा असा सुखी संसार! आयुष्याची चौकट इतकी सुंदर, इतकी आखीव रेखीव की सगळ्या जगाने हेवा करावा अशी. समाधानी म्हातारपण म्हणजे गुलबकावलीच फुल!! ते माईंच्या हाती गवसलं होत. उर्वरीत आयुष्य मुलाबाळांच्यात, नातवंडाच्या सहवासात सुखासमाधानाने घालवायच! मग हा साफल्यचा अट्टाहास कां? कशासाठी ही धडपड? अनेक प्रश्न मनात निर्माण झाले होते.साफल्यचा कानाकोपरा बघितला, माई-दादांना जाणुन घेतल, तिथे चालणारे उपक्रम बघीतले. तिथल्या माणसांना भेटले एक पत्रकार या नात्याने सगळ्या गोष्टी पुर्ण केल्या होत्या तरीही मनातला एक कोपरा रिकामा होता. "साफल्यची ही कल्पना माईंच्या डोक्यात कशी आली??

    रात्रीची जेवणं कालच्या सारखीच झाली. यावेळेला माईंचा परिवार होता जेवायला. रात्री मी आणि माई परत एकटयाच होतो झोपायला. आज मी झोपणार नव्हते. पलंगावर बसले होते हातात टाचण वही घेउन, मधून मधून चाळत होते. माई म्हणाल्या "काय अदिती आज झोपायचे नाही कां?, अगदी गप्पांच्या मुडमध्ये दिसते आहेस" मी हळूच म्हटल, "माई सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालीत, पण एक प्रश्न मनाला त्रास देतोय, ते उत्तर मिळाल्याशिवाय सगळ अपूर्ण वाटतय....." "विचार बाई, काय विचारायचे ते, तुम्ही पत्रकार लोकं सगळी माहिती काढणार, आणि काय छापायचे ते छापा, आता कशाच काही वाटत नाही" माई उत्तरल्या, "माई मला फक्त एक सांगा हे "साफल्यच" बीज तुमच्या मनात कस आणि कां रुजल?.......

    माई हसल्या..........कुठेतरी दुर शुन्यात बघत भुतकाळात हरवल्या.......................४२ वर्षाचा काळ बघता  बघता  पुसला गेला..............४२ वर्षापुर्वी त्या माई कारखानीस नव्हत्या ती होती २३ वर्षाची माधवी. अनिरुद्ध बरोबर सप्तपदीची पावल चालून आलेली, माधवी देशपांडेची माधवी कारखानीस झालेली. तडफदार व्यक्तिमत्वाची! अनेक मोठी स्थळ सांगुन आली होती तिला, पण अनिरुद्धंकडून होकार आल्यावर आईला मनातली पसंती सांगितली होती, ते केवळ त्यांचा साधेपणा, हुशारी बघून. लग्न होऊन ती मुंबईत आली ती दोन खोल्यांच्या घरात, त्याही पसा-याने भरलेल्या, अस्ताव्यस्त झालेल्या. पण माधवीचा हात त्यावरुन फिरला आणि  हेच का ते घर? इतक प्रसंन्न वाटत होत. प्रत्येक पावलाचा ठसा मागे सोडुन जाणारी अचूक बोलणारी कुठल्याही अडचणीत निर्भिडपणे निर्णय घेणारी, निटनेटकेपणाची आवड असलेली, सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी. ही मुलगी आयुष्यात खुप काही करुन दाखवेल याची सगळ्यांना खात्री वाटायची. ती सुंदर कविता करायची, तिला गाण्याचा आवाज होता, चित्र छान काढायची. तिचे गुण बघुन सासुबाईना पण कौतूक वाटायचं आणि मग नकळतच चारही सुनांमध्ये मायेचं झुकतं माप हीच्याकडे व्हायच. सगळ्याच्या आवडी-निवडी मनापासुन जोपासणारी, त्यासाठी कष्ट करणारी, केलेली वस्तु समोरच्याला आवडली की सगळा थकवा विसरणारी, सासरची आणि माहेरची दोन्ही माणसांना जपणारी, खुप वेगळी!!!!

