RSS

Sunday, August 15, 2010

"पुर्नजन्म एका कलाकाराचा"


"पुर्नजन्म एका कलाकाराचा"


आज माझा वाढदिवस. सकाळी आंघोळ करुनच ह्यांना डबा करुन दिला. छान केशर, वेलची, जायफळ घालुन केलेला शिरा, प्रसाद सारखा. त्यावर पेरलेले काजू, बदामाचे काप. सगळ्या डब्याचाच देवाला नैवेद्द दाखवला. संध्याकाळी वाटलच तर बाहेर, नाहीतर घरातच एखादा छान पदार्थ. हल्ली बाहेर जाऊन जेवण्याच फारसं अप्रुप वाटत नव्हत. डब्याबरोबरच माझा स्वयंपाक करुन घेतला होता. पूजा झाली होती. काम वाल्या बाईपण काम करून गेल्या होत्या.
सकाळी सकाळीच सासूबाई आणि आईला नमस्काराचा फोन केला; आणि सगळ्यांचे वाढदिवासाचे फोन येऊन गेले. सकाळपासून वेळ छान गेला होता. मनाला त्रास त्रास होईल अशी एकही घटना घडली नव्हती. आता सगळा मोकळा वेळ माझा होत.हव ते वाचायचं, हव ते लिहायचे. आता साडेदहा झाले होते, पुढे साडेसातपर्यंतच्या सगळ्या वेळाची मी मालकीण होते. मनातून अनामिक आनंदाच्या लहरी येत होत्या.
मग मी माझा वार्डरोब ऊघडला.......क्षणभर बघतच राहीले..............विविध प्रकारच्या साडयांनी गच्च भरलेले कपाट........... प्युअर-सिल्क, कॉटन्स, गढवाल, इरकल, पैठणी.......मग हळूच दागीन्यांचा लॉकर उघडला......... पाटल्या, बांगडया, तोडे, नेकलेस, मोहनमाळ, ठुशी, मोत्याचा सेट, पोवळ्याचा सेट.......हळूवारपणे सगळ्या दागिन्यांवर हात फिरवला. चांदीच्या लॉकरमधून तर भांडी बाहेर पडायला बघत होती, इतकी भांडी जमा झाली होती. लक्ष्मीचा वरदहस्त जाणवत होता.
सगळ्या घरावर नजर फिरवली. किती मोठं घर! ते पण डोंबिवली सारख्या मुंबईच्या उपनगरात......मनात तृप्तता नुसती ओतप्रोत भरुन होती. डॉक्टर झालेली मूलगी. तिचा डॉक्टर जोडीदार......आता लवकरच तीचं "क्लिनिक" या विचारानेच मनावर सुखद मोरपीस फिरल्यासारखं होत होतं. नाशिकला छान बांधलेला बंगला! नाही म्हणायला मुलगा नाही ही उणिव होती, पण जावई ही उणिव नक्कीच भरून काढेल याची हळूहळू खात्री पटायला लागली होती. उच्चशिक्षित, संस्कारी, सात्विक वागण, आणि आमच्या दोघांची काळजी घेणं यामुळे हळूहळू ही उणिव पुसट होत होती. ईश्वरीकृपेचा वर्षाव अजून वेगळा काही असू शकतो का? या तृप्ततेला मी खूप खोल श्वास घेत माझ्या आतल्या मनात, ह्र्दयात भरुन घेतलं.
लॉकरच्या खाली एक कप्पा होता, त्यात माझ्या प्रशस्तीपत्रकांची फाईल आणि काही लिखाण केलं होतं त्या डाय-या होत्या. फाईल आणि डाय-या हातात घेतल्या, आवडती सीडी लावली आणी सोफ्यावर शांतपणे बसले..........
फाईल चाळत होते...........गाण्याचे सूर कानावर पडत होते.............सलीलचा ह्दयाला स्पर्शुन जाणारा आवाज...........!
"आताशा असे हे मला काय होते
कुण्याकाळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते"
अन मी खरच स्तब्ध झाले, माझे शब्दही मूक झालेत. डोळ्यातून आसवांच्या सरी वहायला लागल्यात................
प्रशस्तीपत्रकांनी फाईल गच्च भरली होती. चित्रकला, गायन, भावगीत, निबंध, कथालेखन, रसास्वाद.......... कसली म्हणून प्रशस्तीपत्रक नव्हती त्या फाईलमध्ये ! ७० साली सातवीत असतांना पहिल प्रशस्तीपत्रक मिळाल ते जिल्हापातळीवरच्या चित्रकला स्पर्धेच. त्यावेळेस अजून आठवत......... शाळेचा प्युन घरी बोलवायला आला होता, शाळेच्या स्मरणिकेत देण्यासाठी सगळ्या शिक्षकांबरोबर फोटो काढायचा होता, मग माझी उडालेली धावपळ, कांहीतरी वेगळ करायच म्हणून आहे तो सरळ भांग मोडून तिरपा भांग पाडून घातलेली वेणी, मोजकेच कपडे असायचे, त्यातलाच एक चांगलासा स्कर्ट ब्लाऊज त्यावर रशिदाने भेट दिलेले गळ्यातलं, कानातलं, हातात अंगठी पण आवर्जून घातली, आता ती फोटोत दिसणार नाही हे कुठं कळत होतं तेव्हा. शिक्षकांच्या दोन रांगा, त्याच्यासमोर छोटं स्टूल टाकून मला बसवल मग काढलेला फोटो, बाबांबरोबर जाऊन जळगांवच्या कलेक्टर ऑफीस मधून घेतलेला पूरस्कार! शाळेतल्या प्रत्येक निबंध स्पर्धेत बक्षिस हमखास ठरलेलेच असायच. मग कॉलेज जीवन, त्यातली असंख्य बक्षिसं, त्यातला चढता यशाचा आलेख.
