RSS

Wednesday, September 14, 2016


Friday, November 28, 2014

विश्वामित्रांची तपश्चर्या

१६ जुनचा तो दिवस आठवला की मनात नुसती कालवाकालव होते. आपण मोठया असुनही असे कसे वागलो याची खंत मनाला लागते. तो प्रसंग अजुनही जसाच्या तसा आठवतो. ’तो’ माझ्या अगदी जवळच्या रक्ताच्या नात्यातला. गेली पाच वर्षे डोंबिवलीत आला होता बदली होऊन, बॅंक फ़ोर्टला रहायला डोंबिवलीत. त्याचा मुलगा इथेच इंजिनियर झाला, मुलीने दहावीची परिक्षा दिली होती, रिझल्टही जवळ आला होता. आता दुस-या ठिकाणी बदली झाली होती, दोन दिवस आधीच जेवणाचा कार्यक्रम करुन त्याला शर्ट, सगळ्यांना छोटया भेटवस्तु देऊन निरोपाचा तो कातर क्षणही साजरा केला होता. आज तो आला होता निघायच्या अगोदरच भेटायला!!मी पुजा करत होते, पटकन उठले, म्हटलं याच्याशी थोडया गप्पा मारुया. डोंबिवलीला नावं ठेवणे त्याची नेहेमीची, जुनी सवय होती. त्याच्या मुलीच्या शाळेतल्या अ‍ॅडमिशनपासुन ते डोंबिवलीत घर घेउन देण्यापर्यंत ह्यांनी मदत केली होती. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवण हा त्याचा स्वभाव होता.....शाळा कशी चांगली नाही, घर कसं वाईट आहे. त्याच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे तो बोलत होता. डोंबिवली शहर कसं वाईट आहे याच वर्णन सुरु होतं, मी शांत सुरात त्याला समजावत होते.........अरे, शहराच काय, चांगल्या वाईट गोष्टी असतातच तिथे, पण आपण जिथे रहातो त्या शहराने काहीतरी दिलेलच असतं आपल्याला....म्हणुनच देणेकरी असतो आपण त्या शहराचे.....आता बघ तुझा मुलगा इंजिनियर झाला, मुलगी पण दहावी होईल......ह्या सगळ्या चांगल्याच गोष्टी ना......ऋणी रहायचं त्या शहराचं. तरीही तो बोलतच होता.....रागावल्यासारखा, काहीबाही, वस्तु कशा चांगल्या मिळत नाही.....शाळा तर अजिबातच चांगली नाही.......माझी सहनशक्ती संपत आली होती, गेल्या पाच वर्षात अनेकवेळा या सगळ्या गोष्टी ऐकुन झाल्या होत्या. गेली तीस वर्षे मी डोंबिवलीत रहात होते. माझी सगळी सुख दु:ख , भावनिक ओलावा या शहराशी जोडला गेला होता, कुणास ठाऊक पण मीही जोरजोरात बोलायला लागले, आमचा निष्फळ वाद विकोपाला जात होता, दोघाचाही आवाज टिपेला पोहोचला होता.......शब्दाने शब्द वाढत होता..........एक क्षणभर....डोळ्यांवर हात ठेऊन तो लहान मुलासारखा रडायला लागला..........भरल्या गळ्याने बोलत सुटला......"अग डोंबिवली आम्हाला सगळ्यांना खुप आवडलीय.....रहावसं वाटतय सगळ्यांना..........पण बदली झाली की बि-हाड उचलुन जावं लागत......बदलीच्या गावी......मनात इच्छा असली तरी नाही राहु शकत आम्ही आवडत्या गावात.......मग त्याला नावं ठेवुन समाधान करुन घ्यायच मनाचं....त्याचं बोलणं ऐकल आणि स्तब्धच झाले. मी त्याच्याजवळ जाऊन पाठीवर हात फिरवण्याचा प्रयत्न केला, माझे हात झिडकारुन तो निघुन गेला, रडत रडत.......!! आजही यासगळ्या गोष्टी आठवल्या की डोळे भरुन येतात आणि सहा महिन्यातल्या घटना मनात तरळायला लागतात.३१ डिसेंबरला आम्ही अल्जेरियात होतो. पावभाजी आणि आईस्क्रिम असा साधासाच बेत ठेवला होता. संध्याकाळी ’आनंद’ चित्रपटाची सी.डी. बघत होतो. अल्जेरिया भारतीय वेळेच्या तुलनेत साडेचार तास मागे, भारतात सगळ्यांना फोन करायचे म्हणजे साडेसातलाच करायला हवे, सगळ्यांना फोन करत होतो.....प्रथम ह्यांच्या आईला.....मग माझ्या आईला, वहिनी म्हणतो आम्ही सगळी मुलं तिला, माझे भाऊ, ह्यांचे भाऊ....भराभर फोन लावत होतो......एक वेगळाच उत्साह आला होता. नविन वर्षाच स्वागत मनापासुन, उत्साहाने, नविन संकल्पाने, तो संकल्प पार पाडायचाच ही जिद्द मनात बाळगुन करायचं!. ह्यांच्या धाकटया बहिणीला फोन लावला,उत्साहाने शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली आणि तिने पटकन विचारलं "वहिनी, नविन वर्षाचा संकल्प काय केलात?" आणि एक क्षणभर माझ्या तोंडुन उत्तर निघाल......"सगळ्यांशी आईच्या भुमिकेतुन वागायचं" फोन ठेवला. नंतर आम्ही पाव-भाजी एन्जॉय केली, आईस्क्रिम खाल्ल. छान गेला वेळ, प्रसंन्नता मनात दाटुन आली होती, झोपायला गेलो,गादीवर पाठ टेकली आणि केलेल्या संकल्पाची आठवण झाली.सगळ्यांशी आईच्या भुमिकेतुन वागायच" एकच वाक्य...... पण जरा शांतपणे विचार करायला लागले आणि जाणवलं किती कठिण आहे हा संकल्प!! "आई" म्हणजे विशुद्ध प्रेम, निस्वार्थ सेवा, निराकाराच साकार रुप म्हणजे "आई". ईश्वर सृष्टीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टीची निर्मिती त्याच्या मुलाबाळांसाठी करत असतो, पण तो असतो निराकार. कुणाच्याही, कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तो बांधील नसतो. याउलट आईचं! त्याच्याच सारखा रोल करायचा, पण कुठेतरी थोडासा जरी तोल गेला की तिला उत्तरं द्यावी लागतात, तिच्याच अपत्यांना! म्हणुनच ईश्वरापेक्षाही कठिण असा रोल!!केलेला संकल्प कठिण आहे याची जाणिव झाली होती
"
.समर्थांचा ’दासबोध’ दोनदा अर्थासकट मनापासुन वाचला होता. तेव्हा जसं बोलले तसं वागण्याचा प्रयत्न करायचाच असा निश्चय केला. तसे आम्ही एप्रिलपर्यंत अल्जेरियातच होतो, त्यामुळे संकल्प पार पाडायला विघ्न येणार नव्हती. इथल जिवन म्हणजे एका अर्थाने एकांतातली साधनाच होती. ह्यांच्या आईला, माझ्या आईला फोन करायचे तब्येतीची विचारपुस करायची, ’आईच्या’ भुमिकेचा पहिला भाग सुरुच होता. खरी परिक्षा होती ती भारतात परतल्यावर, अठ्ठाविस एप्रिलला आम्ही भारतात आलो. सासुबाई धाकटया दिरांकडे पुण्याला होत्या, खर तर तीन दिवसांच्या विमानाच्या प्रवासाने खुप थकवा आला होता, पण त्याचा विचार न करता, पुण्याला निघालो, त्यांना भेटायला. त्यांच्यासाठी खाऊची बॅग भरतांना खुप आनंद होत होता, त्यांना भेट म्हणुन आणलेली प्रवासी बॅग पण बरोबर घेतली. वहीनीला,माझ्या आईला) बर नव्हतं म्हणुन तिला भेटायला जळगांवला गेले, तीन दिवस तिच्या सहवासात रहातांना काय काय करु असे झाले. औषध आणलीत, साडयांवरचे ब्लाउज शिवुन आणलेत, कपबशा जुन्या झाल्या होत्या त्याही नविन आणल्यात, तिला आंबे आवडतात म्हणुन चांगले दोन डझन हापुसचे आंबे घेउन गेले होते. निघतांना "माझी डोंबिवलीतली सगळी काम झाली की तुला इथे घ्यायला येईल,पंधरा दिवस शांतपणे रहा माझ्याकडे" असं प्रेमाने सांगुनही आले. मग बंगलोरहुन लेक जावई आलेत, मग माझ्यातल्या ख-याखु-या आईचा रोल सुरु झाला. तिच्याबरोबर शॉपिंग, त्यांना दोघांना आवडणारे पदार्थ........दहिवडे, बटाटेवडे......आलु-पराठे.......त्यांच्यासाठी खास आंब्याच्या पेटया मागवल्या होत्या. हे सगळ करत असतांना मनातल्या मनात मी स्वत:लाच तपासुन बघत होते,,,,,,,,,खरच याच भावनेने मी सगळ्यांशी वागते आहे कां????? तो अधिक महिना होता, गावातल्या दोघी नंणदांना, त्यांच्या घरच्या सगळ्यांना जेवायला बोलावले होते, आंब्याचा रस आणि बाकी सगळे त्यांना आवडणारे पदार्थ केले होते. सगळ्यांना जेऊ घालतांना मी मनापासुन आणि भरपुर करण्याचा प्रयत्न करते. ती सगळी आवडीने,पोटभर जेवली की माझ्यातली ’आई’ समाधान पावते. त्यादिवशीही असेच सगळे चांगले पदार्थ केले होते, सगळे आवडीने जेवत होते. तशा दोन्ही नंणदा आणि त्याचे मिस्टर माझ्यापेक्षा वयाने मोठे पण त्यांना अधिकाचे वाण लावतांना मनातल्या वात्सल्याला किनार होती आईच्या ममत्वाची. २५ मे ला वहिनीला जळगांवहुन घेऊन आले, तीची थकलेली, सुरकुतलेली बोटं धरुन आणतांना, गाडीत तीला लहान मुलासारखं चढवतांना........तीच्या खुपणा-या डोळ्यांवर माझा गॉगल चढवतांना, माझ्यातली आई भेटली होती मला. त्याच दरम्यान सासुबाईपण आल्यात पुण्याहुन माझ्याकडे, हळुच म्हणाल्या, अग माझी एक साडी खराब झालीय, ड्रायक्लिन करुन देशिल का? तु खुप छान करतेस म्हणुन म्हटलं......