RSS

Tuesday, March 22, 2011

तेरे फुलोंसे भी प्यार तेरे कांटोसे भी प्यार....!!!!

"तेरे फुलोंसे भी प्यार, तेरे कांटॊसे भी प्यार.....
जो भी देना है दे दे करतार, दुनियाके तारनहार....
चाहे सुख दे या दु:ख, चाहे खुशी दे या गम.......
मालिक जैसे भी रखेंगे वैसे रह लेंगे हम............
चाहे हंसी भरा संसार दे, या आंसुओकी धार...........!!!!

गाण्याच्या ओळी कानावर पडत होत्या. कुणाला दाद द्यायची....? लताच्या मधाळ, हृदयस्पर्शी आवाजाला, सी. रामचंद्रांच्या कर्णमधुर संगीताला की कवी प्रदीपच्या व्यथित करुन सोडणा-या शब्दांना??? लताचा मधुरतम आवाज निशब्द....दूरदूर क्षितिजापर्यंत पोहोचलेल्या सागरावर विहार करणा-या संथ नौकेसारखा मनात शिरत होता....एक नादानुसंधान तयार झाले होते....निश्चल उभारलेला "तो", त्याच दर्शन घेणारा कुणीतरी "मी" आणि डोळ्यासमोर दिसणार "विश्व" लय पावल होतं.....त्रिपुटी संपली होती....वाटत हाच तो "क्षण" असावा "ब्रह्म अनुभव दे रे राम" अस आर्तपणे आळवणा-या कुणीतरी त्याला पुसटसा त्या अनुभवाचा "स्पर्श" देणारा....!!!

आश्रमात गर्दी उसळली होते. आज माघ शुद्ध पंचमी. कालची माघी गणेश चतुर्थी आणि आजची पंचमी...दोन दिवस आश्रमात नुसत उत्साहाला उधाण असत. आज पंचमीचा प्रसाद घेउन सगळे आपापल्या घरी परतणार. इतकी गर्दी होती पण सगळ शिस्तीत आणि शांततेत सुरु होतं. प्रसादाची रांग सुरु झाली की मग जुन्या हिंदी गाण्याच्या सी.डी. लावल्या जातात. आताही लताचे गोड सुर कानावर पडत होते......भान हरवल्यासारखे होत होते. आम्ही दोघही रांगेत उभे होतो...क्षणभर मागे वळुन बघीतलं...आणि धस्सच झालं.....ब-याच लांब अंतरावर "श्रीया" उभी होती तीच्या दोघी मुलींना घेउन. दोघीही मुली वयाने तशा लहानच...पण उंच शिडशिडीत...तीच्या खांद्याच्याही वर पोहोचणा-या. एक नववीत, तर दुसरी सातवीत....दोघींनीही केसांचे फ्लिक्स कापुन मागे उलटे वळवलेले....त्या बटा मध्येच कपाळावर झेपावायच्या...मग त्यांना हाताने पाठीमागे वळवायच.....श्रीयाच्या कानात दोन्ही बाजुंनी काहीतरी कुजबुजत होत्या. मी पटकन माझी नजर दुसरीकडे वळवली. तीला भेटाव असं वाटुनही भेटले नव्हते म्हणुन....? की माझ्यात धैर्य नव्हत तीला भेटायच म्हणुन...? परत एकदा मागे वळुन डोळ्यांच्या कोप-यातुन हळुच तीला बघितल, आणि भरकन मान पुढे केली...मला तीच्याकडे बघणही शक्य नव्हत....भेटण तर फारच दुर.....!! पण तरीही मनाशी नक्की ठरवल होतं की हा सगळा कार्यक्रम संपला की निवांतपणे तीला भेटायच....तीच्याशी बोलायच...सगळ धैर्य एकवटुन....!!

