RSS

Thursday, November 24, 2011

निशब्दाचे मौन

                                          
   डोळ्यातल्या पाण्याला आवरणे कठिण झाले होते रेवतीला, मन उद्विग्न झालं होतं.  तिने ठरवलं होतं आज बोलायचच याच्याशी सगळं मनातलं. तो प्रसंग आठवला की मनात विचारांची नुसती गर्दी होत होती.
  
   कालचा दिवस किती छान होता. खुप आनंदात होती ती. काल त्यांच्या सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त जेवण, स्पर्धा असे अनेक कार्यक्रम होते. त्यातल्या पेंटींगच्या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. अगदी सहज म्हणून, काहीही तयारी नसतांना. शिवाय परिक्षक पण बाहेरचे होते. तिच्या निसर्ग चित्राला पहिले पारितोषिक मिळाले. तिला खुप आनंद झाला होता. कुठलेही विशेष शिक्षण नाही, अभ्यास नाही, त्यासाठी खास वेळ देणं नाही, पण हातात ब्रश आणि रंग आले की कागदावर जी कांही अदाकारी उतरायची की बस्स!

   सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरांना सामोर जात बक्षिस घेतांना तिला परत लहान झाल्यासारखं वाटत होतं. मजा वाटत होती. बक्षिस घेऊन ती स्टेजवरून उतरत होती, सगळे टाळ्या वाजवत होते.  अचानक तिचं समीरकडे लक्ष गेलं, तो शांत बसला होता कुठेतरी हरवल्या सारखा. तिचा उत्साह उगीचच कमी झाला. "समीर...." तिने त्याच्या खांद्याला धरुन हलवलं, आणि भानावर आल्यासारखा तो टाळ्या वाजवायला लागला. "समीर तुला आनंद नाही झाला कां?, "नाही कसा, झाला ना", "पण चेहे-यावर तर दिसत नाहीये", "प्लीज रेवती परत तेच नको" असं म्हणून तो घरी परतला. तीचं मन उगीचच उदास झालं तीही घरी आली. हातातला तो बक्षिस मिळालेला पेंटींगच्या पुस्तकांचा संच तिने टिपॉयवर आदळला. आज याच्याशी बोलायचच, असा का वागतो म्हणून.....! उशीर झाला होता, जेवण झालच होतं, मग फ्रीजमध्ये कलींगड कापुन ठेवले होते ते तिने दोघांसाठी बाऊल मध्ये घेतले, डायनींग टेबलवर दोघंही शांतच होती, म्हणजे ती गप्प होती त्यांच न बोलणं नेहेमी प्रमाणेच.

   मागचं सगळं आवरून ती आली. आता जरा निवांत बोलायचच याच्याशी असं ठरवून, तर हा शांत झोपलेला....ऒठ घट्ट मिटून. त्याच्याकडे बघितलं आणि एखादं खोडकर मुल आईचे धपाटे खाऊन रडत रडत झोपी जातं, अन गालावर अश्रु तसेच सुकलेले असतात, त्या अश्रुंना बघुन आईला जसं गलबलून येतं तस तिला झालं. त्या घट्ट मिटलेल्या ओठांना कांहीतरी सांगायचय, पण नाहीच बोलत तो, तिने त्याच्या अंगावर पांघरुण घातलं, ती ही पडली पण डोक्यात विचार चालुच होते.  असा कसा हा? चेहे-यावर दु:ख, आनंद कसलेच भाव नाही. डोळ्यात पसंती-नापसंतीच्या छटा नाहीत. का हे असं ? कशासाठी हे हरवलेपण ? इतक छान व्यक्तिमत्व पण ही उदासी सगळ्या व्यक्तीमत्वावर दाट सावलीसारखी पसरलीय. 