    पहिल्या वर्षात मुल हवं की नको या संभ्रमात दोघही असतांनाच त्याची कुणकुण सासुबाईंच्या कानावर गेली अन तिला जवळ घेत त्या म्हणाल्या होत्या, ’पहीलं होऊ द्या लवकर मग करा प्लानिंग वगैरे. तिलाही ते पटलं आणि मग बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. आई होण्याच्या कल्पनेने ती मनातून मोहरली.  आई होतांना खुप वेदनांना सामोर जाव लागतं असं तिने मैत्रीणीकडून ऐकल होतं. तपासणी झाली, सगळे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आलेत आणि ती निश्चींत झाली आता आई होण्याचा क्षण नी क्षण ती अनुभवणार होती .बाळाची प्रत्येक हालचाल, त्याची स्पंदन ती जाणून घेणार होती. पण कसच काय तिच्यावर अतोनात माया करणारी माणसं तिच्या तैनातीला हजर झाली. सासुबाई आणि आईने ठरवल तीन-तीन महीने तीच्याकडे रहायच. सातव्या महिन्यात बाळंतपणासाठी तिला माहेरी घेऊन जायच. या दोघींच्या प्रेमाच्या नजरकैदेत अडकलेली माधवी कुठलाच क्षण स्वत:चा म्हणून जगु शकली नाही. हजार सुचना हजार काळज्या....एकदम उठु नकोस, जड बादली उचलु नकोस, जोरात चालू नकोस सगळ्या मायेच्या सुचना! डोहाळजेवणाची कौतूक करवुन घेत असतांना, तिला कुठेतरी हरवल्या सारख वाटत होत. येणा-या बाळाचा प्रत्येक श्वास, त्याची लय, त्याच्या पोटातल्या हालचाली तिला अनुभवायच्या होत्या.......पण नाही जमलं........या सा-या गोंधळ गडबडीत बाळाचा जन्म झाला. तिचं रुप घेउन जन्माला आलेल्या  छकूलीकडे बघुन मन आनंदाने भरुन आलं होत, नुतन बाळाच नाव ठेवल अपुर्वा’.
   
   अपुर्वा तिन वर्षाची झाली, दरम्यान माधवीला नोकरी लागली. अनिरुद्धची इच्छा नसतांना तिने नोकरी करायची ठरवले होते. बघता बघता प्रोबेशन संपला ती नोकरीत स्थिरावली. तिला परत एकदा आई व्हायच होतं. नोकरीच्या धावपळीमुळे स्वस्थता नव्हती. मनातल्या मनात वाट बघणं चालु होतं. अपुर्वाला ८ व लागलं होतं, अनिरुद्ध उदास झालेत, ती पण मनाने शिणली, आई होतांनाचे ते क्षण तिला परत अनुभवायचे होते. आणि मग परत चाहूल लागली. डॉक्टरांकडे चेकिंग केल्यावर रिझल्ट आला, पॉझिटिव्ह होता. आठ वर्षांनी ती परत एकदा आई होणार होती. वळणावरून स्कुटर नेतांना लागणा-या कट्ट्यावर ती दोघं विसावली, पण या वेळेस मन पुर्वी सारख उल्हासित नव्हतं. असंख्य काळज्या होत्या. सगळे निट पार पडेल ना?  शंकेची पाल मनात चुकचुकत होती. विनाकारण आलेल्या या अस्वस्थतेच कारण उमजत नव्हते.