त्यांची नऊवारी साडी ड्रायक्लिन करण अवघड जात होतं, पण तरीही मनापासुन केली. त्यांच्या दोन-तीन साडयांवर ब्लाउज शिवुन आणुन दिलेत. नविन साडी घेण्यासाठी पैसे दिले. आता माझ्या लेकीचा आणि वहिनीचा हट्ट होता, दोघींनाही मोरगांवच्या गणपतीला पुजा घालायची होती. वहिनीने तर सांगुनच टाकलं.....वरचं बोलावणं यायच्या अगोदर मला एकदा मोरगांवला नेउन आण ग बाई"मग मोरगांवच्या पुजेच ठरवलं. ह्यांची सुट्टी संपल्यामुळे हे २२ मे लाच अल्जेरियाला परतुन आले होते, आता हा सगळा डोलारा मलाच सांभाळायचा होता. वहिनी, मी, लेक आणि सासुबाई अस जायच ठरलं. दोन्ही वयस्कर आज्यांना घेउन जायच फार अवघड होतं, पण निश्चय केला होता, तेवढयात वन्सबाईंचा फोन आला "आईला या वयात प्रवास झेपणार नाही, मी घेउन जाते तिला, तुम्ही जाउन या" मग आम्ही तिघीच निघालो. डोंबिवली ते मोरगांव प्रवास - ड्रायव्हर शोधण्यापासुन ते पुजेची तयारी पार दमले होते मी, शिवाय एवढा सहा-सात तासांचा प्रवास आम्ही तिघी बायकाच होतो. अगदी फुलासारखं निट सांभाळुन नेलं, पुजेच्या आदल्या रात्रीच तिचं आजारपण, दवाखान्यातुन औषध आणलं, खुप वेळ जागत होते तिच्या उशाशी. खुप काळजी वाटत असतांनाही मोरयाच्या कृपेने दोघींचीही पुजा व्यवस्थित यथासांग झाली. एक लेक, एक आई, दोघींचाही लहान मुलासारखा हट्ट पुरवतांना मनात समाधान दाटुन आले होते. खरा क्षण होता तो १३ जुनचा, सगळ्या बहिण भावंडानी एकत्र यायचं ठरवलं, हे नव्हतेच मदतीला, माझीही अल्जेरियाला परतायची तारीख जवळ येत होती, तरीही उत्साहाने तयारीला लागले.सगळे एकत्र जमल्यावर अचानकच ठरले - वहिनीच्या पंचात्तरीचा सोहळा कां करु नये आणि आदल्या दिवशीच्या दोन तासात कार्यक्रमाचे नियोजन केले......आणि अत्यंत अविस्मरणिय असा तो सोहळा झाला.....अचानक ठरवल्याने काय करायचे हे ठरवले नव्हते.......पण एक ’अनामिक शक्ति’ या कार्यक्रमाचे नियोजन करत आहे, हे जाणवत होते.......सकाळी उठल्यावर सनईच्या सुंदर नादात आम्ही चौघ भावंडांनी तिला सुवासिक तेल लावल........बाबांच्या फोटोला सोनचाफ्याच्या फुलांचा हार घातला.....सगळ्या भावंडांनी आणि नातवंडांनी तीची पाद्यपुजा केली.......पंच्चाहत्तर दिव्यांनी औक्षण केल, सोनचाफ्याची फुलांची कंठी घातली......सगळ्यांनी तिला साडी घेतली......अंगठीसाठी पैसे दिले......मोरगांवहुन प्रसादरुपात मिळालेली शाल पांघरली.आयुष्यभर तिने आमच्यासाठी जे जे कांही केलं त्याबद्दलची ’कृतज्ञता’, एक प्रकारे ’कृतज्ञता सोहळा’च होता तो.घडणा-या सगळ्या घटनांकडे मागे वळुन बघतांना एक जाणवत होते, प्रयत्नपुर्वक कठिण असा संकल्प पार पाडत होते, "सगळ्यांशी आईच्या प्रेमाने वागण्याचा, अगदी आईचीही आई होण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते" मग मनात विचार डोकावला.........ही तर सगळी तुझ्या जवळची......नात्यातली......त्यांच्याशी आईच्या भुमिकेतुन वागणं तस खुप कठिण नाही, पण जी नात्यातली नाहीत, त्यांच्याशी वागु शकशील तु या भुमिकेतुन या वात्सल्याने ? आणि त्या घटना आठवल्या....एक मैत्रीण अमेरिकेला जायला निघाली होती, दुस-या दिवशीचं रात्रीचं प्लेन होतं आणि आज संध्याकाळी तिच्या मिस्टरांना हार्ट-अ‍ॅटॅक आला.....डॉक्टरी उपाय तर चालुच होते, पण तिच्या मनाला धीर देण्यासाठी, त्यांच्या साठी म्हणुन ’गणेश-गीतेच’ पारायण केले होते......हा ग्रंथ हातात जरी घेतला तरी मनाला एक अनामिक शांतता येते! दुस-या एका मैत्रीणीचा तरुण, इंजिनियर मुलगा घरातुन निघुन गेला होता रागावुन, तिच्या डोळ्यातले अश्रु थांबत नव्हते. माझ्या धावपळीत, पुर्ण दिवसभर तिच्याबरोबर होते, त्याच्या ऑफीसमध्ये त्याला समजवायला तीच्या बरोबर गेले होते. या सर्व घटनांच्या तुलनेत कांही प्रसंग आठवले की खुप त्रास होतो.....ह्यांना त्यावेळेस नेमकी बाहेरच्या देशात नोकरीची संधी उपलब्ध झाली, आणि लेकीला नाशिकच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळाली. आम्ही दोघीही तिथे शिफ़्ट झालो, निर्णय थोडासा कठीण होता, पण मनाचं धैर्य करुन घेतला, तरीही मन थोड सैरभैरच होतं, त्यादिवशी ब-याच दिवसांपासुन काढलेल्या फोटॊंचा रोल स्टुडिओमध्ये देउया म्हणुन घेउन गेले आणि घरी आले. दुस-या दिवशी सकाळी कॅमेरा शोधतेय, सापडेचना, आठवतच नव्हतं......मला रडायलाच येत होतं......माझी अवघी १७-१८ वर्षाची लेक, मला जवळ घेउन म्हणाली "रडु नकोस ग ममा, सापडेल, तु एखादवेळेस स्टुडिओत विसरली असशील, होतं असं कधी, कधी, आणि नाही सापडला तरी टेन्शन नको घेउस" मी अगदी अवाक होऊन गेले माझी लेक त्याक्षणी माझी माय झाली होती. मी मनात म्हटले, "बेटा, छोटय़ा छोटया वस्तु हरवल्यास म्हणुन किती धपाटे खाल्लेस ग माझ्या हातुन.......कधी वॉटरबॅग, कधी पेन्सिल, कधी कंपास एकदा तर सारखी सारखी पेन्सिल हरवते म्हणुन इतका जोरात धपाटा घातला होता पाठीत की माझ्याच हाताला मुंग्या आल्या होत्या......अन रागाने दरवाजाबाहेर काढुन दिलं होतं.....तो चिमुकला जीव किती भेदरला होता एकटेपणाच्या भीतीने! ती परत मला म्हणत होती.... आई, उद्या जाउया त्या स्टुडिओत......तु रडु नकोस बर......मी मनात म्हटल.....छोट्या वस्तु हरवल्या तरी किती रागावले गं मी तुला, तु मात्र सगळ विसरुन आईची समजुत घालतेयस....तिचा निरागस चेहेरा बघुन माझ्या पश्चातापी अत:करणात विचार आला, खरच आवरायला हवा होता मी राग त्यावेळी....अशा चुका मोठयांकडुनही होत नाही का कधी?.........त्या दिवशीचा रविवार.....मस्त मजेत चाललेला.....घरात पसारा करताय... करु दे.....! वस्तु अस्ताव्यस्त करताहेत....करु दे! सोमवारी आवरु....अशा विचारांमध्ये सकाळचा नाश्ता छान झाला......"अहो तेवढे कॉफीचे मग भरुन ठेवलेय ते आणता का?.....एक मिनिटच.......खळकन आवाज झाला, मग खाली पडुन फुटला होता, कॉफी सांडली होती, काचांचे तुकडे इतस्तत: पसरले होते, मग मात्र रागाचा पारा वर गेला, एक काम सांगितलं तर कुणी धड करेल तर शपथ.सा-या दिवसभर रागातच होते........सगळ्या भुतकाळातल्या आठवणींना उगाळत बसले होते......जरा विचार डोक्यात आला नाही की अनेक वेळा अशाच कपबश्या फुटल्या नंतर ह्यांनी प्रेमाने म्हटल होतं..... चल जाऊ दे.....नाहीतरी कपबशा जुन्याच झाल्या होत्या.....अन मग नविन सेटच आले होते कपबशांचे घरात!आताही तो माझ्या इतक्या जवळच्या नात्यातला, त्याला जेवायला बोलावले त्या दिवशी किती उत्साहाने केलं होत सगळं, तो आता वरचेवर भेटणार नाही म्हणुन डोळ्यात आसवंही आली होती.मग आत्ता त्याच्याशी भांडतांना कुठे हरवली होती माझ्यातली "आई"??एक जाणवलं आमचे संकल्प म्हणजे कलियुगातील एकप्रकारची "तपश्चर्याच" आणि ही तपश्चर्या भंग करायला सहा मेनकांच नर्तन चालु असत.......कधी क्रोध.......मोह.......मत्सर......कधी काम.......लोभ......मद............!!!!या सहा शत्रुंपैकी कुणीतरी मेनकेच लोभसवाणं रुप धारण करतं.......त्याचं नर्तन आमच्या आयुष्यात सुरु होतं आणि आमची "संकल्परुपी तपश्चर्या" कधीच भंग पावलेली असते.मी त्याला पत्र लिहायला घेतलं........"झालेले सगळे वाद-विवाद विसरुन आपलं नातं आपण परत नव्याने सुरु करुया........को-या पाटी सारख......!!तु भाऊबिजेला तरी येत रहा दरवर्षी डोंबिवलीला अणि "विश्वामित्राच्या तपश्चर्येला परत प्रारंभ झाला होता.........! ही तपश्चर्या अशीच चालु रहाणार आहे.........विश्वाच्या अंतापर्यंत.....जोपर्यंत या विश्वाशी विश्वबंधुत्वाच्या नात्याने आम्ही जोडले जात नाही तोपर्यंत!विश्वामित्रांना त्रास द्यायला एकच मेनका होती.......आमच्या आयुष्यात तर सहा मेनकांचं नर्तन चालु असत.....सतत!!!! ? .." (

