RSS

Saturday, August 21, 2010

"उध्वस्त"

"उध्वस्त"
लगबगीने काम करणारे माझे हात घडयाळयाच्या काटयांकडे लक्षं जाताच आणखीनच वेगाने काम आटोपत होते. दहा मिनिटांनी निघायलाच हव. आठ पंचवीसला निघाले नाही तर आठ चाळीसची बस चुकते, मग कंपनीत पोहोचायचे म्हणजे वीस रुपये रिक्शाचे खर्च करा आणि वरतून उशीर होणार ते वेगळेच. त्यातच राहुलचा हट्ट चालला होता, "आई, मला फ्रिजमधला पेप्सीकोला खायला दे ना" म्हणून! मी त्याला कसबस समजावले. बास्केटमध्ये त्याचे दुध, खाऊचे डबे, दोन केळी आणि संध्याकाळी बदलायचा ड्रेस घातला. पर्स गळ्यात अडकवली. राहुलला सांभाळणा-या मावशींच घर आमचा फ्लॅट मध्ये दोन बिल्डींग सोडून होतं.
राहुलला अच्छा करुन मी खाली आले. अतिशय वेगाने माझी पावलं पडत होती. बिल्डींगमधले दोन फ़्लॅट मागे टाकून मी डावीकडे वळले, आणि एक क्षणभर माझ त्याच्याकडे लक्ष गेलं, कालच्या प्रमाणेच आजही तो तिथे उभा होता. अतिशय प्रसंन्न व्यक्तिमत्वाचा, निळसर रंगाचा रेमंडचा शर्ट त्याने घातला होता, मागे वळवलेले त्याचे केस हवेवर उडत होते. मनातल्या मनात मी अस्वस्थ झाले. गेले चार दिवस असच चालल होत. त्याला तिथे अस उभ राहिलेल बघीतल की मला काहीतरी व्हायच!, आत कुठेतरी हलल्या सारख व्हायच. तो..........................तो...........................लंगडा होता. लगडा! शब्द वापरला आणि मला वाईट वाटल.’ त्याला पाय नव्हते’ पण का कुणास ठाऊक हे शब्द पण मनाला टोचत होते. मांडयांपासून त्याला पाय नव्हते. दोन्ही मांडयांच्या खाली दोन लाकडी गोल बसवली होते.
आठ चाळीसची बस पकडायचीय हे विचार मनात असूनही तो उभा होता ती बिल्डींग ओलांडून जातांना माझी पावल संकोचली. आमच्या सारखी धावपळ करणारी माणसं बघून काय वाटत असेल त्याला? एक क्षणभर मागे वळून त्याच्या चेहे-यावरचे भाव निरखावेत अस वाटल,पण तरीही मी मागे वळून बघीतल नाही. माझ्या डोळ्यात दाटून आलेली अनुकंपा, सहानुभूती! कदाचीत तो आणखीन अपमानीत होईल या विचाराने मी वळून बघीतल नाही, पण मग बघीतल नाही याची खंतही वाटत राहीली, त्याला अस तर वाटणार नाही ना ’ही लगबगीने धावपळ करणारी माणस माझ्यासारख्या लंगडया माणसाकडे कशाला बघतील ’ या विचाराने.
प्रयत्नपुर्वक त्याच्याकडे न बघता ती बिल्डींग ओलांडून मी पुढे गेले आणि मनातली विचारांची आंदोलन झटकून टाकली. आठ चाळीसची बस मिळाली. ऑफिसमध्ये मी वेळेवर पोहोचले. मग सेल्स ऑफर, कोटेशन्स, बिलींग...... दिवसभराच्या कामात मी त्याला पार विसरले.
संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडले आणि समोरच एक लंगडा भिकारी दिसला आणि मला पुन्हा त्याची आठवण झाली! भिका-याला बघून त्याची आठवण झाली म्हणून स्वत:चाच रागही आला. त्याच्या लंगडेपणामुळे त्याच्यात आणि भिका-यात साम्य़ असावे काय? किती प्रसंन्न व्यक्तिमत्वाचा होता तो! मनातल्या विचारांना झटकून टाकण्याचा मी प्रयत्न केला.
ब-याच दिवसांपासून मी त्याला पहात होते, म्हणजे लाकडी गोल ठोकलेल्या त्याच्या पायांकडे मी लांबूनच पहायचे, पण मी त्याच्या चेहे-या कडे कधीच पाहिल नाही, म्हणजे माझ धैर्यच व्हायच नाही. एक दिवस बघीतलं तर पांढरी लान्सर आली, ड्रायव्हरने कारचा दरवाजा उघडला अणि ड्रायव्हरच्याच मदतीने तो आत बसला. म्हणजे तो कुठेतरी जात होता हे निश्चित, पण मग कुठे जात असेल? त्याच्याविषयी बरच काही जाणून घ्यावेसे वाटत होते. त्याच लंगडेपण आतल्या आत बोचत होत, त्याच्याविषयी मन दयेने भरुन येत होत. त्याच्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे बघून त्याला पाय नसण खूपच खटकत होतं.
ही खंत ह्याच्याजवळ बोलून दाखवावी अस वाटूनही मी गप्प बसली "तुम्ही काय लेखिका ना म्हणजे भारीच सेंटी! अशी हजारो लंगडी माणस जगात आहेत, सगळ्यांचाच विचार आपण करायला लागलो तर आपल्या डोक्याचा पार भुगा होणार, मग स्वत:विषयी केव्हा विचार करणार?" अस म्हणून ह्यांनी माझ बोलण हसण्यावारी उडवल असत.
मध्यंतरी आमच्या कंपनीत युनियनचा नवीन करार झाला पगारवाढ, वाढीव बोनस त्याचबरोबर आणखीन एक नवीन बदल झाला, लंचटाईम एक तासाच्याऎवजी अर्धा तास, आणि सकाळी नऊच्या ऎवजी साडेनऊची वेळ झाली. माझी जाण्याची वेळ बदलली. नंतर पुन्हा कधीच तो मला दिसला नाही. बिल्डींग ओलांडून जातांना क्षणभर त्याची आठवण यायची. गेल्या सहा महिन्यात मी त्याला पूर्ण विसरले. अगदी त्याचे ओझरते बघीतलेले ’ते’ पायही लक्षात राहिले नाही. एक समाधानाचा सुस्कारा सोडला. त्याच्या न दिसण्याने निदान मनातली ती अनामिक खंत तरी कमी झाली.
त्यादिवशी संध्याकाळी हे घरी आले तेच मोठया आनंदात, हातात पेढयांचा मोठा बॉक्स, अन त्यांच्या आवाजाने घर नूसत दणाणून गेल,"अनुराधा, हा पेढयांचा नैवेद्दय देवाला दाखव, अग आपल घराच लोन सॅक्शन झाल, आता आपण आपल्या प्लॉटवर छान बंगला बाधायचा" बंगल्याच स्वप्न आता पुर्ण होणार या विचाराने मन आनंदीत झाल होतं, राहुल तर नूसता नाचत सुटला.
