RSS

Saturday, April 23, 2011

विश्वामित्राची तपश्चर्या

 १६ जुनचा तो दिवस आठवला की मनात नुसती कालवाकालव होते. आपण मोठया असुनही असे कसे वागलो याची खंत मनाला लागते. तो प्रसंग अजुनही जसाच्या तसा आठवतो. ’तोमाझ्या अगदी जवळच्या रक्ताच्या नात्यातला. गेली पाच वर्षे डोंबिवलीत आला होता बदली होऊन, बॅंक फ़ोर्टला रहायला डोंबिवलीत. त्याचा मुलगा इथेच इंजिनियर झाला, मुलीने दहावीची परिक्षा दिली होती, रिझल्टही जवळ आला होता. आता दुस-या ठिकाणी बदली झाली होती, दोन दिवस आधीच जेवणाचा कार्यक्रम करुन त्याला शर्ट, सगळ्यांना छोटया भेटवस्तु देऊन निरोपाचा तो कातर क्षणही साजरा केला होता. आज तो आला होता निघायच्या अगोदरच भेटायला!!मी पुजा करत होते, पटकन उठले, म्हटलं याच्याशी थोडया गप्पा मारुया. डोंबिवलीला नावं ठेवणे त्याची नेहेमीची, जुनी सवय होती. त्याच्या मुलीच्या शाळेतल्या अ‍ॅडमिशनपासुन ते डोंबिवलीत घर घेउन देण्यापर्यंत ह्यांनी मदत केली होती. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवण हा त्याचा स्वभाव होता.....शाळा कशी चांगली नाही, घर कसं वाईट आहे. त्याच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे तो बोलत होता. डोंबिवली शहर कसं वाईट आहे याच वर्णन सुरु होतं, मी शांत सुरात त्याला समजावत होते.........अरे, शहराच काय, चांगल्या वाईट गोष्टी असतातच तिथे, पण आपण जिथे रहातो त्या शहराने काहीतरी दिलेलच असतं आपल्याला....म्हणुनच देणेकरी असतो आपण त्या शहराचे.....आता बघ तुझा मुलगा इंजिनियर झाला, मुलगी पण दहावी होईल......ह्या सगळ्या चांगल्याच गोष्टी ना......ऋणी रहायचं त्या शहराचं. तरीही तो बोलतच होता.....रागावल्यासारखा, काहीबाही, वस्तु कशा चांगल्या मिळत नाही.....शाळा तर अजिबातच चांगली नाही.......माझी सहनशक्ती संपत आली होती, गेल्या पाच वर्षात अनेकवेळा या सगळ्या गोष्टी ऐकुन झाल्या होत्या. गेली तीस वर्षे मी डोंबिवलीत रहात होते. माझी सगळी सुख दु:, भावनिक ओलावा या शहराशी जोडला गेला होता, कुणास ठाऊक पण मीही जोरजोरात बोलायला लागले, आमचा निष्फळ वाद विकोपाला जात होता, दोघाचाही आवाज टिपेला पोहोचला होता.......शब्दाने शब्द वाढत होता..........एक क्षणभर....डोळ्यांवर हात ठेऊन तो लहान मुलासारखा रडायला लागला..........भरल्या गळ्याने बोलत सुटला......"अग डोंबिवली आम्हाला सगळ्यांना खुप आवडलीय.....रहावसं वाटतय सगळ्यांना..........पण बदली झाली की बि-हाड उचलुन जावं लागत......बदलीच्या गावी......मनात इच्छा असली तरी नाही राहु शकत आम्ही आवडत्या गावात.......मग त्याला नावं ठेवुन समाधान करुन घ्यायच मनाचं....त्याचं बोलणं ऐकल आणि स्तब्धच झाले. मी त्याच्याजवळ जाऊन पाठीवर हात फिरवण्याचा प्रयत्न केला, माझे हात झिडकारुन तो निघुन गेला, रडत रडत.......!! आजही यासगळ्या गोष्टी आठवल्या की डोळे भरुन येतात आणि सहा महिन्यातल्या घटना मनात तरळायला लागतात.३१ डिसेंबरला आम्ही अल्जेरियात होतो. पावभाजी आणि आईस्क्रिम असा साधासाच बेत ठेवला होता. संध्याकाळी आनंदचित्रपटाची सी.डी. बघत होतो. अल्जेरिया भारतीय वेळेच्या तुलनेत साडेचार तास मागे, भारतात सगळ्यांना फोन करायचे म्हणजे साडेसातलाच करायला हवे, सगळ्यांना फोन करत होतो.....प्रथम ह्यांच्या आईला.....मग माझ्या आईला, वहिनी म्हणतो आम्ही सगळी मुलं तिला, माझे भाऊ, ह्यांचे भाऊ....भराभर फोन लावत होतो......एक वेगळाच उत्साह आला होता. नविन वर्षाच स्वागत मनापासुन, उत्साहाने, नविन संकल्पाने, तो संकल्प पार पाडायचाच ही जिद्द मनात बाळगुन करायचं!. ह्यांच्या धाकटया बहिणीला फोन लावला,उत्साहाने शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली आणि तिने पटकन विचारलं "वहिनी, नविन वर्षाचा संकल्प काय केलात?" आणि एक क्षणभर माझ्या तोंडुन उत्तर निघाल......"सगळ्यांशी आईच्या भुमिकेतुन वागायचं" फोन ठेवला. नंतर आम्ही पाव-भाजी एन्जॉय केली, आईस्क्रिम खाल्ल. छान गेला वेळ, प्रसंन्नता मनात दाटुन आली होती, झोपायला गेलो,गादीवर पाठ टेकली आणि केलेल्या संकल्पाची आठवण झाली.सगळ्यांशी आईच्या भुमिकेतुन वागायच" एकच वाक्य...... पण जरा शांतपणे विचार करायला लागले आणि जाणवलं किती कठिण आहे हा संकल्प!! "आई" म्हणजे विशुद्ध प्रेम, निस्वार्थ सेवा, निराकाराच साकार रुप म्हणजे "आई". ईश्वर सृष्टीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टीची निर्मिती त्याच्या मुलाबाळांसाठी करत असतो, पण तो असतो निराकार. कुणाच्याही, कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तो बांधील नसतो. याउलट आईचं! त्याच्याच सारखा रोल करायचा, पण कुठेतरी थोडासा जरी तोल गेला की तिला उत्तरं द्यावी लागतात, तिच्याच अपत्यांना! म्हणुनच ईश्वरापेक्षाही कठिण असा रोल!!केलेला संकल्प कठिण आहे याची जाणिव झाली होती
"
.समर्थांचा दासबोधदोनदा अर्थासकट मनापासुन वाचला होता. तेव्हा जसं बोलले तसं वागण्याचा प्रयत्न करायचाच असा निश्चय केला. तसे आम्ही एप्रिलपर्यंत अल्जेरियातच होतो, त्यामुळे संकल्प पार पाडायला विघ्न येणार नव्हती. इथल जिवन म्हणजे एका अर्थाने एकांतातली साधनाच होती. ह्यांच्या आईला, माझ्या आईला फोन करायचे तब्येतीची विचारपुस करायची, ’आईच्याभुमिकेचा पहिला भाग सुरुच होता. खरी परिक्षा होती ती भारतात परतल्यावर, अठ्ठाविस एप्रिलला आम्ही भारतात आलो. सासुबाई धाकटया दिरांकडे पुण्याला होत्या, खर तर तीन दिवसांच्या विमानाच्या प्रवासाने खुप थकवा आला होता, पण त्याचा विचार न करता, पुण्याला निघालो, त्यांना भेटायला. त्यांच्यासाठी खाऊची बॅग भरतांना खुप आनंद होत होता, त्यांना भेट म्हणुन आणलेली प्रवासी बॅग पण बरोबर घेतली. वहीनीला,माझ्या आईला) बर नव्हतं म्हणुन तिला भेटायला जळगांवला गेले, तीन दिवस तिच्या सहवासात रहातांना काय काय करु असे झाले. औषध आणलीत, साडयांवरचे ब्लाउज शिवुन आणलेत, कपबशा जुन्या झाल्या होत्या त्याही नविन आणल्यात, तिला आंबे आवडतात म्हणुन चांगले दोन डझन हापुसचे आंबे घेउन गेले होते. निघतांना "माझी डोंबिवलीतली सगळी काम झाली की तुला इथे घ्यायला येईल,पंधरा दिवस शांतपणे रहा माझ्याकडे" असं प्रेमाने सांगुनही आले. मग बंगलोरहुन लेक जावई आलेत, मग माझ्यातल्या ख-याखु-या आईचा रोल सुरु झाला. तिच्याबरोबर शॉपिंग, त्यांना दोघांना आवडणारे पदार्थ........दहिवडे, बटाटेवडे......आलु-पराठे.......त्यांच्यासाठी खास आंब्याच्या पेटया मागवल्या होत्या. हे सगळ करत असतांना मनातल्या मनात मी स्वत:लाच तपासुन बघत होते,,,,,,,,,खरच याच भावनेने मी सगळ्यांशी वागते आहे कां????? तो अधिक महिना होता, गावातल्या दोघी नंणदांना, त्यांच्या घरच्या सगळ्यांना जेवायला बोलावले होते, आंब्याचा रस आणि बाकी सगळे त्यांना आवडणारे पदार्थ केले होते. सगळ्यांना जेऊ घालतांना मी मनापासुन आणि भरपुर करण्याचा प्रयत्न करते. ती सगळी आवडीने,पोटभर जेवली की माझ्यातली आईसमाधान पावते. त्यादिवशीही असेच सगळे चांगले पदार्थ केले होते, सगळे आवडीने जेवत होते. तशा दोन्ही नंणदा आणि त्याचे मिस्टर माझ्यापेक्षा वयाने मोठे पण त्यांना अधिकाचे वाण लावतांना मनातल्या वात्सल्याला किनार होती आईच्या ममत्वाची. २५ मे ला वहिनीला जळगांवहुन घेऊन आले, तीची थकलेली, सुरकुतलेली बोटं धरुन आणतांना, गाडीत तीला लहान मुलासारखं चढवतांना........तीच्या खुपणा-या डोळ्यांवर माझा गॉगल चढवतांना, माझ्यातली आई भेटली होती मला. त्याच दरम्यान सासुबाईपण आल्यात पुण्याहुन माझ्याकडे, हळुच म्हणाल्या, अग माझी एक साडी खराब झालीय, ड्रायक्लिन करुन देशिल का? तु खुप छान करतेस म्हणुन म्हटलं......