   हे वागणं आजचं नाही, लग्न झाल्यापासुन ती बघत होती, हे असच...भाजीत मीठ कमी झालं तरी बोलायचं नाही की जास्त झालं म्हणून रागवारागवी नाही.  "अरे समीर, भाजीला मीठ कमी झालय बोलला नाहीस तू" ती वैतागून म्हणायची, "हो ग, मी लावून घेतलं, सांगायचं लक्षातच नाही आलं" ही असली थंड उत्तरं, तिचं अक्षरश: डोकं फिरायचं, रागारागाने दोन दोन दिवस बोलायचीच नाही, तरीही हा आपला कूल!!मग शेवटी हीच विसरुन बोलायची. अण्णा, त्याचे वडिल त्यांच्या लग्नाच्या अगोदरच सहा महिने गेले होते, त्याची आई मोठ्या भावाकडे असायची, कधी गेलेच त्यांच्याकडे तर आईच्या पायावर डोके ठेऊन हा खुप वेळ नमस्कार करायचा, उठायचाच नाही, सगळे हसायचे...आई शेवटी म्हणायची "अरे समीर, पुरे, किती वेळ नमस्कार करतोस" त्याला काहीतरी हवं असायचं आईकडून पण कधी बोलायचा नाही. कार मध्ये बसला की पहिल्यांदा ते गाणं लावायचा ....

                      भरजरी ग पितांबर दिला फाडून
                      द्रौपदीसी बंधु शोभे नारायण...
                        
                      प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
                      जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
                      रक्ताच्या नात्याने उमजेना प्रेम
                      पटली पाहिजे अंतरीची खूण ....

   हे कडवं एकदा, दोनदा, परत परत ऐकायचा. शेवटी ती रागाने म्हणायची ... "समीर, किती वेळ ऐकतोस तेच तेच कडवे. कंटाळा कसा येत नाही तुला". एकदा त्याच्या मित्राच्या लग्नाला जाणार होते ते, तिने नविन घेतलेली जांभळी म्हैसूर सिल्क नेसली त्यावर मोत्याचा सर, आरशातल्या स्वत:च्याच प्रतिमेवर खुश झाली होती ती. "समीर साडी चांगली दिसतेय नां? की जास्त भपकेबाज वाटते", "नाही वाटत भपकेबाज", "पण मला शोभतोय कां हा रंग?" "रंगातलं काही कळत नाही बघ मला" बस्स एवढाच संवाद. रिसेप्शनच्या हॉलवरती सगळ्याच्या कौतुकाच्या नजरा झेलतांना समीरच्या वागण्याची बोच आणखीनच तिव्र झाली होती. कां हा असा अबोल, कांहीतरी मनात आहे पण बोलत नाही, धुमसतो नुसता मनातल्या मनात. त्याच्या दोघी बहिणी, दोघं भाउ किती भरभरुन बोलत असतात, खळखळून हसतात. त्यांची बडबड, एकमेकांमधलं प्रेम, सगळे एकत्र जमले की गप्पांना नुसते उधाण आले असते. पण हा नेहेमी गप्पच. ती अगदी काकुळतीने विचारायची, "समीर अरे काय आहे तुझ्या मनात? सगळं आहे ना आपल्याकडे, कशाला कमी नाही, मग कसली कमीपणाची भावना आहे तुझ्यात? तर नुसता हसायचा म्हणायचा.."काय बोलाव कळतच नाही." तिला उगीचच वाईट वाटत रहायचं.

   आताही तिने त्याच्याकडे बघितलं झोपेत ओठ तसेच घट्ट मिटलेले, या घट्ट मिटल्या ओठांच्या आत काय सोसतोय हा ? किती बोलतं केलं तरी बोलतच नाही. त्याच्या चेहे-याकडे बघून त्याचा थकवा जाणवला, किती पटकन झोपतो हा, सकाळी ऑफिससाठी म्हणून साडेसातला बाहेर पडतो घरी यायची वेळ ठरलेली नाही.  पण कधी कुरकुर नाही. घर सगळ्या सुविधांनी भरलेलं, गेल्याच वर्षी सगळे देश फिरुन आले होते ते. नकळत तिने त्याच्या अंगावरचे पांघरूण निट केले. मनातल्या भांडणाला मिटवून, जाऊ दे असाच हा अशी मनाची समजूत घालून. केव्हातरी खुप उशीरा झोप लागली तिला.

