RSS

Monday, July 11, 2011

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल....!!!

आज आषाढी एकादशी....आज वारकरी आपल्या आवडत्या दैवताचं...विठ्ठलाचं दर्शन घेऊन कृतकृत्य होणार. निघतांना सावळ्या, सुंदर मुर्तीला डोळ्यात साठवून घेत....त्याच्या विरहाच्या अश्रुंना डोळ्यातुन तसच वाहू देत.... पुढच्या वर्षीही अशीच वारी घडू दे म्हणून विठू माऊलीच्या चरणी करूणा भाकणार!! "वारी आणि वारकरी" प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय.

     पुर्वीच्या काळी वैकुंठाला जायचे म्हणजे केवढी अवघड गोष्ट. तपाचे कष्ट करावे लागायचे. पण आता ही गोष्ट एवढी कठिण नाही. पुंडलिकरायाने मोठाच उपकार करून ठेवला आहे. त्याने वैकुंठच भुमिवर आणले. त्याच्यामुळे विठ्ठलच पंढरीला आला. जिथं विठ्ठल तेच भुवैकुंठ. आणि या भुवैकुंठ पंढरीला पायी जाता येते.

     पुंडलिकाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. जे तपाच्या राशी करूनही प्राप्त होत नाही ते निधान त्याने पंढरीला आणले. गया आणि काशीसारखी सर्व तीर्थक्षेत्रे पंढरीत विठ्ठलाच्या पायाशी आहेत. या विठ्ठलाच्या मंदिराचा नुसता कळस पाहिला तरी अंहकाराचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते.

     "कारे पुंडया मातलासी ।
          उभे केले विठ्ठलासी ॥
     ऎसा कैसा रे तू धीट ।
          मागे भिरकावली वीट ॥

     अशा शब्दात तुकोबा पुंडलिकाबद्दल कौतुकाचे उद्गार काढतात. शिवाय अठ्ठाविस युगांचा काळ लोटला तरी अजूनही त्याला बस म्हणायला तयार नाहीस! पुंडलिक हा खरा समर्थ भक्त आहे त्याचा भाव पाहूनच देवाने वैकुंठ सोडले.

     तात्काळ अभिमान नष्ट होतो असे स्थळ माहित आहे का? डोळ्यात पाणी येते, शरिरावर रोमांच उभे रहातात असा अनुभव कोठे येतो? देव भक्तांचा अभेद काला कोठे पाहिला आहे का? या सर्व गोष्टी पंढरीत घडतात, पहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. अगदी दुष्टाच्या अंत:करणाला सुद्धा पाझर फुटतो. पंढरपुरमध्ये विटेवर उभा असलेला विठ्ठल हा सर्वव्यापक असा विश्वंभर असून चराचराचा तो अधिष्ठान आहे.

     काशीच्या पाच यात्रा किंवा द्वारकेच्या तीन यात्रा केल्याने जे पुण्य मिळते तेवढे पुण्य पंढरीच्या एकाच वारीने प्राप्त होते. पंढरीत अठरा पगड जातीच्या वैष्णवात कोणताही भेद केला जात नाही.  भाविक असो वा अभाविक  विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर त्याला मोक्ष मिळतो. पंढरीत जमलेल्या वैष्णवांना अभिमान नसतो म्हणून तर ते निसंकोचपणे एकमेकांच्या पायी लागतात.

     "तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी ।
           तयाचिये घरी यम न ये" 

     जो एकदा पंढरीला जातो त्याच्या घरी यम येत नाही असे तुकोबा ठामपणे सांगतात.

     पंढरी क्षेत्राचा महिमा एवढा आहे की पंढरी नामाचा उच्चार केला तरी पाप देशोधडीला लागते. सतत नामाचा उत्सव चालू असलेले पंढरी हे जगातील धन्य असे ठिकाण आहे. पंढरीतील भक्तांपुढे रिद्धी-सिद्धी लोटांगण घालतात, पण भक्तांना ईश्वरी प्रेमसुखापुढे त्या तुच्छ वाटतात. पंढरी तर प्रेमसुखाची खाणच आहे. तुलनाच करायची झाल्यास विष्णुच्या भुवैकुंठाशी करता येईल.  पंढरी म्हणजे भुमीवरी वैकुंठ "भू वैकुंठ" वैकुंठापेक्षा एका अक्षराने अधिक !!!

2 comments:

Shyam said...

अमृत सोहोळा !!!!
दत्तात्रयजोशी यांनी सोम, 11/07/2011 - 22:04 ह्यावेळी प्रकाशित केले.

सुंदर...अतिसुंदर.....अजि सोनियाचा दिनु......
आजच्या ह्या अमृत्मयी दिवसाची सुरुवात......तुझ्या विठु-माउली वरील लेखा
ने झाली....
खूप खूप आनंदात न्हावून निघालो....आनंदाचे डोही आनंद
तरंगे.....विठु-माउली च्या नामस्मरणात
संतांच्या जयजयकारात टाळमृदुंगाचा गजर...अश्या भारलेल्या वातावरणात
कित्तेकमैल चालत आलेले....
लाखो वारकरी....आजच्या आषाढी एकादशीच्या सावळ्या सुंदर विठ्ठलाच्या
दर्शनाचा अवर्णनीय सोहोळा ...
"याची देही याची डोळा" अनुभवला पण TV वर अन आपल्याच आई च्या चरणांवर
मस्तक ठेवून....माउली च्या
चरणांवर मस्तक ठेवल्याचा अनुभव घेतला....त्या माउलीला साकडे घातले..." जो
जे वांछील तो ते लाहो "......

दिप्ती जोशी said...

dhnyavad shyam - aaichya payavar doke thevene mhanje pandharichi vari karun aalyache punya milavane.

Post a Comment