त्यांची नऊवारी साडी ड्रायक्लिन करण अवघड जात होतं, पण तरीही मनापासुन केली. त्यांच्या दोन-तीन साडयांवर ब्लाउज शिवुन आणुन दिलेत. नविन साडी घेण्यासाठी पैसे दिले. आता माझ्या लेकीचा आणि वहिनीचा हट्ट होता, दोघींनाही मोरगांवच्या गणपतीला पुजा घालायची होती. वहिनीने तर सांगुनच टाकलं.....वरचं बोलावणं यायच्या अगोदर मला एकदा मोरगांवला नेउन आण ग बाई"मग मोरगांवच्या पुजेच ठरवलं. ह्यांची सुट्टी संपल्यामुळे हे २२ मे लाच अल्जेरियाला परतुन आले होते, आता हा सगळा डोलारा मलाच सांभाळायचा होता. वहिनी, मी, लेक आणि सासुबाई अस जायच ठरलं. दोन्ही वयस्कर आज्यांना घेउन जायच फार अवघड होतं, पण निश्चय केला होता, तेवढयात वन्सबाईंचा फोन आला "आईला या वयात प्रवास झेपणार नाही, मी घेउन जाते तिला, तुम्ही जाउन या" मग आम्ही तिघीच निघालो. डोंबिवली ते मोरगांव प्रवास - ड्रायव्हर शोधण्यापासुन ते पुजेची तयारी पार दमले होते मी, शिवाय एवढा सहा-सात तासांचा प्रवास आम्ही तिघी बायकाच होतो. अगदी फुलासारखं निट सांभाळुन नेलं, पुजेच्या आदल्या रात्रीच तिचं आजारपण, दवाखान्यातुन औषध आणलं, खुप वेळ जागत होते तिच्या उशाशी. खुप काळजी वाटत असतांनाही मोरयाच्या कृपेने दोघींचीही पुजा व्यवस्थित यथासांग झाली. एक लेक, एक आई, दोघींचाही लहान मुलासारखा हट्ट पुरवतांना मनात समाधान दाटुन आले होते. खरा क्षण होता तो १३ जुनचा, सगळ्या बहिण भावंडानी एकत्र यायचं ठरवलं, हे नव्हतेच मदतीला, माझीही अल्जेरियाला परतायची तारीख जवळ येत होती, तरीही उत्साहाने तयारीला लागले.सगळे एकत्र जमल्यावर अचानकच ठरले - वहिनीच्या पंचात्तरीचा सोहळा कां करु नये आणि आदल्या दिवशीच्या दोन तासात कार्यक्रमाचे नियोजन केले......आणि अत्यंत अविस्मरणिय असा तो सोहळा झाला.....अचानक ठरवल्याने काय करायचे हे ठरवले नव्हते.......पण एक अनामिक शक्तिया कार्यक्रमाचे नियोजन करत आहे, हे जाणवत होते.......सकाळी उठल्यावर सनईच्या सुंदर नादात आम्ही चौघ भावंडांनी तिला सुवासिक तेल लावल........बाबांच्या फोटोला सोनचाफ्याच्या फुलांचा हार घातला.....सगळ्या भावंडांनी आणि नातवंडांनी तीची पाद्यपुजा केली.......पंच्चाहत्तर दिव्यांनी औक्षण केल, सोनचाफ्याची फुलांची कंठी घातली......सगळ्यांनी तिला साडी घेतली......अंगठीसाठी पैसे दिले......मोरगांवहुन प्रसादरुपात मिळालेली शाल पांघरली.आयुष्यभर तिने आमच्यासाठी जे जे कांही केलं त्याबद्दलची कृतज्ञता’, एक प्रकारे कृतज्ञता सोहळाच होता तो.घडणा-या सगळ्या घटनांकडे मागे वळुन बघतांना एक जाणवत होते, प्रयत्नपुर्वक कठिण असा संकल्प पार पाडत होते, "सगळ्यांशी आईच्या प्रेमाने वागण्याचा, अगदी आईचीही आई होण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते" मग मनात विचार डोकावला.........ही तर सगळी तुझ्या जवळची......नात्यातली......त्यांच्याशी आईच्या भुमिकेतुन वागणं तस खुप कठिण नाही, पण जी नात्यातली नाहीत, त्यांच्याशी वागु शकशील तु या भुमिकेतुन या वात्सल्याने ? आणि त्या घटना आठवल्या....एक मैत्रीण अमेरिकेला जायला निघाली होती, दुस-या दिवशीचं रात्रीचं प्लेन होतं आणि आज संध्याकाळी तिच्या मिस्टरांना हार्ट-अ‍ॅटॅक आला.....डॉक्टरी उपाय तर चालुच होते, पण तिच्या मनाला धीर देण्यासाठी, त्यांच्या साठी म्हणुन गणेश-गीतेचपारायण केले होते......हा ग्रंथ हातात जरी घेतला तरी मनाला एक अनामिक शांतता येते! दुस-या एका मैत्रीणीचा तरुण, इंजिनियर मुलगा घरातुन निघुन गेला होता रागावुन, तिच्या डोळ्यातले अश्रु थांबत नव्हते. माझ्या धावपळीत, पुर्ण दिवसभर तिच्याबरोबर होते, त्याच्या ऑफीसमध्ये त्याला समजवायला तीच्या बरोबर गेले होते. या सर्व घटनांच्या तुलनेत कांही प्रसंग आठवले की खुप त्रास होतो.....ह्यांना त्यावेळेस नेमकी बाहेरच्या देशात नोकरीची संधी उपलब्ध झाली, आणि लेकीला नाशिकच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळाली. आम्ही दोघीही तिथे शिफ़्ट झालो, निर्णय थोडासा कठीण होता, पण मनाचं धैर्य करुन घेतला, तरीही मन थोड सैरभैरच होतं, त्यादिवशी ब-याच दिवसांपासुन काढलेल्या फोटॊंचा रोल स्टुडिओमध्ये देउया म्हणुन घेउन गेले आणि घरी आले. दुस-या दिवशी सकाळी कॅमेरा शोधतेय, सापडेचना, आठवतच नव्हतं......मला रडायलाच येत होतं......माझी अवघी १७-१८ वर्षाची लेक, मला जवळ घेउन म्हणाली "रडु नकोस ग ममा, सापडेल, तु एखादवेळेस स्टुडिओत विसरली असशील, होतं असं कधी, कधी, आणि नाही सापडला तरी टेन्शन नको घेउस" मी अगदी अवाक होऊन गेले माझी लेक त्याक्षणी माझी माय झाली होती. मी मनात म्हटले, "बेटा, छोटय़ा छोटया वस्तु हरवल्यास म्हणुन किती धपाटे खाल्लेस ग माझ्या हातुन.......कधी वॉटरबॅग, कधी पेन्सिल, कधी कंपास एकदा तर सारखी सारखी पेन्सिल हरवते म्हणुन इतका जोरात धपाटा घातला होता पाठीत की माझ्याच हाताला मुंग्या आल्या होत्या......अन रागाने दरवाजाबाहेर काढुन दिलं होतं.....तो चिमुकला जीव किती भेदरला होता एकटेपणाच्या भीतीने! ती परत मला म्हणत होती.... आई, उद्या जाउया त्या स्टुडिओत......तु रडु नकोस बर......मी मनात म्हटल.....छोट्या वस्तु हरवल्या तरी किती रागावले गं मी तुला, तु मात्र सगळ विसरुन आईची समजुत घालतेयस....तिचा निरागस चेहेरा बघुन माझ्या पश्चातापी अत:करणात विचार आला, खरच आवरायला हवा होता मी राग त्यावेळी....अशा चुका मोठयांकडुनही होत नाही का कधी?.........त्या दिवशीचा रविवार.....मस्त मजेत चाललेला.....घरात पसारा करताय... करु दे.....! वस्तु अस्ताव्यस्त करताहेत....करु दे! सोमवारी आवरु....अशा विचारांमध्ये सकाळचा नाश्ता छान झाला......"अहो तेवढे कॉफीचे मग भरुन ठेवलेय ते आणता का?.....एक मिनिटच.......खळकन आवाज झाला, मग खाली पडुन फुटला होता, कॉफी सांडली होती, काचांचे तुकडे इतस्तत: पसरले होते, मग मात्र रागाचा पारा वर गेला, एक काम सांगितलं तर कुणी धड करेल तर शपथ.सा-या दिवसभर रागातच होते........सगळ्या भुतकाळातल्या आठवणींना उगाळत बसले होते......जरा विचार डोक्यात आला नाही की अनेक वेळा अशाच कपबश्या फुटल्या नंतर ह्यांनी प्रेमाने म्हटल होतं..... चल जाऊ दे.....नाहीतरी कपबशा जुन्याच झाल्या होत्या.....अन मग नविन सेटच आले होते कपबशांचे घरात!आताही तो माझ्या इतक्या जवळच्या नात्यातला, त्याला जेवायला बोलावले त्या दिवशी किती उत्साहाने केलं होत सगळं, तो आता वरचेवर भेटणार नाही म्हणुन डोळ्यात आसवंही आली होती.मग आत्ता त्याच्याशी भांडतांना कुठे हरवली होती माझ्यातली "आई"??एक जाणवलं आमचे संकल्प म्हणजे कलियुगातील एकप्रकारची "तपश्चर्याच" आणि ही तपश्चर्या भंग करायला सहा मेनकांच नर्तन चालु असत.......कधी क्रोध.......मोह.......मत्सर......कधी काम.......लोभ......मद............!!!!या सहा शत्रुंपैकी कुणीतरी मेनकेच लोभसवाणं रुप धारण करतं.......त्याचं नर्तन आमच्या आयुष्यात सुरु होतं आणि आमची "संकल्परुपी तपश्चर्या" कधीच भंग पावलेली असते.मी त्याला पत्र लिहायला घेतलं........"झालेले सगळे वाद-विवाद विसरुन आपलं नातं आपण परत नव्याने सुरु करुया........को-या पाटी सारख......!!तु भाऊबिजेला तरी येत रहा दरवर्षी डोंबिवलीला अणि "विश्वामित्राच्या तपश्चर्येला परत प्रारंभ झाला होता.........! ही तपश्चर्या अशीच चालु रहाणार आहे.........विश्वाच्या अंतापर्यंत.....जोपर्यंत या विश्वाशी विश्वबंधुत्वाच्या नात्याने आम्ही जोडले जात नाही तोपर्यंत!विश्वामित्रांना त्रास द्यायला एकच मेनका होती.......आमच्या आयुष्यात तर सहा मेनकांचं नर्तन चालु असत.....सतत!!!! ? .." (