   मध्यंतरी त्याने एक छंद लावून घेतला होता, ताईंच्या आश्रमशाळेत जायचा. आश्रम शाळेतली ही मुलं ए्ड्सग्रस्त होती. मुलांची संख्या दिडशेच्या वर  होती. या मुलांना ताई आईच्या मायेने सांभाळत होत्या. त्यांच संगोपन, संवर्धन त्यांना डॉक्टरी उपाय उपलब्ध करुन देणे, आश्रम चालवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे, सगळ्यांसाठी अपार कष्ट करायच्या, बरं हे सगळ आपला संसार सांभाळून करत होत्या.  जी मुलं आपली नाहीत त्यांना मायेची पाखर देणा-या ताई आणि त्यांचं कार्य त्याला आवडायचं, सुट्टीच्या दिवशी तिथे जायचं, मुलांच्या सहवासात दिवस घालवायचा, आश्रमाला जास्तीत जास्त आर्थिक मदत करायची, आणि बाहेरुनही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. ताईंच्या विषयी त्याच्या मनात अपार श्रद्धा होती. नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात, देशात फिरस्तीवर असला की आवर्जून आश्रम शाळेतल्या मुलांसाठी खाऊ, खेळणी आणायचा. प्रोजेक्टच्या निमित्ताने बाहेरच्या देशात गेला की तिथला मिळणारा सगळा पगार तो आश्रमासाठीच द्यायचा. 

   शाळेच्या कामात व्यस्त असलेल्या ताईं त्याच्याशी क्वचितच बोलायच्या, त्याच्या अबोल स्वभावाने तो ही आपणहून कधी त्यांच्याशी बोलायला जायचा नाही.  आपण बरं की आपलं काम बरं अस असायचं त्याचं. पण ताईंविषयी त्याच्या मनात खुप आदर होता. मध्यंतरी ताई शाळेच्या कामानिमित्त बाहेरच्या देशात गेल्यात. त्या परतुन आल्या आणि रेवतीला आश्रमशाळेतून एक फोन आला, ताईंनी समीरला भेटायला बोलावले आहे असा निरोप होता. तिला आश्चर्य वाटले. दोघही संध्याकाळी भेटायला गेलेत. ताई वरच्या हॉलमध्ये आहे असे समजले मग दोघही वरच गेलीत. ताईंचं हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व, त्यांना बघितलं, भेटलं की सगळा शिण निघुन जायचा !! आजही त्यांना भेटल्यावर मन प्रसन्न झालं. दोघही शांतपणे बसलीत. ताई बोलत होत्या...."समीर तू आश्रमशाळेसाठी आणि मुलांसाठी खुप कांही केलं आाहेस, आणि करत असतोस, इथे अनेक जण मदतीचा हात घेउन येतात, पण त्या सगळ्यांमध्ये तुझा शांतपणा, समंजसपणा, पारदर्शी स्वभाव सगळं मला आवडतं. मी शाळेच्या कामासाठी बाहेर गेले होते, अचानक मला तुझी आठवण झाली, तुझ्यासाठी एक भेटवस्तु आणलीय. शांत बसलेल्या समीरच्या चेहे-यावरच्या रेषा झरझर बदलत होत्या....डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं होतं, मन सुखावलं होतं त्याचा आनंद चेहे-यावर दिसायला लागला होता, रेवती हे सगळं चकित नजरेने पहात होती. समीर ताईंना नमस्कार करण्यासाठी वाकला आणि ताईंनी त्याच्या पाठीवर आईच्या मायेने हात फिरवला .... त्याच्या डोळ्याचा कडा पाणावल्या, पुरुष होता तो पण काय होत होतं त्यालाच समजत नव्हतं, ... लहान मुलासारखे ... भेटस्वरुपात मिळालेलं ते काळ्या डायलच घडयाळ हृदयाशी घट्ट धरून, त्याचे डोळे पाझरत होते .... ओठांच्या कोप-यात हसु उमटलं होतं ... आज निशब्द अवयवांच मौन सुटल होतं.

   गाडीत बसल्यावर तो बोलत होता आवेगाने ....... भरभरून .... आज रेवती त्याला अडवणार नव्हती.  आज इतक्या वर्षांनी त्याच्या निर्जिव डोळ्यात एक वेगळीच चमक बघितली होती. आज शब्दांच्या धबधब्यात ती न्हाऊन निघणार होती.  तो बोलत होता .....!!