Safar Swiss







































Safar Swiss







































Thursday, November 24, 2011

निशब्दाचे मौन

                                          
   डोळ्यातल्या पाण्याला आवरणे कठिण झाले होते रेवतीला, मन उद्विग्न झालं होतं.  तिने ठरवलं होतं आज बोलायचच याच्याशी सगळं मनातलं. तो प्रसंग आठवला की मनात विचारांची नुसती गर्दी होत होती.
  
   कालचा दिवस किती छान होता. खुप आनंदात होती ती. काल त्यांच्या सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त जेवण, स्पर्धा असे अनेक कार्यक्रम होते. त्यातल्या पेंटींगच्या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. अगदी सहज म्हणून, काहीही तयारी नसतांना. शिवाय परिक्षक पण बाहेरचे होते. तिच्या निसर्ग चित्राला पहिले पारितोषिक मिळाले. तिला खुप आनंद झाला होता. कुठलेही विशेष शिक्षण नाही, अभ्यास नाही, त्यासाठी खास वेळ देणं नाही, पण हातात ब्रश आणि रंग आले की कागदावर जी कांही अदाकारी उतरायची की बस्स!

   सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरांना सामोर जात बक्षिस घेतांना तिला परत लहान झाल्यासारखं वाटत होतं. मजा वाटत होती. बक्षिस घेऊन ती स्टेजवरून उतरत होती, सगळे टाळ्या वाजवत होते.  अचानक तिचं समीरकडे लक्ष गेलं, तो शांत बसला होता कुठेतरी हरवल्या सारखा. तिचा उत्साह उगीचच कमी झाला. "समीर...." तिने त्याच्या खांद्याला धरुन हलवलं, आणि भानावर आल्यासारखा तो टाळ्या वाजवायला लागला. "समीर तुला आनंद नाही झाला कां?, "नाही कसा, झाला ना", "पण चेहे-यावर तर दिसत नाहीये", "प्लीज रेवती परत तेच नको" असं म्हणून तो घरी परतला. तीचं मन उगीचच उदास झालं तीही घरी आली. हातातला तो बक्षिस मिळालेला पेंटींगच्या पुस्तकांचा संच तिने टिपॉयवर आदळला. आज याच्याशी बोलायचच, असा का वागतो म्हणून.....! उशीर झाला होता, जेवण झालच होतं, मग फ्रीजमध्ये कलींगड कापुन ठेवले होते ते तिने दोघांसाठी बाऊल मध्ये घेतले, डायनींग टेबलवर दोघंही शांतच होती, म्हणजे ती गप्प होती त्यांच न बोलणं नेहेमी प्रमाणेच.