Thursday, April 21, 2011

धुक्यात हरवलेल्या वाटा

                        
    गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे अल्जेरियातला सुट्टीचा दिवस. गुरुवारी सकाळी उठले. हॉलच्या काचेच्या तावदानातून बाहेर बघते तर काय....रस्ते...घरं....इमारती....झाडं....सगळं हरवलेलं. दुरवर पसरलेल्या धुसर धुक्यात. हे धुकं शेवरीच्या कापसाच्या म्हातारी सारखं सा-या आसमंतात हळूवार विहार करत होतं.

   थंडी आणि दाट धुकं यात रोमान्स न सापडणारा आणि हातातली असतील नसतील ती कामं टाकून फिरायला न जाणारा विरळाच!! फ्रेश झालो आणि थंडीचा सगळा जामानिमा करुन बाहेर पडलो. दोन किलोमीटर चालत थेट मेरिडियन समुद्रापर्यंत पोहोचलो. गुलजारजींच्या "इस मोडसे जाते है कुछ सुस्त कदम रस्ते.....कुछ तेज कदम राहे....पत्थरकी हवेलीसे...शिशोंके घरोंदोतक" या गाण्यातून भेटणा-या अशा वाटांची आठवण करत धूक्यात हरवलेल्या वाटेने चालत होतो. किंचित ओलसर रस्ता!
झाडापानातून ठिबकणारे दवबिंदू.......मधूनच येणारी थंडीची शिरशिरी आणि अंगावर येणा-या धुक्याच्या लाटा.....आम्ही चालत होतो त्या वाटेवरच तेवढच दिसत होत...बाकी पाठीमागे आणि पुढे....सगळं धुसर....धुक्यात हरवलेल.

   हे असं मागच आणि पुढचं दिसेनासं होणं हा अनोखा अनुभव होता. रस्ता परिचयाचा असला तरी परका वाटू लागला होता. नेहेमीची वळणं चकित करत होती. एरवी वेगाने धावणा-या गाड्या मिणमिणत्या उजेडात रस्ता शोधताहेत असं वाटत होतं. सा-या आसमंताला गुढ वातावरणाने झाकून टाकणारं हे धुकं काहीतरी सांगतय असं वाटत होतं....भुतकाळातल्या दु:खद आठवणींच्या खपल्या नकोत की भविष्यकाळातल स्वप्नरंजन नको...आत्ता जिथून चालतोय तो रस्ता.....!! तो ’वर्तमान’ तेवढा खरा...तो हातातून निसटू नको देऊस म्हणजे झालं!!

   या धुक्यात चालता चालता उगीचच हरवल्यासारखं वाटायला लागल....अस्वस्थ वाटायला लागलं तोच आकाशात सुर्याचा उगवतीचा गोल दिसू लागला. त्या कोवळ्या किरणात सारं काही विरून गेलं. त्याक्षणी वाटलं की आपलं आयुष्यही धुक्यात हरवलेल्या वाटेसारखच आहे. जीवनाचं रहस्य आपण उलगडलय अस वाटत तोच संकटाच धुकं पसरतं, आपलं कोण परक कोण कळत नाही अपेक्षित वळणं
नागमोडी होतात. आपण भांबावून जातो....अशा वेळेस आपल्या मनातल्या आकाशात मैत्रीचा सूर्य उगवतो. कोणीतरी हातात हात घेउन म्हणतं "मी" आहे ना! हा "मी" इथे नेहेमीच भेटतो आपल्याला आणि संकटाच धुकं विरत!!! ते आपल्या मनातूनच आलेलं असत.     
 












      

Thursday, April 14, 2011

गुळ

             

   मध्यंतरी "शब्दपट" म्हणुन ब्लॉग बघण्यात आला, त्यातली "कालिब" पोस्ट वाचली आणि अगदी शब्द भारावल्या झाडासारख मन तरल झाल होत........मग ठरवल........आपणही लिहायच.........जे मनात येतं ते...........जे भावतं ते......!!

   त्यादिवशी पुजा करायला बसले तर देवासमोर काचेच्या सटात अगदी "एवढुसा" बोटाच्या नखावर मावेल एवढा गुळ ठेवला होता. त्या कणभरगुळाकडे बघुन क्षणभरहसायला आलं........हसता हसता डोळ्यात पाणीही आलं......आता गुळाकडे बघुन हसायला येणं......आणि डोळ्यात पाणी येणं......टु मच!!!!!

   गुळ तो काय, त्यावर लिहिणार ते काय? फार तर गुळ गोड असतो. गावाकडील   मंडळी पिवळा गुळ बघितला की गुळ आणि शेंगदाणे पटकन तोंडात टाकतात. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महीन्यात संक्रांतीला या गुळापासुन तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्या बनवतो आणि दोन्ही गोष्टींवर मस्त ताव मारतो. होळी आली की पुरणपोळी या गुळापासुनच बनवली जाते. संकष्टी आणि गणेश-चतुर्थीला गुळ आणि ओल्या खोब-याचे सारण भरुन बनवलेले उकडीचे मोदक......अहाहा!!! आपण जेव्हा हा उकडीचा मोदक फोडुन त्यावर भरपुर तुप ओतुन तोंडात सोडतो ना......तेव्हा या गणरायाला इतका अवघड पदार्थच कां आवडतो? याचे उत्तर जिभेवर रेंगाळणारी चवच देऊन जाते.

   फार तर गुळ म्हटला की "गुळाचा गणपती" हा पु.ल.देशपांडेंचा जुना चित्रपट आठवतो. आमच नुकतच लग्न झालं होतं. सगळी सासरची मंडळी जमली होती, रात्री खुप उशीर झाला होता आणि गप्पांना नुसत उधाण आलं होतं, माझ्या डोळ्यात झोप मावत नव्हती.......त्याचवेळेस या चित्रपटाचा विषय निघाला आणि मी झोपाळलेल्या डोळ्यांनी उगीचच काहीतरी बडबडले......"हो तो सिनेमा खुपच सिरियस आहे" कदाचित मला "विनोदी" म्हणायच होतं आणि झोपेत "सिरियस" शब्द निघुन गेला........आणि त्यानंतर उडालेले हास्याचे फवारे......!! आजही सगळे एकत्र जमले की मला चिडवतात, "ह्यांचा "गुळाचा गणपती" सिरियस बुव्वा!! किंवा एखाद्या गोष्टीचा पिच्छा सोडला नाही की जुनी मंडळी रागावतात "अरे काय गुळाला मुंगळा चिकटल्या सारखा पाठी पडलाय......!!!!

   तर असा हा गुळ! या गुळाकडे बघुन चक्क माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

   ह्यांच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही भारताबाहेर होतो. जवळ जवळ तिन महीने होत आले होते....पंधरा दिवसांनी सुट्टी डयु झाली की मग भारतात परतायच.....त्याच दरम्यान सायलीचा फोन आला "ती बंगलोरला अनिरुद्धला भेटायला जाऊन येतेय....८-१० दिवस रहाणार होती. सायलीला नाशिकला परतुन ८-९ महिने झाले होते..... नविन लग्न झालेलं, पण दवाखान्याचा जम बसावा म्हणुन तिने पुढे येउन क्लिनिक सुरु केलं होतं, अनिरुद्धच्या पीजी चे अजुन सहा  सात महिने राहीले होते....दोघही एकमेकांना भेटुन बरेच दिवस झाले होते....म्हणुन निघाली होती.

   सायली लग्नानंतर अशी एकटी पहील्यांदाच जाणार होती. लग्नाच्या आधी तिने कुठेही जायच म्हटल की कितीही दमलेले असोत, हे तिला सोडवायला जाणार कुठुन ती यायची म्ह्टली की आधीच ड्रायव्हर सांगुन ठेवुन, गाडी घेउन तिला घ्यायला जाणार, तिलाच नाही तर घरात कुणीही पाहुणे येणार असो त्यांना घ्यायला आणि सोडवायला हजर!! कधीच कंटाळा नाही.