बंगला बांधायचा म्हणजे चांगल्या आर्किटेक्चर कडून प्लान काढून घायला हवा. ह्यांनी एक दोन मित्रांना फोन करून विचारल, त्यांच्याकडून आर्किटेक्चर राजवाडे फार हुषार आणि नावाजलेले आहेत अस समजल. ह्यांनी मला फोन करुन संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर परस्पर राजवाडयांच्या ऑफिसमध्ये यायला सांगीतलं. संध्याकाळी आम्ही दोघं भेटलो, आणि त्यांच्या ऑफिसच्या दिशेने चालायला लागलो, तस जवळच होत. "अनिकेत राजवाडे (बी.ई., आर्किटेक्ट)" ऑफिसवरची पाटी वाचून किंचीत हसायला आलं, "अनिकेत" म्हणजे घर नसलेला! लाखो लोकांना घराचे प्लॅन काढून देणारा हा आर्किटेक्चर घराविना! गंमतच वाटली. तळमजल्यावरच ऑफिस बघून जरा हायस वाटल, जिने चढायचा त्रास नाही या विचाराने, कारण इथले बहुतेक सगळे ऑफिसेस पहिल्या किंवा दुस-या मजल्यावरच होते. कांचेच दार ढकलून आम्ही आत शिरलो. वातानुकुलित ऑफिसच बाह्यदर्शन मनाला सुखावणार होत. अगदी समोरच गणपतीची भव्य पाचफुटी मुर्ती, तिला घातलेला गुलाबाच्या फुलांचा हार, आणि त्यासमोर लावलेली मंद सुवासाची उदबत्ती! वातावरणात एक पावित्र्य भरुन राहिलं होतं. त्या मुर्तीच्या बाजुलाच असलेल्या निळ्या फोमच्या कस्टमर्स साठी असलेल्या आठ ते दहा खुर्च्या. समोर अर्धवर्तुळाकृती निळसर काचेच टेबल, त्यावरचा इन्टरकॉम! त्याच्या पलीकडे खुर्चीवर बसलेली सुरेख रिसेप्शनीस्ट! तीने गोड आवाजात आमच स्वागत केलं. "राजवाडेंना भेटायचय" हे म्हणाले "एक मिनिट", असं म्हणून तिने इन्टरकॉम उचलला. "आतमध्ये दुस-या कस्टमरबरोबर मीटींग चालु आहे, थोडा वेळ बसावे लागेल" ती उत्तरली. आम्ही दोघही शांतपणे ऑफिसच निरिक्षण करत बसलो होतो. एक विस मिनिटांत तिने आम्हाला आत जायला सांगीतले.
आतल ऑफिस आणखीनच छान होत. एक काळं,समोरून खालपर्यंत अ‍ॅक्रेलीकच्या काचा लावलेलं मोठं टेबल, बाजूच्याच काचेच्या शेल्फमध्ये ठेवलेल्या निटनेटक्या बॉक्स फ़ाईल्स! टेबलवरच आकर्षक पेन स्टॅन्ड! आणि त्या पलिकडे झुलत्या खुर्चीवर बसलेले रुबाबदार ’अनिकेत राजवाडे’ एक क्षण त्यांच्याकडे बघितलं आणि जाणवल, ह्यांना कुठेतरी बघीतलय, कुठे ते मात्र आठवत नव्हत. हे त्यांच्याशी बराच वेळ चर्चा करत होते, त्यांची साईट व्हिजिट, प्लान याविषयी सगळ बोलून झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. राजवाडयांकडून आमचा प्लान आला, महानगरपालिकेकडून तो मंजूर झाला.आणि चांगलासा मुहुर्त बघून कामाला सुरुवात झाली. मधून मधून मी साईटवर जात होते. हवेनको ते बदल सुचवत होते. बघता बघता बंगल्याचे काम पुर्ण होत आले होते. हे तर सगळ्या कामात इतके व्यस्त होते की माझ्याशी दोन शब्द बोलायलाही त्यांना सवड होत नव्हती. सगळ काम पुर्ण झाल्यावर ह्यांनी समाधानाचा श्वास टाकला.