लिखाणाची आवड फार लहानपणापासून होती. ८ वीत असतांना पहिली कथा लिहिली- "अनोखे दान" तिच नांव. पुढे हीच कथा कॉलेजमध्ये गेल्यावर रेल्वे कल्चरल अकाडमीच्या स्पर्धेसाठी पाठवली, आणि तिला "व्हेग" मासिकेचा प्रथम पुरस्कार मिळाला. "शिक्षा" कथेला चारचौघी मासिकाचा प्रथम पुरस्कार, "नजर" कथा गृहलक्ष्मीच्या कथा स्पर्धेत ६०० कथांमधून अंतिम फेरीत पोहोचली. अनेक चित्र काढलीत, एखादा विषय घेवून, त्यावर लिखाण करुन मग चित्र काढलीत---मोठ्या चित्रकाराने कौतुक करावीत अशी ---- इतकी सुंदर! गाण्याची आवड होती ---- गाण शिकण्याचा प्रयत्न केला.
आता या ५३ व्या वर्षात पदार्पण करत असतांना स्वत:च्या आयुष्याच्या यशस्वी वाटचालीचा पट उघडून बसले होते अन डोळ्यातुन आसवाच्या सरी वहात होत्या. हातातुन आयुष्य निसटून गेल्याची खंत, सृजनशिलतेची प्रचंड शक्ति असूनही तिला योग्य दिशा मिळाली नाही याची बोच जाणवत होती.
आयूष्याच्या प्रत्येक वळणावर नवी भुमिका निभावतांना ......... एक मुलगी.........बहिण.........पत्नी......सुन.......प्रत्येक वळणावर एकेका कलेच विसर्जन करत आयुष्य पुढे जात होतं.
"बाबा चित्रकला फार आवडते, मी जी.डी.आर्ट्सला जाऊ का?"
"बाई इतक महागडं शिक्षण तुला द्यायच. बाकीच्या मुलांच्या शिक्षणाच काय?"
मनातला चित्रकार निमुटपणे विसर्जित झाला होता.
लग्नानंतर खुप लिखाण करायच होतं, पण सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि जाणंवल चांगल सुस्थिर जिवन जगायचे असेल तर नोकरी करण क्रमप्राप्तच आहे. मग अठरा वर्षे नॊकरीच्या चक्रात वावरतांना....... नऊ ते पांच आफिस, लेकीची शाळा, घरचा अभ्यास, पाहुण्यांची सततची वर्दळ, मोलकरणीच्या सुट्ट्या, लिखाणाचे सुंदर विचार सुचत असतांना, डोळे थकून कधीच मिटलेले असायचे, आतल्या लेखीकेच कधीच समर्पण झाले होते.
अचानक ह्यांना परदेशी नोकरीची संधी चालून आली. आम्ही दोघांनी सल्लामसलत करुनच ह्यांनी ती संधी स्विकारली होती. पण त्याच वेळेस लेकीच ख-या अर्थाने शिक्षण, करियर सुरु झालं होत. पांच वर्ष तिच्याबरोबर रहातांना, तिच्यासाठी आई आणि वडिल या दोन्ही भुमिका निभावतांना, नोकरीच्या धावपळीत तीच्या सहवासात रहायलाच मिळाले नव्ह्ते, आता तिच्यावर चांगले संस्कार करतांना, तिची मैत्रिण होतांना, तिचं आयुष्य नादमय बनवतांना माझ्या मनातले गाण्याचे सूर कधीच हरवले होते..........कधीतरी ते सूर साद घालायचे.....अन माझं मन त्या ओळींभोवती रूंजी घालायच.................
"दूर.......आर्त........सांग......कुणी.......छेडीली बांसरी.........!!!!!
आज फाईल्स चाळता चाळता मनातली खंत आसवांच्या सरीतून बाहेर पडत होत्ती. किती गूण होते अंगात, किती कलासक्त मन होतं. लग्न होऊन आल्यापासून कोणी बघीतलीत ही प्रशस्तीपत्रक? दागदागीने, साड्या, मोठं घर हीच कां होती सुखाची परिमाणं? मला आठवतयं, गेल्या दोन वर्षात ते जड दागीने कधी घातलेच नाही. अगदी जवळच्या लग्नात देखिल हातात एक पाटली, घड्याळ, गळ्यात मोत्याचा सर! बस्स एवढेच. लग्नकार्याला जातांना कपाट उघडल की प्युअरसील्कच्या नाजूक जरी बार्डरच्या साडी कडे हात वळायचा,त्या जड जड पैठण्या कधीच वरच्या बॅगेत टाकल्य़ा होत्या. ......., माझ्यातला कलाकार तळमळत होता, अतृप्त होता.