   आता ती नाशिकहुन निघुन रात्री मुंबईतल्या एका नातेवाईंकांकडे रहाणार होती, आणि मग तिथुन सकाळच्या फ्लाईटने बंगलोर. ह्यांच्या मनाची घालमेल दोन दिवस झाले बघत होते. सारखे फोन करत होते......अग निट तयारी केलीस ना? सगळं घेतलस ना?, वजन जास्त घेउ नकोस....!! मी सगळ डोळ्याने टिपत होते. तिची निघायची वेळ झाली, ह्यांनी परत फोन लावला.....मी म्हटलं, "अहो ती निघायच्या गडबडीत असेल, किती फोन करायचे..... शिवाय तिचे सासु-सासरे आहेत मदत करायला....आणि हल्ली मुली परदेशात एकटया जातात, बंगलोरच काय घेउन बसलात? आपण इतक्या लांब....सातासमुद्रापलिकडे.......किती काळजी करणार इथे बसुन? नेहेमी "काळजीवाहु सरकार" च लेबल माझ्या डोक्यावर लावलेलं असत.......आज माझ्या मनातल्या काळजीला बाजुला करुन मी ह्यांना समजावत होते. शेवटच्या क्षणी ह्यांनी तिला फोन करुन आयडी प्रुफ घेण्याची आठवण करुन दिलीच.

   आमच्याकडे फार पुर्वीपासुन एक प्रथा आहे....कुणीही प्रवासाला निघाले की गणपतीसमोर वाटीत थोडासा ’गुळ’ ठेवायचा.....सुखरुप प्रवास होऊ दे म्हणुन प्रार्थना करायची....मग प्रवासाला निघायचे.

   रात्रीचे दहा वाजले होते. आम्ही अल्जेरियाला येउन तीन महिने झाले होते. बरोबर आणलेलं प्रोव्हिजनच सामान जवळ जवळ संपत आलं होत.....त्यातला गुळही संपला होता, आणि इकडे गुळ हा काय पदार्थ आहे कुणालाच माहित नाही.. त्यामुळे बाजारात मिळण्याची शक्यता अजिबातच नाही, ह्यांनी गुळाची बरणी बाहेर काढली, अगदी तळाशी चिकटलेला गुळ चमच्याने खरवडुन काढला, अगदी "एवढुसा" बोटाच्या नखावर मावेल एवढा!!! काचेच्या सटात ठेउन देवासमोर ठेवला आणि शांतपणे सुखरुप प्रवास होऊ देण्यासाठी प्रार्थना करत होते!!!!

   मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात जायला निघाली असो की सासरी  जायला निघालेली मुलगी असो, मनसोक्त रडुन झालं की मग हातावर दही-साखर देऊन हसत तो निरोपाचा क्षण साजरा करणा-या समस्त आया!! अन त्याचवेळेस ओलावणारे डोळे उगीचच चष्म्यात दडवणारे......सगळ्यांना विनाकारणच घाई करायला लावुन, निरोपाचा "तो कातर क्षण" मनातच जिरवुन टाकण्याचा हळवा प्रयत्न करणारे ’बाबा’!!! पुरुष ना ते, रडण बर दिसणार का त्यांना!!

   गुळ तसा गोडच!! खाल्ला की आवडतोच.......पण त्या कणभर गुळात दडलेली बाबाची "आभाळभर माया" पाहुन डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांच्यातल्या "बाबा" कडे बघता बघता.......डोळ्यासमोर उभा राहिला एक सळसळता "वटवृक्ष"!!!! माळरानावर निश्चल उभारलेला....पांथस्तांना शितल छाया देणारा.......नाजुक वेलींना अधार देणारा.....!! पाखरांना आसरा देणारा वटवृक्ष!!

   "तो" ही कधीतरी थंडीने शहारतो.........!! पावसाच्या तडाख्याने गारठतो...!! उन्हाने करपतो......!!! त्यालाही वाटत असत.....आपणही कुठेतरी सावलीत विसावाव............कुणाचा तरी आधार घ्यावा............कुणाच्या तरी आश्रयाला जावं...............पण श्रांत, थकलेले पांथस्त......थरथरणा-या नाजुक वेली अन चिवचिवणारी पाखरं बघतो आणि तो शहारा..........ते गारठणं.......ते उन्हाने करपणं.........सगळ सगळ दुर दुर भिरकावुन तो परत तेवाढयाच ताठपणे उभा रहातो.......ऋतुंचे तडाखे सोसत निश्चलपणे!!

   त्या ’एवढयाश्या’ गुळाने मला विचारांच्या निळ्या आभाळाची सैर करवुन आणली होती.