   या घटनेनंतर अवघे पाचच दिवस उलटले, आणि तिच्या उजव्या ओटी-पोटात वेदना सुरु झाल्यात, फॅमिली डॉक्टरांनी औषधं, इंजेक्शन दिलं, पण दुखण काही थांबत नव्हते. डॉक्टरांना निराळीच शंका आली आणि त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली आणि समजलं एक्टोपिक प्रेग्नसी. टयुबमधील प्रेग्नसी, अगदी क्वचितच एखाद्या स्त्रीला याला सामोरं जावं लागतं, आणि हे सगळ तिच्याच वाटेला....!!! सिझेरियन करुन उजव्या भागातली गर्भ-नलिका काढून टाकायची. एका क्षणात चित्र बदललं. अ‍ॅम्ब्युलन्स मधुन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर पर्यंत नेईपर्यंत गर्भ-नलिका फुटून पोटात रक्तस्त्राव झाला होता...बाहेरुन रक्त देण्याची आवश्यकता होती. अनिरुद्धना तर काही सुचतच नव्हते. तार मिळता क्षणी तिचे आई दादा पहिल्या गाडीने हजर झालेत. शुद्ध हरपून म्लान अवस्थेत झोपलेल्या तिला बघून आईला रडू आवरणं कठीण झालं होतं. ऑपरेशनंतर २४ तासांनी शुद्धीवर आल्यावर सगळ समजलं आणि डोक्यावर पांघरूण घेऊन तिने डोळ्यातल्या आसवांना वाट करुन दिली होती. १५ दिवस सलाईन, निरनिराळी औषधं, भेटायला येणारी असंख्य नातेवाईक आणि मित्रमंडळ पण ति मात्र कुठेतरी हरवलेली,सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखी.....१५ दिवसांनी तिने रुमच्या बाहेर पाऊल टाकलं. तपासायला आलेल्या डॉक्टरांना तिने विचारलं, "डॉक्टर, आता नाही होता येणार न मला आई ? या प्रश्नाने डॉक्टरही हळवे झाले, तिच्या पाठीवर थोपटत म्हणाले, "कुणी सांगितलं तुम्हाला, फक्त एकच गर्भ-नलिका गेलीय तुमची, आणि हो आता विचार करायचा नाही फक्त विश्रांती घ्यायची, समजलं"

   तिन महिन्यांच्या विश्रांती नंतर ती ऑफिसला रुजु झाली. परत आई होण्याच स्वप्न तिने पार मनाच्या कप्प्यात दडवून टाकलं, आता परत नकोच ते टेन्शन! पण मग आई-दादांच मत, अनिरुद्धांचा  विचार आणि लहानग्या अपुर्वाने विचारलेल्या केविलवाण्या प्रश्नाने, ’आई, मी कुणाशी खेळु ग!, तीचं एकलकोंडेपण, त्यापायी आरशासमोर उभं राहुन आरशातल्या प्रतिमेशी बडबडणं, मग मधेच  स्वत:च्याच आरशातल्या प्रतिमेशी भांडणं, रागावणं, एकटेपणाचा तिच्यावर होणारा मानसिक परिणाम जाणवत होता, सगळा विचार करुन परत एक संधी घ्यावी, असं ठरवल मग परत ट्रिटमेंट सुरु. नोकरी डोंबिवलीला, डॉक्टर ठाण्याला. सा-या सकाळची उठलेली माधवी वेळेत ऑफिस गाठायची, दिवसभर कामाचा शिण, संध्याकाळी ६.१२ ची व्ही.टी. फास्ट. सकाळची कोरडी पोळी भाजी खाऊन पोटात भुकेचा डोंब उसळलेला असायचा. कुठल्यातरी स्टॉलवरचा वडा-पाव बांधून घ्यायचा, मग रिक्षात बसलं की तो घाईघाईत तोंडात कोंबायचा, दवाखाना गाठायचा. मनात अपुर्वाच्या आठवणी गर्दी करायच्या...दवाखाना लांब म्हणून जाता येता रिक्षा, दवाखान्यात ही गर्दी, केव्हा नंबर लागेल याची वाट बघत बसायचे, डॉक्टरांची महागडी फी, रिक्षा, ठाण्याचे तिकिट....खर्चाचा विचार करायचाच नाही. हा सगळा द्राविडी प्राणायाम करुन साडेनऊ पर्यंत ती घरी पोहोचायची तर स्वयंपाक घर वाट बघत असायचे....लहानगी अपुर्वा तिची वाट बघत असायची...."आई ग तू आलीस.....मी आता झोपणार नाही...." थांब ग राणी आलेच मी, अगं ब्रेड-बटर दिलय पप्पांनी मला, मला तर ते आमटी भात पण देत होते, पण माला तुला स्कुल मधल्या खुप गोष्टी सांगायच्या आहेत नां, म्हणून मी थांबलेय तुझ्यासाठी..असं म्हणता म्हणता ती कधीच झोपी गेलेली असायची....!! तिच्या अंगावरुन हात फिरवतांना तिचं सुकलेपण जाणवायचं.