माझ्यातल्या कलाकाराला असं प्रत्येक वळणांवर विसर्जित होतांना मन मात्र रडत होत. मला खुप कांही करायच होतं, पण आयुष्य मात्र हातातून निसटून गेल्याची खंत नेमकी आज वाढदिवसाच्याच दिवशी होत होती. ईश्वराजवळ प्रार्थना करतांना एक विनंती केली....."ईश्वरा या ज्न्मात नाही जमलं हे सगळं, पण पुढचे अनेक जन्म माणसाचेच दे, एकेक कलेसाठी सगळा जन्म वाहून घेतला जाऊ दे.........." डोळ्यातल्या आसवांना परतवून लावत असतांना एक क्षणभर गुंगी आली...........आणि कानाशी कुणीतरी गुणगुणत होतं................!!
"अग, बघ तुझा हा रेखिव संसार, प्रत्येक गोष्ट कशी नेटकी ठेवली आहेस, प्रत्येक डब्यावर लावलेलं लेबल,
त्यात बरोबर तीच वस्तु, कलात्मकतेने सजवलेला दिवाणखाना, सगळ कसं आखिव आणि नियोजनबध्द.
संसाराच हे असं सुंदर चित्र, एखाद्या चित्रकारालाच जमतं........मला भेटला की तुझ्यातला चित्रकार!"
"तुझ्या मनातल्या सात्विक विचारांचे संस्कार तु तुझ्या लेकीवर करत होतीस, म्हणून तर ती इतकी संस्कारशील घडत गेली.हा तर तुझ्यातल्या लेखिकेचा चालता बोलता आविष्कार!"
"आणि गाण्याचच म्हणशील तर..........तिन्हीसांजेच्या वेळी.......समईची ज्योत उजळ्यावर, आर्त स्वरात केलेली ईश्वराची आळवणी........ती भक्तीगीतं, भावगीतं.........तुझ्यातल्या सुरांना, गाण्याला ती जोपासत होती......!"
माझ्या कानात उमटणारे ते शब्द खुप गोड होते, कदाचित तो माझ्या मनातलाच आवाज असेल, पण तो आवाज ईश्वरी होता. ती वाणी अमृतवाणी होती. डोळ्यातल्या आसवांना मी कधीच पुसुन टाकले होते, माझ्या ओठावर हसू उमटलं होतं आणि ते हास्य आतल्या मनातुन आलं होतं. परवाच काढलेलं गजानन महाराजांच चित्र घेतल ते टेबलावर ठेवलं, एक छोटसं लिखाण केलं होतं "भाव ते दृढनिष्ठा - प्रवास भक्तिचा" ते ही त्या फोटोसमोर ठेवलं, आणि मी शांतपणे हात जोडून डोळे मिटून गाणं म्हणत होते.
"नच वाण कोणतीही, सौख्यास पार नाही कांता, सुपुत्र सारे दैवेच प्राप्त होता....... शेगांवच्या महंता.........."!
माझ्यातला कलाकार कदाचित जगापुढे उघड झाला नसेल पण या चराचराला, सा-या जगाला निर्माण करणा-या या नियंत्यापुढे मात्र मी कलाकारच होते. त्याच्यासमोर गातांना, त्याचे चित्र काढतांना, त्याच्याविषयी लिहीतांना माझ्यातला कलाकार मोकळा......मोकळा श्वास घेत होता......!
माझ्यातल्या कलाकाराचा हा पूर्नज्न्म होता.....!!!!!
मनात गाण्याच्या ओळी उमटत होत्या...............
"एकाच या जन्मी जणु फिरूनी नवी जन्मेन मी....."!
एक आगळा वेगळाच वाढदिवस साजरा झाला होता माझा.......
दिप्ती जोशी, मुंबई,
***************************************************

4 comments:

Shyam said...

अतिशय छान लिहिले आहेस ...तुझे कडून खूप भव्य-दिव्य..
लिखाण आम्ही नाही तर सगळे वाचक आतुरतेने वाट बघत आहेत
तुमचा दादा !

Madhura said...

तुम्ही हा ब्लॉग लिहायला घेतलात हा पण एक प्रकारे पुनर्जन्मच आहे नाही का ... लिहा, मनमोकळे लिहा ...

दिप्ती जोशी said...

तुम्ही माझा ब्लॉग वाचुन प्रतिसाद दिला, धन्यवाद, असे प्रतिसाद मिळालेकी अजुन लिहिण्यास प्रोसाहन मिळते, पुन्हा एकदा धन्यवाद- दिप्ती जोशी

दिप्ती जोशी said...

तुम्ही माझा ब्लॉग वाचुन प्रतिसाद दिला, धन्यवाद, असे प्रतिसाद मिळालेकी अजुन लिहिण्यास प्रोसाहन मिळते, पुन्हा एकदा धन्यवाद- दिप्ती जोशी

Post a Comment