श्यामची आज्जी


आज मी सगळ आवरुन जळगांवला निघालो होतो. मी घेतलेला निर्णय चुक की बरोबर कळत नव्हते. कल्याण स्थानकावर उभ राहुन आम्ही सेवाग्राम एक्सप्रेसची वाट पहात होतो. मन मात्र गेल्या अनेक वर्षात मुंबईत अनुभवलेल रंगीबेरंगी आयुष्य आठवत होतं. मुळातच आयुष्यातला क्षण नी क्षण वेचुन घ्यायचा, जे काही अनुभवायच, उपभोगायच ते "सर्वोत्तमच" असावे असा आग्रही स्वभाव! डोंबिवलीतल्या त्या छोटयाश्या दोन खोल्यांच्या घरात जे काही जमवलं होत ते सगळ अप्रतिम! त्या काळात म्हणजे ८०-८२ चा काळ ........कुणाकडेही डायनिंग टेबल नसायच....पण मी, राधिका आणि शार्दुल डायनिंग टेबलवरच जेवायचो. नाजुक काचांची पांढरी शोकेस, त्यातला सर्वोत्कृष्ठ कंपनीचा ऒनिडाचा टी.व्ही. गोदरेजच स्टीलच कपाट, डोंबिवली तस मुंबईपासुन लांब, तरीही मेट्रो, एरॉस, मराठा-मंदिर, नॉव्हेटी ला बघितलेले सिनेमे!! राधिकेला साडया घेण हा माझा आणखीन एक आवडता छंद. मुंबईच्या दुकानांमध्ये, नविन ज्या ज्या साडया असायच्या त्या सगळ्या साडया मी राधिकेला आणायचो. मुंबईतल्या बॅंकेतली नोकरी, तिथल्या सगळ्यांशी असलेले चांगले संबंध.......तिथल मानाच जिवन....... मी आणि राधिकेने उभारलेला हौसेचा संसार सगळ सोडुन मी निघालो होतो........जळगांवला..............!!!
८० साली अप्पा गेलेत, आई तर अवघी ५२ वर्षांची. सगळे विधी आटोपुन आईला एकट सोडुन येतांना वाईट वाटत होत. धाकटा दिनू तिच्याजवळ सोबतीला आहे याचा दिलासा वाटत होता. आम्ही तिघं भाऊ आणि दोघी बहीणी, पैकी मी आणि मधला डोंबिवलीत आणि दोघी बहीणीही लग्न होऊन डोंबिवलीतच. आता धाकटयाला मुंबईत नोकरी लागली, मग आईला एकटं कसं सोडायचं या विचाराने मी बॅंकेत बदलीसाठी अर्ज दिला.....तो मंजुर झाला आणि जळगांव जवळच्या ’किन्ही’ या गांवी बदली मिळाली. .......आणि मी निघालो होतो जळगांवला. डोंबिवलीच घर बंद करुन.......फक्त कपडयांच्या चार बॅगांसह.......मनाच्या संभ्रमावस्थेत!! मुंबईच्या मोठया दुनियेतुन एका छोटया शहरात. माझ बालपण सगळ जळगावातलच, शिक्षण ही तिथेच झालेल. तिथल्या मातीतच माझ बीज रुजलेलं! तरीपण आता तिथे करमेल ना? राधिकेच बालपण, तरुणपणाचा बराचसा काळ कल्याण - डोंबिवलीच्या परिसरात गेलेला, तिला जळगांव आवडेल का? या सगळ्या मानसिक आंदोलनांना मी मनाच्या कप्प्यात बंद केल.
जळगांवला पोहोचलो तर तिथल ’अंगण’ आणि ’आई’ आमची वाटच बघत होते. बॅगा ठेवल्या, आंघोळी केल्यात आणि आईच्या हातच गरम गरम जेवलोत. खुप दमलो होतो म्हणुन ठरवलं मस्त झोपायच, सकाळी जाग आली तरी चांगल नऊ, दहा वाजेपर्यंत लोळत पडायच.....पण सकाळी जाग आली ती आईच्या गोड आवाजातल्या गोपाळकृष्णाच्या आरतीने...."अरे माझ्या गोपालकृष्णा करीन तुलाच आरती" आणि मी उठुन बाहेर ऒटयावर आलो तर आईने ओटा आणि खालचे अंगण लांबपर्यंत झाडुन सडा घातला होता. ऒटयावर रांगोळी काढली होती. तीची आंघोळ झाली होती आणि देवाजवळ तुपाची निरांजन लाउन ती आरती म्हणत होती. आईने आरती संपवली आणि म्हणाली "श्याम दात घास, मी चहा ठेवते" "अग पण तु इतक्या लवकर कां उठलीस?" "अरे कार्तिक महिना ना हा कार्तिक स्नान आणि काकडा चालु आहे" जळगांवच्या दिवसाची सुरवात अशा मंगलमय वातावरणाने झाली.
डोंबिवलीच दोन खोल्यांच घर आणि इथला प्रशस्त वाडा. आमच्या नानांनी म्हणजे माझ्या आजोबांनी स्वत:च्या देखरेखी बांधलेला. त्या काळात ते सिव्हील मिस्त्री म्हणुन काम करायचे म्हणजे आजच्या काळातले सिव्हील इंजिनियरच. इतका छान, भरवस्तीतला, रेल्वेस्टेशनला लागुन असलेला आमचा हा वाडा. थोडासा उंचावर बांधलेला, मध्ये दोन, आजुबाजुला दोन, दोन, अशा सहा खोल्यांचा इंग्लीश ’सी’ आकाराचा, समोर प्रशस्त ओटा, मधल्या दोन खोल्यांच्या समोरुन उतरायला तीन मोठया पाय-या. मधल्या खोल्यांच्या आजुबाजुला दोन प्रशस्त वाडे, त्यातल्या एका वाडयात मोठी बाथरुम आणि टॉइलेट, मधल्या खोल्यांच्या पाठीमागुन दोन्ही वाडयांना जोडणारी बोळ, वरती प्रशस्त गच्ची, बाथरुम असलेल्या वाडयातुन गच्चीवर जाण्यासाठी जीना, त्या जिन्यातच आईने तुळशीच रोप लावल होतं, त्यासमोर काढलेली रांगोळी आणि संध्याकाळची लागणारी पणती. मन प्रसंन्न झाल होतं. घेतलेला निर्णय चुकीचा नसावा अस वाटत होत, पण राधिकाचा आणि आईचा स्वभाव जुळण ही एक काळजी होतीच मनात. संसार म्हटला की थोडया कुरबुरी चालणारच, त्याकडे लक्ष द्यायच नाही, आईची सेवा करायची, राधिकाला पण जपायच......... बस्स अस ठरवल आणि मन शांत झाल.
बॅंकेत रुजु व्हायला आठ दिवस होते, मग जळगांवचा भाजीबाजार फीर, साडयांची दुकान बघ, सिनेमागृहातले सगळे सिनेमा बघुन झालेत. ’मनोहर साडीयां’ च्या तर मी प्रेमातच पडलो. त्या दुकानाचे मालक माझे चांगले मित्र झालेत. साडयांच्या प्रांतातला मी किती दर्दी माणुस आहे हे मग त्यांनाही समजले. हापुस आंब्याच्या पेटया ठेवणारे आंबेवाले जोशीही घनिष्ठ मित्र झालेत.
’किन्ही’ ला मी रुजु झालो. सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने भुसावळला आणि भुसावळहुन बसने किन्हीला. गाडीत अशी अप-डाऊन करणारी मंडळी बरीच होती. त्यात धाकटया वहीनीचा म्हणजे धाकटया भावाच्या बायकोचा भाउही असायचा. आम्ही गप्पांच्या ओघात छान मैत्रीच्या धाग्यात बांधलो गेलो. किन्ही तस खेडेगाव. मी, माझा सहकारी राजे आणि आमचा प्युन हरिश. आमची टीम छान जमली. सकाळी साडे आठला निघायच, रात्री सातला परतायच. राधिकाचा स्वयंपाक तयारच असायचा. नऊच्या आत जेवणं आणि आणि दहाच्या आत आम्ही झोपलेलो असायचो, जे मुंबईच्या जिवनात कधीच शक्य झालं नव्हत.
किन्हीला तीन वर्षे मजेत गेलीत, मग प्रमोशनचे वारे वाहु लागले. हातात मिळणारा पगार थोडासा अपुरा पडत होता. बाजुच्या दोन खोल्या भाडयाने दिल्या होत्या, त्याच भाडं आणि आईच पेन्शन घरात वापरल जात होत, त्यामुळे भावाची, बहीणींची बोलणी कानावर येत होती. पण मी मनाने प्रामाणिक होतो. मी घरात ब-य़ाच सुधारणा केल्या होत्या, घरात गॅसपासुन सगळ्या वस्तु आल्या होत्या. आईला मी फुलासारख जपत होतो.
प्रमोशनसाठी डिपार्टमेंटची परिक्षा दिली, पास झालो. खुप आनंद झाला. आता ऑफिसरची पोस्ट, पगार वाढणार या आनंदात बदलीची टांगती तलवार विसरलोच होतो. आणि त्यादिवशी ऑर्डर आली.............माझी बदली झाली होती.........अमरावतीला.......इथली सगळी सुख सोडुन अमरावतीला जायच? प्रमोशनचा आनंद पार मावळला, पण जावं लागणार होत. आई, राधिका, शार्दुल, मानस....हो इथल्या तीन वर्षाच्या वास्तव्यात मानसच आगमन झाल होत. सगळ्यांना सोडुन जातांना मन जड झाल होत.