    हे चक्र असच चालू होतं. माधवीला सगळ्याचा उबग आला होता. ही सगळी धावपळ थांबवावी असं वाटत होत. जगात कितीतरी जोडपी आहेत, ज्यांना अपत्यच नाही, तरीही सुखाने आयूष्य जगत आहेत. मला तर अपुर्वा आहे....एका क्षणात निर्णय झाला...मन शांत करून ट्रिट्मेंट थांबवली. खुप मोकळं मोकळं झाल्यासारख वाटलं....त्यादिवशी अपुर्वाला घेऊन ठाण्यात मस्त फिरून आलो.....तिच्यासाठी खरेदी केली मनसोक्त. कसल्यातरी जखडलेल्या बंधनातून सुटल्या सारखं झालं.

    याला आठच दिवस होत होते रविवारी ऑफिसच्या मैत्रिणी आणि सगळ्यांची मुलं अस सगळे कर्जतला मैत्रिणीच्या फार्म हाऊस वर पिकनिक साठी निघाले होते आणि तीची बालपणीची मैत्रीण स्मिता भेटली गाडीत. ती योगायोगाने कर्जतलाच रहात होती....मग गप्पा रंगल्या...सगळी सुख दु:खं...उजळली गेलीत. तिने कर्जतजवळच असलेल्या कोठींबे गावातल्या शिंत्रे आजींचा पत्ता दिला. कर्जत पासून जामखुर्द मार्गे जाणा-या बसने एका तासाने लागणारं हे गांव. त्या गांवात फार पुर्वीपासून रहाणारी ही मंडळी. घरची शेतीवाडी, मोठा वाडा, वाड्यातली गुरं, ढोरं, मोठा पसारा आणि वाड्यावर गडी माणासांचा असणारा राबता. या वाड्याचं वैभव सांभाळणा-या आजी...आणि त्यांचा वनौषधींचा छंद! वाडयाला लागूनच असलेल्या मोकळ्या जागेत निरनिराळ्या औषधी वनस्पतींची लागवड केली होती. त्यांची निगा, जोपासणी, खतांचा वापर, त्यापासून निरनिराळी औषधं बनवून त्यांचा वापर, त्यांचे गुण अजमावणे. या त्यांच्या छंदातून त्यांना एक औषध गवसलं होतं. विशिष्ठ नियम पाळून त्या सांगतील तसं ते औषध घ्यायच, गुण येतोच. पण त्यांना याचं व्यावसायीकरण करायच नव्हतं, म्हणून मग फक्त कोणी माहिती होऊन विचारत आल्यास त्याला औषध द्यायचं ते ही विनामुल्य. माधवीच्या मनात आशा पालवली. तिने अनिरुद्धंना हे सगळं सांगितलं, त्यांनी प्रथम तिचं म्हणणं हसण्यावारी नेलं, पण तिच्या मनाच्या अवस्थेचा विचार करून शेवटी होकार दिला.
  