   मी सात वर्षांचा होतो तेव्हा .... मला खुपसं नाही आठवत, पण थोडं थोडं आठवतयं .... माझ्या कपाळावर गंध, अक्षता लावल्या होत्या, मोत्याच्या माळा बांधल्या होत्या. जे खुप मोठयाने बोलायचे, जोरात तपकिर ओढायचे, ज्यांच्या आवाजाने मी खुप बिचकायचो त्या मामांच्या मांडीवर मी बसलो होतो. बॅन्डबाजाच्या आवाजात माझ्या आणि दादाच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. दागिने घातलेल्या, छान छान साड्या नेसलेल्या आत्या आणि मामी आजुबाजुला वावरत होत्या. माझे आणि दादाचे गालगुच्चे घेत होत्या, त्यांचे बोलणे कानावर पडत होते, "काय गोड दिसत आहेत दोन्हीही बटु .... हा धाकटा समु तर कसला गुळांबा दिसतोय ... शांताक्का मुंज तुमच्या हातून लागली म्हणजे हा आता तुमचा झाला.  मला तर खुप झोप येत होती. आईच्या कुशीत जाऊन झोपावसं वाटत होतं.  मी झोपेतून डोळे उघडले तर शांताआत्येच्या कुशीत होतो, मी रडायला सुरुवात केली, परत शांताआत्येच आली समजवायला. ती अशी सारखी जवळ जवळ कां करत होती समजतच नव्हते. घरात सगळे माझ्याविषयीच कांहीतरी बोलत होते. आजी, नाना, अण्णा, आईला समजावत होते, ती सारखी रडत होती.

   सकाळी उठलो तेव्हा मी गाडीत होतो.  "पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया" असं म्हणत झाडांना मागे टाकून पुढे पळणारी गाडी लहान मुलांना खुप आवडते, पण माझं त्या पळणा-या झाडांकडे लक्षच नव्हतं, कारण या प्रवासात माझे आई-अण्णा नव्हते. मामा आणि शांता आत्येबरोबर मी कुठेतरी चाललो होतो. कुठे? मी नाही विचारले आत्येला. मला खुप रडावेसे वाटत होते, पण मामांकडे लक्ष जाताच मी भिऊन गुढघ्यात डोके खुपसून बसलो होतो. माझ्या गप्प रहाण्याची ती पहिली सुरुवात असावी.

   आम्ही अमरावतीला पोहोचलो. मला तिथल्याच शाळेत टाकले. आई अण्णांच्या आठवणींनी रात्री उशी भिजायची. पण सकाळी उठलो की एकदम गप्प गप्प. आत्येजवळ कधी हट्ट धरला नाही की मला आई कडे जायचं म्हणूंन की मामांशी कधी बोलायला धजावलो नाही.  ओठ घट्ट मिटून आतल्या आत आवंढे गिळायचो.

   थोडा मोठा झाल्यावर समजले ..... शांता आत्येला मुलबाळ नव्हते, अण्णांच्या पाच बहिणींपैकी ही सर्वात धाकटी, अण्णांची लाडकी, अण्णांना तिचं दु:ख बघवत नव्ह्तं, मग आजी, नानांनी आणि अण्णांनीच हा विषय आईजवळ काढला होता. दादाचा जन्म अण्णांच्या लग्नानंतर पाच वर्षांनी, तो ही नवसासायासांनी झाला होता, तो दोघांचाही जीव की प्राण, खुप लाडका, त्यानंतर मी, माझ्या पाठीवर दोघी बहिणी, आणि धाकटया दिनूचा तर अजून जन्म व्ह्यायचा होता. मग आत्येला द्यायला मीच होतो, आईला खुप समजावल्यावर ती तयार झाली होती, पण सारखी डोळे पुसत होती. मधलं असणं इतकं वाईट असतं हे त्यावेळी समजलं नव्हतं, पण त्यानंतर आयुष्यभर हे मधलेपणाचं दु:ख मनात बाळगून जगत होतो.