   मागचं सगळं आवरून ती आली. आता जरा निवांत बोलायचच याच्याशी असं ठरवून, तर हा शांत झोपलेला....ऒठ घट्ट मिटून. त्याच्याकडे बघितलं आणि एखादं खोडकर मुल आईचे धपाटे खाऊन रडत रडत झोपी जातं, अन गालावर अश्रु तसेच सुकलेले असतात, त्या अश्रुंना बघुन आईला जसं गलबलून येतं तस तिला झालं. त्या घट्ट मिटलेल्या ओठांना कांहीतरी सांगायचय, पण नाहीच बोलत तो, तिने त्याच्या अंगावर पांघरुण घातलं, ती ही पडली पण डोक्यात विचार चालुच होते.  असा कसा हा? चेहे-यावर दु:ख, आनंद कसलेच भाव नाही. डोळ्यात पसंती-नापसंतीच्या छटा नाहीत. का हे असं ? कशासाठी हे हरवलेपण ? इतक छान व्यक्तिमत्व पण ही उदासी सगळ्या व्यक्तीमत्वावर दाट सावलीसारखी पसरलीय. 

   हे वागणं आजचं नाही, लग्न झाल्यापासुन ती बघत होती, हे असच...भाजीत मीठ कमी झालं तरी बोलायचं नाही की जास्त झालं म्हणून रागवारागवी नाही.  "अरे समीर, भाजीला मीठ कमी झालय बोलला नाहीस तू" ती वैतागून म्हणायची, "हो ग, मी लावून घेतलं, सांगायचं लक्षातच नाही आलं" ही असली थंड उत्तरं, तिचं अक्षरश: डोकं फिरायचं, रागारागाने दोन दोन दिवस बोलायचीच नाही, तरीही हा आपला कूल!!मग शेवटी हीच विसरुन बोलायची. अण्णा, त्याचे वडिल त्यांच्या लग्नाच्या अगोदरच सहा महिने गेले होते, त्याची आई मोठ्या भावाकडे असायची, कधी गेलेच त्यांच्याकडे तर आईच्या पायावर डोके ठेऊन हा खुप वेळ नमस्कार करायचा, उठायचाच नाही, सगळे हसायचे...आई शेवटी म्हणायची "अरे समीर, पुरे, किती वेळ नमस्कार करतोस" त्याला काहीतरी हवं असायचं आईकडून पण कधी बोलायचा नाही. कार मध्ये बसला की पहिल्यांदा ते गाणं लावायचा ....

                      भरजरी ग पितांबर दिला फाडून
                      द्रौपदीसी बंधु शोभे नारायण...
                        
                      प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
                      जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
                      रक्ताच्या नात्याने उमजेना प्रेम
                      पटली पाहिजे अंतरीची खूण ....

   हे कडवं एकदा, दोनदा, परत परत ऐकायचा. शेवटी ती रागाने म्हणायची ... "समीर, किती वेळ ऐकतोस तेच तेच कडवे. कंटाळा कसा येत नाही तुला". एकदा त्याच्या मित्राच्या लग्नाला जाणार होते ते, तिने नविन घेतलेली जांभळी म्हैसूर सिल्क नेसली त्यावर मोत्याचा सर, आरशातल्या स्वत:च्याच प्रतिमेवर खुश झाली होती ती. "समीर साडी चांगली दिसतेय नां? की जास्त भपकेबाज वाटते", "नाही वाटत भपकेबाज", "पण मला शोभतोय कां हा रंग?" "रंगातलं काही कळत नाही बघ मला" बस्स एवढाच संवाद. रिसेप्शनच्या हॉलवरती सगळ्याच्या कौतुकाच्या नजरा झेलतांना समीरच्या वागण्याची बोच आणखीनच तिव्र झाली होती. कां हा असा अबोल, कांहीतरी मनात आहे पण बोलत नाही, धुमसतो नुसता मनातल्या मनात. त्याच्या दोघी बहिणी, दोघं भाउ किती भरभरुन बोलत असतात, खळखळून हसतात. त्यांची बडबड, एकमेकांमधलं प्रेम, सगळे एकत्र जमले की गप्पांना नुसते उधाण आले असते. पण हा नेहेमी गप्पच. ती अगदी काकुळतीने विचारायची, "समीर अरे काय आहे तुझ्या मनात? सगळं आहे ना आपल्याकडे, कशाला कमी नाही, मग कसली कमीपणाची भावना आहे तुझ्यात? तर नुसता हसायचा म्हणायचा.."काय बोलाव कळतच नाही." तिला उगीचच वाईट वाटत रहायचं.

   आताही तिने त्याच्याकडे बघितलं झोपेत ओठ तसेच घट्ट मिटलेले, या घट्ट मिटल्या ओठांच्या आत काय सोसतोय हा ? किती बोलतं केलं तरी बोलतच नाही. त्याच्या चेहे-याकडे बघून त्याचा थकवा जाणवला, किती पटकन झोपतो हा, सकाळी ऑफिससाठी म्हणून साडेसातला बाहेर पडतो घरी यायची वेळ ठरलेली नाही.  पण कधी कुरकुर नाही. घर सगळ्या सुविधांनी भरलेलं, गेल्याच वर्षी सगळे देश फिरुन आले होते ते. नकळत तिने त्याच्या अंगावरचे पांघरूण निट केले. मनातल्या भांडणाला मिटवून, जाऊ दे असाच हा अशी मनाची समजूत घालून. केव्हातरी खुप उशीरा झोप लागली तिला.

   मध्यंतरी त्याने एक छंद लावून घेतला होता, ताईंच्या आश्रमशाळेत जायचा. आश्रम शाळेतली ही मुलं ए्ड्सग्रस्त होती. मुलांची संख्या दिडशेच्या वर  होती. या मुलांना ताई आईच्या मायेने सांभाळत होत्या. त्यांच संगोपन, संवर्धन त्यांना डॉक्टरी उपाय उपलब्ध करुन देणे, आश्रम चालवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे, सगळ्यांसाठी अपार कष्ट करायच्या, बरं हे सगळ आपला संसार सांभाळून करत होत्या.  जी मुलं आपली नाहीत त्यांना मायेची पाखर देणा-या ताई आणि त्यांचं कार्य त्याला आवडायचं, सुट्टीच्या दिवशी तिथे जायचं, मुलांच्या सहवासात दिवस घालवायचा, आश्रमाला जास्तीत जास्त आर्थिक मदत करायची, आणि बाहेरुनही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. ताईंच्या विषयी त्याच्या मनात अपार श्रद्धा होती. नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात, देशात फिरस्तीवर असला की आवर्जून आश्रम शाळेतल्या मुलांसाठी खाऊ, खेळणी आणायचा. प्रोजेक्टच्या निमित्ताने बाहेरच्या देशात गेला की तिथला मिळणारा सगळा पगार तो आश्रमासाठीच द्यायचा. 

   शाळेच्या कामात व्यस्त असलेल्या ताईं त्याच्याशी क्वचितच बोलायच्या, त्याच्या अबोल स्वभावाने तो ही आपणहून कधी त्यांच्याशी बोलायला जायचा नाही.  आपण बरं की आपलं काम बरं अस असायचं त्याचं. पण ताईंविषयी त्याच्या मनात खुप आदर होता. मध्यंतरी ताई शाळेच्या कामानिमित्त बाहेरच्या देशात गेल्यात. त्या परतुन आल्या आणि रेवतीला आश्रमशाळेतून एक फोन आला, ताईंनी समीरला भेटायला बोलावले आहे असा निरोप होता. तिला आश्चर्य वाटले. दोघही संध्याकाळी भेटायला गेलेत. ताई वरच्या हॉलमध्ये आहे असे समजले मग दोघही वरच गेलीत. ताईंचं हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व, त्यांना बघितलं, भेटलं की सगळा शिण निघुन जायचा !! आजही त्यांना भेटल्यावर मन प्रसन्न झालं. दोघही शांतपणे बसलीत. ताई बोलत होत्या...."समीर तू आश्रमशाळेसाठी आणि मुलांसाठी खुप कांही केलं आाहेस, आणि करत असतोस, इथे अनेक जण मदतीचा हात घेउन येतात, पण त्या सगळ्यांमध्ये तुझा शांतपणा, समंजसपणा, पारदर्शी स्वभाव सगळं मला आवडतं. मी शाळेच्या कामासाठी बाहेर गेले होते, अचानक मला तुझी आठवण झाली, तुझ्यासाठी एक भेटवस्तु आणलीय. शांत बसलेल्या समीरच्या चेहे-यावरच्या रेषा झरझर बदलत होत्या....डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं होतं, मन सुखावलं होतं त्याचा आनंद चेहे-यावर दिसायला लागला होता, रेवती हे सगळं चकित नजरेने पहात होती. समीर ताईंना नमस्कार करण्यासाठी वाकला आणि ताईंनी त्याच्या पाठीवर आईच्या मायेने हात फिरवला .... त्याच्या डोळ्याचा कडा पाणावल्या, पुरुष होता तो पण काय होत होतं त्यालाच समजत नव्हतं, ... लहान मुलासारखे ... भेटस्वरुपात मिळालेलं ते काळ्या डायलच घडयाळ हृदयाशी घट्ट धरून, त्याचे डोळे पाझरत होते .... ओठांच्या कोप-यात हसु उमटलं होतं ... आज निशब्द अवयवांच मौन सुटल होतं.

