मध्यंतरी "शब्दपट" म्हणुन ब्लॉग बघण्यात आला, त्यातली "कालिब" पोस्ट वाचली आणि अगदी शब्द भारावल्या झाडासारख मन तरल झाल होत........मग ठरवल........आपणही लिहायच.........जे मनात येतं ते...........जे भावतं ते......!!
त्यादिवशी पुजा करायला बसले तर देवासमोर काचेच्या सटात अगदी "एवढुसा" बोटाच्या नखावर मावेल एवढा गुळ ठेवला होता. त्या ’कणभर’ गुळाकडे बघुन ’क्षणभर’ हसायला आलं........हसता हसता डोळ्यात पाणीही आलं......आता गुळाकडे बघुन हसायला येणं......आणि डोळ्यात पाणी येणं......टु मच!!!!!
गुळ तो काय, त्यावर लिहिणार ते काय? फार तर गुळ गोड असतो. गावाकडील मंडळी पिवळा गुळ बघितला की गुळ आणि शेंगदाणे पटकन तोंडात टाकतात. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महीन्यात संक्रांतीला या गुळापासुन तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्या बनवतो आणि दोन्ही गोष्टींवर मस्त ताव मारतो. होळी आली की पुरणपोळी या गुळापासुनच बनवली जाते. संकष्टी आणि गणेश-चतुर्थीला गुळ आणि ओल्या खोब-याचे सारण भरुन बनवलेले उकडीचे मोदक......अहाहा!!! आपण जेव्हा हा उकडीचा मोदक फोडुन त्यावर भरपुर तुप ओतुन तोंडात सोडतो ना......तेव्हा या गणरायाला इतका अवघड पदार्थच कां आवडतो? याचे उत्तर जिभेवर रेंगाळणारी चवच देऊन जाते.
फार तर गुळ म्हटला की "गुळाचा गणपती" हा पु.ल.देशपांडेंचा जुना चित्रपट आठवतो. आमच नुकतच लग्न झालं होतं. सगळी सासरची मंडळी जमली होती, रात्री खुप उशीर झाला होता आणि गप्पांना नुसत उधाण आलं होतं, माझ्या डोळ्यात झोप मावत नव्हती.......त्याचवेळेस या चित्रपटाचा विषय निघाला आणि मी झोपाळलेल्या डोळ्यांनी उगीचच काहीतरी बडबडले......"हो तो सिनेमा खुपच सिरियस आहे" कदाचित मला "विनोदी" म्हणायच होतं आणि झोपेत "सिरियस" शब्द निघुन गेला........आणि त्यानंतर उडालेले हास्याचे फवारे......!! आजही सगळे एकत्र जमले की मला चिडवतात, "ह्यांचा "गुळाचा गणपती" सिरियस बुव्वा!! किंवा एखाद्या गोष्टीचा पिच्छा सोडला नाही की जुनी मंडळी रागावतात "अरे काय गुळाला मुंगळा चिकटल्या सारखा पाठी पडलाय......!!!!
तर असा हा गुळ! या गुळाकडे बघुन चक्क माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
ह्यांच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही भारताबाहेर होतो. जवळ जवळ तिन महीने होत आले होते....पंधरा दिवसांनी सुट्टी डयु झाली की मग भारतात परतायच.....त्याच दरम्यान सायलीचा फोन आला "ती बंगलोरला अनिरुद्धला भेटायला जाऊन येतेय....८-१० दिवस रहाणार होती. सायलीला नाशिकला परतुन ८-९ महिने झाले होते..... नविन लग्न झालेलं, पण दवाखान्याचा जम बसावा म्हणुन तिने पुढे येउन क्लिनिक सुरु केलं होतं, अनिरुद्धच्या पीजी चे अजुन सहा सात महिने राहीले होते....दोघही एकमेकांना भेटुन बरेच दिवस झाले होते....म्हणुन निघाली होती.
सायली लग्नानंतर अशी एकटी पहील्यांदाच जाणार होती. लग्नाच्या आधी तिने कुठेही जायच म्हटल की कितीही दमलेले असोत, हे तिला सोडवायला जाणार कुठुन ती यायची म्ह्टली की आधीच ड्रायव्हर सांगुन ठेवुन, गाडी घेउन तिला घ्यायला जाणार, तिलाच नाही तर घरात कुणीही पाहुणे येणार असो त्यांना घ्यायला आणि सोडवायला हजर!! कधीच कंटाळा नाही.
आता ती नाशिकहुन निघुन रात्री मुंबईतल्या एका नातेवाईंकांकडे रहाणार होती, आणि मग तिथुन सकाळच्या फ्लाईटने बंगलोर. ह्यांच्या मनाची घालमेल दोन दिवस झाले बघत होते. सारखे फोन करत होते......अग निट तयारी केलीस ना? सगळं घेतलस ना?, वजन जास्त घेउ नकोस....!! मी सगळ डोळ्याने टिपत होते. तिची निघायची वेळ झाली, ह्यांनी परत फोन लावला.....मी म्हटलं, "अहो ती निघायच्या गडबडीत असेल, किती फोन करायचे..... शिवाय तिचे सासु-सासरे आहेत मदत करायला....आणि हल्ली मुली परदेशात एकटया जातात, बंगलोरच काय घेउन बसलात? आपण इतक्या लांब....सातासमुद्रापलिकडे.......किती काळजी करणार इथे बसुन? नेहेमी "काळजीवाहु सरकार" च लेबल माझ्या डोक्यावर लावलेलं असत.......आज माझ्या मनातल्या काळजीला बाजुला करुन मी ह्यांना समजावत होते. शेवटच्या क्षणी ह्यांनी तिला फोन करुन आयडी प्रुफ घेण्याची आठवण करुन दिलीच.