    अपुर्वाला आत्याकडे ठेऊन संध्याकाळी ४ वाजता ती दोघेही निघाली. जातांना काहीही त्रास न होता ते कोठिंब्याला सुखरुप पोहोचले. शिंत्रे  मंडळी फारच सज्जन होती. वाडयावर ज्यांना वहीनी म्हटल जायच, त्यां वहीनींनी ते लांबून आले होते म्हणून गरम पोहे आणि चहा केला, त्यांच्या अगत्याने संकोचल्यासारखे झाले. मग आजींनी तिला जवळ बोलावलं. खुप वेळ औषध कसं घ्यायच, काय पथ्य, नियम पाळायचे ते समजावलं. कां कुणास ठाऊक एखाद्या नातेवाईंकाच्या घरी गेल्यासारखेच वाटत होते. त्यांचा निरोप घेऊन दोघही निघालेत तेव्हा मन उल्हासित झालं होतं. बस थांब्यावर ते पोहोचतच होते....पण कशी कुणास ठाऊक शेवटची साडेसहाला परत कर्जतला जाणारी बस, ड्रायव्हरने थांबवलीच नाही. त्यांना दोघांनाही वाटलं मिळेल दुसर वाहन....म्हणून त्यांनी चालायला सुरुवात केली.
    बघता बघता काळोख पडला. अंधारी रात्र, सुनसान रस्ता, रस्त्यावर चिटपाखरुही नाही. एखादा वाटसरु दिसताच माधवी रडवेल्या आवाजात विचारत होती, ’बाबा, आता बस केव्हा येणार?’ ’माझी बाय, आता बस कन्ची? हे इथून फर्लांगभर चालत गेलं की लागेल की जामखुर्द, तिथं भेटली तर भेटेल एखादी जीप गाडी’. बर त्या वाटसारुच्या मागे चालत जाव तर ती खेडेगावातली माणस......भरभर चालत काळोखात केव्हाच अदृष्य व्हायची. परत त्या अंधारात ती दोघच. माधवी पार घाबरली होती. डोळ्यातून आसवं यायला लागली होती. कुठुन दुर्बुद्धी झाली आणि अशा या आडवाटेच्या खेडेगावात आलो. अनिरुद्ध तिला सारखा धीर देत होते. ३-४ किलोमिटर चालून आल्यावर कुठेतरी दुरवर मिणमिणते दिवे दिसलेत. काळोखातला रस्ता कापतांना वटवाघूळ फडफड पंख उडवत गेलं आणि भितीचे काटेच आले तिच्या अंगावर. गेले अडीच ते पावणेतीन तास झाले ते चालत होते मग कुठे ती दोघही जवळच्या खेड्यात पोहोचले. तिथून जीप मिळून ते कर्जतला पोहोचले तेव्हा १० वाजले होते. व्ही.टी. कडे जाणारी शेवटची गाडी उभी होती. धावत पळत गाडी पकडून डॊंबिवलीली पोहोचेपर्यंत १२ वाजले होते.

   नियमीत घेतलेलं औषध, पाळलेले नियम, आणि पथ्य या सगळ्या गोष्टींनी मनातल्या आशेला कोवळा अंकूर फुटला. तिला आई होण्याची चाहूल लागली. मनस्ताप, दु:ख, यातनांना सामोर जात मनामध्ये तिने जी तिव्र इच्छा बाळगली होती ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर होती. परत एकदा आई होण्याचे स्पंदनं तिला अनुभवायला मिळणार होती.
     "प्रत्येक क्षण या स्पंदनांचा अनुभव घेत ती जगली. बाळाच्या पोटातल्या हालचालींचा ती कानोसा घेत होती. शांत शांत होत बाळाची तिच्याशी जोडलेली लय ती अनुभवत होती. ती स्पंदनं!! त्या हालचाली!! ती लय......!! एका अनोख्या विश्वात तिला घेउन जात होते...!! आणि मग खुपशा वेदनांना सामोर जात तिने बाळाला जन्म दिला. अनिरुद्धांशी खुपस साम्य असणा-या बाळाच्या गोंडस रुपाकडे बघून तिचं मन तृप्त तृप्त झालं. सगळे मनस्ताप, ताणतणाव विसरायला लावण्याचे सामर्थ त्या एका क्षणात होते. अतिव सुखाने तिला ग्लानी आली. तिच्या थकलेल्या चेहे-यावरचे समाधान बघून घरातले सगळेजण आनंदले. बाळाच नाव ठेवलं चैतन्य!
 
    चैतन्यचं बालपण, तरूणपण सगळे क्षण तिने मनापासून जोपासले. २५ वर्षांच्या देखण्या चैतन्यकडे बघतांना ती इतिहासाची पानं चाळवायची आणि मनात चकित व्हायची.  तो अजुनही तिला लहानच वाटायचा. दुसर अपत्य हे तिचं स्वप्न होतं, हे स्वप्न साकारतांना तिने खुप कठिण प्रसंगाना तोंड दिलं होतं. त्याच्या बाबतीत ती खुप हळवी होती, त्याने सतत समोर असावं असं तिला वाटायच..एक दिवस त्याने सायलीला समोर आणून उभं केलं....जोडीदार म्हणून....!! आणि ती भानावर आली...अरे चैतन्य आता मोठा झालाय, या जाणिवेने.

