RSS

Monday, July 18, 2011

अशी रंगली गुरुपौर्णिमा

                         
    मनातल्या समुद्रात आठवणींच्या लाटा उसळायला लागल्या होत्या. आता ह्या लाटा डोळ्यांच्या किना-यावर आदळून फेसाळत बाहेर पडताय की काय असे वाटायला लागले....मी डॊळे बंद केले, किना-याला कधी दरवाजे असतात का ? माझ्या मनातल्या समुद्राच्या किना-याला दरवाजे आहेत, बंद केलेत ते दरवाजे, म्हटलं उसळू देत या आठवणींच्या लाटांना मनातच ..... !!!

      आज गुरुपौर्णिमा ...इतका चांगला दिवस आणि आपण देशातच नाही तर पार देशाच्या बाहेर ...!!! माझ्या सदगुरुंची सौ. ताईंची, गुरुस्वरुप सासुबाईंची, माझ्या आईची आणि हो लेकीचीही खुप आठवण येत होती. सौं. ताईंच्या कार्याची व्याप्ती एवढी वाढली आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना आमच्याशी फोनवर बोलता येणे शक्यच नव्हते. मग सासुबाईंना पहिला फोन केला, वय वर्षे ८२, या वयातला त्यांचा प्रसंन्न आणि हसरा आवाज ऐकला आणि  मनावरची सगळी मरगळ झटकली गेली. त्यांना नमस्कार सांगितला आणि म्हटलं, "गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला ताईंच्या आश्रमात जाणार ना उद्या?, तर म्हणाल्या, "हो जाणार ना, पण पाऊस खुप पडतोय, पावसाला सांगितलय उद्या दिवसभर पडू नकोस, मला जायचय ना आश्रमात....आणि परत एक निर्मंळ हसू, आमच्या नमस्काराला, ’माझे आशिर्वाद  बेटा तुम्हाला असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्यांच्याशी बोलून खुप उर्जा मिळाल्या सारखे वाटले, मनात प्रसन्नता दाटून आली.

      आईलाही नमस्काराचा फोन केला .... तीच्या नेहेमीच्या मायेने भरलेल्या आवाजात आमच्या नमस्काराला तीने, ’माझे लाख लाख आशिर्वाद ग तुम्हाला’ असं म्हटलं. या दोघींचेही आवाज ऐकलेत आणि वाटलं, या कल्पवृक्षाच्या सावलीत आम्ही किती निर्भर आहोत. तिसरा फोन लेकीला केला जसजशी मोठी होत गेली तशी ती अनेक रुपांनी माझी मैत्रीण कम गुरुच होत गेली.

      सकाळपासून ताईंच्या, माझ्या सदगुरुंच्या आश्रमातल्या कार्यक्रमाची खुप आठवण येत होती. आम्ही सगळेच सकाळी लवकर उठून तिथे हजर असतो. तिथे होणा-या अनुपम सोहोळ्याचा एक भाग होऊन जातो. यावर्षी मात्र ह्यांच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने इतक्या दुर, साता समुद्रापलीकडे, वेगळ्या वातावरणात, म्हणुनच आठवणींच्या लाटा अशा गर्दी करत होत्या. मग ठरवलं आपणही साजरी करुया "गुरुपौर्णिमा" !!!!