   माझी रवानगी शांता आत्येबरोबर झाली होती. काळ सगळ्या गोष्टींवर औषध असतं. आत्ये माझ्यावर खुप प्रेम करत होती.  ज्याच्याबद्दल खुप भिती वाटायची ते मामाही आता जवळचे वाटायला लागले होते. हळूहळू मी अमरावतीच्या जीवनात रुळत होतो. अचानक एक दिवस खुप ताप भरला. ताप उतरतच नव्हता, आणि तापात मी आईची सारखी आठवण काढायला लागलो. डॉक्टरांकडे जाऊन चेकींग केल्यावर त्यांनी टॉन्सील्सचा त्रास असल्याचे सांगितले. मामांनी लगेचच ऑपरेशन करायचा निर्णय घेतला.  ऑपरेशन अमरावतीला, आई अण्णा जळगांवला. ऑपरेशनच्या भीती पेक्षा आता मला आई भेटणार याचाच खुप आनंद झाला होता.  मी आईची वाट बघत होतो. आईला मी घट्ट मीठी मारणार होतो. ऑपरेशन टेबलवर जातांना मी ’आई आई ’ असच बडबडत होतो.  ऑपरेशन छोटसच होतं. मी गुंगीतुन अपार उत्सुकतेने डोळे उघडले, मला वाटलं आई आली असेल, पण नव्हती आली आई !! मामांनी त्यांच्या नेहेमीच्या मोठया आवाजात मला सांगितलं, "बघ समीर आई आली नाही म्हणून काय झालं, तुझी आत्या आहे नां तुझ्याजवळ", मामांचा सांगण्याचा हेतू एवढाच असेल की आत्याचं तुझ्यावर खुप प्रेम आहे. पण त्याहीपलीकडे, माझं ऑपरेशन होउन देखिल आई मला भेटायला आली नव्ह्ती या दु:खाचा ओरखडा मनावर खोल उमटला गेला आणि मी आणखीनच अबोल झालो. नंतर समजलं, दादाला कांजिण्या झाल्या होत्या, त्यामुळे तिला येता आले नव्हते. पण तोपर्यंत त्या ओरखडयाचा व्रण झाला होता.
  
    मी अमरावतीलाच राहिलो असतो तर आता जो आहे त्यापेक्षा कदाचित वेगळा घडलो असतो.  पण नियती नावाची गोष्ट असते नां. मामांची बदली जळगांवला झाली. अण्णांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाला धरुन, आत्येला त्यांच्याच वाडयात रहायला बोलावले. यात आत्येवरच प्रेम तर होतच पण आपला मुलगा डोळ्यासमोर राहिल हादेखिल विचार होता. इंग्लीश सी आकाराचा वाडा, मधल्या खोल्यांमध्ये भाडेकरी, आणि समोरासमोर आम्ही आणि आई-अण्णा, माझी भावंडं.  मामांच्या मनात काय होते माहित नाही पण जळगांवला आल्यापासून त्यांनी माझा राहणीमानाचा थाट आणखिनच वाढवला होता. टेरिकॉटचे नवनविन कपडे, शाळेत सोडवायला सायकल रिक्षा. खरं तर शाळा खुप जवळ होती. माझी सगळी भावंड पायीच जायची पण मामांच्या स्वभावाला औषध नव्हते एवढे खरे.  मधल्या सुट्टीत आम्ही मुलं घरी यायचो. आत्येने पोहे नाही तर उपमा करुन ठेवलेला असायचा.  माझी सगळी भावंड धावत घरी यायची, धावल्यामुळे त्यांना खुप भुक लागलेली असायची, मग रात्रीच्या पोळ्या, तीळाची चटणी, खाराच्या मिरच्या जोडीला पातीचा कांदा आणि अण्णांनी मुळा आणि त्याचा पालाही स्वच्छ धुवुन ठेवलेला असायचा.  मी एकटाच जेव्हा घरात कंटाळल्यासारखे मटार पोहे खात असायचो त्यावेळेस ती सगळी एकमेकांशी मस्ती करत, एकमेकांना ढकलत त्या शिळ्या पोळ्यांवर ताव मारत असायची. मध्येच त्यांचे हसण्याचे आवाज, ए तू जास्त चटणी घेतली म्हणून आरडाओरडा, मला मुळा अजून हवाय म्हणून अण्णांकडे केलेला हट्ट. मलाही त्यांच्यात मिसळून भांडणं करायची असायची, चटणीचा, मिरच्यांचा वास मलाही बोलवायचा.  मी जरा बाहेर डोकावलो की मामांचा आवाज मोठा व्हायचा .... "समीर ते पोहे संपवायचे आणि शाळेत जायचय ... अरे मटार किती महाग होते, पण तुला आवडतात म्हणून आणलेत खास !! हे शेवटचं वाक्य आणखीन मोठयाने, समोर ऐकु जावं म्हणून.  माझे ते थाटमाट बघितले की सगळी भावंडं माझ्यापासून उगाचच बिचकून लांब लांब रहायची. 