    सायली तिला खुप आवडली सून म्हणून. गुजराथी होती. मग तिने मनापासून ठरवलं....सायलीशी छान मैत्रीच नातं जोडायचं, तिलाच मनातलं सगळं सांगायच....ती लग्न होऊन आली आणि मग सणवार साजरे करणं...नव्या नवलाईचे दिवस.. .खरेदी, दिवस कसे मंतरल्यासारखे भासत होते, माधवीला तर दोघांचेही किती कौतूक करु नी किती नाही असे व्हायचे, तिला विश्रांती मिळावी म्हणून चैतन्यच सगळ तिच करायची. आताच  त्यांच्या लग्नाला एक वर्ष होत होतं....सरप्राइज म्हणून तिने दोघांच्याही हातात सिंगापूरची एअरतिकिट्सही दिली होती.....!!!! मन तृप्त झालं होतं.....सुख सुख म्हणतात ते अजुन वेगळ असू शकत नाही याची जाणिव झाली होती तिला....!!!

    त्यादिवशी ती आणि अनिरुद्ध गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते.....कार्यक्रमातल्या भैरवीचे सूर अजुनही मनात रेंगाळत होते. दरवाजा लोटून ते आत आले.....सायली आणि चैतन्य दोघांचीही दरवाजाकडे पाठ होती......सायलीचा स्वर थोडासा उदास पण तक्रारीचा होता..."माझी कांही तक्रार नाही रे, तू त्यांना अगदी नवसाने झाला आहेस, याची मला जाणिव आहे, पण मी तुझी बायको आहे हे त्या जाणून घ्यायला तयारच नाही, सगळं त्याच करणार, तुझी खाण्याची, कपडयांची आवड सगळं त्या जोपासणार...कधीतरी एखादा छानसा पदार्थ तुझ्यासाठी करु म्हटलं तर यांच्या निरनिराळ्या डिशेश तयार...तुला हे आवडत, तुला ते आवडत म्हणून याच सगळी धावपळ करणार, मला खरच समजत नाही माझा तुझ्या जीवनातला रोल काय आहे? त्यांच प्रेम, त्यांची माया मी समजू शकते, पण या प्रेमात कुणी भागिदार आलाय हे त्या स्विकारायला तयार नाहीत याच वाईट वाटत..... आता हेच बघ सिंगापूरची तिकिटं दिलीत आपल्या हातात...आपल्यालाही काही मन आहे चॉईस आहे असं त्यांना वाटतच नाही.....तूझी आई आहे तुला यात फारसं काही वावग वाटत नसेल, पण मी फार दिवस नाही हे सहन करु शकणार, माझी सहनशक्ती संपली की मी निघून जाईल माझ्या आईकडे.....!!!!! घरात आलेली माधवी हे सगळं आश्चर्यचकीत होऊन...ऐकत होती. चैतन्य सायलीला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करत होता...."सायली, प्लीज तू आईला समजाऊन घे ग, तिचं आम्हा दोघा मुलांवर खुप प्रेम आहे, ती तुझ्यावर पण अपूर्वा इतकच प्रेम करते....क्षणभर तु तिच्या जागी आहेस अशी कल्पना करुन बघ, आपण यातून काहीतरी मार्ग काढु पण आईवर रागाऊ नकोस...." कसल्याशा आवाजाने दचकून चैतन्यने मागे वळून बघितलं, माधवी उभी होती....सगळ दु:ख, वेदना डोळ्यात जमा झाल्या होत्या, त्यांना आवरुन!!!!!  तिला गरगरल्यासारखे झाले. "आई, तु केव्हा आलीस? असं म्हणत तो माधवीकडे धावला. "थांब चैतन्य, मला आता शांतता हवीय" अस म्हणत माधवी बेडरुममध्ये गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला.