      सकाळी फार लवकर नाही पण साडेसहाला उठलो. सगळं आवरून हे पुजेला बसले .. बाप्पाला पंचामृती स्नान, श्रीसुक्त, गजानन महाराज आवाहन आणि गणपती अथर्वशिर्षाची २१ आवर्तने. आदल्याच दिवशी अपार्टमेंटच्या बगिच्यातुन दुर्वा, लाल, केशरी जास्वंद, पांढरी कण्हेरी, मुकी जास्वंद तरत-हेची फुलं आणली होती त्याने देवघर आणि ग्रंथ सजवलेत."जे जे काही मिळालं ते सर्व सदगुरुंच्या आशिर्वादाने, गुरुंविषयी वाटणारी कृतज्ञता एका छोट्याश्या पुस्तिकेत लिहिली आहे, तीचं नांव     "श्री गुरुगुणगीता" या पुस्तिकेचं पुजन केलं. मग आरती. "गणेश गीता" या ग्रंथाचे वाचन.  छानसा सात्विक स्वयंपाक करायचा असे ठरवले होते पण मागचे दोन दिवस हे सारखे विचारत होते, आपला गुरुपौर्णिमेचा उपवास आहे का? म्हणून काय वाटले कुणास ठाऊक पण उपवासाचा मेनु करुया कां असं ह्यांना विचारलं आणि हो म्हणताच, मऊसर भगर, बटाट्याची भाजी, उपवासाची कढी आणि फळं असा नैवेद्य दाखवला. त्यानंतर शांतपणे जप लिहिला. ताईंच्या प्रवचनाची आठवण येत होती म्हणून २००९ सालातल्या दत्तजयंतीच्या प्रवचनाची व्हिडिओ क्लिप लावली... त्यांचा आवाज ऐकला .... त्यांना बघितलं आणि शांत वाटलं. प्रवचन संपल की नैवेद्य होतो, मग बाप्पाचा गजर असतो ..... "बाप्पा बाप्पा मोरया .... अरे बाप्पा बाप्पा मोरया.... साक्षात बाप्पा मोरया ...., त्यानंतर "तरुण गणपा, भक्त गणपा, विर गणपा ......" ही इडगुंजी या कर्नाटकातल्या गणेशाचे वर्णन करणारी कानडी गाण्याची कॅसेट लागते. हजारोंच्या संख्येने भक्तसमुदाय जमलेला असतो, सगळी पावलं थिरकायला लागतात. हजारो मनं एका पातळीवर येऊन ईश्वर नामात दंग होतात. ताई सांगत असतात .... सगळ्यांनी जयघोष करायचा, सगळ्यांनी त्या गजरात नाचायचं .... तुम्ही कोण आहात?  डॉक्टर, इंजिनियर, वकिल, सगळी लेबलं, सगळ्या झुली उतरवायच्या आणि एक भक्त म्हणून मोकळं मोकळं व्हायचं ...!!!!

      आम्ही पण आज इडगुंजी बाप्पाची कॅसेट लावली, त्या आधी श्री गजानन जय गजानन .. जय जय गणेश मोरया ... या तालबद्ध तालावर डोळे बंद करुन नामघोषात दंग झालो होतो .... पावलं थिरकत होती .... आश्रमातली सगळी भक्तमंडळी आजुबाजुला आहेत याची जाणिव होत होती.

      फराळ करुन थोडीशी विश्रांती घेतली. स्वयंपाक केला .... संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला, श्रीसुक्त म्हटलं, गजानन महाराजांची मानसपुजा केली आणि दुरवर मेरिडियन समुद्राजवळ असलेल्या फवा-यांच्या जवळ फिरायला गेलो ...घरी आल्यावर नैवेद्य केला आणि उपवास सोडायला बसलो.

      रात्री हॉलची खिडकी उघडली ...पुर्वेकडून वा-याच्या थंडगार झुळकी येत होत्या आणि रिअल प्लेयरवर गाण्य़ांचे सूर उमटत होते ... ’तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम .... "नको देवराया अंत आता पाहु ....." "रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा," आणि सर्वात शेवटी ... बैजू बावराचं ..... "मन तरपत हरि दर्शनको आज .... गुरु बिन ग्यान कहासे लांऊ ...... दिजो दान हरि गुन गाऊ ... !!! आर्त स्वरात गुरुंच्या आठवणींना जागवत मनात निरामय आनंद, प्रसन्नता फुलत होती...!!!

      गुरु हे चराचराला व्यापुन उरलेले तत्व आहे.  सदगुरुंच्या स्वरुपात सगुण रुप घेऊन ते आपल्या समोर उभे आहे. सदगुरुंनी दिलेले संस्कार, सर्वांशी प्रेमाने, विश्वबंधुत्वाच्या नात्याने वागायचे, स्वच्छता, शिस्त, नियमितपणा, नामजप, वाचन साधना पाळून स्वत:चा उद्धार करायचा, आई-वडिलांची, गुरुजनांची, समाजरुपी ईश्वराची सेवा करून गुरुभावात जगायचे, हे साधता आले तरी ख-या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी झाली.

      सदगुरुंचा सत्संग, सहवास आपल्याला सदैव लाभेलच असे नाही, पण त्यांनी दिलेली अध्यात्माची शिदोरी आपल्याजवळ आहे. या स्वरुपातच त्या आपल्या जवळ असणार आहेत.      हीच निर्गुणाची उपासना !!!.   

   एक आगळी-वेगळी गुरुपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद मनात घेऊन झोपायला गेलो.











2 comments:

भानस said...

खुपच छान, उत्साहात साजरी झाली गुरुपौर्णिमा! :)

दिप्ती जोशी said...

dhanyavad bhanas, kharach khup utsahat sajri jhali gurupaurnima.

Post a Comment