शरिराने असकार केला तरी मन कधीच तीच्या आठवणीत बुडाल होतं. तस तीचं माझं नातं नव्हतच मुळी आणि ती माझी मैत्रीणही नव्हती. माझा धाकटा दिर..सुजय, त्याच्या मित्राची हर्षदची ही बायको. सुजय औरंगाबादला असायचा. एकदा त्याचा फोन आला......"वहीनी, माझा मित्र आणि त्याची बायको मुंबई बघायला यायच म्हणताय, त्यांची रहाण्याची व्यवस्था नाहीय कुठे.....तुमच्याकडे आलोत तर चालेल का? नेहेमीच्या स्वभावाप्रमाणे स्वत:ला काय त्रास होइल याचा विचार न करता मी पटकन होकार दिला. मग सुजय धाकटी जाउ, त्यांचा मुलगा..सुजयचा मित्र हर्षद, त्याची बायको आणि दोन मुली!! सगळे माझ्याकडे उतरले होते. माझी नोकरी....त्यात सगळे रहायला...कसं केल होतं कुणास ठाऊक? मी नुकताच पंजाबी डीशेश चा क्लास केला होता मग सगळ्यांसाठी नवरतन कुर्मा....पंजाबी सामोसे, खुप मजा आली होती. तीच्या या दोन्ही मुली तर खुप लहान होत्या. मोठी "डिंगी" आणि धाकटी "सीमू"...देवयानी अन सीमरन. सीमू नुकतीच पोटावर सरकत रांगायला शिकली होती. सगळ्या घरभर पोटावर सरपटत दिसेल ती वस्तु तोंडात घालुन तीने जी धमाल उडवली होती. आम्ही सगळे तीच्यापाठी धावत होतो....अग अग हे घातल तोंडात.. अग अग ते घातल तोंडात अस चालल होतं. चार दिवस ते माझ्याकडे होते....मग आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढलेत. सगळा गोंधळ...नंतर आलेला प्रचंड थकवा...थोडासा रागही देउन गेला होता....काय बाई लोकांकडे इतक का रहायच... पण सुजयने ’आम्ही येउ का अस विचारुनच ते सगळे आले होते रहायला’, नाही म्हणण्याचा अधिकार होता मला, तेव्हा असं रागावण योग्य नाही असं मनाला समजावून मी तो विचार मनातुन काढुन टाकला होता.

कुठलही नातं नसतांना, मैत्री नसतांना, तीच्याशी ओळख झाली ती अशी. ती ही माझ्या अगत्याने भारावुन गेली होती. मग केव्हाही भेटली की आवर्जुन गप्पा मारायची. त्या चार दिवसांच्या सहवासाने आम्हाला एका अनोख्या नात्याच्या बंधनात बांधुन टाकल होतं. ते आमच्याकडे रहायला आले होते त्यावेळेस एक दिवस सगळ्यांना घेउन आम्ही या आश्रमात आलो होतो........आणि हर्षदला इथल सगळच आवडलं होत.......मंदिर....आश्रम....इथे चालणारे उपक्रम.....साजरे होणारे चार उत्सव!! तो सगळ्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घ्यायला लागला. आश्रमाचा कार्यकर्ताच झाला तो. आम्हा सगळ्यांना या आश्रमाने, तीथे साज-या होणा-या उत्सवांनी एका सुत्रात बांधुन ठेवल होतं, त्या निमित्ताने आमच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. श्रीयाच वागणं, बोलणं, दिसणं सगळच मला आवडायला लागल होतं. उंच शिडशिडीत बांध्याची, आश्रमाच्या कार्यक्रमाला हमखास काठपदराच्या कॉटनच्या साडया नेसुन यायची. कपाळावर लक्ष वेधुन घेइल एवढी मोठी टिकली लावायची....खुप गोड दिसायची तीच्या चेहे-याला ....मी तीला एकदा म्हटलं होतं, "श्रीया, फार मोठी टिकली लावतेस ग तु, छान दिसते तुला पण आता फॅशन गेलीय"....तर हसत म्हणाली होती, "तुमचे हर्षद भावजी दिसले पाहिजेत ना कपाळावर....ठसठशीत.....अन मग हसत होती....प्रसंन्न व्यक्तिमत्वाची, क्षणोक्षणी हसणारी......ईश्वरावर नितांत श्रद्धा असणारी.....सगळं त्याच्या इच्छेने घडतय अस मानणारी...खुपच वेगळी, मनस्वी....कार्यक्रम संपला की निघतांना सुटसुटीत पंजाबी ड्रेस घालुन आणखीन छान दिसणारी.