आमच्याकडे फार पुर्वीपासुन एक प्रथा आहे....कुणीही प्रवासाला निघाले की गणपतीसमोर वाटीत थोडासा ’गुळ’ ठेवायचा.....सुखरुप प्रवास होऊ दे म्हणुन प्रार्थना करायची....मग प्रवासाला निघायचे.
रात्रीचे दहा वाजले होते. आम्ही अल्जेरियाला येउन तीन महिने झाले होते. बरोबर आणलेलं प्रोव्हिजनच सामान जवळ जवळ संपत आलं होत.....त्यातला गुळही संपला होता, आणि इकडे गुळ हा काय पदार्थ आहे कुणालाच माहित नाही.. त्यामुळे बाजारात मिळण्याची शक्यता अजिबातच नाही, ह्यांनी गुळाची बरणी बाहेर काढली, अगदी तळाशी चिकटलेला गुळ चमच्याने खरवडुन काढला, अगदी "एवढुसा" बोटाच्या नखावर मावेल एवढा!!! काचेच्या सटात ठेउन देवासमोर ठेवला आणि शांतपणे सुखरुप प्रवास होऊ देण्यासाठी प्रार्थना करत होते!!!!
मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात जायला निघाली असो की सासरी जायला निघालेली मुलगी असो, मनसोक्त रडुन झालं की मग हातावर दही-साखर देऊन हसत तो निरोपाचा क्षण साजरा करणा-या समस्त आया!! अन त्याचवेळेस ओलावणारे डोळे उगीचच चष्म्यात दडवणारे......सगळ्यांना विनाकारणच घाई करायला लावुन, निरोपाचा "तो कातर क्षण" मनातच जिरवुन टाकण्याचा हळवा प्रयत्न करणारे ’बाबा’!!! पुरुष ना ते, रडण बर दिसणार का त्यांना!!
गुळ तसा गोडच!! खाल्ला की आवडतोच.......पण त्या कणभर गुळात दडलेली बाबाची "आभाळभर माया" पाहुन डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांच्यातल्या "बाबा" कडे बघता बघता.......डोळ्यासमोर उभा राहिला एक सळसळता "वटवृक्ष"!!!! माळरानावर निश्चल उभारलेला....पांथस्तांना शितल छाया देणारा.......नाजुक वेलींना अधार देणारा.....!! पाखरांना आसरा देणारा वटवृक्ष!!
"तो" ही कधीतरी थंडीने शहारतो.........!! पावसाच्या तडाख्याने गारठतो...!! उन्हाने करपतो......!!! त्यालाही वाटत असत.....आपणही कुठेतरी सावलीत विसावाव............कुणाचा तरी आधार घ्यावा............कुणाच्या तरी आश्रयाला जावं...............पण श्रांत, थकलेले पांथस्त......थरथरणा-या नाजुक वेली अन चिवचिवणारी पाखरं बघतो आणि तो शहारा..........ते गारठणं.......ते उन्हाने करपणं.........सगळ सगळ दुर दुर भिरकावुन तो परत तेवाढयाच ताठपणे उभा रहातो.......ऋतुंचे तडाखे सोसत निश्चलपणे!!
त्या ’एवढयाश्या’ गुळाने मला विचारांच्या निळ्या आभाळाची सैर करवुन आणली होती.
7 comments:
दिप्तीताई नमस्कार.
खुप छान लिहलय. असच छान लिहीत राहा.खुप खुप शुभेच्छा..
वाह मस्त... !!
आपली ओळख मी मराठी.नेट पुरती, पण आज तुमचा ब्लॉग सापडला. उत्कृष्ट लिहिता आपण, ह्यात वाद नाही. तुमची लिखाण शैली खुप भावते. शुभेच्छा !!!
dhanyavad raj aani suhas.
suhas majhi likhan shaili tumhala avadli, mast!!
asha pratisadani lihinyasathi sphurti milate.
kay sundar lihita ho tumhi... dolyat pani ala... !!
dhanyawad Rajeshwari
Tumhala katha aavadali aani tumhi majhya blog chya follower jhalat tyabaddal.
dipti
मुळात गोडावा घेवुन जन्माला आलेल्या गुळाची ही "गोड" कथा ..
चि.सौ.दीप्ती इतक्या स्पीड ने इतके उत्कट लिखाण करीत आहेस .....
आम्हाला प्रतिसाद लिहावयास न शब्द सुचत....न लय ....खरेच आम्ही कौतुकाचे
दोन शब्द लिहिण्यास देखील पात्र नाही आहोत तोडक्या मोडक्या
बोबड्या शब्दात थोडेसे लिहित आहे "गोड"मानून घे !
गुळाची गोडी अन गोडवा अवीटच !...अन मग हा असा गोडवा असलेला
शब्द दीप्तीच्या हाती लागल्यावर ...तर मग काय त्याचे ती सोने च करणार ...!
टीचभर गुळाने अख्या रसिकांचे तोंड गोड करण्याचे सामर्थ्य असेच उत्तरोत्तर वाढीस लागो
हीच त्या "गुळाच्या गणपतीला " प्रार्थना अन साकडे देखील ....
shyam - dhanyavad, apratim pratisad mhanun mi marathiche malak raj jain yani suddha kautuk kele. kharokharach apratim - dipti
Post a Comment