अमरावतीला मी उतरलो तेव्हा अकरा वाजले होते. आमची उतरण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्येच केलेली असायची. दोन गोष्टींची सोय करायची होती. घरगुती जेवण आणि रहाण्यासाठी घर. हॉटेलवर सामान ठेवल आणि फ्रेश होऊन मी बाहेर पडलो. चालतांना बैठी घर लागत होती, एका घरावर "भागवत" नांव वाचल आणि बेल वाजवली, दरवाजा उघडला, समोर एक काका होते, त्यांना विचारल,"घरगुती जेवण मिळेल अशी व्यवस्था होइल का इथे कुठे?" त्यांनी माझ्याकडे बघीतल आणि म्हणाले, "आमच्याकडेच ही व्यवस्था होइल, आतापण जेवण तयार आहे, तुमच जेवण राहील असेल तर हातपाय धुवुन या". मी घडयाळात बघितले तर साडेबारा वाजले होते. खुप भुक लागली होती, मनातल्या मनात देवाचे आभार मानले. जेवता जेवताच त्यांना म्हटल, "इथे रहाण्यासाठी खोली मिळेल का? एकटाच आहे त्यामुळे मोठा फ़्लॅट नको, फक्त स्वतंत्र बाथरुम वगैरे असावी." ते म्हणाले इथुन चार घरं सोडुन जे घर आहे, ’पराडकरांच’ तिथे जा, त्या आजींना माझं नाव सांगा, कदाचित मिळेल तुम्हाला घर" जेवुन बाहेर पडलो, भागवत काकांनी सांगितलेल्या घराजवळ आलो, बेल वाजवली......दार उघडलं गेल.....,दरवाजात ९० ते ९२ वर्षांच्या आजी उभ्या होत्या................!!! मी म्हटल, "आजी भागवतांनी पाठवलय, भाडयाने खोली मिळेल का?" त्यांनी मला खालुन वर शांतपणे न्याहाळलं, मग म्हणाल्या, ’आत या’. आवाज थोडा कणखर आणि करारी वाटत होता, त्यांनी पाणी दिलं. मी म्हटलं "आताच भागवतांकडे जेवण करुन आलोय". "ठीक आहे, मग आत जा आणि खोली बघुन या". त्यांनी दाखवलेल्या दिशेने मी आत गेलो, खोली बघितली.......मस्तच होती.......प्रशस्त..........एक कॉट......पंखा.......भिंतीतल कपाट......मागच्या बाजुने उघडणा-या दरवाजासमोर वाडा होता....वाडय़ात मोगरा....चमेली....जास्वंद.....पपईची झाडं बहरुन आली होती.....वाडयाच्या डाव्या टोकाला बाथरुम आणि टाइलेट......व्वा...व्वा... क्या बात है!! जशी हवी होती तशी खोली मिळाली, मला खुपच आनंद झाला.आजी म्हणाल्या, "आवडली का खोली? आवडली असेल तर तिनशे रुपये भाडं आणि एक महिन्याचा अ‍ॅडव्हान्स म्हणजे सहाशे रुपये द्यायचे तुम्ही". मी म्हटल, ’आजी खोली खुप आवडली, हे अठराशे रुपये, सहा महीन्यांच भाडं अ‍ॅडव्हांस म्हणुन देत आहे.’, त्यातले फक्त सहाशेच रुपये घेत त्या म्हणाल्या, ’मी फक्त एकाच महिन्याचे भाडे अ‍ॅडव्हान्स म्हणुन घेते.......बर चहा घेणार कां?’, हो चालेल, पण दुध....साखर कमी, थोडा स्ट्रॉंग....त्यानंतर जो चहा हातात आला तो निव्वळ अप्रतिम होता.....आलं घालुन आणखीनच छान केलेला....मी आजींना म्हटल, "माझी सोय तशी हॉटेलमध्ये आहे, पण मी आजपासुनच येऊ का रहायला? या की त्या म्हणाल्या.
सामान आणल, थोडा फ्रेश झालो. झब्बा पायजमा घातला आणि कॉटवर लवंडुन पुस्तक वाचत होतो. इथे येतांना गेले चार पाच दिवस जो तयारीचा शीण झाला होता तो काढायचा, मस्त झोपायच ठरवल.........सकाळी अगदी पहाटेच जाग आली ती दुर्गासप्तशतीतील स्तोत्राने "नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:" आवाज कणखर होता, पण त्यात एक लय होती, गोडवा होता, त्यावेळेस पहाटेचे पाच वाजले होते. मी पटकन उठलो आणि देवघरात आलो, आजी पुजा करत होत्या., त्यांच्यामागे चटई घेउन बसलो. मी आल्याची त्यांना चाहुल लागली, वाचन संपल्यावर पाठीमागे वळुन त्या म्हणाल्या, तुम्ही दात घासुन, आंघोळ आटोपुन या. मला वाटल माझं अस पारोशाने देवघरात येणं त्यांना आवडल नसाव. मी पटकन उठलो, आंघोळ करुन देवाला नमस्कार करायला देवघरात आलो. त्यांच वाचन संपवुन त्या उठल्या आणि माझ्यासाठी चहा टाकला. पुन्हा त्याच चविचा गरम, गरम चहा, त्याबरोबर डीशमध्ये ५-६ बिस्किटं, मी म्हटल ’आजी चहा झकास झालाय, पण बिस्किट नकोत’, तर म्हणाल्या ’अहो तुमच्या सारख्या तरुण माणसांनी खायलाच हव, घ्या ती बिस्किटं’, त्यांच्या अधिकारवाणीने बोलण्याची गंमतच वाटली मला, मग मी न बोलता सगळी बिस्किटं संपवली.
दोन दिवसातच त्यांचा दिनक्रम माझ्या लक्षात आला. त्या सकाळी लवकर उठायच्या, सकाळचे केरवारे, आंघोळ करुन पुजेला बसायच्या, सगळे स्तोत्र म्हणत पुजा करायच्या. पुजा झाली की सप्तशतीचा पाठ वाचायच्या. आठ वाजता ओचा पदर झटकुन, पातळ निट करुन अंबामातेच्या दर्शनाला निघायच्या. एकटयाच! वय वर्षे ९२! मग आल्या की थोडी विश्रांती घेउन स्वयंपाक करायच्या.त्यांच्या स्वयंपाकाची पण गंमतच......................सगळा स्वयंपाक करुन ओटा आवरुन झाला की एक ताट वाटी घ्यायच्या, त्या ताटात सगळ वाढायच्या.....आमटी, भाजी, तीन पोळ्या, भात, भातावर आमटी वाढुन त्यावर तुप पण वाढायच्या, त्यावर परत एक ताट झाकुन ठेवायच्या, त्यावर एक पांढरा रुमाल झाकुन ठेवायच्या. त्या स्वत: मात्र अगदी मोजकेच म्हणजे अर्धी किंवा पाउण पोळी, थोडीशीच भाजी, आमटी आणि भात इतकच जेवत होत्या. एक दिवस न राहवुन मी त्यांना विचारल देखील "आजी तुम्ही तर इतक थोड जेवता, मग कशाला एवढ करत बसतात आणि हे ताट कुणासाठी वाढुन ठेवतात?, "ती सखुबाई येते ना कामाला, तिच्यासाठी......!! मी अवाकच झालो.......मोलकरणीसाठी प्रथम अस ताज ताट वाढायच......!! पुन्हा भातावर साजुक तुप पण..! उरलेले शीळ सुद्धा जास्तीत जास्त स्वत:च खायच, मग त्यातुनही उरल तर मोलकरणीच्या वाटेला, ते पण उपकार केल्यासारखं, मग त्यादिवशी हमखास दोन मोठे डबे घासुन घायचे....अशी आमची वृत्ती!!!!!!!
माझ्या जॉइनिंगच्या सुट्टीत जळगांवला जाउन आल्यावर माझ्या अमरावतीच्या जीवनाला खरी सुरवात झाली. आजींची दिनचर्या मला फार आवडली. मी पण त्यांच्याबरोबर लवकर उठायच असा निश्चय केला. तिकडे लवकर उठुन आईला मदत करायचो, आता इकडे आजींना करुया. मनाशी निश्चीत ठरवलं.......सकाळी उठुन घर झाडायच.....त्यांच्या पुजेची फुलं काढुन द्यायची, पाणी भरायच आणि त्यांचा हात धरुन त्यांना अंबामातेच्या दर्शनाला घेउन जायच. त्या मंदिरातुन सव्वानऊ पर्यंत यायच्या. माझी बॅंकेची वेळ होती दहाची. म्हणजे मी आरामात बॅंकेत पोहोचणार होतो. हे सगळ मनाशी ठरवल आणि चांगला संकल्प केला, या विचाराने खुप बर वाटल आणि शांत झोप लागली.
दुस-या दिवशी जरा जास्तच लवकर ऊठलो. झाडण्यासाठी कुंचा हातात घेतला आणि आजींना सांगीतल "आजी आजपासुन सगळ घर मी झाडुन देणार" त्या आल्या, माझ्या हातातला कुंचा काढुन घेत म्हणाल्या......."मला माझ्या हाताने स्वच्छ झाडलेले आवडते" अहो मी पण स्वच्छच झाडेन की, तेवढीच मदत तुम्हाला" मी म्हणालो. ’नको’ त्यांचा कणखर आवाज. मला थोड वाइट वाटल. ठीक आहे आंघोळ करुन पाणी भरुया आणि पुजेची फुलं काढुन देऊया. पाणी भरायला गेलो तर म्हणाल्या "जोशी, मी पाणी सोवळ्यात भरते". आता मात्र मला रागच आला. कसलं, सोवळं या काळात. मी पण तर चांगली स्वच्छ आंघोळ करुनच आलोय ना? यांची अजुन काय सोवळ्यातली आंघोळ? "आजी, आता फुलं तरी काढुन देउ की नको?" "तुम्ही गरम चहा घ्या बर आधी", म्हणजे त्यांना मला कुठलही काम करु द्यायच नव्हत. मनात म्हटल, जाउ दे अंबामातेच्या दर्शनाला तरी हात धरुन घेउन जाउया. आठ वाजता त्या निघाल्या तसा मी पण तयार होऊन निघालो. त्यांना म्हटल, "आजी इतक्या रहदारीच्या रस्त्यातुन पायी जातात, मी रोज हात धरुन नेत जाइन तुम्हाला" तर म्हणाल्या "अहो रोज ती अंबामाता येते मला घ्यायला, तुमचा हात धरला तर तीचा हात सुटेल की माझ्या हातातुन" अस म्हणत एकटयाच निघुन गेल्यात. आता मात्र मला खुपच राग आला. काय विचित्र आणि हट्टी स्वभाव.......एवढया मोठया घरात त्या एकटया रहात होत्या त्याच कारण समजलं........नक्कीच मुलं, सुना, नातवंड असणार, पण हा असा हट्टी स्वभाव, कोण जमवुन घेणार यांच्याशी? हे एकटेपण स्वत:च्या स्वभावानेच ओढुन घेतलेल दिसतयं. पण
तरीही मला त्यांच्या घरात खुप आवडलं होत......त्यांची स्वच्छता, देवपुजा...देवावरची श्रद्धा, सगळ आवडलं होतं.