   गाडीत बसल्यावर तो बोलत होता आवेगाने ....... भरभरून .... आज रेवती त्याला अडवणार नव्हती.  आज इतक्या वर्षांनी त्याच्या निर्जिव डोळ्यात एक वेगळीच चमक बघितली होती. आज शब्दांच्या धबधब्यात ती न्हाऊन निघणार होती.  तो बोलत होता .....!!

   मी सात वर्षांचा होतो तेव्हा .... मला खुपसं नाही आठवत, पण थोडं थोडं आठवतयं .... माझ्या कपाळावर गंध, अक्षता लावल्या होत्या, मोत्याच्या माळा बांधल्या होत्या. जे खुप मोठयाने बोलायचे, जोरात तपकिर ओढायचे, ज्यांच्या आवाजाने मी खुप बिचकायचो त्या मामांच्या मांडीवर मी बसलो होतो. बॅन्डबाजाच्या आवाजात माझ्या आणि दादाच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. दागिने घातलेल्या, छान छान साड्या नेसलेल्या आत्या आणि मामी आजुबाजुला वावरत होत्या. माझे आणि दादाचे गालगुच्चे घेत होत्या, त्यांचे बोलणे कानावर पडत होते, "काय गोड दिसत आहेत दोन्हीही बटु .... हा धाकटा समु तर कसला गुळांबा दिसतोय ... शांताक्का मुंज तुमच्या हातून लागली म्हणजे हा आता तुमचा झाला.  मला तर खुप झोप येत होती. आईच्या कुशीत जाऊन झोपावसं वाटत होतं.  मी झोपेतून डोळे उघडले तर शांताआत्येच्या कुशीत होतो, मी रडायला सुरुवात केली, परत शांताआत्येच आली समजवायला. ती अशी सारखी जवळ जवळ कां करत होती समजतच नव्हते. घरात सगळे माझ्याविषयीच कांहीतरी बोलत होते. आजी, नाना, अण्णा, आईला समजावत होते, ती सारखी रडत होती.

   सकाळी उठलो तेव्हा मी गाडीत होतो.  "पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया" असं म्हणत झाडांना मागे टाकून पुढे पळणारी गाडी लहान मुलांना खुप आवडते, पण माझं त्या पळणा-या झाडांकडे लक्षच नव्हतं, कारण या प्रवासात माझे आई-अण्णा नव्हते. मामा आणि शांता आत्येबरोबर मी कुठेतरी चाललो होतो. कुठे? मी नाही विचारले आत्येला. मला खुप रडावेसे वाटत होते, पण मामांकडे लक्ष जाताच मी भिऊन गुढघ्यात डोके खुपसून बसलो होतो. माझ्या गप्प रहाण्याची ती पहिली सुरुवात असावी.

   आम्ही अमरावतीला पोहोचलो. मला तिथल्याच शाळेत टाकले. आई अण्णांच्या आठवणींनी रात्री उशी भिजायची. पण सकाळी उठलो की एकदम गप्प गप्प. आत्येजवळ कधी हट्ट धरला नाही की मला आई कडे जायचं म्हणूंन की मामांशी कधी बोलायला धजावलो नाही.  ओठ घट्ट मिटून आतल्या आत आवंढे गिळायचो.

   थोडा मोठा झाल्यावर समजले ..... शांता आत्येला मुलबाळ नव्हते, अण्णांच्या पाच बहिणींपैकी ही सर्वात धाकटी, अण्णांची लाडकी, अण्णांना तिचं दु:ख बघवत नव्ह्तं, मग आजी, नानांनी आणि अण्णांनीच हा विषय आईजवळ काढला होता. दादाचा जन्म अण्णांच्या लग्नानंतर पाच वर्षांनी, तो ही नवसासायासांनी झाला होता, तो दोघांचाही जीव की प्राण, खुप लाडका, त्यानंतर मी, माझ्या पाठीवर दोघी बहिणी, आणि धाकटया दिनूचा तर अजून जन्म व्ह्यायचा होता. मग आत्येला द्यायला मीच होतो, आईला खुप समजावल्यावर ती तयार झाली होती, पण सारखी डोळे पुसत होती. मधलं असणं इतकं वाईट असतं हे त्यावेळी समजलं नव्हतं, पण त्यानंतर आयुष्यभर हे मधलेपणाचं दु:ख मनात बाळगून जगत होतो.

   माझी रवानगी शांता आत्येबरोबर झाली होती. काळ सगळ्या गोष्टींवर औषध असतं. आत्ये माझ्यावर खुप प्रेम करत होती.  ज्याच्याबद्दल खुप भिती वाटायची ते मामाही आता जवळचे वाटायला लागले होते. हळूहळू मी अमरावतीच्या जीवनात रुळत होतो. अचानक एक दिवस खुप ताप भरला. ताप उतरतच नव्हता, आणि तापात मी आईची सारखी आठवण काढायला लागलो. डॉक्टरांकडे जाऊन चेकींग केल्यावर त्यांनी टॉन्सील्सचा त्रास असल्याचे सांगितले. मामांनी लगेचच ऑपरेशन करायचा निर्णय घेतला.  ऑपरेशन अमरावतीला, आई अण्णा जळगांवला. ऑपरेशनच्या भीती पेक्षा आता मला आई भेटणार याचाच खुप आनंद झाला होता.  मी आईची वाट बघत होतो. आईला मी घट्ट मीठी मारणार होतो. ऑपरेशन टेबलवर जातांना मी ’आई आई ’ असच बडबडत होतो.  ऑपरेशन छोटसच होतं. मी गुंगीतुन अपार उत्सुकतेने डोळे उघडले, मला वाटलं आई आली असेल, पण नव्हती आली आई !! मामांनी त्यांच्या नेहेमीच्या मोठया आवाजात मला सांगितलं, "बघ समीर आई आली नाही म्हणून काय झालं, तुझी आत्या आहे नां तुझ्याजवळ", मामांचा सांगण्याचा हेतू एवढाच असेल की आत्याचं तुझ्यावर खुप प्रेम आहे. पण त्याहीपलीकडे, माझं ऑपरेशन होउन देखिल आई मला भेटायला आली नव्ह्ती या दु:खाचा ओरखडा मनावर खोल उमटला गेला आणि मी आणखीनच अबोल झालो. नंतर समजलं, दादाला कांजिण्या झाल्या होत्या, त्यामुळे तिला येता आले नव्हते. पण तोपर्यंत त्या ओरखडयाचा व्रण झाला होता.
  