मधल्या काही वर्षात त्यांच येणं एकदमच बंद झाल......सुजय कडुन समजल....हर्षदला सिंगापूरला नोकरी मीळाली. ब-याच वर्षांनी ते सगळे एका कार्यक्रमाला आलेत आणि मी चकीतच झाले....हर्षदची तब्येत छान झाली होती म्हणजे मस्त सुटला होता. सुखवस्तु वाटत होता. देवयानी आणि सीमरन मोठया झाल्या होत्या आणि श्रीयाच्या कडेवर एक छोटस पिल्लु होतं.......खुप अंतराने झालय अस वाटत होतं. मी विचारल देखिल, "काय श्रीया....हे कॅलेंडर कधी........?? मला ती शोभा वहीनी हाक मारायची......म्हणाली "शोभा वहीनी, खुप बोलायच तुमच्याशी, हा कार्यक्रम संपला की निवांत बसु जरा गप्पा मारत. मी पण हो म्हटल. त्या दिवशीच्या कार्यक्रमाच नियोजन आमच्याकडे होतं, त्यामुळे मी आणि हे कार्यक्रमात व्यस्त होतो आणि हर्षदजवळच्या छान कॅमे-यामुळे त्याला कार्यक्रमाचे फोटो काढण्याचे काम मिळाले होते.....तो भराभर फोटो काढत होता..... फोटो काढत असतांना हे पील्लु...."ईशान" त्याचं नाव....इतक मध्ये मध्ये करत होत की बस्स!...पण हर्षद त्याला अजिबात रागावत नव्हता....त्याच्याजवळचा कॅमेरा प्रचंड महागडा होता......तो किंमती कॅमेरादेखिल तो ईशानच्या हातात देत होता...त्याला कडेवर घेउन कॅमेरा कसा वापरायचा ते दाखवत होता.....अवघ चार वर्षाच पोरग ते....सगळ बघतांना जाणवलं.....खुप लाडका दिसतोय लेक......!!!