दिवाळी जवळ आली होती आता घरी परतायचे वेध लागले होते, तरी एक आठवडा होता. एक दिवस म्हणाल्या जोशी हे अकराशे रुपये देते, तिनशे रुपयांपर्यंत दोन साडया आणि पाचशे पर्यंत शर्ट-पॅन्टच कापड आणुन द्याल कां? मी म्हटल "व्वा आजी आज सुर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय.....तुम्ही मला काम सांगितल?" तर म्हणाल्या त्या कपडयातल काही कळत नाही बघा, तुमच्या आवडीचे रंग आणा, फक्त ते अगदी इंग्रजी रंग नकोत. मग आणलेल्या साडया आणि शर्टपीस त्यांना दाखवत होतो, तर म्हणाल्या "छान आणल्यात साडया, बायको खुश असेल हो तुमच्या निवडीवर. त्यादिवशी खुप खपुन फराळाचे केलेले दिसत होतं. मी म्हटल, "आजी एकटयाच तर असतात, हे एवढ फराळाच करायच, किती दमायला होत, कशाला एवढी दगदग करायची, तर म्हणाल्या "एकटी कुठे?, माझा गोपाळांचा मेळा आहे ना, ती सखुबाई आपल्याकडे भांडी घासायला येते ती, समोरचा रस्ता झाडणारी जनी, आणि घरोघरी पत्र वाटणारा नामदेव पोस्टमन......आणि तुमच्या मुलांनाही देऊया की फराळाच!!! या नामदेव पोस्टमनने कधी पत्र टाकल्याच मला तरी आठवतं नव्हतं......!!वरवर कडक....हट्टी....वाटणा-या, त्यांच अंतकरण किती मऊ होत याचा अनुभव मी पदोपदी घेत होतो. साडया आणि कपडे बघता बघता, अगदी हरवल्यासारख्या गप्पा मारत होत्या. अचानक माजघरात गेल्या अन हातात एक फ्रेम केलेला फोटो घेउन आल्या, त्यावर बॅटरीवर चालणारा दिवा होता तो दिवा पण हातात घेतला होता. बघितलं तर चमकी लावलेल डार्क निळे झबले घातलेला बालकृष्णाचा फोटो होता तो............रांगणारा.......त्याच्या बाजुला एक छोटासा माठ.......त्यातुन लोणी बाहेर आलेल.....अन त्या बालकृष्णाच्या ऒठांनाही लागलेलं लोणी........ खोडकर, खटयाळ चेहे-याचा तो बालकृष्ण!! मला म्हणाल्या "जोशी हा बघा........लब्बाड! माझ्याकडे बघुन हसतो......बोलतो माझ्याशी........!!! तुमच नाव काय म्हणालात ?" मी म्हटल "आजी घरात मला सगळे श्याम म्हणता.......अरे वां...... मग मी पण आजपासुन तुम्हाला श्याम म्हणत जाऊ का?.....नाहीतर बालकृष्ण...........!!!थोडस त्या फोटोकडे बघत........ थोडस माझ्याशी अस काहीतरी नादात बोलत होत्या.... मी म्हटल "आजी मला तर फार आवडेल तुम्ही मला श्याम म्हटल तर".......आणि त्या दिवसापासुन त्या मला श्याम म्हणायला लागल्या. एक दिवस म्हटल "आजी तुम्ही मला रोज छान चहा करुन देतात, वरतुन बिस्कीटं पण असतातच, मी वेगळे पैसे देत जाईल याचे, तर तरतरा आत गेल्या, हातात तीनशे रुपये होते, माझ्या हातात देत म्हणाल्या, "हे घे तुझे एक महिन्याचे भाडे आणि खोली खाली कर प्रथम......., मनात खुप खजील झालो आणि पुन्हा असल काही बोललोच नाही.
त्यादिवशी बॅंकेतुन घरी आलो तर स्वयंपाक घरात गॅसवर एक पातेली ठेवली होती, त्यावर झाकण ठेवले होते आणि पाणी उकळण्याचा "खळ्..खळ्..." असा आवाज येत होता. माझी चाहुल लागल्यावर म्हणाल्या "श्याम आंघोळ करुन ये, मी गोडाचा शिरा केलाय, तो देते खायला". मी म्हटल, "हे पातेल्यात काय ठेवलय उकळायला?, तर म्हणाल्या" अरे त्या मोठया पातेल्यात पाणी ठेवुन त्यात छोटया पातेल्यात शिरा गरम करतेय, अहो पण कढईत करायचा ना......अरे करपेल ना म्हणुन........मग तो वाफाळलेला, साजुक तुपातला गरम गरम शिरा!! त्यावरचे पेरलेले काजु बदामाचे काप!! मी म्हटल आजी शिरा अप्रतिम झालाय, पण आज काय विशेष? "आज सखुबाईच्या मुलाचा वाढदिवस होता म्हटलं तुझ्यासाठी पण ठेवावा. "आजी शिरा तर मला आवडतोच पण मला पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड, गुलाबजाम सगळेच गोड पदार्थ खुप आवडतात. मग श्याम आपण अस करुया तुझं नाव आजपासुन "गोडया" ठेऊया! मी तुला "गोडया" म्हणुनच हाक मारत जाईल त्यादिवसापासुन आवर्जुन माझ्यासाठी गोड पदार्थ ठेवायला लागल्या, कधी घरी बनवलेलं श्रीखंड, पुरणपोळी, कधी बासुंदी तर कधी गुलाबजाम.
अमरावतीच्या बॅंकेत रुजु झालो त्यावेळेस मी होतो बॅंकेतला एक जबाबदार ऑफिसर "जोशी"!! पण ’जोशी’ ते ’श्याम’ आणि ’श्याम’ ते ’गोडया’ हा प्रवास कधी झाला कळलेच नाही. त्यांनी मला ’गोडया’ हाक मारली आणि क्षणभर "मी माझ्या जळगावच्या ऒटयावर नुसता हुंदडतोय आणि नाना, आजी मला घरातुन जोरात दटावतायत किंवा एक क्षणभर माझ्या आजोळच्या नगरच्या वाडयात विट्टी-दांडुचा खेळ खेळतोय आणि आईचे दादा आणि नानी रागावताहेत "अरे काय दंगा मांडलाय म्हणुन" असा भास झाला. मी पण त्यांना आजीच्या ऐवजी "आज्जी" म्हणायला लागलो. या आजीतल्या "जी" ला आणखीन एक ’ज’ जोडला की आजी नातवंडाच नात अधिकच लडिवाळ , अधिकच मृदु मुलायम होत जात. आज्जींच्या हातचं गोड खायचं, कधीतरी त्यांना प्रेमाने रागवायच, रोज ’ज्ञानेश्वरी’ आणि ’दासबोधाचा’ एक अध्याय वाचायचा.......त्यावर मी खुप बडबड करायचो त्या मात्र सगळ्याचा अर्थ निट शांतपणे समजावुन सांगायच्या. .....इतके सुंदर क्षण!!! अनमोल असे!
आज धनत्रयोदशी, रात्रीच्या उशीराच्या गाडीने मी जळगांवला निघणार होतो. संध्याकाळी बॅंकेतुन घरी आलो तर, किराणामाल भरुन येतो त्या पिशव्या धुवुन पुसुन निट ठेवलेल्या असायच्या, त्या पिशव्या आणि फराळाचे डबे काढुन बसल्या होत्या......सगळ फराळाच निट वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरलं......ह्या सखुबाईंसाठी.........ह्या जनीसाठी.......ह्या नामदेवासाठी...........ह्या तुझा मुलांसाठी..........अगदी मोजक स्वत:साठी ठेवत त्यांनी सगळे फराळाचे डबे खाली केले.....मी चकित होऊन सगळ बघत होतो. मग देवाजवळ दिवा लावला, एक विझलेली काडी घेउन ती दिव्यावरुन पेटवुन पणत्या लावत बसल्या होत्या......ती काडी विझायची.......त्या परत पेटवायच्या.......परत विझायाची.....परत पेटवायच्या.....खुप वेळ त्यांची खुडबुड चालली होती......मला अस्सा राग आला म्हटल...."आज्जी, तुमच गणित काही कळत नाही मला......हे एवढं सगळ फराळाच करुन वाटत बसायच आणि दोन काडया जाळायच्या तर बसल्या आहेत कंजुषपणा करत.....काहीच न बोलता त्या नुसत्या हसल्या!!
आज्जींचा ’गोडया’ होऊन रहातांना, मला माझ्या बॅंकेतल्या नोकरीचा आणि होणा-या बदल्यांचा विसरच पडला होता.......आणि त्यादिवशी परत बदलीची ऑर्डर हातात पडली. माझी बदली झाली होती, नांदेडला!! आता हे सगळ सोडुन जायच......हे घर......आज्जींचा सहवास.......खुप कठीण होत....... मी त्यांना सांगीतल, वाटल त्यांना फार त्रास होइल, पण शांत होत्या त्या, कदाचित हा शांतपणा वरवरचा असावा, आतुन त्रास होतच असेल त्यांना. सगळ आवरुन निघतांना मन शोकाकुल झाल होतं, माझी खोली.....वाडयात बहरुन आलेला मोगरा....चमेली......आमची ’ज्ञानेश्वरी’ ’दासबोधा’ची पारायणं काही काही विसरु शकणार नव्हतो मी. निघतांना त्यांना नमस्कार केला.....डोळ्यातल्यां आसवांना आवरणं कठिण जात होतं......त्यांनी शांतपणे पाठीवरुन हात फिरवला अन म्हणाल्या "गोडया" एक मागु? माझे शब्दच हरवले होते, मी मानेनेच काय म्हणुन विचारले, तर म्हणाल्या "तुझी राधिका, मुल आणि आईला घेउन ये रहायला चार दिवस माझ्याकडे" पुरुष असुन मी लहान मुलासारखा रडत होतो, डोळ्यातल्या अश्रुंना आवरण खरच कठिण होतं.........काय होत त्यांच माझ नातं..........इतक आग्रहाच.....प्रेमाच आमंत्रण!!!!
मी घरी आल्या आल्या प्रथम आईला आणि राधिकाला सांगीतल नांदेडला रुजु व्हायच्या अगोदर आपण सगळ्यांनी अमरावतीला जायचय, माझ्या आज्जी कडे चार दिवस रहायला. आणि सगळेच आनंदले. मी तसा फोनही केला.
आम्ही सगळे आज्जींकडे पोहोचलो आणि त्यांच्या उत्साहाला नुसते उधाण आले होते. आम्हाला जेवतांना रोज गरम पोळ्या वाढत होत्या. एकदिवस तर पुरणपोळी....तीसुध्दा तव्यावरची......गरम गरम.....साजुक तुपात खरपुस भाजलेली...... परत वाटीत साजुक तुप आणि जाड थराची साय......त्यावेळेस वाडयातल्या मोग-याला बहर आला होता.....स्वत:च्या हाताने राधिकेला रोज गजरा गुंफुन देत होत्या. गजरा देतांना म्हणाल्या......."फार भाग्यवान आहेस बाई...... नव-याच भारी प्रेम आहे तुझावर, जप हो त्याला"
निघायच्या दिवशी आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो अन ओघांत मी बोलुन गेलो "आज्जी काही गोष्टी बोलु कां तुमच्याशी.........." बोल की, त्या म्हणाल्या.........." "तुमचा हा असा कुणालाच काम न करु द्यायचा स्वभाव......मला वाटत तुम्ही तो बदलावा.....आजुबाजुच्यांकडुन करुन घ्यावी थोडीशी कामं.....थोड सोवळं ओवळं कमी केल तर तुम्हालाच त्रास कमी होइल. एकीकडे हे एवढ सगळं करत बसायच आणि वाटत बसायच सगळ्यांना आणि दुसरीकडे मात्र आगपेटीची एक काडी जाळायची तरी विचार करत बसायचा......आणि हो तुमची मुलं....सुना....नातवंड.....कुठे आहेत सगळी....भेटायला येत नाही का तुम्हाला.......?