"अनुराधा, आज आपण सकाळपासूनच बंगला बघायला निघूया, मग तिकडूनच बाहेर जेवायला जाऊ या". म्हणजे आज अजिबात काम नाही, मस्त एन्जॉय करायचा दिवस! मी आणि राहूल लवकरच तयार झालो. बंगल्यावर पोहोचलो. सुरुवातीच्या काळात काय काय सोयी हव्यात ते सांगितल्यानंतर माझ येण झालच नव्हत. त्यामुळे मला कधी एकदा पुर्ण झालेल काम बघेल असं झाल होत. मी बंगल्यात शिरले आणि चकित होऊन बघतच राहिले! इतक सुंदर माझ घर! संगमरवरी देवघर, एकावर एक पाय-या, त्यावरची छत्री, किचनमधल्या टाईल्स, ट्रॉलिज, ओव्हनची सुबक जागा, हॉलमध्ये तिन पाय-य़ा चढून गेल्यावर केलेली डायनिंग टेबलची व्यवस्था, भिंतीतल्या शोकेस, कॉर्नर पीस, बेडरुमच्या फ्रेंच विंडोज आणि वॉर्डरोब! मी अविश्वासाने सगळ बघत होते, हे माझच घर का? अशा संभ्रमात. स्वप्नातल घर साकार झालेल बघून मन समाधानाने भरुन आले होते. मनातल्या मनात मी आर्किटेक्ट राजवाडयांना धन्यवाद दिलेत.
ह्यांच्या चेहे-यावरपण समाधान दिसत होते. मी म्हटल ह्यांना "अनिकेत राजवाडयांना जाऊन भेटून येउया, त्यांचे आभार मानायला हवेत आणि त्यांना एक छानशी भेट देउया त्यांच्या घराला शोभेल अशी, मी तर म्हणते ताजमहालाची छोटीशी प्रतिकृती देउया, त्यांची बायको खुश होइल" माझी बडबड चालूच होती. ह्यांनी एक खोल निश्वास सोडला, अगदी मला जाणवेल असा, मी चमकलेच, "कां हो काय झाल उदास व्हायला? "अग, बिचारे, दोन्ही पाय नाहीत त्यांना" हे उद्गारले, "काय, पण इतके दिवसात बोलला नाहीत तुम्ही कधी" "अग, घराच्या कामात इतका गुंतलो होतो आणि विषयच निघाला नाही तसा. आत्ता आठवल, राजवाडयांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना कुठेतरी बघितल्या सार वाटत होत. मी आठ चाळीसची बस गाठायला धावायचे, तेव्हा तो उमद्या प्रसंन्न व्यक्तिमत्वाचा, पाय नसलेला तरुण ती बिल्डिंग ओलांडतांना दिसायचा! हाच तो अनिकेत!
"मी अनिकेत राजवाडयांना भेटले तर तुमची काही हरकत आहे का?" मी ह्यांना विचारल."माझी हरकत नाही, पण उगीच त्यांच मन दुखावलं जाईल अस काहीतरी त्यांना विचारु नकोस म्हणजे झाल." मी राजवाडयांच्या ऑफिसमध्ये पोहोचले, रिसेप्शनिस्टची परवानगी न घेताच आत गेले, झुलत्या खुर्चीवर राजवाडे बसले होते, समोर कस्टमर बसले होते,त्यांच्या बरोबर काही चर्चा करत होते,त्यांचाकडे बघून त्यांना पाय नाहीत यावर कुणाचाच विश्वास बसला नसता. मला बघून त्यांना खूप आश्चर्य वाटल्यासारखे दिसले आणि ते थोडेसे डिस्टर्बही झाल्यासारखे दिसले, मी अपॉइटमेंट न घेता आल्यामुळे. समोरच्या कस्टमरजवळ दिलगिरी व्यक्त करत त्यांनी त्यांना थोडयावेळासाठी बाहेर जायला सांगितले.