   आई एक दिवस येउन आत्येला म्हणाली, "शांता वन्स, तो लहान आहे, मुलांमध्ये जेवायला, खेळायला पाठवत जा त्याला, हल्ली खुप उदास दिसतोय, आणि बोलत देखिल नाही अजिबात, तब्येत तर बरी आहे ना त्याची" हे सगळ ऐकलं आणि मामांनी दत्तक विधानच करायचे ठरवले. माझं नांव बदलणार....!! माझ्या अण्णांच्या जागी मामांच नांव लागणार .... मला जास्तच घुसमटल्यासारखं झालं. आणि फणफणून ताप भरला.  तापाच निदान होत नव्हतं आणि ताप उतरतही नव्हता.  तापात मी बडबडत होतो ... "अण्णा, आता मी मरून जाणार, मी माझं नावच पुसून टाकणार आहे". अण्णांनी ते ऐकलं आणि म्हणाले, "बाळासाहेब, दत्तक देण्याच्या बातमीमुळे त्याने ताप काढलाय, त्याच्या मनावर परिणाम होत असेल तर नका करु दत्तक विधान, असाही आम्ही त्याला तुम्हाला दिलेलाच आहे.  तापातही अण्णांचे ते शब्द ऐकलेत आणि माझ्या अण्णांना मिठी मारुन मी खुप रडत होतो, त्यांचा पाठीवरुन मायेने फिरणारा हात खुप कांही सांगून जात होता.

   जळगांवच्या घरात असतांना घडलेले अनेक प्रसंग माझ्या मनावर परिणाम करत होते. संध्याकाळी मी बाहेरच्या खोलीत गृहपाठ करीत असायचो. ओटयावर आई बसलेली असायची. मग दादा तिच्याजवळ टिप घालायला सदरा आणि सुईदोरा आणून द्यायचा. तिच्या गोड आवाजात ती गाणं म्हणायची, मध्येच सद-याला टाके घालायची, मध्येच मांडीवर निजलेल्या दादाच्या केसांमधून हात फिरवायची. मला ते गाणं अजुनही आठवतं.....

         "भरजरी ग पितांबर दिला फाडून...
         द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ...

   मलाही तिच्या मांडीवर असच झोपायचं असायचं, असच गाणं म्हणत तिने माझ्याही केसातून हात फिरवावा असे वाटायचे. एकदा असाच घेऊन गेलो तिच्याकडे शर्ट शिवायला, तिच्याजवळ बसलो आणि हळूच तिच्या मांडीवर डोकं टेकवलं, म्हटलं, "आई, माझ्यासाठी पण म्हण ना ग ते गाणं, दादासाठी म्हणते ते, एखादीच ओळ म्हटली असेल तिने, तेवढयात मित्रांमध्ये खेळणारा दिनू पडला असं सांगत त्याचे मित्र आलेत, माझं डोकं खाली ठेवून ती धावत दिनूला बघायला गेली. मी मात्र त्या दगडी ओटयावर डोकं टेकून निश्चल झालो होतो, त्या दगडासारखा ! मामांच्या नेहेमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी मोठमोठयाने बोलायला सुरुवात केली..." समीर, फाटलेला शर्ट घालायचा नाही, मग आत्याला सुचना, ’तो सदरा बोहारणीला दे आता’ आणि त्याच दिवशी माझ्यासाठी दोन नविन सदरे घरात आले होते.
  