त्या पार पार हरवल्यां सारख्या झाल्या आणि बोलतच सुटल्या.....अनावर होऊन........
"गोडया, तुला अस वाटत ना मी खुप विचित्र आहे स्वभावाने......अरे पण तुम्ही सगळे येणार काही दिवसांसाठी....तुमच्याकडुन कामं करुन घ्यायची सवय लावायची मग तुम्ही गेल्यावर काम होत नाही म्हणुन रडत बसायच त्यापेक्षा स्वत:ची कामं स्वत:च करायची म्हणजे अस अडल्यासारख नाही होणार. अरे तु माझा हात धरुन अंबामातेला घेऊन गेलास तर मला किती आधार वाटेल रे. पण मग अशी सवय लावुन घ्यायची आणि तु नसलास की एकटी कशी जाऊ या विचाराने दर्शनालाही जायचं नाही, आणि दर्शनाला जाता येत नाही म्हणुन आणि तुझ्या आठवणीत रडतं बसायच........म्हणुन मग धैर्याने एकटीच जाते. एकाच काडीने पणत्या लावायच म्हणशील तर जितकी म्हणुन काटकसर करता येईल तितकी करायची.....काडी....काडी वाचवुन जमवलेला पैसा मग गरिबांच्या मदतीसाठी वापरायचा. फार शिकलेली नाही मी, पण माझ्या आयुष्याच गणित अगदी साध, सोप, सरळ आहे.
आणि मुलं.....सुना.......नातवंडाच म्हणशील तर फार मोठी कहाणी आहे बाबा ती........वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झालं.......आमच पराडकरांच घराण अगदी सधन.....सासरे आमच्या लग्नाच्या आधीच गेलेले......सासुबाई गांवी आमची मोठी शेती आणि घराचा व्याप सांभाळत होत्या...... नोकरीच्या निमित्ताने आम्ही अमरावतीत. इथे पण आमचे तीन वाडे आणि हे रहात घर. लग्नाला जेमतेम सव्वा वर्षच होत होतं......ह्यांना एकेदिवशी ताप आला.....पाच दिवस झाले तरी ताप उतरत नव्हता. जवळच्याच डॉक्टरांच औषध चालु होतं, पण ताप काही केल्या उतरत नव्हता. शेवटी जिल्हा रुग्णालयात दाखल केल आणि निदान झालं "विषमज्वर". त्याकाळी लवकर बरा न होणारा असाध्य असा हा ताप!!! उपचार सुरु होते. डॉक्टर अगदी माझ्या वडिलांच्या वयाचे होते, सारखे धीर देत होते, दिवसरात्र मी ह्यांच्या उशाशी बसुन होते. त्यादिवशी डॉक्टर आलेत, त्यांनी तपासलं, ताप अजुन उतरलाच नव्हता. त्यांनी एक इंजेक्शन दिलं.........अणि अवघ्या २०-२५ मिनिटात सगळा खेळ संपला......ह्यांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला.......या एवढया मोठया जगात मला एकटीला सोडुन निघुन गेलेत....पुढच्या प्रवासाला.....मला अश्रुं आवरण कठिण झाल होतं. डॉक्टरांनी इंजेक्शनचा बॉक्स बघीतला आणि सुन्न होऊन ते कॉटवरच बसले....त्यांनी नर्सेस आणि सगळ्या नातेवाईंक मंडळींना बाहेर जायला सांगीतले खोलीचा दरवाजा बंद केला, माझे पाय धरुन डॉक्टर रडत होते, "मी तुझा अपराधी आहे, तारीख उलटुन गेलेल इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा मृत्यु झालाय, तु देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे" अनावर होऊन डॉक्टर माझे हात हातात घेउन रडत होते, त्यांच बोलणं ऐकल आणि माझ्या सगळ्या जाणिवा थिजुन गेल्यात. त्यांना मी उठवल, त्यांच्या अपराधी चेहे-याकडे बघितल आणि एवढच बोलले "डॉक्टर तुम्हाला शिक्षा देऊन माझं गेलेल माणुस तर परत येणार नाही ना?"
पार एकाकी झाले, सासुबाईंनी पाठीवरुन हात फिरवुन सांगीतल "फार लहान वय आहे तुझ.......मी गावाकडचा व्याप सोडुन तुझ्याजवळ नाही राहु शकणार तुच तिकडे ये........नाहीतर आई-वडिलांकडे रहा........जीव जळतो ग तुझ्याकडे बघुन......!! पण नाही गेले कुठेच. त्यांच्या आठवणी जपत इथेच राहीले. एक मात्र केले इथले तीनही वाडे विकलेत, त्याचा पैसा बॅंकेत ठेवला, उपजिविकेचे साधन म्हणुन. वयाच्या १८ वर्षापासुन अस एकाकी जीवन जगतेय.......मग कुठली मुलं...बाळ.... सुना नातवंड.......पण मी ही सुगरण होते.........स्वयंपाक करण्याची, खाऊ-पीऊ घालण्याची मलाही हौस होती म्हणुन मग अस सगळ्यांना खाउ घालायच.....सखुच्या मुलाचा वाढदिवस साजरा कर....जनी......नामदेव.......त्यांची नाव वेगळीच.....पण मीच ठेवली होती ही नावं.......सगळ्यांमध्ये आपला संसार बघायचा..........!!!
मी, राधिका, आई पार सुंन्न झालो होतो, आसवांच्या धारा वहात होत्या.
"हे विश्वची माझे घर" अस मानणा-या माझ्या "आज्जी" कधीच देवत्वाला पोहोचल्या होत्या. संत तुकडोजी महाराजांचा अनुग्रह घेतलेल्या......संत गाडगेबाबां बरोबर काम केलेल्या माझ्या "आज्जी"!! गुरुंनी सांगीतलेल्या मार्गावरुन चालतांना मी अडखळत होतो.....धडपडत होतो........अध्यात्मांवरची पुस्तकच्या पुस्तक वाचत होतो......वाचनाने आलेली प्रगल्भता बोलण्यातही उतरत होती.....पण "अध्यात्म जगायचं कसं ते माझ्या आज्जींनी शिकवलं...."
क्रियेला प्रतिक्रियाच नाही, बोलायला सोप, पण कितीही प्रयत्न केला तरी मनात तरी राग येतोच, ज्यांच्यामुळे नवरा गेला त्यांच्यावर कोर्ट-केस करुन त्यांना शिक्षा झाल्यावर "जशास तस" वागल्याच समधान कदाचीत मिळाल असत, पण क्रियेला प्रतिक्रियाच नाही. "अटळ प्रारब्ध" म्हणुन तो क्षण तिथेच विसर्जित.
देवाच पूजन, दर्शन, स्तोत्र वाचन करुन ’कायिक’ तप करत होत्या! सदैव गोड बोलणं, एखाद काम करु नको अस सांगण्यापेक्षा मी ते काम करीन अस गोड स्वरात सांगण ...म्हणजे ’वाचिक’ तप!! आणि नियतीने काहीही दिलं नाही तरीही तो राग मनात न ठेवता, सगळ्यांवर भरभरुन प्रेम करत होत्या...प्रसंन्न अंत:करणाने.....हे मानसिक तप!!!!
त्यांच्या पायावर डोकं ठेवुन नमस्कार करतांना .....मी माझ्या अश्रुंना आवरलच नाही.....त्यांच्या पायावर पडणारे अश्रु म्हणजे अभिषेकच होता. मी म्हटल "आज्जी तुम्ही कधीच माझ्याजवळ काही मागीतल नाही, एखादी तरी इच्छा सांगा, ती पुर्ण करायला मला खुप आवडेल, तर म्हणाल्या, "गोडया, तु तुझ्या गुरुंबद्दल ......ताईंबद्दल मला सारख कांही कांही सांगायचास ना? आमच्या ताई अशा.......इतक्या छान प्रवचन करतात.....सुंदर मंदिर बांधलय त्यांनी डोंबिवलीला......तुला माहीत आहे त्या माझ्या लांबच्या नात्यातल्या आहेत., पण भेटीचा योग नाही आला कधी.....एकच कर माझ्यासाठी.....त्यांची माझी भेट घडवुन आण! मागुन मागुन काय मागितलं माझ्या आज्जीने माझ्याजवळ.......मी मनाशी ठाम ठरवल...ताईंना घेउन जायचच अमरावतीला.
मनाच्या कातर अवस्थेत आज्जींचा निरोप घेउन आम्ही सगळे जळगांवला परतलो. तिथुन बॅंकेची काही कामं घेउन मुंबईला आल्यावर प्रथम डोंबिवलीच्या ताईंच्या मंदिरात दर्शनाला आलो. ताई भेटल्या नाहीत पण निरोप मात्र ठेवला.."की अशा अमरावतीच्या आज्जी आहेत, त्या तुमच्या दुरच्या नात्यातल्या देखील आहेत, त्यांना तुम्हाला भेटायची ओढ लागली आहे" त्यांचा उलट निरोप मिळाला "सध्या कार्यक्रमांची गर्दी आहे, पण अमरावतीला जाण्याचा योग आला की आजींना भेटू"
याला दोनच महीने होत होते आणि अमरावतीहुन सखुबाईंचा फोन आला आज्जी गेल्याचा! माझ मन शोकाकुल झालं होत. मिळेल त्या गाडीने मी अमरावतीला पोहोचलो, शेवटच दर्शन झालं नाही, मला पहाताच सखुबाईंना रडु आवरणं मुष्किल झाल होतं........म्हणाल्या....."दादा, गेल्या हो आज्जी....!जातांना ह्यो वाडा माझ्या नावावर सोडुन गेल्या बघा......" मी म्हटल ’सोडवायला कुणी होत की नाही? व्हय की माझ्या घरचे सगळे, जनीचा नवरा, मुलं, नामदेवाच्या घरची बी सगळी व्हती"
मनात म्हटल ......."दासबोध, ज्ञानेश्वरीची पारायणं करणा-या.....कायिक, वाचिक, मानसिक तप करणा-या, ’जे जे भेटीजे भुत ते ते मानिजे भगवंत’ अस मानणा-या माझ्या ’आज्जी’ गेल्या होत्या कैवल्याच्या प्रवासाला....त्या माउलीला सोडवायला होता की तिचा गोपाळांचा मेळा...!! पण त्यांच्या मनातली ताईंच्या भेटीची इच्छा मी पुर्ण करु शकलो नाही याची खंत घेऊनच मी परतीच्या गाडीत बसलो होतो!!!!