"बसा मिसेस लिमये, हसून ते उद्गारले, काही प्रॉब्लेम झाला आहे कां?, माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या, " राजवाडे, तुम्ही कधी बोलला नाहीत, मी ऑफिसला जातांना रोज तुम्हाला बघायचे, खूप वेळ अस्वस्थ व्हायचे, काही सुचायच नाही, का अस व्हायच समजत नव्हत.! तुमच्या समोरून चालतांना, माझीच पावल पण ती टाकतांना अपराध्यासारख व्हायचं...........आवेगाने मी बोलत होते, डोळ्यातून आसवं वहायला लागली होती. अरे, अरे, मिसेस लिमये, मला राजवाडे म्हणण्यापेक्षा अनिकेतच म्हणा, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्याविषयी जाणून घ्यायचयं ना, तस तुम्हाला माझ्याविषयी सांगण्याचे काही कारणच नाही, पण तुमच्या स्वच्छ, सरळ मनाला झालेला त्रास मला जाणवतोय, एखाद्याचे दु:ख मनाला जाउन भिडले की असं होत, माझ्याबद्दल मी कधीच कुणालाच काहीही सांगत नाही, पण आज तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या मोठया वयाचा विचार करून.........................अगदी साधी आहे कहाणी..............!
आर्किटेक्चरच शिक्षण घेउन मी नुकताच मी कॉलेजमधून बाहेर पडलो होतो. आईचा एकूलता एक मुलगा, बाबा मी सातवीत असतांनाच गेले होते, बाबांच्यापाठीमागे आईने शिक्षिकेची नौकरी करून मला शिकवल होतं, वडिलोपार्जित इस्टेट होती पण आईच्या एकाकीपणाचा फायदा घेउन आमच्या वाटेला काहीच आले नव्हते. अगदी रहायला चांगले घरही नव्हत. मीत्रांची चांगली घरं बघीतली की वाइट वाटायच, मनाशी निश्चित ठरवल होत की स्वत:चा व्यवसाय सुरु केल्यावर छान घर बांधायच, आणि आईला सुखात ठेवायच. त्याचवेळेस व्यवसायाच्यानिमित्ताने देवधरांशी ऒळख झाली, त्यांना माझा स्वभाव, माझं शिक्षण, वागणं सगळच आवडलं होतं, त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुली साठी माझी निवड केली, पण मी त्यांना माझ्या घरातल्या परिस्थितीची जाणिव करून दिली होती, तरीही त्यांनी त्यांच्या मुलीशी, सुरुचीशी माझी ओळख करुन दिली होती, परिचयाच आवडीत आणि आवडीच प्रेमात रुपांतर कधी झाल, कळलच नाही. व्यवसायात मी स्थिर नव्हतो, माझी थांबण्याची तयारी होती, पण देवधरांची थांबण्याची तयारी नव्हती. लवकरातला मुहुर्त काढून थाटात लग्न झालं, आई तर खूप खूश होती सुनेवर.
लग्न झाल्यावर व्यवसायाच्या व्यापामुळे बाहेरगावी फिरायला जाता येणार नाही याबद्दल मी सुरुचीला सांगितले होते. पण अगदीच कुठे नाही तर पप्पांची कार घेउन आपण माथेरानला तरी दोन दिवस जाउया !असा हट्ट धरला. मी पण तिच मन मोडू नये म्हणून तयार झालो. आई तर खूप काळजी करत होती, निट सांभाळून जा म्हणून वारंवार बजावत होती. आईचा आणि सुरुचीच्या पप्पांचा निरोप घेउन आम्ही निघालो.