     तिला अश्रु आवरणं कठिण झालं होतं. "माझं,"  "मी"  पण कुठेतरी दुखावलं गेलं होतं, अश्रुंच्या अविरत धारा चालल्या होत्या. नक्की कशाचं होतं ते दु:ख? सायलीच्या बोलण्याचं?  की जे आपलं होतं ते आपलं राहिलं नाही या जाणिवेच? की माझ्यातल्या "मी" ला कुणीतरी हरवलय या जाणिवेच, काहीच कळत नव्हत, सायलीचा खुप राग आला होता, बाई ग आत्ताच आलीस आणि लगेचच अधिकाराच्या गोष्टी बोलायला लागलीस? आम्ही काय अपार कष्ट केलेत तेव्हा हे  सगळं मिळालय...हातातून कांहीतरी निसटून जातय या जाणिवेने घुसमटल्यासारखं झालं.  सततच्या अश्रुंनी आणि विचारांनी डोकं फुटायची वेळ आली होती. बाहेर सगळे सुन्न झाले होते. चैतन्यला माहित होतं शांत झाली की आई बाहेर येईल. आत्ता तिला दरवाजा उघडायला सांगून काही उपयोग नाही.  रडता रडता माधवी अचानक शांत झाली, सायलीच्या बोलण्याचा शांतपणे विचार करायला लागली....सायली खरच चुकीचं बोलत होती कां? स्वत:च्याच मनाला तिने प्रश्न केला आणि ती अनुत्तरीत झाली. गेल्या कांही दिवसातले सायलीच्या सहवासातले दिवस तिला आठवले.  दोघी कधी मैत्रीच्या धाग्यात बांधल्या गेल्या समजलेच नव्हते. सायलीचं तिला "मा" म्हणून हाक मारणं तिला खुप आवडायचं. तिने पंजाबी ड्रेस, चुडिदार कधी घातले नव्हते, पण सायली आली आणि तिने सांगितलं "मा" तुम्ही ड्रेसेस घालायचे, छान दिसतात तुम्हाला....स्वत:च खुप सारे ड्रेसेस शिवून आणले होते. पाणीपुरी तिला खुप आवडायची.. ती ही खास भैय्याकडची....पण म्हणायची, नको ग सायली आता शोभत नाही पाणीपुरी खाणं....मग सायलीच घेउन जायची तिला...चला "मा" आपण पाणीपुरी खायला जायचय आज...तुम्ही मला कंपनी देणार ना...? घरात ऊंधियू फारसं आवडीने कुणी खायच नाही, पण सायली माहेरी गेली की आईला ऊंधियू बनवायला सांगायची आणि हिच्यासाठी खास घेऊन यायची किती सुंदर क्षण तिच्या सहवासातले....!! चैतन्यवर स्वत:पेक्षा देखिल जास्त प्रेम करतो आपण, लहानपणी त्याला एवढंसं लागलं तरी जिव कासाविस व्हायचा..... आणि आता सायली दुखावली तर त्याच्या मनाला किती वेदना होतील....ते आवडेल तुला? हक्क गाजवणं ही कां प्रेमाची व्याख्या?...पझेसिव्हनेस....हा तर प्रेमाचा अतिरेक...!!!! तिला एक जाणवलं, आई होण्याचं "स्पंदन" तिला अनुभवायचं होतं ते चैतन्यच्या जन्मातून तिने अनुभवलं...बस्स!!! तो क्षण उपभोगून तिथेच संपवायचा, परत त्यात अडकायचं नाही. चैतन्यच्या संपुर्ण आयुष्यावर मक्तेदारी गाजवण्याचा आपल्याला हक्क नाही त्याच्या जन्मासाठी इतके कष्ट सोसलेत आणि आपल्याच वागण्याने त्याला मानसिक त्रास व्हावा? तिच्या मनातली आंदोलनं संपत नव्हती. खुप वेळाने ती एकदम शांत शांत झाली. चैतन्यला त्रास होईल, दु:ख होईल असं ती वागूच शकणार नव्हती.

     रात्री खुप उशिरा माधवी दरवाजा उघडून बाहेर आली ती हसतच. पहिल्यांदा तिने सायलीला जवळ घेतलं...तिच्या मृदु स्पर्शात तिला दुर देशी गेलेली तिची अपुर्वा भेटली....!!! अरे ही तर माझी अपुर्वाच...!!! मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली..."सायली, तुझ्यावरच काय पण मी कोणावरही रागावले नाहीये....मला खुप भुक लागली आहे, आपण सगळे एकत्र जेवायला बसूया". सायलीचा चेहेरा  उतरला होता...डोळ्यातल्या अश्रुंना आवरणं तिला कठीण झालं होतं, तिच्याजवळ येऊन हात हातात घेत ती म्हणाली..." मा, मला माफ करणार ना?", तिला जवळ घेत माधवी म्हणाली .."नो सॉरी...नो रडणे....ओके....!!!!! सगळी शांतपणे जेवलीत. सकाळी क्षितिजावर नवी पहाट झाली होती......सुर्याची किरणंही कोवळी, नविनच भासत होती....!!!!