      मामांनी मला त्यांचं सोन्याचं पेन दिलं होतं वापरायला. कसं कुणासठाऊक ते हरवलं. मामांना समजल्यावर ते शाळेत आले, मोठमोठयाने चौकशी करत होते. मला खुपच घाबरल्यासारखे झाले होते. माझ्या दंडाला आवळत ते ओरडले .... कुठे टाकलस पेन, असं म्हणत त्यांनी माझ्या गालावर जोरात मारले. किती थरथर कापत होतो मी तेंव्हा!! ते भय अजुनही मनात तरळतयं. मला दादाचं ते पळणं, धावणं आठवतं, दादा रोज अण्णांच पेन पळवायचा, अण्णा त्याला भरपूर शिव्या घालायचे, कधी कधी तर बदडून काढायचे, मग तो वाडयात पळायचा, दुस-या दिवशी परत त्याने अण्णांचा पेन घेतलेलाच असायचा.  मी त्याला विचारायचो, "दादा, तुला भीती नाही कां वाटत अण्णांची? तो म्हणायचा, "छे रे, अरे रागावले तर रागावले, माझेच आहेत ना ते, आणि मी पेनला हात नाही लावला तर त्यांनाच वाईट वाटेल". मी तर ते सोन्याचं पेन हरवल्यापासून मामांच्या कुठल्याच वस्तूला हात लावायला धजावत नव्हतो.

   समीरने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. सीट वर मागे डोके टेकवून तो बोलतच होता.... भरभरुन.... "माझी आई चुक होती असं नाही ग, तीच्या पाठीमागे चार मुलांचा व्याप होता, घरात सततचे पाहुणे, नणंदांची बाळंतपणं, या सगळ्या व्यापात ती इतकी मग्न असायची, तिला वाटायचं, मी शांता आत्येकडे किती सुखात आहे. मीच वेडा तिच्या सहवासासाठी आसुसलेला असायचो. रेवती, आता घडलेले ते दोन प्रसंग ...

   मी प्रोजेक्टसाठी कोईमतुरला तिन महिन्यांसाठी जाणार होतो, नुकतच सायलीचं लग्न झालेलं, तीच्या जाण्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली होती, त्यात मी ही बाहेर जाणार, तु एकटीच रहाणार, मला तर काहीच सुचत नव्हतं, आईला किती विनवलं, ये ग रहायला, पण नाही आली. आणि सर्वात मोठा सल... माझ्या मनातून न जाणारा, सायली डॉक्टर झाली, माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न पुर्ण झालं, घरातली पहिली डॉक्टर!! आभाळाला हात टेकल्यासारखे झाले होते. तिने दवाखाना काढला, दवाखान्याच्या उद्घाटनाला सगळ्यांना बोलावलं, पण गणपती जवळ आलेत म्हणून नाही आले कोणी, दादा सोडून, आईला तर किती विनवण्या केल्यात, अग आपल्या गाडीने जात आहोत, सकाळी जाऊन रात्री परत यायचय, चल ग, पण प्रवास झेपणार नाही म्हणुन नाही आली, खुप खुप वाईट वाटलं होतं, इतका आनंदाचा क्षण, पण फक्त तू आणि मी दोघच होतो.  तरीही मनाची समजूत घातली होती, खरच झेपत नसेल तिला प्रवास, पण तीच आई दादाच्या मुलांची घरं बघायला, दिनूच्या वास्तुला, बहिणींबरोबरच्या ट्रिपला सगळीकडे जातेय म्हटलं की तिच्या न येण्याचा सल टोचतच राहतो, आणखीनच घट्ट होत जातो. माझे शब्द आणखीनच हरवत जातात.

   माझी कुणाविषयीच तक्रार नाही. आत्येला मुल नव्हतं, तिने मला एखाद्या अनमोल वस्तु सारखे सांभाळले, तिला मी म्हणजे जपून ठेवण्यासारखी वस्तू वाटत होती. आपण रागावलो आणि हा आईकडे निघून गेला तर, या धास्तीने ती माझा सांभाळ करत होती.  मग मुलांना वाढवण्यात जी नैसर्गिकता असते... त्या मुलाच्या यशाचं कौतूक, प्रसंगी त्याच्या चूका खंबीरपणे दाखवून वेळ पडली तर चार धपाटे घालायचे असं काही घडलच नाही माझ्या बाबतीत. मला एखाद्या शो पीस सारखं वाढवलं गेलं असच वाटतं मला. आईला तर वाटायचे माझा समीर आत्याकडे किती मजेत रहातोय.