कार्यक्रम संपला आणि बाहेरच्या कट्ट्यावर आम्ही विसावलो. ती खुप भरभरुन बोलत होती. "शोभा वहीनी खुप नवसा सायासांनी झालाय हा. सीमरनच्या पाठीवर खुप वर्षांनी दिवस राहीलेत...आम्हाला दोघांनाही आनंद झाला, पण हा आनंद जास्त दिवस टिकला नाही.......ती "एक्टोपीक प्रेग्नसी" निघाली. हजारात एखादीच केस. गर्भ नलिकेतील गर्भ धारणा....तीला काढुन टाकण्याशिवाय गंत्यंतरच नसते. गर्भाची वाढ होता होता नलिका फुटली तर आणखीनच गुंतागुंत. खुप जिवावरच्या गोष्टी. पुढे दिवस रहाण्याची शक्यता पन्नास टक्के!! या सगळ्या संकटाना तोंड देउन उभी राहीले...मला मुलगा हवा होता मग नवस-सायास, डॉक्टरी उपाय.....सीमरनच्या पाठीवर तब्बल बारा वर्षांनी झालाय हा. मला मुलगा हवाय ही माझी प्रबळ इच्छाशक्ती!!! माझी गाढ श्रद्धा आहे गणेशावर. मला मुलगा हवा होता.....झाला.....एवढा एकच हट्ट केला त्याच्याकडे बाकी मला कशाचीही तक्रार नाही. ईश्वराने जे जे दिलय ते मी आनंदाने स्विकारलय. जीवनातला प्रत्येक क्षण त्याचाच प्रसाद वाटतो मला. मध्यंतरी हर्षदची नोकरी गेली....पण नाही डगमगले......माझं फॅशन डिझायनिंगच शिक्षण कामाला आलं......किति दिवस घरी होता, पण सांभाळला संसार...नेटाने आणि मग सिंगापुरचा असा सोन्यासारखा जॉब मिळाला....आम्ही सगळे होतो तिथे.....पैसा....मानमरातब.....गाडी....सुंदर घर....तिथलं ऐश्वर्यपुर्ण जिवन जगलो....आता सिंगापुरच काम घरबसल्या नेटवर करतोय....पुण्यात सेटल झालोय....मग आता आश्रमातल्या सगळ्या कार्यक्रमांना यायला मिळतं. मी तीच सगळ बोलणं ऐकुन चकितच झाले होते. मनात एक पुसटसा विचार येउन गेलाच. कुठल्याही गोष्टीसाठी इतका अट्टाहास करणं बर नाही. तरीही तीला भेटुन छान वाटल. ती खुप भरभरुन बोलत होती. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी....तीच्या त्याच्यावर असलेल्या दृढ निष्ठेविषयी. कुठलाही प्रसंग येउदे मी इथे येणारच....मी येणार आणि माझ्याबरोबर अनेकांना घेउन येणार...सांगत होती...मी खुप जणांना या आश्रमाविषयी सांगत असते. आमची पुण्याहुन येणा-यांची संख्या वाढली आहे, आम्ही मोठी गाडी करुनच येतो.....मी तीला म्हटलं, "श्रीया, तु जे काही बोलतेय ते मला पटतय....पण असं बघ संसाराच्या त्रासातुन क्षणभर विश्रांती मिळावी म्हणुन आपण इथे येतो. सगळ मनासारख होत तोपर्यंत आपण ईश्वर ही संज्ञा मानत असतो. वारंवार मनाविरुद्ध घटना घडायला लागल्या की विश्वास उडायला लागतो......देव नाहीच या जगात अस वाटायला लागत......साधारण आशीच धारणा असणारे माणसं असतात जगात. त्यावर ती ठामपणे म्हणाली "नाही, असं नाहीच मुळी, माझ्या आयुष्यात कुठलाही प्रसंग घडु दे.......माझा नाही विश्वास उडणार.....ईश्वरी शक्ती आहे आणि ती जाणवत रहाते......मी तीच्या निश्चयी चेहे-याकडे बघतच राहीले होते...तरीही मी बोलतच होते......"अग बघ, हर्षदची नोकरी गेली, पण त्याला काही दिवसांतच का होइना सिंगापुरला नविन नोकरी मीळाली, आता ते काम पण तो पुण्यात राहुन करु शकतोय.....दोन सुंदर मुली....त्यांच्या पाठीवर मुलगा हवा होता, तो पण झालाय....सगळ हव हवय तोपर्यंतच असते ही श्रद्धा!! आमच्या दोघींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. एकमेकींचा निरोप घेतांना गणेश जयंतीला भेटायचच अस ठरवुन आम्ही निरोप घेतला. एक जाणवल, लहान वयात खुप समज आली होती तीला.

गेल्या वर्षीच्या गणेश-जयंतीच्या कार्यक्रमाला ती अशीच आली होती उत्साहाच वारं घेउन. पन्नास सीटच्या बसने सगळे आले होते......भरगच्च कार्यक्रम!! माणसांचा लोटलेला महापूर!! तेवढया गडबडीतही आम्ही एकमेकांना भेटलो.....हर्षद मस्त बोलत होता....लहानग्या ईशानसाठी आणलेला चॉकलेटचा बॉक्स मी त्याला दिला, त्यावर स्वारी एकदम खुश झाली होती....त्यातलं एकेक चॉकलेट दोन्ही तायांना पण उदार होऊन दिलं होतं. श्रीयाने त्याला "थॅंक्यु म्हण" अस म्हटल्यावर माझ्याजवळ येउन एक छानशी पापी देत "थॅंक्यु, शोभा वहीनी" अस म्हटल्यावर त्याच्या या स्पेशल "थँक्यू" ला आम्ही सगळे खुप हसलो होतो. आमचा सगळ्यांचा निरोप घेउन ते पाच वाजता निघाले.....आठ वाजेपर्यंत पुण्यात.....!!!आम्ही घरी पोहोचलो तेव्हा पार दमलो होतो. मी बाल्कनीतल्या झोपाळ्यावर शांत बसले होते.....आश्रमातल्याच गाण्याची सी.डी. लाउन..............!!