    मी अमरावतीलाच राहिलो असतो तर आता जो आहे त्यापेक्षा कदाचित वेगळा घडलो असतो.  पण नियती नावाची गोष्ट असते नां. मामांची बदली जळगांवला झाली. अण्णांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाला धरुन, आत्येला त्यांच्याच वाडयात रहायला बोलावले. यात आत्येवरच प्रेम तर होतच पण आपला मुलगा डोळ्यासमोर राहिल हादेखिल विचार होता. इंग्लीश सी आकाराचा वाडा, मधल्या खोल्यांमध्ये भाडेकरी, आणि समोरासमोर आम्ही आणि आई-अण्णा, माझी भावंडं.  मामांच्या मनात काय होते माहित नाही पण जळगांवला आल्यापासून त्यांनी माझा राहणीमानाचा थाट आणखिनच वाढवला होता. टेरिकॉटचे नवनविन कपडे, शाळेत सोडवायला सायकल रिक्षा. खरं तर शाळा खुप जवळ होती. माझी सगळी भावंड पायीच जायची पण मामांच्या स्वभावाला औषध नव्हते एवढे खरे.  मधल्या सुट्टीत आम्ही मुलं घरी यायचो. आत्येने पोहे नाही तर उपमा करुन ठेवलेला असायचा.  माझी सगळी भावंड धावत घरी यायची, धावल्यामुळे त्यांना खुप भुक लागलेली असायची, मग रात्रीच्या पोळ्या, तीळाची चटणी, खाराच्या मिरच्या जोडीला पातीचा कांदा आणि अण्णांनी मुळा आणि त्याचा पालाही स्वच्छ धुवुन ठेवलेला असायचा.  मी एकटाच जेव्हा घरात कंटाळल्यासारखे मटार पोहे खात असायचो त्यावेळेस ती सगळी एकमेकांशी मस्ती करत, एकमेकांना ढकलत त्या शिळ्या पोळ्यांवर ताव मारत असायची. मध्येच त्यांचे हसण्याचे आवाज, ए तू जास्त चटणी घेतली म्हणून आरडाओरडा, मला मुळा अजून हवाय म्हणून अण्णांकडे केलेला हट्ट. मलाही त्यांच्यात मिसळून भांडणं करायची असायची, चटणीचा, मिरच्यांचा वास मलाही बोलवायचा.  मी जरा बाहेर डोकावलो की मामांचा आवाज मोठा व्हायचा .... "समीर ते पोहे संपवायचे आणि शाळेत जायचय ... अरे मटार किती महाग होते, पण तुला आवडतात म्हणून आणलेत खास !! हे शेवटचं वाक्य आणखीन मोठयाने, समोर ऐकु जावं म्हणून.  माझे ते थाटमाट बघितले की सगळी भावंडं माझ्यापासून उगाचच बिचकून लांब लांब रहायची. 

   आई एक दिवस येउन आत्येला म्हणाली, "शांता वन्स, तो लहान आहे, मुलांमध्ये जेवायला, खेळायला पाठवत जा त्याला, हल्ली खुप उदास दिसतोय, आणि बोलत देखिल नाही अजिबात, तब्येत तर बरी आहे ना त्याची" हे सगळ ऐकलं आणि मामांनी दत्तक विधानच करायचे ठरवले. माझं नांव बदलणार....!! माझ्या अण्णांच्या जागी मामांच नांव लागणार .... मला जास्तच घुसमटल्यासारखं झालं. आणि फणफणून ताप भरला.  तापाच निदान होत नव्हतं आणि ताप उतरतही नव्हता.  तापात मी बडबडत होतो ... "अण्णा, आता मी मरून जाणार, मी माझं नावच पुसून टाकणार आहे". अण्णांनी ते ऐकलं आणि म्हणाले, "बाळासाहेब, दत्तक देण्याच्या बातमीमुळे त्याने ताप काढलाय, त्याच्या मनावर परिणाम होत असेल तर नका करु दत्तक विधान, असाही आम्ही त्याला तुम्हाला दिलेलाच आहे.  तापातही अण्णांचे ते शब्द ऐकलेत आणि माझ्या अण्णांना मिठी मारुन मी खुप रडत होतो, त्यांचा पाठीवरुन मायेने फिरणारा हात खुप कांही सांगून जात होता.

   जळगांवच्या घरात असतांना घडलेले अनेक प्रसंग माझ्या मनावर परिणाम करत होते. संध्याकाळी मी बाहेरच्या खोलीत गृहपाठ करीत असायचो. ओटयावर आई बसलेली असायची. मग दादा तिच्याजवळ टिप घालायला सदरा आणि सुईदोरा आणून द्यायचा. तिच्या गोड आवाजात ती गाणं म्हणायची, मध्येच सद-याला टाके घालायची, मध्येच मांडीवर निजलेल्या दादाच्या केसांमधून हात फिरवायची. मला ते गाणं अजुनही आठवतं.....

         "भरजरी ग पितांबर दिला फाडून...
         द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ...

   मलाही तिच्या मांडीवर असच झोपायचं असायचं, असच गाणं म्हणत तिने माझ्याही केसातून हात फिरवावा असे वाटायचे. एकदा असाच घेऊन गेलो तिच्याकडे शर्ट शिवायला, तिच्याजवळ बसलो आणि हळूच तिच्या मांडीवर डोकं टेकवलं, म्हटलं, "आई, माझ्यासाठी पण म्हण ना ग ते गाणं, दादासाठी म्हणते ते, एखादीच ओळ म्हटली असेल तिने, तेवढयात मित्रांमध्ये खेळणारा दिनू पडला असं सांगत त्याचे मित्र आलेत, माझं डोकं खाली ठेवून ती धावत दिनूला बघायला गेली. मी मात्र त्या दगडी ओटयावर डोकं टेकून निश्चल झालो होतो, त्या दगडासारखा ! मामांच्या नेहेमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी मोठमोठयाने बोलायला सुरुवात केली..." समीर, फाटलेला शर्ट घालायचा नाही, मग आत्याला सुचना, ’तो सदरा बोहारणीला दे आता’ आणि त्याच दिवशी माझ्यासाठी दोन नविन सदरे घरात आले होते.
  
      मामांनी मला त्यांचं सोन्याचं पेन दिलं होतं वापरायला. कसं कुणासठाऊक ते हरवलं. मामांना समजल्यावर ते शाळेत आले, मोठमोठयाने चौकशी करत होते. मला खुपच घाबरल्यासारखे झाले होते. माझ्या दंडाला आवळत ते ओरडले .... कुठे टाकलस पेन, असं म्हणत त्यांनी माझ्या गालावर जोरात मारले. किती थरथर कापत होतो मी तेंव्हा!! ते भय अजुनही मनात तरळतयं. मला दादाचं ते पळणं, धावणं आठवतं, दादा रोज अण्णांच पेन पळवायचा, अण्णा त्याला भरपूर शिव्या घालायचे, कधी कधी तर बदडून काढायचे, मग तो वाडयात पळायचा, दुस-या दिवशी परत त्याने अण्णांचा पेन घेतलेलाच असायचा.  मी त्याला विचारायचो, "दादा, तुला भीती नाही कां वाटत अण्णांची? तो म्हणायचा, "छे रे, अरे रागावले तर रागावले, माझेच आहेत ना ते, आणि मी पेनला हात नाही लावला तर त्यांनाच वाईट वाटेल". मी तर ते सोन्याचं पेन हरवल्यापासून मामांच्या कुठल्याच वस्तूला हात लावायला धजावत नव्हतो.

   समीरने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. सीट वर मागे डोके टेकवून तो बोलतच होता.... भरभरुन.... "माझी आई चुक होती असं नाही ग, तीच्या पाठीमागे चार मुलांचा व्याप होता, घरात सततचे पाहुणे, नणंदांची बाळंतपणं, या सगळ्या व्यापात ती इतकी मग्न असायची, तिला वाटायचं, मी शांता आत्येकडे किती सुखात आहे. मीच वेडा तिच्या सहवासासाठी आसुसलेला असायचो. रेवती, आता घडलेले ते दोन प्रसंग ...