   लग्नानंतरचा तो दिडखोलीतला संसार. त्यात मामांची अधिकार गाजवण्याची वृत्ती, तुझा महत्वाकांक्षी स्वभाव, त्यातुन उद्भवणारे असंख्य वादविवाद!! कदाचित त्यांना वाडयातलं घर सोडायला सांगितले नसते तर नसते आले ते मुंबईला, त्यांना रहायला घर नव्हतं, माझ्याशिवाय कोण होतं त्यांना, म्हणून आले ते मुंबईत, जागे अभावी होणा-या वादविवादात ना आपण लग्नानंतरचं आयुष्य मनमोकळेपणाने जगू शकलो, ना त्यांना सांभाळण्याचं कर्तव्य मी पुर्ण करू शकलो ..... कां कुणास ठाऊक सगळ्या बाजूंनी अपूरा, अर्धा भासणारा मी..!!!

   खुप प्रसंन्न हसणारी, लांब केसाची वेणी घालणारी, गोड आवाजात गाणी म्हणणारी माझी आई ! तिचा हात माझ्या पाठीवर मायेन फिरावा म्हणून मी तिला कितीवेळ नमस्कार करायचो, तुम्ही सगळे हसायचे मला !! माझ्यावर जीव तोडून प्रेम करणारी माझी आत्ये !, किंचित स्वार्थी, .. समीरचा सांभाळ आपण करतोय, मग वाड्यातले हे घर आपल्याला मिळायला काय हरकत आहे, किंवा समीर आपली म्हातारपणाची काठी होईल, अशा विचाराचे मामा !! माझे भोळेभाबडे प्रेमळ अण्णा !! सगळेचजण आपापल्या जागी बरोबरच होते. मलाच काय झालं होतं समजत नव्हतं, पण माझी घुसमट होत होती एवढे मात्र खरे.

   सहवासाचे प्रेम आईकडून मिळाले नाही म्हणून माझ्या मनाचा इतका कोंडमारा झाला, ज्यांना आई-वडिलांचं छत्रच नाही, आणि ते हिरावलं जातांनाही एक भयानक व्याधी देऊन या अफाट जगात त्यांना एकटं सोडून जाणारे त्यांचे आई-वडिल. समोर उभा ठाकलेला त्यांचा मृत्यु त्या जीवांना माहित आहे. बालपण हरवलेली ती मुलं आणि त्यांच्यावर आईच्या मायेची पाखर घालणा-या ताई!! सगळ्याची माऊली!! त्यांनी  दिलेल्या भेटवस्तूने, त्यांच्या मायेच्या स्पर्शाने आज ईश्वरी स्पर्शाचा अनुभव मिळाला. मी त्या मुलांना आधार देणार आहे, त्यांच्यासाठी खुप काही करायची इच्छा आहे, त्यांच शिक्षण, त्यांच संगोपन, त्यासाठी लागणारा निधी सगळ्यात मला सहभागी व्हायचय, प्रोजेक्टच्या निमित्ताने  मिळणारा अतिरिक्त पैसा या मुलांच्या कल्याणासाठीच वापरायचा आहे, त्यांच्यासाठी वाचनालय, त्यासाठीची चांगली वाचनिय पुस्तकं, संगणकाच शिक्षण, त्यासाठी लागणारे संगणक, मनामच्ये खुप कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी, रेवती मला तुझी साथ हवी आहे, खुप बोलावसं वाटतं पण शब्दच हरवलेले असतात. मला समजून घे, प्लीज!!

   आयुष्याच्या पटावर जमा झालेले काळे ढग केव्हाच विरले होते. रेवती समीरच्या पाठीवरुन हात फिरवत होती, आज एका निशब्द अवस्थेचं मौन सुटलं या आनंदात !!!

                                        ********************************