तेरे फुलोंसे भी प्यार, तेरे कॉंटोंसे भी प्यार........!!!

आज हे गाणं असं खोल काळजात कां जाउन भिडत होतं, कुठली अस्वस्थता आली होती मनाला तेच कळत नव्हते...... .शांतपणे गालावरुन अश्रु ओघळु द्यावे त्यांना थांबवुच नये असं वाटत होतं. अचानक फोन खणखणला.......दचकल्यासारख झालं. फोन घेतला......सुजयचा फोन होता......त्याने दिलेली बातमी भयंकर होती. ह्रदयाचा थरकाप उडवणारी होती. हर्षद आणि श्रीया यांचा ग्रुप ज्या बसने गेला होता तीला एक्सप्रेस हायवे वर अपघात झाला होता. गाडीचे तीन टायर फुटले होते........गाडी उलटी पालटी होत दुरवर जाउन आदळली होती.....सगळी माणसं इतस्तत: विखुरली गेली होती. अजुनही कोणी गेल्याची बातमी नव्हती...पण हर्षद आणि ईशान सापडत नव्हते. बातमी ऐकली आणि सुंन्न होऊन मी सोफ्यावर बसले. अर्ध्या तासाने परत फोन वाजला....सुजयचाच होता.........वहीनी फार वाईट बातमी आहे....हर्षद आणि ईशान दोघही दुर फेकले गेले आणि मृत सापडले....मी धाडकन फोन आपटला, मनातला आक्रोश अश्रुंच्या रुपात बाहेर पडला...अरे देवा सगळे वाचलेत मग ह्यांनाच कां नाही वाचवलस रे!! डोळ्यातुन ओघळणा-या आसवांना आणि मनात काहुर उठवणा-या प्रश्नांना उत्तरच नव्हतं. ह्यांनी माझ्या हातात गरम चहाचा कप दिला, पाठीवरुन हात फिरवत म्हणाले....उठ रडु नकोस...आपल्याला पुण्याला जायला हव.......पण नाही गेले मी....माझ्यात धैर्यच नव्हत तीला भेटायचं...कुठल्या शब्दांनी सात्वंन करणार होते मी तीच?

आज बरोबर एक वर्ष झालं या घटनेला. दुख-या आठवणींच्या खपल्या घेउन माझे पाय आश्रमाकडे वळलेत. मनावर मरगळ आली होती. तीच्या आठवणींनी हळव झालं होतं मन. तीने येउच नये कार्यक्रमाला.....सगळच्या सगळ सुख ओरबाडल गेल....आता काय शिल्लक राहीले होते हातात.....विचारांच्या संभ्रमावस्थेत रांगेत उभी होते....पाठीमागे वळुन बघितलं तर दुरवर रांगेत ती उभी होती....तीच्या दोघी मुलींना घेउन....!! मागे जाउन तीच्या जवळ पोहोचले.....माझी नजर उगीचच अपराधी.....तीचा हात हातात घेतला अन माझ्या डोळ्यातले अश्रु तीच्या हातावर पडत होते......भेटायच होतं ग तुला....पण नाही भेटु शकले...प्रचंड दु:ख हृदयात साठवुन ती उभी होती...माझ्या खांद्यावर हात ठेउन म्हणाली "बोलु या जरा वेळ.....माझ झालं की बाहेर बसु"