   मी प्रोजेक्टसाठी कोईमतुरला तिन महिन्यांसाठी जाणार होतो, नुकतच सायलीचं लग्न झालेलं, तीच्या जाण्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली होती, त्यात मी ही बाहेर जाणार, तु एकटीच रहाणार, मला तर काहीच सुचत नव्हतं, आईला किती विनवलं, ये ग रहायला, पण नाही आली. आणि सर्वात मोठा सल... माझ्या मनातून न जाणारा, सायली डॉक्टर झाली, माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न पुर्ण झालं, घरातली पहिली डॉक्टर!! आभाळाला हात टेकल्यासारखे झाले होते. तिने दवाखाना काढला, दवाखान्याच्या उद्घाटनाला सगळ्यांना बोलावलं, पण गणपती जवळ आलेत म्हणून नाही आले कोणी, दादा सोडून, आईला तर किती विनवण्या केल्यात, अग आपल्या गाडीने जात आहोत, सकाळी जाऊन रात्री परत यायचय, चल ग, पण प्रवास झेपणार नाही म्हणुन नाही आली, खुप खुप वाईट वाटलं होतं, इतका आनंदाचा क्षण, पण फक्त तू आणि मी दोघच होतो.  तरीही मनाची समजूत घातली होती, खरच झेपत नसेल तिला प्रवास, पण तीच आई दादाच्या मुलांची घरं बघायला, दिनूच्या वास्तुला, बहिणींबरोबरच्या ट्रिपला सगळीकडे जातेय म्हटलं की तिच्या न येण्याचा सल टोचतच राहतो, आणखीनच घट्ट होत जातो. माझे शब्द आणखीनच हरवत जातात.

   माझी कुणाविषयीच तक्रार नाही. आत्येला मुल नव्हतं, तिने मला एखाद्या अनमोल वस्तु सारखे सांभाळले, तिला मी म्हणजे जपून ठेवण्यासारखी वस्तू वाटत होती. आपण रागावलो आणि हा आईकडे निघून गेला तर, या धास्तीने ती माझा सांभाळ करत होती.  मग मुलांना वाढवण्यात जी नैसर्गिकता असते... त्या मुलाच्या यशाचं कौतूक, प्रसंगी त्याच्या चूका खंबीरपणे दाखवून वेळ पडली तर चार धपाटे घालायचे असं काही घडलच नाही माझ्या बाबतीत. मला एखाद्या शो पीस सारखं वाढवलं गेलं असच वाटतं मला. आईला तर वाटायचे माझा समीर आत्याकडे किती मजेत रहातोय.

   लग्नानंतरचा तो दिडखोलीतला संसार. त्यात मामांची अधिकार गाजवण्याची वृत्ती, तुझा महत्वाकांक्षी स्वभाव, त्यातुन उद्भवणारे असंख्य वादविवाद!! कदाचित त्यांना वाडयातलं घर सोडायला सांगितले नसते तर नसते आले ते मुंबईला, त्यांना रहायला घर नव्हतं, माझ्याशिवाय कोण होतं त्यांना, म्हणून आले ते मुंबईत, जागे अभावी होणा-या वादविवादात ना आपण लग्नानंतरचं आयुष्य मनमोकळेपणाने जगू शकलो, ना त्यांना सांभाळण्याचं कर्तव्य मी पुर्ण करू शकलो ..... कां कुणास ठाऊक सगळ्या बाजूंनी अपूरा, अर्धा भासणारा मी..!!!

   खुप प्रसंन्न हसणारी, लांब केसाची वेणी घालणारी, गोड आवाजात गाणी म्हणणारी माझी आई ! तिचा हात माझ्या पाठीवर मायेन फिरावा म्हणून मी तिला कितीवेळ नमस्कार करायचो, तुम्ही सगळे हसायचे मला !! माझ्यावर जीव तोडून प्रेम करणारी माझी आत्ये !, किंचित स्वार्थी, .. समीरचा सांभाळ आपण करतोय, मग वाड्यातले हे घर आपल्याला मिळायला काय हरकत आहे, किंवा समीर आपली म्हातारपणाची काठी होईल, अशा विचाराचे मामा !! माझे भोळेभाबडे प्रेमळ अण्णा !! सगळेचजण आपापल्या जागी बरोबरच होते. मलाच काय झालं होतं समजत नव्हतं, पण माझी घुसमट होत होती एवढे मात्र खरे.

   सहवासाचे प्रेम आईकडून मिळाले नाही म्हणून माझ्या मनाचा इतका कोंडमारा झाला, ज्यांना आई-वडिलांचं छत्रच नाही, आणि ते हिरावलं जातांनाही एक भयानक व्याधी देऊन या अफाट जगात त्यांना एकटं सोडून जाणारे त्यांचे आई-वडिल. समोर उभा ठाकलेला त्यांचा मृत्यु त्या जीवांना माहित आहे. बालपण हरवलेली ती मुलं आणि त्यांच्यावर आईच्या मायेची पाखर घालणा-या ताई!! सगळ्याची माऊली!! त्यांनी  दिलेल्या भेटवस्तूने, त्यांच्या मायेच्या स्पर्शाने आज ईश्वरी स्पर्शाचा अनुभव मिळाला. मी त्या मुलांना आधार देणार आहे, त्यांच्यासाठी खुप काही करायची इच्छा आहे, त्यांच शिक्षण, त्यांच संगोपन, त्यासाठी लागणारा निधी सगळ्यात मला सहभागी व्हायचय, प्रोजेक्टच्या निमित्ताने  मिळणारा अतिरिक्त पैसा या मुलांच्या कल्याणासाठीच वापरायचा आहे, त्यांच्यासाठी वाचनालय, त्यासाठीची चांगली वाचनिय पुस्तकं, संगणकाच शिक्षण, त्यासाठी लागणारे संगणक, मनामच्ये खुप कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी, रेवती मला तुझी साथ हवी आहे, खुप बोलावसं वाटतं पण शब्दच हरवलेले असतात. मला समजून घे, प्लीज!!

   आयुष्याच्या पटावर जमा झालेले काळे ढग केव्हाच विरले होते. रेवती समीरच्या पाठीवरुन हात फिरवत होती, आज एका निशब्द अवस्थेचं मौन सुटलं या आनंदात !!!

                                        ********************************           
 

  
  
                    
                 

Friday, July 22, 2011

कोइ लौटा दे मेरे बिते हुए दिन .... !!!

  "अलबेले दिन प्यारे ....
  मेरे बिछडे साथ सहारे ....
  हाये कहां गये .......
  हाये कहां गये .......
  आंखोके उजियारे .....
  मेरी सुनी रात के तारे ...
  हाये कहा गये ......
      कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन ....
      बिते हुए दिन वो मेरे प्यारे पलछिन" .... !!

   किशोरदांच हे गाणं ऎकायच ..... शांतपणे .... आवाजातला दर्द आणि कविच्या मनातली व्यथा नकळत सैरभैर करुन सोडते. ’काहीतरी’ निसटलय हातातून याची खंत मनात चोरपावलांनी प्रवेश करते ..... ’ते काहीतरी’ म्हणजे आपलं ...  ’बालपण’ ...... आणि नकळत ते क्षण डोळ्यासमोर उलगडायला लागतात रेशमी लडीं सारखे. कौलारु घराच्या वरती बहिण भावंडाबरोबर बसुन टोपलीभर हिरव्या चिंचा मिठ लाऊन खाल्ल्याचे क्षण ! चक्क मुलांमध्ये खेळलेले विट्टी-दांडू, लगोरीचे खेळ, पावसाळ्यात खेळायचा ’खोपचा’ म्हणून खेळ. एका बाजूने टोकदार अशी अर्धा फूट लांबीची लोखंडी सळी ....उंच हात करुन चिखलात खोचायची, असं खोचत खोचत दुरवर जायच, खोचल्यावर चिखलात ती उभीच राहिली पाहिजे, खाली पडली की दुस-या भिडूला राज्य!!

   मधल्या सुट्टीत विकत घेतलेली मीठ लावलेली आंबट गोड लाल बोरं, वर्गामध्ये तास सुरु झाला की गुपचुप तोंडात टाकायची आणि आठोळ्या बेंच मागे. चुकुन वर्गावर शिकवणा-या बाईंनी एखादा प्रश्न विचारलाच तर, बोरं आणि आठोळी तोंडात एका बाजुला धरुन उत्तर देतांना जी फजीती व्हायची, त्यानंतर मिळालेली शिक्षा, शिवाय वर्ग झाडणारा शिपाई बेंच मागील आठोळ्या काढतांना बडबड करायचा ती निराळीच.