सुरुचीला वेगाच फार वेड होत. कार चालवतांना ती खूप वेगात चालवावी असा तिचा हट्ट असायचा. वेगाने कार चालवतांना बघून तिला थ्रील वाटायच! त्यादिवशी माथेरानला जातांना म्हणत होती "अनिकेत वेग वाढव ना.................. अजून वेगात..............काय मस्त वाटतय बघ...................! ही थंड हवा...............काय मजा येतेय ना?.......................!!! मलाही काय झालं होत समजत नव्हत, मी वेग वाढवतच होतो................!ते भयंकर वळण, त्या वळणावरुन येणारा ट्रक दिसलाच नाही..........ट्रकची जोरात धडक बसली.......क्षणभर काही समजलच नाही. शुध्दीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो, आई माझ्याजवळ बसून आसव पुसत होती. प्रथम मी सुरुचीची चौकशी केली, आणि कळल तिला केवळ मुका मारच बसला होता, हात फ्रॅक्चर झाला होता आणि प्लॅस्टरमध्ये ठेवला होता. सुरुचीचा विचार करता करता एक असह्य कळ आली पायातून! पाय हलवून बघण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एक जिवघेणी कळ! पायावरच पांघरूण बाजूला केलं आणि........ आणि............ जे कांही बघीतलं ते भयंकर होतं! माझी करूण आरोळी सा-या हॉस्पिटलभर घुमली. माझे मांडयांपासून दोन्ही पाय कापले होते! ओंजळीत चेहेरा लपवून मी रडत होतो लहान मुलांसारखा!
हॉस्पिटलमधून घरी आलो, वाटल, सुरुची घरी असेन, पण ती माहेरी गेलेली होती. मन आंतल्या आंत घुसमटल! सुरुची श्रीमंताची एकूलती एक मुलगी होती, ती ही असली तडजोड स्विकारणार नव्हती याची जाणिव होती मला.पण तरीही मला तिच्या आधाराची आत्ता खूप गरज भासत होती, आत्ता लगेचच तिने अस जाऊ नये असं वाटत होत. तिने मित्र म्हणून तिला आवडणा-या माणसाचा स्वीकार करावा पण माझ घरकुल अस मोडून जाऊ नये आणि ब-याच अंशी ती ही जबाबदार होती या अपघाताला! तिच पत्नी म्हणून घरात असणंच मला खूप धिर देणारं होतं. पण नाही सुरुचीने घटस्फोटाची नोटिस पाठवली, मी ही कुठलाही वादविवाद न करता त्यावर सही केली, सहा महिन्यांनी आम्ही विभक्त झालो.
माझं घराच स्वप्नं अस तोडून मोडून गेलं! पार उध्वस्तं झालं!!!!!!!!!
तरीही मी उभारी धरली. माझे पाय कापले गेले म्हणजे सगळच संपल नव्हत! माझ्या हातातली कला अजुन शाबुत होती. ईश्वराने दिलेली डोळ्यांची, हातांची अनमोल देणगी माझ्याजवळ होती. निष्णांत डॉक्टरांनी ऑपरेशन करून हे लाकडी गोल माझ्या मांडयात बसवले, ज्याच्या आधाराने मी उभा रहायला लागलो. सुरुवातीचे काही दिवस रिक्शा, आणि व्यवसायात जम बसल्यावर कार घेतली, पुर्णवेळ नोकर ठेवला, आणि मग सगळी घडी निट बसली.
माझ्या व्यवसायात स्थिरावलो, नाव कमावलं, किर्ती कमावली, संपत्ती मिळवली. आता मी खरोखरच खूप तृप्त झालोय.
मी घराचे सुंदर प्लॅन्स बनवतो. त्या घरात रहायला जाणा-या त्या कुणीतरी दोघांचे समाधान, आनंद बघतो, आणि आतल्या आत मी सुखावतो, त्यांचा आनंद मी स्वत: अनुभवतो. त्या सुंदर घरात रहायला जातांना ती कुणीतरी दोघं! स्वप्न रंगवणार आहेत, घर सजवणार आहेत................. असा विचार करतो आणि माझं उध्वस्त झालेलं घर त्या सुंदर घरांमध्ये विसरून जातो."
माझे डोळे काठोकाठ भरुन आले होते. नवीन घरात रहायला जातांना त्याचं उध्वस्तं घर आठवून मी मनांतल्या मनांत अंत:र्मुख होणार होते.
सौ.दिप्ती जोशी, डोंबिवली.
*******************************************************

1 comments:

Prathmesh said...

सुंदर . वाचता वाचता डोळ्याला पाणी आल.

Post a Comment