बाहेरच्या कट्टयावर मी खीन्नपणे बसले होते.....दुरुन मुलींसह तीला येतांना बघीतले आणि मनातली खीन्नता आणखीनच वाढली. ती जवळ आली......क्षणभर मी तीला मीठीच मारली. माझ्या खांद्यावर मान ठेउन ती रडत होती......मुक्तपणे......अगदी थोडाच वेळ.....मग एकदम शांत झाली. कपाळावर आता मोठया टिकलीच्या जागी उगीचच दिसेल न दिसेल अशी छोटी टिकली लावली होती......चेहेरा भकास दिसु नये म्हणुन......अन हातात ते गोजीरं पिल्लुही नव्हतं. एकाच क्षणी "सौभाग्यवती" आणि "पुत्रवती" दोन्हीही भाग्य तीच्या कपाळावरचे पुसले गेले होते.......कशाला आलीस ग ? माझा त्रागा शब्दात प्रकट होत होता.....अन ती बोलत होती......."दोघही गेलेत.....माझ्या कपाळावरच भाग्य पुसलं गेलं हे तर नक्कीच.....पण या मुलींची "आई" म्हणुन मी जगणार आहे. मी नाही रागावलेय "त्याच्यावर".....ते दोघही गेलेत.....पंचमीच्या दिवशी.......त्यांचे प्राण पंचतत्वात विलिन झाले.......आम्ही तीघी वाचलोत. हात, पाय, डोकं सगळ शाबूत.....आमच्यापैकी एखादीचा हात किंवा पाय कापला गेला असता किंवा आणखीन काही झालं असत तर जन्मभराच अपंगत्व घेउन जगाव लागल असत. ज्यांच संपल ते गेले पण मागे उरलेल्यांना तर धडधाकट ठेवलं ना.....? माझ्या बछड्या......त्यांचा काय गुन्हा? मी रडका, सुतकी चेहेरा करुन बसले तर त्यांनी कुठे आनंद शोधायचा.....मी परत नव्याने उभी रहाणार आहे....माझ्या मुलींची आई आणि हो "पप्पा" म्हणुन.....ठामपणे....!!! फॅशन डिझायनींग परत सुरु केलेय. "हवा दिसत नाही, सुगंध दिसत नाही म्हणुन नसतो का तो? जाणवते ना हवा, जाणवतो ना सुगंध?? ते दोघही आहेतच आमच्यात....आमच्या आजुबाजुला वावरताहेत पण हे सगळ मला जाणवलय....."त्याने" दिलीय ही दृष्टी मला पण माझ्या मुली लहान आहेत अजुन त्यांना हे सगळ कसं कळणार? म्हणुन मीच होणार त्यांची "पप्पा" आणि ईशानच म्हणाल तर आम्ही त्याला गेल्या राखी पोर्णिमेला शोधलय. सिंधुताई सपकाळांच्या आश्रमात......दोन दिवस मुलींना घेउन राहुन आले मी तीथे, त्याच्या सहवासात.....माझा जम बसला की त्याच्या शिक्षणाचापण खर्च उचलण्याचा प्रयत्न करणार आहे मी.

शांत शांत होऊन गाभा-यातल्या गणपतीची मुर्ती आठवत होते. त्या निश्चल मुर्तीच्या जागी मला तीचा चेहेरा दिसू लागला......!!! अन आजुबाजुला हर्षद फोटो काढतोय..... लहानगा ईशान लूडबूड करतोय.....अरे आहेतच की ते इथे......!!! लताच्या गाण्याच्या शेवटच्या ओळी मनात उमटत राहील्या........!!!!

"हमको दोनो है पसंद, तेरी धुप और छॉव....
दाता किसी भी दिशामें ले चल जिंदगी की नांव...
चाहे हमे लगादे पार, डुबा दे चाहे हमे मजधार....
जो भी देना चाहे दे दे करतार...दुनियांके तारनहार.....!!!


**********************************************************