   हिंदी विषय शिकवणा-या भावसार सरांच्या कोटावर पाठीमागून शाई शिंपडायची, त्यांच्या मफलरचा धागा ओढायचा, त्यांनी मागे वळून बघितलं की काहीच केलं नाही असा साळसुद निरागस भाव चेहे-यावर आणायचा, पण ते आम्हा सगळ्यां गृपला चांगले ओळखून होते. मग हेडमिस्ट्रेस कडे तक्रार.... सुमित्रा मॅडमने हातावर दिलेला छड्यांचा मार अजुनही आठवतोय. एकदा तर आम्हाला मारल्यावर त्या स्वत:च कितीवेळ डोक्याला हात लाऊन बसल्या होत्या, खुप वेळ समजावत होत्या ..... तुम्ही सगळ्या फार हुषार आहात ग ... कशासाठी एवढी मस्ती करता ... खुप अभ्यास करा , मोठ्या व्हा !! या छडयांच्या ऐवजी तुम्हाला बक्षिसाचं मेडल द्यायला मला जास्त आवडेल. मॅडमला असं भावूक होऊन बोलतांना बघून आम्ही किती रडलो होतो त्यावेळेस !!! मग दृढ निश्चय, असं कधी करायच नाही म्हणून, परत एखादा क्षण असा यायचा की परत पहिले पाढे पंच्चावन !!

   श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवसच असायची. खिचडी कितीही खाल्ली तरी खुप भुक लागलेली असायची. शेवटचा तास भुमितीचा. उंचीने कमी असलेले रामनाथ सर हात पुरत नाही म्हणून खुर्चीवर चढून भुमितीच्या आकृत्या काढायचे, समजवायचे, पुसायचे, परत दुसरी आकृती .... बापरे ते हे सगळं इतक भरभर करायचे की नुसतं गरगरायला व्हायचे आणि पोटात उठलेला भुकेचा डॊंब ....  डॊळ्यासमोर भुमितीच्या आकृत्यांचा ऐवजी आईने केलेला सुग्रास स्वयंपाक नाचत असायचा.... अन मग एकदाची बेल वाजली की वही बंद करुन घराकडे धुम ठोकायची, ’तुम्हीच काढत बसा आणि तुम्हीच पुसत बसा त्या आकृत्या असं म्हणत" 
   
   मराठीचे पुरोहित सर आमचे वर्ग शिक्षक. खांदे नेहेमी ऊंच करुन चालायचे आणि एका संथ लयीत बोलायचे, मग त्यांच्या पाठीमागे त्यांची नक्कल करत चालायचं. त्यांच्यासारखच संथ लयीत बोलायच. बर हे सगळं आम्ही मैत्रिणी आळीपाळीने करायचो. घरात आज्जी गेली आणि त्या गडबडीत बाबा फी द्यायला विसरले, मी मराठीच्या तासाला बसायला टाळायला लागले. पुरोहित सरांच्या ते लक्षात आले, त्यांनी बोलावून सांगितले ..."फी सावकाश भर, पण तासाला बसत जा. तु हुषार आहेस, अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नकोस", त्या वेळेस किती रडले होते मी.

   सगळ्या विषयात चांगले मार्क्स मिळवणारी मी  गणिताच नांव काढलं की ’शुन्यावस्थेत’ च पोहोचायची.  पोटात भितीचा मोठ्ठा गोळा उठायचा. गणिताचा पेपर ज्या दिवशी मिळायचा, त्याचे मार्क बघून दिवसभर चेहेरा उतरलेला असायचा, वाटायचं छे, पहिल्यापासून या विषयाकडे निट लक्ष दिलं असतं तर ..... !!!  एक सुखद आठवण मात्र मनावर कायमची कोरली गेलीय....."त्यादिवशी शाळेत गेले नव्हते, तर संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी धावत घरी, अगं आज मराठीचे पेपर्स मिळालेत, तु हायेस्ट!!, पी. आर. कुलकर्णी सरांनी तुझा पेपरमधला ’आई’ निबंध वर्गात वाचायाला सांगितला, आणि कुणाला माहितेय, सीमाला !! सगळ्या चिमण्या चिवचिवत होत्या. हयाच पी.आर. सरांनी, तास चालु असतांना मी आणि सीमा गुपचुप "नाव, गांव, आडनांव, पदार्थ..." हा खेळ खेळत होतो, म्हणून दोघींनाही वर्गाबाहेर जायला सांगितले होते. बरं ही खेळायची टुम मीच काढली म्हणून सीमाने बोलणच बंद केलं होतं माझ्याशी, त्यादिवशी पेपर घेऊन सीमाच घरी आली होती आणि भांडणही मिटलं होतं दोघींच !!

   जिल्हा पातळीवरच्या चित्रकला स्पर्धेच बक्षिस मिळालं तेव्हा सातवीत होते, मग तो सर्व शिक्षकांबरोबर काढलेला फोटो, त्यासाठी उडालेली धांदल, कपडे तसे मोजकेच असायचे पण त्यातल्या त्यातही चांगला कुठला ? यावर किती वेळ घालवला होता. रशिदाने वाढदिवसाला भेट दिलेलं गळ्यातलं, कानातलं, अंगठी ही घातली होती ती अंगठी दिसावी म्हणून अगदी हात पुढे दिसेल असा ठेवला होता .... कांही तरी वेगळं म्हणून केसांचा सरळ ऐवजी तिरपा पाडलेला भांग !!

  आत्ता आयुष्याकडे मागे वळून बघतांना जाणवते .... त्यावेळीस गणितात जास्त मार्क मिळवले नाहीत म्हणून आयुष्याच्या गणितात कुठेही चुकले नाही किंवा चित्रकलेत खुप बक्षिसं मिळवलीत म्हणून मोठी चित्रकारही झाले नाही, पण आयुष्याची चौकट मात्र सुरेख रंगवली ... त्यातल्या रंगामध्ये कुठेही विसंगती नाही .... !!!

   हे असे सुंदर क्षण, ओंजळीतून निसटून गेलेत, किशोरदांच्या आवाजातली .....व्यथा ... खंत हळूहळू  आपल्याही मनात झिरपायला लागते. डोळ्यांच्या कडा उगाचच ओलावतात, आणि जगजीत सींगजीच्या आवाजातला दर्दभ-या ओळी परत मनात उमटायला लागतात ...

   "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो ...
   भले छिन लो मुझसे मेरी जवानी ...
   मगर मुझको लौटा दो बचपनका सावन ...
   वो कागजकी कश्ती, वो बारिश का पानी .... "

   परवा फवारे बघायला गेलो होतो. उंच उंच भुईनळ्यांसारखे उडणारे ते कारंजे, पांढरे शुभ्र, फेसाळ, मध्येच त्यात लाल, हिरवे, पिवळे रंग मिसळत होते, फ्लोरोसंट रंग....चमकणारे. ते तुषार अंगावर घेत होतो. पाठीमागे वळून बघितले तर रंगीबेरंगी फुगे, त्यांना हात लावला अन मनातली सगळी खंत गळूनच पडली, गुब्बा-यांसारखं मन हलकं झालं आणि इथून तिथे धावत सुटलं.  तिथेच भेटला चेहे-याला चित्रविचित्र रंगरंगोटी करून, स्वत:च दु:ख विसरून पोटासाठी जगाला हसवणारा जोकर. "बुढ्ढीके बाल" साखरेचा कापूस खाणारा तो "गोटुराम", आईला सोडून उंटावर बसवलय, म्हणून रडणारी ती "पिटूकली"

  ते उंच उंच उडणारे तुषार, ते फुगे, ते बुढ्ढीके बाल, सगळं तसचं होतं, तिथेच होतं !! आपल्या मनातच असतं हे बालपण, फक्त आठवणींची कुपी उघडायची आणि मस्त ’सुगंध’ घ्यायचा !!!

   किशोरदांच्या आणि जगजित सींगजीच्या व्यथित स्वराला आता मस्तपैकी रॉक म्युझिकचा ठेका आला होता. फवा-यांचे तुषार अंगावर घेऊन आम्ही परतत होतो, मनातल्या बालपणाचा सुंगध मनात दरवळत ठेऊन !!!

*********************************