    याला एक महिना होत होता....हसत खेळत रात्रीची जेवणं चालु होती.....जेवणं संपलीत आणि माधवीने हा साफल्यचा प्रस्ताव सगळ्यांच्या समोर मांडला....चैतन्य आणि सायलीला हा मोठाच धक्का होता....चैतन्य उदास होत म्हणाला...."आई तुझा राग अजुनही गेला नाही, म्हणूनच हा निर्णय, हो ना? चैतन्य, सायलीला वाईट वाटण तिला अपेक्षितच होतं, ति समजुतीच्या स्वरात म्हणाली, "हे बघा चैतन्य आणि सायली....तुमच्यावर मी अजिबात रागावले नाहीये...पण हा प्रसंग मला खुप काही शिकवून गेला...तुमच्या नुसत्या दुरावण्याच्या कल्पनेने माझी झालेली घालमेल किती भयंकर जिवघेणी होती याची कल्पना नाही तुम्हाला....पण जगात अशी अनेक माणसं आहेत...ज्यांना खरोखरच कुणी नाही, किंवा मुलांनी त्यांना सांभाळायला नकार दिला आहे, तरुण वयात स्वप्नांवर आरुढ होऊन कष्ट करायचे.....मुलांसाठी....!!!! त्या कष्टांचा शीण जाणवतच नाही कारण ही मुलं आपली असतात ना....?? पण ही आपली म्हणवणारी मुलं जेंव्हा आई-वडिलांना सांभाळायला नकार देत असतील त्यावेळेस काय वाटत असेल रे त्या आई-वडिलांना....एक क्षणभर मी ते अनुभवलं...!!! म्हणून मग मनात विचार आला इतकं सुखी, समाधानी आयुष्य दिलं आहे ईश्वराने, मग थोडयाशा वेगळ्या वाटेने जाऊन करु या काहीतरी अशांसाठी.....ज्यांना खरच आधाराची गरज आहे. माझे प्रॉव्हिडंड फंडाचे पैसे, दादांजवळची शिल्लक, तुम्ही दोघही थोडा हातभार लावा. अनिरुद्ध शांत होते. चैतन्यने विचार करण्यासाठी अवधी मागून घेतला...विचारांन्ती दोघांनाही तिचं म्हणणं पटलं. आणि मग "साफल्य" ची कल्पना साकार करण्यासाठी माधवी...अनिरुद्ध, चैतन्य, सायली...सगळेच कामाला लागले......जागेसाठीचा शोध....कायद्याच्या बाबींची पुर्तता....बांधकामासाठीचा प्लान.....बांधकामासाठी लागणारे मटेरियल, त्यासाठी सप्लायर शोधणे, वर्तमानपत्रातील जाहिरात. सगळ्यांचे  प्रयत्न चालू होते.

    ज्या कोठिंब्याच्या परिसरातून चैतन्यचा कोवळा अंकूर घेऊन त्याची "स्पंदनं" माधवीने अनुभवली होती....त्याच कोठिंब्याच्या निसर्गरम्य परिसरात "साफल्य" च बीज रुजलं....बघता बघता त्याचा मोठा वृक्ष झाला होता.......दूर...दूर च्या परिसरात प्रसिध्दीस पावलेलं "साफल्य" आणि त्याच्या संचालिका "माई कारखानिस" रसिकांना भेटणार होत्या, अदितीने घेतलेल्या  "नादब्रह्म" मासिकातल्या मुलाखतीच्या माध्यमातून....!!

    कुठेतरी शुन्यात बघत भुतकाळात हरवलेल्या माई भानावर आल्या, त्यांनी अदितीला मायेने जवळ घेतलं, तिच्या खांद्यावर थोपटत त्या म्हणाल्या "या स्पंदनातून हा साफल्यचा वृक्ष" !!